Is there a continuous hoteling? What is bad in it? | सतत हॉटेलिंग होतंय का?
सतत हॉटेलिंग होतंय का?

-वैद्य  राजश्री कुलकर्णी

हॉटेलिंग’ हा शब्द हल्ली अगदी परवलीचा झाला आहे. अगदी लहान मुलांपासून ते कॉलेजला जाणा-या मुलांपर्यंत आणि नोकरी करणा-या तरुणाईलादेखील हॉटेलचं भयंकर आकर्षण आहे. रविवार म्हटलं की अगदी चिल्लीपिल्ली पोरंसुद्धा संध्याकाळपासूनच आईवडिलांच्या मागे लागतात. कधी भेळ-पाणीपुरीसाठी, कधी इडली-डोशासाठी, तर कधी चायनीज पदार्थांसाठी, तर कधी लंच किंवा डीनरसाठी! रविवारी संध्याकाळी सगळ्या प्रकारच्या हॉटेल्समध्ये लागणा-या  मोठमोठय़ा रांगा बघितल्या की बाहेर जेवायचं किंवा खायचं प्रमाण किती वाढलंय याचा सहज अंदाज येतो!
प्रश्न असा आहे की सारखं हॉटेलमधलं खाणं आरोग्यासाठी कितपत श्रेयस्कर आहे? 

खरं तर याचं उत्तर आपणा सर्वांनाच माहीत असतं, की हे हितकारक नाही आणि असं म्हणण्यामागे अनेक कारणंही आहेत. कोणतीही गोष्ट ही व्यवसाय किंवा धंदा म्हणून, व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून करायची झाली की त्याची सगळीच गणितं बदलतात. नफा- तोटा यांचा विचार गुणवत्तेच्या आधी होऊ लागतो आणि इथेच ते आपल्या स्वास्थ्यासाठी घातक होऊ लागतं. 

कमी दर्जाचे-ताजे नसलेले पदार्थ

अगदी मोठमोठय़ा हॉटेल्समध्ये जाऊन त्यांचं स्टोअर जर बघितलं तर त्यात कमी दर्जाचे असणारे पदार्थ बरेचदा सापडण्याची शक्यता असते. मग ते अगदी पीठ, मीठ यापासून तर तेल, तूप, डाळी, भाज्या, फळं इथपर्यंत काहीही असू शकतं! काही पदार्थ ऑर्डर दिल्यानंतर त्वरित तयार होऊ शकतील असे नसतात (ऑर्डर देणा-यालाही याची कल्पना असतेच). या पदार्थांची पूर्वतयारी करून ठेवावी लागते. त्यामुळे अनेक प्रकारच्या ग्रेव्हीज, मिर्शणं, पनीर, शिजवलेल्या डाळी, भात अशा असंख्य गोष्टींनी हॉटेलमधले फ्रीज ओसंडून वाहात असतात. कधी आदल्या दिवशी उरलेल्या भातापासून दुस-या दिवशी कोणतातरी राइस बनवून तो भात संपवला जातो! उरलेल्या भाज्या मिक्स भाज्यांमध्ये खपवल्या जातात! बरेचदा असं अन्न खाऊन अचानक पोट बिघडणं, जुलाब होणं, फूड पॉयझनिंगची लक्षणं निर्माण होणं अशा तक्रारी जाणवू शकतात.

स्वच्छतेकडे दुर्लक्ष

स्वच्छता हा आरोग्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. ही स्वच्छता अगदी भाजीपाला, अन्नधान्य निवडून घेण्यापासून, ताटं-वाट्या, रूमाल-फडकी धुण्यापर्यंत आणि किचनमधील स्वच्छतेपासून प्रत्यक्ष अन्न शिजवणा-या लोकांच्या वैयक्तिक स्वच्छतेपर्यंत लागू होतो. 

मोठय़ा, नीटनेटक्या, चांगल्या दर्जाच्या हॉटेल्सच्या बाबतीत परिस्थिती पुष्कळ बरी असते. म्हणजे आरोग्य, स्वच्छता यांचा विचार केला जातो. प्रत्यक्ष स्वयंपाक करणा-या कर्मचा-याची नखं, केस, त्वचा यांची विशेषत: खूपच काळजी घ्यावी लागते. कारण तयार होत असलेल्या अन्नाशी यांचा संपर्क येत असतो! 

अधूनमधून काही व्हिडीओ व्हायरल होत असतात, जसं की, पाणीपुरीवाला इतकं मोठय़ा प्रमाणात पीठ हातानं भिजवू शकत नाही म्हणून पायानं  तुडवतोय, लग्नात गर्दीत पाणीपुरी सर्व्ह करणारा माणूस जरा गर्दी कमी झाल्यावर कपाळाचा घाम हातानं पुसून त्याच हातानं पुढच्या लोकांना सर्व्ह करतोय.  या गोष्टी प्रत्येक ठिकाणी घडत असतील असं नाही; पण अजिबातच होत नसतील याची तरी खात्री कोण देणार?

निकृष्ट दर्जाचे, मुदत संपलेले पदार्थ

पदार्थ बनवण्यासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरणं किंवा अगदी बंदी असणा-या गोष्टी वापरणं हेदेखील सर्वसामान्य झालं आहे. हरभरा डाळऐवजी लाखेची डाळ वापरणं, अन्न शिजवायला चांगल्या प्रतीचं तेल न वापरता सोयाबीन, सरकीचं तेल वापरणं, चांगला रंग यावा म्हणून घातक फूड कलर्स वापरणं, भाज्या निवडून न आणता होलसेलमध्ये जशा चांगल्या- वाईट एकत्र मिळतील तशा आणून वापरणं, अजिनोमोटोसारखे घातक पदार्थ विचार न करता वाट्टेल तसे वापरणं ही आणि अशी आणखी हजारो उदाहरणं देता येतील. 

पदार्थ बनवताना सोड्याचा खूप वापर करणं, तळलेलं तेल पुन्हा पुन्हा गरम करून वापरणं, कमी दर्जाचं तेल, मसाले वापरणं यामुळे अँसिडिटी, गॅसेस, पचनशक्ती मंदावणं असे अनेक त्रास उद्भवू शकतात. विशेषत: ज्यांना नाइलाज म्हणून रोज बाहेरचं खावं लागतं त्यांच्या बाबतीत तर हे नेहमीच आढळतं. पदार्थ तयार करताना पाणी चांगलं, स्वच्छ नसेल आणि विशेषकरून चटणी किंवा पाणीपुरीचं पाणी. यासाठी कच्चं पाणी वापरलं गेलं तर अचानक जुलाब, आग पडणं यासारख्या तक्रारी जाणवतात. 

बरेचदा काही नेहमी लागणा-या गोष्टी मोठय़ा प्रमाणात स्वस्त पडतात म्हणून आणून ठेवल्या जातात; पण त्यांची एक्स्पायरी डेट गेल्यानंतर त्या फेकल्या जातात की नाही यावर नियंत्नण असेलच असं सांगता येत नाही.  सगळ्यात हॉटेलांत सरसकट असं होत असेल असं माझं म्हणणं नाही, मात्र आपण सजग रहायला हंवं. 

बाहेर कधी खायचंच नाही का?

- तर तसं नाही. पण हॉटेलमध्ये खाण्याचं  प्रमाण मात्र नक्कीच नियंत्रित हवं. अगदी क्वचित मजा म्हणून, चवीत बदल, विश्रांती अशा कोणत्याही हेतूनं चालेल; पण जेव्हा खायचं तेव्हा ते चांगल्या स्वच्छ हॉटेलमध्ये असेल आणि आरोग्य आणि स्वच्छतेचे किमान निकष तिथं पाळले जात असतील याची निदान खात्री करून घ्यावी. 
यामुळे सुरक्षितता अबाधित राहील आणि ती सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. कारण आपलं शरीर निरोगी राखणं ही आपलीच जबाबदारी आहे!

(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)

rajashree.abhay@gmail.com


Web Title: Is there a continuous hoteling? What is bad in it?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.