We are Open: - Free moments to reduce loneliness among immigrants | वुई आर ओपन:- स्थलांतरितांमधला एकटेपणा कमी करणारे मोकळे क्षण
वुई आर ओपन:- स्थलांतरितांमधला एकटेपणा कमी करणारे मोकळे क्षण

-शुभांगी जगताप-गबाले


व्हॉलेण्टिअर -Volunteer - आणि  व्हॉलेण्टिअरिंग - volunteering या शब्दांना  पश्चिमी समाजात एक विशेष जागा आहे. या शब्दांमागची भावना आणि जबाबदारी याकडे इथे अतिशय गांभीर्यानं पाहिलं जातं. समाजाप्रतिची बांधिलकी याखेरीज इतर अनेक संदर्भात ही कृती इथल्या सामान्यांच्या रोजच्या जगण्यात, मानसिकतेत अन् व्यवस्थात्मक व्यवहारातही खोलवर रुजलेली आहे. युद्धांचा कुरूप वारसा अन् इथली भौतिक समृद्धी ही दोन्ही टोकं कारणीभूत आहेतच; पण खास म्हणजे लोकांच्या जाणिवेत ही समज मुरलेली आहे. 

सामान्य नागरिकांचे, युवकांचे कितीतरी कम्युनिटी ग्रुप्स, छोटी-मोठी सेंटर्स, साहायकारी गट लोकांच्या समस्या केंद्रीय ठेवून त्यावर पोटतिडकीनं काम करताना इथे पाहता येतात. विशेषत:  ग्रंथालयं, शाळा, दवाखाने, चॅरिटी शॉप्स (लोकांनी दान केलेल्या वस्तूंची स्वस्त विक्री दुकानं) ते अनेक सामाजिक, स्वयंसेवी संस्थांमध्ये असंख्य व्हॉलेण्टिअर्स उत्साहानं राबत असतात. याला कुठल्याच वयाचं, वर्गाचं, मागे चिकटलेल्या पदाचं वावडं नाही. नोकरीसाठीच्या  बायोडेटामध्येही या कामाचं अनुभवमूल्य हमखास जमेस धरलं जातं. व्हॉलेण्टिअरिंग हा इथे कोणत्याही करिअरचा पहिला टप्पा मानला जातो. व्हॉलन्टिअरिंगशी जोडून घेऊ इच्छिणा-याना रीतसर प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणारी कौन्सिलची सेंटर्स जागोजागी उभी असलेली दिसतात. इतकं हे काम जागरूकपणे केलं जातं. व्हॉलेण्टिअर या शब्दाचा एक लांबलचक इतिहासच हा देश बाळगून आहे खरं म्हणजे. मुळात व्हॉलेण्टिअरिंग मधल्या आस्थेशी एकवटलेली कामं या शब्दाची  व्यापक जाणही  इथे कळीची आहेच. काम या गोष्टीचं एक निराळं मूल्यभान हा समाज राखून आहे. कामाशी निगडित सामाजिक उतरंडी अन् त्यावरून जोखली जाणारी प्रतिष्ठा याची लागण हरएक समाजाला आहेच आहे. तथापि, इथे ती अनेकदा धूसर झालेली अनुभवता येते. म्हणजे घरा-दारातली बारीकसारीक काम मदतनिसाशिवाय व्यक्तिगतरीत्या अधिक करून निपटत राहाणं हे तर कॉमन झालं; पण सार्वजनिक अवकाशातही या रेघा पुसट होताना दिसतात.

एखाद्या कॅफेमध्ये काउण्टरमागे कॉफी बनविणारी, त्याचं बिल करणारी मुलगी कॅफे बंद व्हायची वेळ झाली की झटकन हातात व्हॅक्युम क्लीनर घेऊन वा फडकं घेऊन स्वच्छता करू लागते. हेच रेस्टॉरण्ट्समध्ये, दवाखान्यातून, शाळांमधूनही दिसत राहातं. डॉक्टर केबिनमधून उठून प्रत्येक रुग्णापर्यंत येतो, त्याला घेऊन केबिनमध्ये जातो. त्याच्या हाताखाली कम्पाउण्डर नावाचा माणूस दिमतीला नसतो. वकील आपल्या अशिलाला घ्यायला चार मजले उतरून खाली येतो अन् बोलणी झाल्यानंतर पुन्हा पोहोचवायलाही येतो. शाळांमध्ये टीचर असिस्टंट असतात. शिपाई हा प्रकार नाही. अगदी प्रिन्सिपलच्या हाताखालीही असं कुणी नसतं.  शाळामधून निघणा-या  सहली, पिकनिक वा कोणत्याही इव्हेण्टमध्ये पालक व्हॉलेण्टिअर म्हणून खुशीनं सहभागी होतात. आम्ही राहतोय त्या इमारतीचा प्रॉपर्टी मॅनेजर अधेमधे स्वच्छता करण्याचं कामही करतो. कामाकडे निव्वळ काम म्हणून पाहणारी अन् आपल्या नजरेला सकसता पुरवत राहणारी अशी अनंत उदाहरणं इथे सतत आसपास वावरत असतात. कामाप्रतिचं हे भानच कदाचित व्हॉलेण्टिअरिंगच्या विचारतळाशी झिरपत असावं. या  धर्तीवर निर्वासित आणि व्हॉलेण्टिअरिंग या दोन्हींबाबत माझी समज वाढत होती.  अखेर  शोधाशोधीतून  ‘हार्बर प्रोजेक्ट’ या निर्वासितांच्या सुखरूपतेसाठी झटणा-या  एनजीओ तथा स्वयंसेवी  संस्थेची माहिती हाताशी लागली. पूर्वी सेंट ल्यूक चर्चची इमारत असलेल्या जागेत या संस्थेचं ऑफिस आहे. लोकांनी सतत वाहणारं. मग तिथे व्हॉलेण्टिअरिंगबाबत विचारणा करता समजलं, ऑनलाइन अर्ज करावा लागेल नि आधीचेच असंख्य अर्ज पेंडिंग असल्यानं कमीत कमी तीन-चार महिने वाट पाहावी लागेल असंही. व्हॉलेण्टिअर ते  बिझिनेस मॅनेजर  असा आलेख गाठलेली याझमीन हे सगळं समजावून सांगत असताना ते ऑफिस उगाचंच आवडून गेलं. मुळात त्याला ऑफिसचा नाही तर घराचा फील वाटला म्हणून. ये-जा करणा-याच्या पुष्कळ  गर्दीतही अजिबात गोंगाट न करता शिस्तीत सुरू असलेली कामाची धांदल अन् लोकांच्या खातपीत सुरू असलेल्या गप्पा हा सगळा माहौलच खूप खास वाटला. कित्येक बारीकसारीक तपशील मागणारा भलामोठा अर्ज त्या दिवशीच भरून टाकला. सध्या हार्बरमध्ये व्हॅकन्सी नाही, पण तोवर स्वीडन सिटी ऑफ  सँक्चुअरी  (Swindon city of sanctuary - SCOS) या संस्थेकरिता तू काम करू शकतेस, त्यांच्या ‘वी आर ओपन’ या उपक्र मासाठी हे सुचवणारी मेल दुस-याच आठवड्यात आली अन् माझी वाट बघण्यातली धाकधूक तिथेच संपून गेली. SCOS हीदेखील राष्ट्रीय स्तरावर निर्वासितांसाठी काम करणारी  एनजीओ. अनेक शहरात तिच्या शाखा आहेत.  हार्बर ही स्थानिक चॅरिटी. इथे या दोन्हींचं काम वेगळ्या पद्धतीनं,  निराळे अजेंडे समोर ठेवून पण एकमेकांच्या संगनमतानं चालतं.  

काय आहे हा ‘वी आर ओपन’? तर, SCOS कडून हा सेशन प्रत्येक गुरुवारी इथल्या एका कॅफेमध्ये संध्याकाळी दोन तासाकरिता भरवला जातो. मीट-अप असंही म्हणू शकतो याला. या तीन शब्दांचा साधासा अर्थ आहे, तुम्ही या शहरात नवे आहात, अजून ओळखी व्हायच्या आहेत, एकटं वाटतंय, बोलायला कुणी नाही  वा मित्न बनविण्याची, सोशलायझेशनची आवड आहे, गाणं, संगीत, नृत्य यात रस आहे, तर इथे या कॅफेमध्ये या, आणि स्नॅक्स, कॉफीची मजा घेत घेत इथल्या माहौलमध्ये रमून जा. वी आर ओपन.. 

 खास निर्वासितांसाठी चालवला जाणारा हा उपक्रम कुणाहीसाठी खुला आहे खरं तर. हे स्नॅक्स नि कॉफी अर्थात मोफत असते. जोल आणि  सारा हे  ब्रिटिश तरुण-तरु णी व्हॉलेण्टिअर या नात्यानं अत्यंत उत्साहानं हा सेशन हाताळतात. यापैकी जोल पक्का ब्रिटिश. एका कंपनीचा मालक, तर साराचं कुटुंब मूळ इस्त्रायलचं; पण ती इथेच जन्मलेली. कुठल्याही औपचारिकतेशिवाय या दोघांनी मला इथलं काम समजावून दिलं आणि भारताविषयी उत्सुकतेनं गप्पाही मारल्या. जोलनं जवळपास सगळा दक्षिण भारत पालथा घातलाय आणि भारतीय पदार्थ त्याला एकदम प्रिय आहेत. वेगवेगळ्या देशांची ओळख मिरविणारे असंख्य चेहरे एकमेकांशी हसत-खेळत, गप्पा मारताना एका छताखाली मी इथे पहिल्यांदा पाहिले. बहुतेकजण एकमेकांसोबत समोर टेबलावर मांडलेले वेगवेगळे गेम्स खेळण्यात मग्न होते. हे गेम्स खेळण्यासाठी अन् गप्पासाठी तुमची एकमेकांशी ओळख असण्याची अजिबात गरज नाही ही नंतर लक्षात आलेली विलक्षण गोष्ट माझ्या भारतीय मनावरची जळमट काढत माझी  समजूत विस्तारणारी होती. मुळात कुणाही अनोळखी व्यक्तीशी पुसटशीही नजरानजर होताच ब्रिटिश माणूस झटकन एक स्माइल देतोच. हाय.. हॅलोही सहज म्हणतो. ब्रिटिशेतर माणसं मात्र एकाच देशा-वेशातली असली तरी एकमेकांच्या नजरा चुकवत, पाहून न पाहिल्यासारखं करत थंड चेह-यानं एकमेकांसमोरून निघून जातात. संस्कृती-सभ्यतेतल्या या बारीकसारीक  रेषा इथे अशा नकळत ठळक होत राहातात. 

‘वी आर ओपन’ हा उपक्र म मुख्यत: निर्वासितांना समोर ठेवूनच सुरू झाला. त्यांच्यापैकी बहुतेकजण एकट्यानं प्रवास करतच इथवर पोहोचलेले असतात. पुरुष, स्त्रिया कुणीही. काही कुटुंबासहितही असले तरी तुलनेनं कमी. इथल्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं इंग्रजी बोलण्याचे धडे घेत आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करत ते मेटाकुटीला येतात. यात भर पडते इथल्या विचित्र  हवामानाची. कधीही सुरू असणारी पावसाची भुरभुर आणि हुडहुडी भरविणारी थंडी. विशेषत: संध्याकाळी पाच-सहालाच सगळी दुकानं एकसाथ बंद होऊन रस्ते सुनसान वाटू लागतात. पब आणि रेस्टॉरण्ट्स वगळता.  या वेळात फिरण्याकरता, काही करण्याकरता फारसे पर्याय नसतातच. 
हिवाळ्यातले दिवस तर दुपारी तीन-चारलाच अंधारून येणारे. नव्यानं इथे आलेल्यांना हे सगळं अस्वस्थ करणारं, एकटेपण वाढवणारं असतं. आणि धास्तावणारही.  एकट्यानं राहणार्‍यांसाठी तर अधिकच. रेफ्युजीपण नवखं असणा-या अन् अनेक टक्के-टोणपे झेलत इथं एकट्यानं पोहोचलेल्यांना तर हे सगळं असह्य होणारं असतं. आधीच निर्वासित म्हणून राहण्या-खाण्यापासून सगळ्याच तर्‍हेची  ओढाताण आणि इथलं  बेभरवशी वातावरण यामुळे बहुतांशी निर्वासित मानसिक तणावाखालीच असतात. अशा लोकांना मनोरंजनाचे, मन रमविण्याचे काही निवांत क्षण मिळावेत, त्यांचे ताण काहीसे निवळावेत, आपल्यासोबत आपल्यासारखे आणखीही दोस्त आहेत इथे हा दिलासा मिळावा या हेतूनं हा ‘वी आर ओपन’ सेशन दर आठवड्याला नेमानं साजरा होतो. टाउन सेंटरमधला कॅनल कॅफे यातूनच इथल्या सर्व रेफ्युजी दोस्तांकरिता एक हक्काची जागा बनला आहे.  

 गुरु वारी 6.30 ते 8.30 या वेळात अनेक स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी इथे येतात, एकमेकांविषयी आस्थेनं विचारपूस करतात. खातपीत मनसोक्त गप्पा मारतात, गेम्स खेळतात. कधी स्थानिक गायक, संगीतकारांचे लाइव्ह म्युझिक बॅण्ड बोलावून एखादी संध्याकाळ संगीतमय केली जाते. कधी स्थानिक कलाकारांना आपली एखादी कला सादर करण्यासाठी बोलावलं जात. निर्वासितपणाखाली सतत उपरेपणाशी झगडत राहणा-या या समूहाला इथल्या संस्कृतीशी जोडण्याचा हा एक छोटासा प्रयास..

(लेखिका इंग्लंडमध्ये वास्तव्याला असून निर्वासितांसाठी काम करणा-या संस्थेशी संलग्न आहेत)

shubhangip.2087@gmail.com


Web Title: We are Open: - Free moments to reduce loneliness among immigrants
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.