The story about Janhavi who learn at home | घरीच शिकलेल्या जान्हवीची गोष्ट
घरीच शिकलेल्या जान्हवीची गोष्ट

-संदीप आडनाईक

 मूल अडीच वर्षांचं होत नाही तोच त्याच्या शाळा प्रवेशाच्या चर्चा हल्ली घरोघर सुरू होतात. आणि त्याला शाळेत ‘अडकवून’ निदान दोन तास तरी पालक मोकळे होतात. मात्र कोल्हापूरची जान्हवी अलीकडेच 85 टक्के गुण मिळवून दहावी पास झाली. विशेष म्हणजे शाळेत न जाता, होमस्कूलिंग करून तिनं दहावीचं यश मिळवलं.

इंच इंच मार्क लढवण्याच्या आजच्या स्पर्धेत आपल्या लेकीचं होमस्कूलिंग करायचं हा निर्णय कसा घेतला याविषयावर जान्हवी आणि तिच्या आईबाबांशीच बोलायचं ठरवलं. 

जान्हवी नीलिमा देशपांडे. तिच्या आईचा, नीलिमाचा टूरिझमचा व्यवसाय आहे. त्या सांगतात, 2006मध्ये मी होमस्कूलिंगसंदर्भात  ऐकलं होतं. जान्हवी केजीतून पहिलीत गेली तेव्हाचा प्रसंग मला आठवतोय,  शाळेचा युनिफॉर्म, ते घट्ट कपडे, शूज काढताना होणारा त्रास हे सारं मी पाहिलं. त्यात शिक्षण म्हणजे फक्त एबीसीडी, पुस्तकी शिक्षण हे काही पटत नव्हतं. त्यातून  तिला शाळेत न पाठविण्याचा निर्णय ठाम झाला. 

सॉफ्टवेअर कंपनीत असलेल्या त्यांच्या पतीनेही या निर्णयाला साथ दिली आणि जान्हवी पहिलीनंतर कधीही शाळेत गेली नाही. एकीकडे मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आणि दुसरीकडे मुलीला शाळेतच घालत नाहीत म्हणून नातेवाईक, मित्रमैत्रिणींचे आक्षेप याचा त्रास त्यांनाही झालाच. मात्र औपचारिक शालेय शिक्षण न देता मुलीला घरीच शिकवायचं यावर हे पालक ठाम होते.

नीलिमा सांगतात, ‘सुरुवातीला आई-बाबा आपल्यासोबत असल्याचा तिला आनंद झाला. नंतर मात्र आई स्वयंपाकघराबरोबरच कायम अभ्यासात, काहीतरी वाचताना, लिहिताना, कॉम्प्युटरवर काम करताना दिसू लागली. डॅडूचेही कॉम्प्युटरवर काहीतरी चाललेलं तिनं पाहिलं. त्यामुळे घरी असा अभ्यास करायचा असतो, हे तिच्या मनात ठसलं. सुरुवातीचे काही महिने खेळण्यात, बागडण्यात गेले, टीव्हीही भरपूर पाहून झाला. आम्ही तिला टोकलं नाही मग हळूहळू तिला टीव्हीचा कंटाळा येऊ लागला. ती पर्याय शोधू लागली. अपार्टमेंटमध्ये भरपूर मुलं आहेत. प्रत्येकाच्या शाळेच्या वेगवेगळ्या वेळा असल्यामुळे कोणी ना कोणी खेळायला कायम असायचंच. खेळाचं मैदान, गाण्याचे, नृत्याचे क्लासेस, सुटीतील शिबिरे, परदेश दौर्‍यात मिळालेले मित्र-मैत्रिणी, नातेवाइकांची मुलं यामुळे जान्हवीला शाळेतील मित्रमैत्रिणींची कधीच कमतरता जाणवली नाही.

विशेष म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया कशा कानाआड करायच्या हेही ती शिकली. कुणी म्हणत, शाळेतच पाठवत नाहीत,  शिक्षण नाही,  घरी बसून कसे होणार, मुलीची जात, शिकली नाही तर लग्न कसं होणार, असे असंख्य प्रश्न तिच्या कानावर पडू लागले. मात्र ते दुर्लक्ष करून तिनं अभ्यास करायला कधी सुरुवात केली, हे तिचं तिलाही कळलं नाही.’

आईच्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या व्यवसायामुळे सातत्यानं देश आणि परदेशातील सहलींसोबत जान्हवी जात असे. इतिहास आणि भूगोल असा प्रत्यक्षच अभ्यासायला मिळाला. तिच्या आईची फ्रेंचमध्ये पीएच.डी.ही याच काळात सुरू होती. त्यातून ती फ्रेंच भाषाही शिकली. महाराष्ट्रातील किल्ले पाहण्याचा छंदही तिनं जोपासला. इतिहासाचा अभ्यास असा झाला. पुस्तक वाचनाचा छंद घरात होताच, त्यातून तिनं भरपूर मराठी पुस्तकं वाचली.  हिंदी, इंग्लिश आणि फ्रेंच भाषेतलं वाचन वाढलं. वडिलांना इंग्रजी सिनेमे पाहण्याचा छंद, त्यांच्यासोबत तिनं विविध इंग्रजी, फ्रेंच सिनेमेही पाहिले. मग हळूहळू लिहिणंही सुरू केलं. चित्रकला, शास्रीय संगीत, पाश्चिमात्य संगीत, नृत्य हे सारं शिकायला सुरुवात केली. आजीने स्वयंपाकही शिकविला. कोणत्या हंगामात कोणती भाजी, कोणता पदार्थ करायचा हे शिकायला मिळालं. 
जान्हवीची आई सांगते, तिनं एकटीने घर सांभाळायला सुरुवात केली. आम्ही दोघं कामानिमित्त बाहेर असताना स्वयंपाक, बाजारहाट ती करू लागली. तिला आठ दिवसासाठी लागणारी रक्कम देऊन त्यात तिचं तिला नियोजन करायला सांगितलं तर ती पैशांचं उत्तम नियोजन शिकली. इतकेच नव्हे, तर परदेशातील त्यांच्या टूरचे नियोजनही ती लहान वयातच करू लागली.  
जान्हवी सांगते,  ‘दहावीपर्य्ंत शाळेत गेले नाही मात्र आता कॉलेजला जाणार आहे. अर्थशास्र आणि फ्रेंच भाषा विषय घेऊन आर्ट्स करायचं आहे. होमस्कूलिंग सोपं नसतं, तिथं घोकाओका नसतं, आपले प्रश्न काय आहेत, त्यानुसार उत्तरं शोधून विषय समजून घ्यावा लागतो. त्यातूनच माझा शिकण्याचा प्रवास झाला !

---------------------------------------------------------------------

होमस्कूलिंगमध्ये पालकांची जबाबदारी दुपटीने वाढते!

मुक्त शिक्षणाची संकल्पना नवी नाही. शाळेच्या चार भिंतीत बंदिस्त शिक्षण न घेता मुक्त वातावरणात, आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेण्याची मुळातच माझी इच्छा होती. अर्थात ती तेव्हा पूर्ण झाली नव्हती. माझ्या मुलीच्या निमित्ताने ही संधी मी घेतली. जान्हवी बालवाडीत, केजीत जात होती; परंतु त्यात ड्रॉबॅक जास्त आढळले. त्यामुळे होमस्कूलिंगचा निर्णय घेतला. अनेकांनी माझ्या या निर्णयावर टीका केली. अनेक अपमानास्पद प्रसंगांना आम्ही सामोरे गेलो. परंतु आम्ही ठाम राहिलो. माझ्या आईने आणि नव-यानेही या होमस्कूलिंगमध्ये उत्तम साथ दिली. विशेषत: जिच्यासाठी हा निर्णय घेतला, तिनं हा निर्णय समजून घेतला.

त्यातून आम्हीही शिकलोच. होमस्कूलिंगमध्ये पालकांची जबाबदारी दुपटीने वाढते. मुलांनी केलेल्या चुका या पालकांच्याच असतात, याची जाणीव होती. चिडचिड, दुसर्‍यांच्या खोचक बोलण्याकडे दुर्लक्ष करणे, अशा अनेक प्रसंगांतून जावे लागते. हा सारा प्रवास दहावीच्या या टप्प्यावर येऊन यशस्वी झाला याचा आनंद आहेच.
- नीलिमा देशपांडे, (जान्हवीची आई)

-------------------------------------------------------------------------

प्रयोग  नाही तर जाणीवपूर्वक उचललेलं पाऊल !

शाळेत जाऊनच सारं काही शिकलं पाहिजे, असं नाही. उघड्या जगाकडूनही शिकता येतं अशी माझी धारणा आहे. सिनेमा पहा, पुस्तकं वाचा, माणसांकडून शिका, असं मला वाटल्यामुळे मुलीला तसंच शिकवण्याचं ठरवलं. व्यक्तिमत्त्व घडवण्याला प्राधान्य दिलं. घोकंपट्टी आणि रट्टा मार अभ्यासातून मुलांना बाजूला काढणं गरजेचं आहे. समाज ज्या पद्धतीनं मुलांना शिकवतो आहे, त्यातून शिक्षण पद्धती विकसित होते, माणूस नाही. शाळेतील गणिताचा व्यवहारातील गणिताशी ताळमेळ नाही. त्यामुळे शाळेत न जाताही शिकता येतं, हे आम्ही करून पाहिलं. हा काही आमचा प्रयोग नव्हता तर जाणीवपूर्वक उचललेलं पाऊल होतं. शाळेत एका वर्गात खच्चून भरलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक कसे शिकवितील, याचा विचार पालकांनी केला पाहिजे. घरी तुम्ही त्यांना शिकवा, त्याचं नियोजन करा. मूल तुमचं ऐकतं, त्याच्यावर विश्वास ठेवा. पैसे फेकले की शिक्षण पाहिजे तसं मिळतं हा समज चुकीचा आहे. आपली मुलगी शाळेत जात नाही म्हणजे ती चोवीस तास आपल्यासोबत आहे, आपल्यावर तिच्या शिकण्याची जबाबदारी याचं दडपण आम्हालाही आलं मात्र त्यावर मात करत तिच्या बालसुलभ प्रश्नांना उत्तरे देत आम्ही दोघंही शिकत गेलो आणि समृद्ध होत गेलो.
- ऋषिकेश पत्की (जान्हवीचे वडील)

 

(लेखक लोकमतच्या कोल्हापुर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)

sandip.adnaik@gmail.com 
 


Web Title: The story about Janhavi who learn at home
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.