Is there any similarity between the well and the woman .. Read this! | खोल खोल विहिरीतले अव्यक्त श्वास
खोल खोल विहिरीतले अव्यक्त श्वास

-सोनाली लोहार

कधी कधी असं होतं की, एखाद्या  गोष्टीविषयी प्रचंड कुतूहल वाटतं. ती गोष्ट अत्यंत हवीहवीशी वाटते.  इथेच कुठेतरी मनाची ती शांतता मिळेल. ती हुरहूर  थांबेल. जो अखंड शोध सुरू आहे, तो संपेल अशी अनावर ओढ वाटते. आणि त्याक्षणी त्याच गोष्टी विषयी एक संभ्रम, एक अनाकलनीय भीतीही दाटून येते की, या ओढीच्या मागे काय दडलंय? मला काहीसं असचं आकर्षण हे पाण्याविषयी म्हणजे पाण्याचा स्त्रोत असलेल्या प्रत्येक स्थळाविषयी आहे. विहीर, नद्या, समुद्र, झरे, धबधबा, तळी, डोह. एखादी निवांत जागा असावी, शेजारी वाहणारं, कोसळणारं किंवा संथ पाणी असावं आणि आपण काहीही न करता तिथे शांत बसून राहावं, अशी उचंबळून येणारी इच्छा मनात असते. आजकाल शहरात फारशा विहिरी बघायला मिळत नाहीत. पण आमच्या ठाण्यात नुकतीच एक विहीर एका जुन्या पडक्या वाड्यात दिसली. अगदीच छोटी. रुंदी दहा फूटपण नसेल आणि  खोलीही फारशी नाही. तळ दिसावा इतकीच. माणूस उतरला की तळपाय भिजेल इतकंच पाणी उरलेलं. बाकी सगळा पालापाचोळा. लोखंडी जाळी टाकून बंद करून ठेवलेली ती विहीर मला उदासून गेली. तिचं पाणी आटलं होतं. काही कामाची उरली नाही. जुनी झाली. कोळ्याच्या जाळ्यांनी वेढलेली ती विहीर मला एखाद्या कमरेत वाकलेल्या काटकुळ्या जख्ख म्हाता-या  बाईसारखी दिसली. सगळा भूतकाळ डोळ्यात घेऊन ती अजूनही उभी होती. पण तिचं ऐकायला मात्न कोणी नव्हतं.
याउलट गावी लहानपणी एक विहीर होती, अजूनही आहे. शंभरेक फूट रुंद आणि तेवढीच खोल. एखाद्या खानदानी गर्भारलेल्या बाईसारखी दिसायची. तिच्यावर गर्द सावलीचा कायम एक पडदा असायचा. इतकी खानदानी की सूर्यालाही तिचं दर्शन चुकूनमाकूनच व्हावं. आत थंड काळंभोर पाणी, खाली उतरायला अंतरा अंतरावर बाहेर आलले ते दगड. वाडीतल्या मुलांना त्याच विहिरीत पोहायला शिकवायचं असा एक अलिखित नियम होता. असोल्या नारळाची सुखडी पोरांच्या कमरेला बांधायची आणि  द्यायचं वरून ढकलून. माझ्या मनातल्या भीतीचा उगम बहुतेक तिथे झाला. एवढय़ा उंचावरून मारलेली ती पहिली आणि शेवटची उडी पार विहिरीच्या पोटात घेऊन गेली ! आत सगळंच गूढ, अंधारलेलं होतं. किती गुपितं पोटात दडवून ती स्तब्ध जड होऊन अंधारातून रोखून बघत होती.
पण वरून भारदस्त वाटणारी ती विहीर आतून मात्न केविलवाणी भासली. एकटी उदास उसासे सोडणारी. सोबतीची वाट पाहणारी. सुखडीनं वर आणलं तेव्हा नाकातोंडात पाणी गेलं होतं. पाण्यात थांबलेल्या काका मंडळींनी वर चढवलं. त्यानंतर मी विहिरीत कधीच उतरले नाही. त्याच वाडीत दुसरी एक विहीर होती. मोठय़ा विहिरीच्या मानानं तशी छोटीच. या विहिरीलापण छान गोड पाणी होतं. थोडी उंचावर होती ती. पाणी काढायला लाकडावर बसवलेली पुली आणि खळखळत आत जाणारी पत्र्याची बादली. आजूबाजूला छोटा चौथरा. या विहिरीत मात्र ऊन दंगामस्ती करावी इतकं आगाऊ सारखं आत सरळसोट घुसायचं. खरं तर ती विहीर 14-15 वर्षांच्या मस्तीखोर मुलीसारखी होती. त्यात इतक्या सा-या छोट्या छोट्या मासोळ्या आणि बेडूक असायचे. आणि विहीर रुंदीला तशी छोटी, त्यामुळे या मंडळींच्या सततच्या उलट्या पालट्या उड्यांमुळे ती सतत नाचत असल्यासारखी वाटायची. तिचं पाणी कधीच शांत राहायचं नाही. सारखं आपलं कोणी न कोणी डोकं बाहेर काढतंय मग आत जातंय.. दुपारच्या वेळेला सगळी बच्चेकंपनी विहिरीवर खेळायला यायची. विहिरीच्या काठावर बसून आत खडा टाकला की आत निरोप जायचा, मग आतले सोबती खेळायला बाहेर यायचे. मधूनच वाडीतल्या एखाद्या 
घरातून कोणातरी मोठय़ांचा आवाज यायचा,  ‘वाकू नका रे पोरांनो विहिरीवर !’ सगळी पोरं खिदळायची. विहिरीच्या आजूबाजूला गवतच गवत. त्याला रंगीत फुलं यायची. वाटायचं, विहिरीनेच केसांच्या वेण्या घालून फुलं माळलीयेत. त्या फुलांवर बसलेले चतुर, फुलपाखरं आणि रंगीबेरंगी टाचण्या पकडणं हा आमचा दुपारचा खेळ. असं वाटायचं, ही विहीर कायम परकरी खोडकर मुलगीच राहणार, आपल्यासारखी. एक दिवस मात्न जरा गडबड झाली. पहाटे पाणी काढायला कोणीतरी बादली सोडली. ती आत जाऊन धपकन पाण्यावर आपटली आणि त्या आवाजानं जागं होऊन आतलं जनावर फसकन फणा काढून पाण्यावर आलं. पाणी काढणा-याच्या हातून घाबरून बादली सुटली. दोरी घरंगळत केव्हा आत गेली कळलं नाही. आमच्या विहिरीत नाग शिरला होता ! यथावकाश साप पकडणा-याला बोलावून त्याला बाहेर काढलं. पण त्यानंतर आम्हा मुलांना मात्र विहिरीला भेटायची परवानगी मिळेना.
विहीर हिरमुसून गेली. शांत होत गेली .अचानक प्रौढ झाली. खरं तर, नाग शिरला  ही काय तिची चूक होती का? पण तरी जगाला बोटं दाखवायला जागा मिळाली.  तशी विहीर चांगली आहे; पण एकदा नाग शिरला म्हटल्यावर नासलीच नं. आता पाणी कसं प्याव तिचं  उगाच लोक कुजबुजायचे. विहीर अजूनच आक्रसून गेली.
अशीच एक मोठी विहीर वडिलांनी शेतावर बांधली होती. ती धडधाकट विहीर एक दिवस बाजूची जमीन खचली आणि बघता बघता आतल्या आत कोसळून नाहीशी झाली. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मला जनकाची लेक आठवली. ती अशीच जमिनीत नाहीशी झाली असणार.  का कोण जाणे; पण मला प्रत्येक पाण्याच्या स्रोतात, विशेषत: विहिरीत, एखाद्या स्त्रीच्या अस्तित्वाचा  भास होतो. ती उभी असते, ऊन-पाऊस-वारा झेलत. तिच्या पोटात अपार मायेचे झरे स्त्रवत असतात. कोणाची तरी तृष्णा भागवायची असते तिला. तिच्या अथांग मनात किती खोलवर तरंग उठत असतात.  त्यातले चुकारमुकार काही ती ओठांवर येऊ देते आणि  खूप सारे न बोलता गिळून टाकते..सुकलेल्या-पडक्या विहिरी बघितल्या की  म्हणून अनावर कढ दाटून येतात. का आटले झरे तिचे? का नाहीये पाणी तिच्या पदरात? काय चुकतंय? कुठे चुकतंय? कोणाचं चुकतंय?
ओढ, आसक्ती, विरक्ती, संभ्रम, विभ्रम. सगळ्यांचं प्रतीक म्हणजे विहीर. विहीर म्हणजे बाईच की ! विहीर सुकायला नको. ती हसती-खेळती जिवंत राहू दे. सदैव !

(लेखिका व्हॉइस थेरपिस्ट आहेत)

 sonali.lohar@gmail.com


 

 

Web Title: Is there any similarity between the well and the woman .. Read this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.