The story of Thimakka . Who loved and cared trees like childrens. Government declare Padmashree award to her for her devotion for trees. | झाडांवर मुलांप्रमाणे प्रेम करणा-या कर्नाटकातल्या वृक्षमाता थिमक्काची गोष्ट
झाडांवर मुलांप्रमाणे प्रेम करणा-या कर्नाटकातल्या वृक्षमाता थिमक्काची गोष्ट

ठळक मुद्देकर्नाटकातल्या सालमुद्रा थिमक्का यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव’ या ख्यातकीर्त दिवाळी वार्षिकामध्ये 2017 साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या प्रदीर्घ मुलाखतीचा हा संपादित संक्षेप, !

थिमक्का बंगळुरूजवळच्या एका खेड्यातल्या. बंगळुरूपासून 40 किलोमीटरवर  असणा-या  रामनगर जिल्ह्यातल्या हुलिकल गावच्या या आजीबाई. वय वर्षं फक्त 108. सध्या बंगळुरूजवळ नामसंद्राच्या मंजुनाथनगरमध्ये असतात. या गावात त्या सालुमार्दा थिमक्का म्हणून ओळखल्या जातात. सालुमार्दा म्हणजे वृक्षांची रांग. एका सरळ रांगेत त्यांनी वृक्ष लावले म्हणून थिमक्कांना आता हे नाव मिळालं आहे.

मंजुनाथनगरच्या शांत परिसरात एका लहानशा बंगलीत थिमक्का राहतात. घराच्या दोन भिंती थिमक्कांना मिळालेल्या पुरस्कारांनी, जाडजूड रंगीबेरंगी हारांनी, प्रशस्तिपत्राच्या फ्रेम्स आणि मधोमध भांग पाडल्यासारख्या दिसणा-या कर्नाटकी पगड्यांनी भरलेल्या. तिकडे मध्येच थिमक्का दाराकडे पाठ करून टीव्ही पाहात बसलेल्या. हिरवीगार सुती साडी, पूर्ण पांढरे केस, कानात बुगड्या, दोन्ही नाकपुड्यांमध्ये मुगती-मुगबट्ट, कपाळावर ‘इबत्त’ची ठळक दिसतीलशी उमटवलेली तीन बोटं  आणि पक्का कर्नाटकी रंग !

थोड्याच वेळात थिमक्का, त्यांचा दत्तक मुलगा उमेश यांच्याबरोबर हुलिकलच्या दिशेने निघालो. वाटेत गप्पा झाल्या.मूळच्या तुमकूर जिल्ह्यातल्या कुक्केनहळ्ळी गावातल्या या थिमक्का. बिक्कलु चिक्कया यांच्याशी लग्न झाल्यावर त्या हुलिकलमध्ये राहायला आल्या. थिमक्का आणि चिक्कयांचा हुलिकलच्या एका लहानशा घरात संसार सुरू झाला. लग्न झालं तरी कष्ट सुटले नव्हते. कोणाची गुरं सांभाळ, कोणाच्या शेतात मजुरी कर आणि रोज मिळतील त्या पैशावर चूल पेटव असं सुरू झालं. पण गरिबीबरोबर एक नवं दु:खही थिमक्का-चिक्कयांसमोर येऊन ठेपलं होतं. संसाराला 25 वर्षं झाली तरी त्यांच्या घरात पाळणा हलला नाही. हुलिकलच्या लोकांनी येता-जाता दोघांना टोमणे मारणं, चिडवणं सुरू केलं. नातेवाईकही या टोमण्यांमध्ये वेळ आणि संधी मिळेल तशी यथाशक्ती भर घालत होते. मूल नसण्याचं दु:ख आणि टोमणे असह्य झाल्यावर दोघांनाही मन गुंतवायला काहीतरी हवं असं वाटायचं.

- शेवटी थिमक्कांनी रानोमाळ वाढणा-या  झाडांनाच आपली मुलं मानायचं ठरवलं.
थिमक्का आणि चिक्कया या दोघांनीही रोज सकाळी कामाला जाण्याआधी गावाजवळच्या कुडूरला जाणा-या रस्त्यावर झाडं लावायला सुरुवात केली. स्वत: खड्डे काढायचे आणि त्यात वडाचं रोप लावायचं अशी सायलेंट मोहीम सुरू झाली. कोणाचीही मदत न घेता, जाहिरात, गाजावाजा न करता त्यांनी हे सुरू केलं. आणि  थिमक्कांच्या आयुष्याने नवं वळण घेतलं.

गप्पा सुरू असतानाच हुलिकल आलं. सत्तर वर्षांपूर्वी लावलेली झाडं आता चांगलीच फोफावली आहेत. दोन्ही बाजूला लावलेल्या या वटवृक्षांच्या शाखांनी आणि पारंब्यांनी रस्त्यावर एक कमानच तयार केली आहे. कमान जशी जवळ येऊ लागली तसे  थिमक्कांचे डोळे चमकू लागले. थिमक्का एकदम सत्तर-ऐंशी वर्षं आधीच्या काळात जाऊन पोहोचल्या होत्या. त्या सांगत होत्या,

‘हुलिकलला पूर्वी डांबरी रस्ता नव्हताच. चिखलमातीची एक साधी सडक होती.  हा रस्ता डांबरी करायचा ठरल्यावर आम्ही त्याच कामासाठी मजुरी करू लागलो. सकाळी डांबर ओतायचं आणि दुपारी झाडांसाठी खड्डे काढायचे असं काम सुरू केलं. या प्रत्येक रोपाला वाढवण्यासाठी मी लांबून विहिरीतून पाणी आणून घातलं आहे. संसारात मन लागायचं नाही, मुलं नाहीत तर झाडं तरी वाढवू म्हणून सहज सुरू केलं होतं हे. एका वर्षी दहा, मग वीस, पंचवीस असं प्रत्येक वर्षी रोपं लावत गेलो. शेवटी मी मोजायची सोडून दिली. घरात मुलं वाढतात, खातात-पितात-बागडतात, त्यांना आपण काय काय देतो याचा हिशेब ठेवता येईल का कोणाला? ही झाडं माझी मुलंच ना!’
पण फक्त वडाचीच रोपं का लावलीत?

- गप्पांच्या ओघात हा प्रश्न आला, तेव्हा माझ्या डोक्यात एक टपली मारून थिमक्का म्हणाल्या, ‘‘अरे मुला, वडाची झाडं मस्त आडवीतिडवी वाढतात.. भरपूर सावली देतात आणि माझं स्वत:चं आवडतं कारण म्हणजे या झाडावर पक्षी बसायला येतात!’’
अख्खा रस्ता कवेत घेत पसरलेली ही झाडांची रांग, त्यांच्या कमानीच्या पोटातली थंडगार सावली आणि त्याच्यातून सुरू झालेली मोहीम हे सगळं नंतर झालेलं. आजीबाईंनी यातलं काही ना ठरवलं होतं, ना आखलं होतं. दरवर्षी नवी झाडं लावायची आणि जुन्या झाडांची काळजी घ्यायची असा कुवतीला झेपेल असा मामला होता. थिमक्कांना वाटतं प्रत्येक मुलाचं बालपण झाडांच्या संगतीत गेलं पाहिजे. जसे प्राणी-पक्षी निसर्गात वाढतात तशी मुलंही जंगला-झुडपांच्या सोबतीने वाढली पाहिजेत.
हुलिकलच्या या इतक्या साध्या बाईचं काम जगाला कसं कळलं आणि आज त्या इतक्या प्रसिद्ध कशा झाल्या हीसुद्धा एक भारी गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी कर्नाटकातले एक खासदार या रस्त्यावरून जात होते. गाडीमध्ये अस्वस्थ वाटायला लागल्यावर मोकळ्या हवेत थांबावं म्हणून ते उतरले. बाहेर आल्यावर दोन्ही बाजूने असलेल्या या मोठाल्या झाडांच्या सावलीमुळे ते चांगलेच सुखावले. ही झाडं कोणी लावली आहेत असं त्यांनी शेतात काम करणार्‍या मजुरांना विचारलं. तेव्हा थिमक्का नावाची कोणी बाई गावात राहाते तिने ही झाडं लावल्याचं त्यांना समजलं. 

खासदारांनी थिमक्काच्या झोपडीवजा घराकडेच मोर्चा वळवला आणि तिची भेट घेतली. या झाडांची कथा ऐकल्यानंतर ते भारावून गेले. त्यानंतर त्यांचे दावणगिरी आणि चित्रदुर्गला कार्यक्रम होते. तिकडे भरसभेत बोलताना त्यांनी थिमक्कांचा आणि त्यांच्या कार्याचा उल्लेख केला आणि त्यांचं कौतुक केलं. हे सगळं प्रजावाणी आणि डेक्कन हेरॉल्डच्या पत्रकारांनी ऐकलं आणि पहिल्यांदा थिमक्कांनी केलेल्या कामाची बातमी छापून आली. त्यानंतर थिमक्का आणि त्यांची झाडं सगळ्या कर्नाटकभर प्रसिद्ध झाली. कन्नड, हिंदी, इंग्लिश वर्तमानपत्रांनंतर परदेशातील माध्यमांनीही त्यांची दखल घेतली. बीबीसीने तर त्यांचा समावेश 100 प्रभावशाली महिलांमध्ये केला. 

1990 साली थिमक्कांच्या यजमानांचं निधन झालं. थिमक्का एकट्या पडल्या; पण झाडांवरचं प्रेम काही कमी झालं नाही. हुलिकलच्या परिसरामध्ये त्यांनी झाडं लावायचं काम सुरूच ठेवलं.आणि आजही थेट अगदी बीबीसीच्या पत्रकारांपासून अख्खं जग त्यांना ओळखतं; पण थिमक्कांच्या जगाचा परिघ फार फार तर दोन-पाच किलोमीटरनी वाढला असेल, तेवढाच ! त्यातून थिमक्का कधीच शाळेत गेल्या नसल्यामुळे हुलिकलच्या बाहेर त्यांचं जग नव्हतंच. आज त्यांच्या आयुष्यावर पहिलीपासून दहावीपर्यंत वेगवेगळ्या बोर्डांच्या अभ्यासक्रमांमध्ये धडे आहेत. पण यातल्या कश्शाचाही स्पर्शसुद्धा या आजीबाईंना झालेला नाही. त्या आहेत तशाच आहेत. 

गेली अनेक वर्षं थिमक्कांनी ज्वारी, बाजरीसारखं कोणतंही धान्य खाल्लेलं नाही. कधी थोडासा भात खातात तितकाच. सकाळी चार-साडेचारला उठून आजही त्या सगळं स्वत:चं आवरतात, सकाळचा तासभर देवपूजेत गेल्यावर मगच दिवसाची सगळी कामं आणि कार्यक्रम सुरू करतात.

आता प्रसिद्धीमुळे मुलाखती वगैरे देतात, फिरायला गाडीघोडे वापरतात, तेवढंच!!
बाकी सगळं तेच. तस्संच.

(दीपोत्सव प्रतिनिधी)

sakhi@lokmat.com

Web Title: The story of Thimakka . Who loved and cared trees like childrens. Government declare Padmashree award to her for her devotion for trees.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.