Weight is not fifty but fifty-five is perfect .. How should we look at the changed weight scale? | वजन पन्नास नव्हे पंचावन्न परफेक्ट.. बदलेल्या वजन परिमाणाकडे आपण सामान्यांनी कसं बघावं?

वजन पन्नास नव्हे पंचावन्न परफेक्ट.. बदलेल्या वजन परिमाणाकडे आपण सामान्यांनी कसं बघावं?

- डॉ अंजली औटी 

राष्ट्रीय पातळीवर बदललेल्या शरीर प्रमाण मानकांचं खरोखरच स्वागत आहे, कारण त्यानुसार एकूणच आपल्या जीवनमानाचा दर्जा सुधारला आहे हे सिद्ध होतं. भारतीय लोकसंख्येला चपखल लागू होईल अशी आदर्श, समग्र परिमाणं, मोजमापं जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात प्रमाण मानणं तसं खूप आव्हानात्मक काम आहे. कारण आपल्या भारतीयांच्या फक्त परंपराच नाही तर आपली व्यक्तिमत्त्व, जाणिवा, आवडी-निवडी, आहारसवयी आणि पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. त्या विविध भौगोलिक रचना, बदलणारे ऋतू आणि हवामानाला अनुकूल असलेल्या आहेत. जगणं अर्थपूर्ण बनवणारी ही  विविधताच जागतिक पातळीवर आपली ओळख आणि ताकद आहे. भारतीय समाजजीवनाचा विचार या सगळ्या बाजू लक्षात घेऊन करावा लागतो. या पाश्र्वभूमीवर शहरी भाग आणि शहरांच्या प्रभावाखाली असलेला ग्रामीण भाग वेगळा काढला तरी अजूनही प्राथमिक सोयी-सुविधांपासून वंचित असलेला आणि भौगोलिक दृष्टीनं दुर्गम असलेला खूप मोठा म्हणजे जिथे नेटवर्क पोहोचत नाही असा खरा ग्रामीण भाग आणि समाज यांच्यासाठी जगण्याचं वास्तव अजूनही केवळ दोन वेळा पुरेसं पोटभर जेवण मिळवण्यासाठी जगणं, असंच आहे. कुपोषण ही त्यांची खरी आहार समस्या आहे. पोषणमूल्यांचा अभाव, कमतरता यांचा त्यांच्या शारीरिक-मानसिकवाढीवर प्रभाव आहे. अशी आदर्श परिमाणं त्यांच्या जगण्याचा भाग आज होऊ शकत नाहीत; पण शहरी समाजात या सा:याचं महत्त्व वाढतं आहे.

आदर्श परिमाणं म्हणजे आरोग्य नव्हे! 

आदर्श परिमाणं म्हणजे निरोगी आणि आरोग्यदायी व्यक्ती असं समजायचं का?
-  तर आरोग्याचं खरं मोजमाप ते नाही. असा अभ्यास करण्यामागे संशोधकांचे हेतू आणि उद्देश वेगवेगळे असतात. त्यांच्या निष्कर्षाचे आधार वेगळ्या संदर्भात महत्त्वाचेही असतात. त्यांनी प्रस्तुत केलेल्या आकडय़ांचा आधार अनेक सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रांना आपल्या उत्पादनांची गुणवत्ता वाढवण्यासाठी घेता येतो. शारीरिक सौंदर्य आणि आरोग्याशी निगडित असलेले लहान-मोठे उद्योग-व्यवसाय कंपन्या, सिनेमा आणि जाहिरात कंपन्या अनेकदा आपल्या आर्थिक फायद्यासाठी त्याचा वापर करतात. त्यातून सर्वसामान्य लोकांर्पयत संशोधनाच्या हवाल्यानं भलतेच,   कित्येकदा अनारोग्यकारक अर्थ आणि धारणाही पोहोचतात. मध्यंतरी ‘झिरो फिगर’चा ध्यास घेऊन त्यासाठी कितीतरी 
तरुणींनी आयुष्यभराचं नुकसान करून घेतलं. प्रत्येकाला कमीतकमी प्रयत्नांनी फक्त या मापामध्ये बसायचं आहे; पण स्वत:साठी काय महत्त्वाचं, काय योग्य याचा वैद्यकीय सल्ला फार कमी लोक घेतात.
  *आरोग्याचा विचार प्रत्येकासाठी वेगळा आहे, कारण आपली जीवनशैली वेगवेगळी आहे. आहाराची गरजही वेगवेगळी आहे. 
*आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, शारीरिक स्थितीप्रमाणे आणि ऋतुमानानुसार आहारात बदल होत जातात. उदा. गर्भवती स्रिया आणि लहान मुलं यांची पोषक आहार गरज जास्त असते. प्रौढ लोक, वृद्धांना मोजका आहार पुरतो.
* कामाचं स्वरूप, शारीरिक श्रमांची तीव्रता यानुसारपण आहार बदलतो. शरीराच्या सगळ्या पोषण गरजा पूर्ण करणारा, शरीर आणि मनाचं संतुलन योग्य राखणारा आहार ‘संतुलित’ समजला जातो.
* शरीराची पोषण गरज वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाला गरजेप्रमाणे नेमके पोषक घटक मिळणं आवश्यक असतं. त्यानुसार कोणाला दिवसातून चार वेळा थोडय़ा थोडय़ा प्रमाणात आहार लागतो तर कोणाला दिवसातून एकदा पूर्ण जेवण केलेलं   पुरतं.
*आठवडय़ातून एक दिवस संपूर्ण लंघनही फायद्याचं ठरतं; पण हा विचार न करताच आपण आपल्या सोयीप्रमाणे वागतो. 
*खरं तर लठ्ठपणा किंवा स्थूलता भारतीय आजार नाही; पण आज कोटय़वधी भारतीय लोकं लठ्ठपणानं त्रस्त आहेत, कारण शारीरिक हालचाल, कष्ट आणि आहार यांचं प्रमाण कितीतरी पटीत व्यस्त आहे. गरजेपेक्षा कमी किंवा जास्त खाणं, अवेळी खाणं आणि एकूणच अर्निबधता ही अनेकांच्या जगण्याची शैली आहे.
* याचा फायदा मोठय़ा खाद्य आणि औषध, फिटनेसशी निगडित उद्योगांनी व्यवसायासाठी करून घेतला तर त्यात चूक कोणाची? आपण तंदुरुस्त असावं असं कोणाला वाटत नाही? 
*जाहिरातींना बळी पडणारा सामान्य माणूस असे ‘आदर्श आकडे’ आरोग्याचे निदर्शक समजतो आणि त्याच त्या चक्रात सापडतो. आकडे केवळ संदर्भासाठी असतात. 
*शहरी भागात तरु ण मुली आणि महिला अक्षरक्ष: अपूर्ण पोषित आहेत. शरीराला आवश्यक असलेल्या घटकांची कमतरता पुढच्या पिढीलाही कमजोर बनवते आहे. 

*किती प्रमाणात, काय खायचं याबाबतीत आपलं पोट आणि मन योग्य तो  कौल वेळोवेळी आपल्याला देत असतं.  त्याकडे दुर्लक्ष केलं की मन आपली लक्ष्मणरेषा ओलांडतं मग त्याचा परिणाम शरीरावर होतो.
* शरीराची संपूर्ण आणि निरोगी वाढ होण्यासाठी सुयोग्य पोषण मिळणं गरजेचं असतं. स्नायू बळकट राहाण्यासाठी योग्य प्रमाणात व्यायामाचीही गरज आपल्याला असते. शरीरातील फॅट आणि मसलमास यात फरक आहे. वय, वजन, उंची आणि आरोग्याचा आहाराशी असलेला नेमका संबंध योग्य वयातच समजायला हवा. 
*पोषण, व्यायाम आणि झोप यांचे योग्य प्रमाण ही आरोग्याची त्रिसूत्री आहे. आपलं शरीर स्वस्थ, निरोगी ठेवणं, आपले आयुष्य चांगलं जगण्यासाठी करायचं आहे, हे भान जागं असलं तरी पुरे. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वजनाची परिमाणं कोण कसं ठरवतं?
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूट्रिशननं भारतीयांसाठी आदर्श वजन आणि उंची किती असायला हवी यांची परिमाणं बदलली आहेत. 
*2010 मध्ये पुरु षांसाठी 60 किलो तर महिलांसाठी 50 किलो वजन योग्य मानले जात असे, जे आता पुरु षांसाठी 65 किलो तर महिलांसाठी 55 किलो असावं असं म्हटलं आहे.
* 2010मध्ये पुरु षांसाठी 5 फूट 6 इंच आणि महिलांसाठी 5 फूट असलेली शारीरिक उंचीची परिमाणं आता बदलून पुरु षांसाठी 5 फूट 8 इंच तर महिलांसाठी 5 फूट 3 उंच अशी आदर्श मानण्यात आली आहेत.

* म्हणजेच भारतातील लोकांसाठी आदर्श असलेले बॉडी मास इंडेक्सही आता बदलले आहे. लोकांच्या पोषण सवयी अधिक सकस झाल्या म्हणून हे प्रमाण बदललं असं संशोधकांचं म्हणणं आहे. 

 (लेखिका समुपदेशक आहेत.)
anjaliauti@yahoo.com

Web Title: Weight is not fifty but fifty-five is perfect .. How should we look at the changed weight scale?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.