Tsarenjaw Soudenopil from Mongolia who solves the problem of money and environment by art through waste. | मंगोलियातल्या त्सरेनजावनं महिलांना दिला कच-यातून उत्पन्नाचा नवा मंत्र!
मंगोलियातल्या त्सरेनजावनं महिलांना दिला कच-यातून उत्पन्नाचा नवा मंत्र!


-डॉ. विनिता आपटे

कचरा व्यवस्थापन करण्यासाठी महिलांचा सहभाग असेल तर गोष्टी चांगल्या प्रकारे बदलू शकतात. आजवर अनेक सामाजिक परंपरा आणि रूढी महिलांमुळे बदलल्या आहेत. मग कचरा व्यवस्थापन करणं यात अवघड काय आहे?’ त्सरेनजाव सॉडनॉँपिल ही मंगोलियात उलनबतर येथे राहणारी सामान्य महिला एका आंतरराष्ट्रीय परिषदेत स्वत:चे विचार मांडत होती. तिचं या क्षेत्रातलं कर्तृत्व असामान्य असंच. सुरुवातीला धोरणकर्त्यांनी महिलांना कचरा व्यवस्थापनाच्या कामात घ्यायचं नाही असं ठरवलेलं असताना या महिलेनं उचललेलं पाऊल निश्चितच कौतुकास्पद होतं.

महिला कचरा व्यवस्थापनाच्या कामात अडथळा ठरू शकतील.  कारण जे हात घरकाम करतात, घरातला कचरा बाहेर टाकण्याचं काम करतात ते हात कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावू शकणार नाहीत, असं काहीसं विनोदी तत्त्वज्ञान सांगणा-या  मंगोलियन धोरणकर्त्यांना तिनं तिच्या कामातून एक चांगला धडा दिला आहे. 
त्सरेनजाव म्हणते की, ‘मला कोणतंही एखादं क्षेत्र महिलांसाठी नाही ही कल्पनाच सहन होत नाही.  त्यातून महिलांची कल्पकता आणि वस्तूंचा पुनर्वापर करण्याची क्षमता यावर माझा चांगलाच विश्वास आहे. सुरुवातीला कष्टाचं वाटणारं हे काम उपजीविकेचं साधन आहे यावर विश्वास ठेवणा-या  महिला मला मिळाल्या त्यामुळेच मी अशाप्रकारचं काम उभं करू शकले.
आज मी कच-या चा पुनर्वापर करून वेगवेगळ्या आकर्षक आणि सुंदर वस्तू बनवायला शिकवते. त्या वस्तू आम्ही ऑनलाइन विकतो त्यासाठी आमची स्वत:ची वेबसाइट आहे. यातून आमच्या उपजीविकेचं साधन आम्हाला मिळालं आहे. मी आणि माझ्या मुली महिलांना प्रशिक्षण देतो. प्रशिक्षण घेऊन तयार झालेल्या महिला, त्यांनी तयार केलेल्या वस्तू आमच्या वेबसाइटवर टाकतात. त्या वस्तूंचे सर्व पैसे थेट त्यांच्याच खात्यावर जमा होतात.
हे  प्रशिक्षण केंद्र चालवताना मात्र  अजूनही कित्येकदा बरेच अडथळे येत असतात. प्रशिक्षण घेण्यासाठी जो खर्च येतो तो करण्याची तयारी आमच्या समाजात अजूनही नाही, तशी मानसिकता तयार करणं हे एक आव्हानात्मक काम आहे. त्यासाठी आजही माझ्या मुली खूप कष्ट घेतात.
त्यांना अक्षरश: वणवण भटकावं लागतं. प्रशिक्षण घेऊन पुढे आपल्यालाच कष्ट करायला लागणार तरच वस्तूंचा मोबदला मिळू शकतो हे काही महिलांच्या लक्षात येत नाही.
 प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याआधी मी घरोघर जाऊन माझ्या तयार केलेल्या वस्तू विकत असे. 
त्याला खूप मागणी होती.  पण मी एकटीच कच-यातून पुनर्निर्मिती करत असे. त्यामुळे पहाटेच माझा दिवस सुरू व्हायचा आणि तो रात्री उशिरा संपायचा. पहाटे उठून कचरापेटी धुंडाळणारी म्हणून गावात माझी खूप टिंगल करायचे; पण मी लोकांच्या टीकेला कधीही घाबरले नाही. मला एकच ध्यास होता तो म्हणजे ज्या पुरुष प्रधान संस्कृतीनं कचरा व्यवस्थापनाच्या कामातून महिलांना वगळलं आहे त्यांना काहीतरी वेगळं करून दाखवायचं आणि या कामावर महिलांचा वेगळा ठसा उमटवायचा. मी पहाटे उठून वेचून आणलेला कचरा वेगळा करायचे आणि त्यातून कोणत्या प्रकारची नवनिर्मिती करता येईल हे ठरवायचे. कधी कधी 3-4 दिवसपण एखादी गोष्ट करायला लागायचे. 
पण या सगळ्यात एक मजा होती. एकदा काही कारणांनी मी रस्त्यातल्या बाजारातच माझ्या वस्तू घेऊन उभी होते त्या बघून तिथे आलेल्या एका पर्यटक बाईनं मला हे शिकवशील का असं विचारलं आणि माझ्या विचारांना नवीन दिशा मिळाली. वस्तू तयार करण्याबरोबरच त्या तयार करायला शिकवण्याचं केंद्र सुरू करावं असं त्या महिलेनंच मला सांगितलं आणि त्यासाठी काय करावं लागेल याचं मार्गदर्शन करायला ती तिच्या मुक्कामात माझ्याकडे येत राहिली. 
जिया नाव असलेली थायलंडमधली ही महिला माझी ख-या अर्थानं मार्गदर्शक ठरली. तिच्या सल्ल्यानुसारच मी वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण देणारं प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. इथे पहिलं प्रशिक्षण मी माझ्या मुलींना आणि काही ओळखीच्या महिलांना दिलं.  या प्रशिक्षणातून तयार झालेल्या महिला स्वत:च्या कल्पनेतून आणखी काही चांगल्या वस्तूंची निर्मिती करायला लागल्या आणि आमच्या प्रशिक्षण केंद्राला वेग आला. 
वस्तूही खूप तयार व्हायला लागल्या; पण त्याला बाजारपेठ मिळणं हे आव्हान समोर उभं ठाकलं. परत एकदा जिया मदतीला आली आणि तिनं वेबसाइट तयार करायला सांगितली.
माझ्या मुलीनं कष्टपूर्वक कमी खर्चात वेबसाइट तयार केली. आता पूर्ण वेळ ती या वेबसाइट व्यवस्थापनात असते. त्यामुळे आमच्या महिलांनी केलेल्या वस्तू जागतिक बाजारपेठेतपण विकल्या जातात. 
आमच्या महिला या फक्त कचरा उचलायची जबाबदारी पेलणा-या नसून त्या कलाकार आहेत. त्यामुळेच त्यांच्या कल्पक बुद्धीला वाव मिळतो. शिवाय कचरा निर्मूलनाची उग्र समस्या, त्याचं स्वरूप त्यांच्या ध्यानात येतंय. त्यामुळे काय होतं की घरीदारी आपोआपच कचरा कमी केला जावा यासाठीचं प्रशिक्षणही मिळतं.
त्सरेनजावनं  घालून दिलेला हा आदर्श मंगोलियात आणि आजूबाजूच्या देशात झिरपतो आहे. मला तर वाटतं की, पर्यावरण रक्षणाच्या या चळवळीत महिलांचा सहभाग असेल तर ही चळवळ नक्कीच यशस्वी होईल.

(लेखिका तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक संचालक आहेत.)

saptevh@gmail.com

Web Title: Tsarenjaw Soudenopil from Mongolia who solves the problem of money and environment by art through waste.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.