There are solutions to come out of the social media! | सोशल मीडियाच्या जाळ्यातून बाहेर पडायचे उपाय आहेत!
सोशल मीडियाच्या जाळ्यातून बाहेर पडायचे उपाय आहेत!

-  डॉ. हरिश शेट्टी

 गेमिंग, इंटरनेट, सोशल मीडियाचं व्यसन हे सगळे प्रश्न मुलांना सतावत आहेत पण त्याचा दोष मुलांना देऊन चालणार नाही. हा दोष व्यवस्थेचा आहे. 
कुटुंब आणि शाळा या दोन्ही व्यवस्थांमध्ये काही मूलभूत बदल जोवर होत नाहीत तोवर या प्रश्नाचं उत्तर मिळू शकणार नाही. 
 

मुलांमध्ये मोबाइल  अँडिक्शन आलं कुठून?
 

* इंटरनेट सहज उपलब्ध आहे. एका माणसाच्या एक वेळच्या नाश्त्यापेक्षाही इंटरनेट स्वस्त आहे. 

*  कुठेही, कुठूनही, कधीही इंटरनेट वापरता येऊ शकतं. इंटरनेटच्या वापरला कुठलंही बंधन नाहीये. 

*  पालकांशी संवाद नाही. शाळा  मुलांना अभ्यासात खिळवून ठेवण्यास असर्मथ आहेत. पालक  आणि शाळेपेक्षा इंटरनेट मुलांना अधिक आकर्षक वाटतं. मुलांना गुंतवून ठेवण्यात पालक आणि  शाळा कमी पडत आहेत. 
 

* शारीरिक खेळ हा प्रकार जवळपास बंद होतोय. आजूबाजूच्या मुलांनी एकत्र येऊन गल्लीत, बिल्डिंगखाली, घराबाहेर खेळणं हा प्रकार जाऊन मुलं एकत्न येतात आणि गेमिंग करतात. पालक बर्‍याचदा या गोष्टीकडे कौतुकानं बघताना दिसतात. मुलांना मोकळा वेळच मिळत नाही. आणि  मिळाला तर त्याचं काय करायचं हे माहित नसल्यानं मग ती इंटरनेटकडे वळतात. 
 

* सगळ्या गोष्टी मुलांच्या हातात फार लवकर पडत आहेत. त्यांना समजतंय का? त्यांना गरज आहे का ? याचा विचार होत नाहीये.

* मुलं नेट सॅव्ही हवीत हा आग्रह आधी पालकांचा असतो मग मुलांचा. 

पालकांचा कंट्रोल का सुटतोय?
 * पालकांना वेळच नाहीये. पालक स्वत:च्या कामात, टेंशनमध्ये, रिलॅक्सेशनच्या गरजेत इतके अडकलेले आहेत की त्यांना मुलांशी संवाद साधायला पुरेसा वेळच मिळत नाही. 
 * मुलं पालकांपेक्षा हुशार आहेत. पालकांना कसं गुंडाळून ठेवायचं हे त्यांना व्यविस्थत माहीत आहे. 
 * पालक स्वत:च इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेले आहेत. त्यांना स्वत:लाच व्यसन जडलेलं आहे. त्यामुळे मुलांना एका मर्यादेपलीकडे ते तरी काय सांगणार?
*  जगण्याचा वेग इतका प्रचंड आहे की गप्पा मारायला, एकमेकांना फोन करायला, निवांत बोलायला कुणाकडे वेळच नाहीये. कुणाच्याच जीवाला शांतपणा नाहीये. त्यातून मुलांवर तर ताण आहेच पण पालकांवर ही आहेच. 

पालक काय करतात?

या सगळ्या गोंधळातून मुलांना बाहेर कसं काढायचं, त्यासाठी काय करायला हवं हेच पालकांना नीटसं माहीत नाही. मदत घेण्याचीही त्यांना अनेकदा गरज वाटत नाही. 
मुलं जास्तवेळा फोनमध्ये अडकलेले असतील तर पालक काय करतात? अशावेळी पालकांच्या ठरलेल्या दोन प्रतिक्रिया असतात. ते मुलांशी वाद घालतात. जोरदार भांडण करतात. फोन हिसकावून घेतात. 
किंवा 
वादावादी झाल्यावर निमूटपणे फोन परत देऊन टाकतात. 
या दोन्हीच्यामध्ये काही असू शकतं, 
ज्याची आज गरज आहे हेच पालकांच्या
लक्षात येत नाहीये. 
 

यावर उपाय काय?

 *  रात्री  दहा नंतर पालक आणि मुलांचा सगळ्यांचा फोन बंद झाला पाहिजे. 
 मुलांना जेवढा वेळ फोन वापरण्याची परवानगी दिली असेल त्या वेळेबाबत पालकांनी आग्रही राहायला हवं. 
*  अर्धा किंवा एक तासापेक्षा अधिक काळ फोनवर गेमिंग किंवा इतर कुठलीही गोष्ट करण्याची परवानगी देता कामा नये. आणि वेळ काटेकोरपणे पाळली गेली पाहिजे. 
  * कुठलंही महागडं गॅजेट मुलांना द्यायचं नाही. आपण मुलांना महागडी गाडी चालवायला देतो का? मौल्यवान वस्तू रोज वापरायला देतो का? नाही ना, मग महागडी गॅजेट्स कशी काय देतो?
*  फोन वापरायला द्या, भेट देऊ नका. आईबाबांनी घेऊन दिलेला फोन हा आई-बाबांचा आहे, मुलांना तो फक्त वापरायला मिळणार आहे हे त्यांना माहीत असायला हवं. 
*  जर तुमचं मूल फोनवरून सतत भांडत असेल, खोलीत बसून सतत गेमिंग करत असेल, जेवत नसेल, चारचौघात येत नसेल, नातेवाइकांना भेटत नसेल, गेमिंग आणि इंटरनेट पलीकडे जग त्याला नसेल, तुमच्याशी बोलत नसेल तर याचा अर्थ त्याला नेट, गेमिंगचं व्यसन जडलेलं आहे. त्याला ताबडतोब समुपदेशकाकडे घेऊन जा. ज्याप्रमाणे दारूच्या व्यसनात अडकलेल्या व्यक्तीला पुनर्वसनाची गरज असते तशी नेट व्यसन जडलेल्यांनाही असते. त्यामुळे अशी कुठलीही लक्षणं मुलांमध्ये दिसली तर मदत घेतली पाहिजे.  

(लेखक प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)


Web Title: There are solutions to come out of the social media!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.