That special Sunday in Shravan | श्रावणातले ते विशेष रविवार
श्रावणातले ते विशेष रविवार

-निता कनयाळकर

श्रावण म्हणजे गोडाधोडाचा महिना. सणांची मैफल. आणि हे सण जर आपल्याला आपल्या आवडत्या हक्काच्या सुट्टीच्या दिवशी साजरे करायला मिळाले तर मग त्याची मजा काही औरच. 

रविवार म्हणजे सगळ्यांचा आवडता दिवस. पण श्रावणात हा रविवार मला खूपच आवडायचा. खरं तर श्रावणातल्या रविवारी माझ्यावर मोठी जबाबदारी असायची. पण त्या जबाबदारीचा मला कधीच कंटाळा आला नाही. श्रावणातल्या रविवारी आमच्या गोव्याच्या घरात आई आयतार पूजन करायची. 
 रविवार म्हणजे सूर्याचा वार अर्थात आयतार.  या आयतारला चार चांद लावणारी माझी आई मला या पूजेसोबत बरंच काही शिकवून गेली. श्रावणातील सगळे सणवार आई हौशीनं साजरे करायची. त्यापैकी गोवा आणि कोकणात साजरा होणारा परंपरागत सण म्हणजेच आयतार. अर्थात, श्रावण महिन्यातील रविवारची पूजा. या दिवशी आई तर उत्साही असायचीच सोबत मीही. 
हा आयतार माझ्या आवडीचा सण. याचं खास वैशिष्ट्य म्हणजे दर आयतार पूजेला नैवेद्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारचा गोड गोड खाऊ आम्हाला खायला मिळायचा.
आयतारची पूजा असल्यानं आईचा उपवास असायचा. रविवारी लवकर उठून ती अंगणात सडा-रांगोळी घालून घर पूजेसाठी सज्ज आणि प्रसन्न करायची. एरव्ही गोव्यातील लोकांना रविवारी शाकाहारी आणि त्यातून उपवास म्हणजे शिक्षाच! तरीसुद्धा आई  श्रद्धेनं पूर्वजांनी सुरू केलेला रितीरिवाज पाळायची. मी हक्काचं शेंडफळ असल्यानं पूजेची सर्व तयारी करायची जबाबदारी माझ्याकडे असायची. 
श्रावण सरींसोबत बहरलेल्या हिरव्यागार  परिसरात पूजेसाठी लागणारी फुलं, , पत्री शोधायला  मला फारशी मेहनत घ्यावी लागत नव्हती.  रानातली अंगणातील पानं-फुलं, कुंपणावर अथवा विहिरीलगत पावसाळ्यात रुजून आलेल्या झाडांची पानं पत्नी म्हणून वापरली जायची. त्यात बेल, दुर्वा, शंकराची फुलं, शेरवड्याची पानं, पारिजातकाची पानं-फुलं, ठरावीक प्रकारची दुर्मीळ रानझाडांची पानं ज्यांना घोड्याची पावलं, रामाची बोटं, वाघाची नखं म्हणून ओळखलं जातं. ही पानं पत्री आयतार पूजेसाठी लागायची. ही पानं पत्री स्वत: जाऊन शोधण्यात, गोळा करण्यात आनंद होता. निसर्गाशी जवळीक व्हायची. आता तर बाजारातसुद्धा हे सगळं मिळतं.  
आईसोबत पूजेची तयारी करताना आई आयतार पूजेबद्दल खूप काही सांगायची. ‘आयतारची’ पूजा म्हणजे सूर्य आणि चंद्राची उपासना. पावसाळ्यात बहरलेल्या निसर्गातून उगवलेल्या पानाफुलांचा मान -सन्मान आणि आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी, आरोग्यासाठी आणि संरक्षणासाठी सूर्य आणि चंद्राकडे केलेली प्रार्थना. 
 आई जिथे ‘आयतार’ पूजा मांडायची तिथे पाट मांडून सभोवार रांगोळी घालायची. केळीच्या पानाचा पुढचा अर्धा भाग पूजेसाठी वापरायची. पाटावर अक्षदा वाहून त्यावर केळीच्या पानाचा शेंड्याकडचा भाग ठेवायची. त्या पानाच्या एका भागावर चंद्राची प्रतिमा चंदनाच्या सफेद गंधानं काढायची आणि यावर चंद्राचं प्रतीक म्हणून हळकुंड ठेवायची. केळीच्या पानाच्या दुसर्‍या भागावर सूर्याची प्रतिमा पिवळ्या अष्टगंधानं काढून त्यावर सूर्याचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची.   त्या चंद्र आणि सूर्याच्या प्रतिमेवर विड्याच्या पानाचा त्रिकोणी द्रोण करून ठेवायची. आई ही पूजा मांडायची तेव्हा त्या पूजेकडे नुसतं बघत राहावं असं वाटायचं. फुलं आणि पत्री या कशाही वाहून चालत नसे. आईची त्याबाबतीतही शिस्त होती. परंपरेतून आलेली ही शिस्त आईकडून माझ्यातही आली. दुर्वा आणि फुलांच्या चार जुड्या करायची.  त्यापैकी त्यातल्या दोन जुड्या पूजा मांडायच्या पाटावर दोन्ही बाजूनं ठेवायची. एक जुडी आई तुळशीला वाहायची आणि एक जुडी स्वत: पूजा करतेवेळी डोक्यात माळायची. मी गोळा करून आणलेली फुलं आणि पत्री जेव्हा आई पूजेवर वाहायची तेव्हा मी आयतार पूजनाशी प्रेमानं आणि  श्रद्धेनं जोडले जायचे. घरात आयतारच्या निमित्तानं गोडाधोडाचा स्वयंपाक असायचा. त्यामुळे घरातलं वातावरण मधुर असायचं. फुलं, अगरबत्ती आणि धुपानं घर अधिकच सुगंधित व्हायचं. कधी एकदा नैवेद्य दाखवून आम्हाला गोडधोड खायला मिळेल या विचारानं आम्ही उतावीळ झालेलो असायचो.  या आयतार पूजनाचं वैशिष्ट्य म्हणजे या ‘आयतारला’ दर रविवारी आई नैवेद्य म्हणून  वेगवेगळे पदार्थ करायची. परिसरात पिकलेले जिन्नस जसं नारळ, तांदूळ आणि हळदीची पाने यांचा आई जास्तीत जास्त वापर करायची.

पहिल्या आयतारचा नैवेद्य म्हणून मुठल्या असायच्या. तांदूळ भिजत घालून, नंतर सुकवून, तो कुटून त्याचं पीठ केलं जातं. त्या पिठाची उकड घेऊन लांबट आकाराच्या पाती बनवून त्यात गूळ, खोबरं, वेलची आणि सुकामेवा घातलेलं सारण भरून मुटकुळ्याचा आकार दिला जातो यालाच मुठल्या असं म्हणतात. दुसर्‍या आयतारला नैवेद्य म्हणून पातोळ्या असायच्या. तांदळाची उकड घेऊन ती हळदीच्या ओल्या पानांवर थापून त्यात गूळ, खोबरं, वेलची, सुकामेव्याचं सारण घालून पान बंद करून उकडून हा पदार्थ केला जातो. या पातोळ्या तयार करताना हळदीच्या पानांचा सुगंध घरभर दरवळतो. हा वास म्हणजे खास  श्रावण महिन्याची आठवण. 
 गोड खिचडीचा नैवेद्य तिस-या आयतारला केला जायचा. तांदूळ, मूग, चणाडाळ मंद आचेवर भाजून चांगली शिजवली जाते आणि त्यात शेंगदाणे, सुकामेवा, गूळ, वेलची आणि नारळाचं दूध घालून घट्टसर अशी गोड खिचडी होते.
चौथ्या आयतारला नैवेद्य म्हणून गोड पोळे असायचे. तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घालून दुस-या दिवशी वाटली जाते. त्यात जिरे, गूळ, ओलं खोबरं आणि वेलची घालून त्या मिश्रणाचे दाटसर घावन तयार केले जातात. हे घावन म्हणजेच गोड पोळे.  श्रावणात जर पाचवा आयतार आलाच तर नैवेद्यासाठी तवसोळी करायची. मोठी काकडी किसून त्यात सुकामेवा, ओलं खोबरं, भाजलेला रवा आणि गूळ घालून घट्ट मिश्रण तयार केलं जातं. पातेल्याला आतून तूप लावून त्यात ते मिश्रण घालून कोळशाच्या मंद आचेवर दोन्ही बाजूनं ते भाजलं जातं आणि नंतर केकसारख्या वड्या  पाडल्या जातात.  
 नवीन लग्न झालेल्या मुली पहिले दोन ‘आयतार’ माहेरी आणि नंतरचे दोन आयतार सासरी पूजतात. श्रावणातील आयतार पूजनाचं विसर्जन संध्याकाळी साडेपाचपर्यंत तुळशी वृंदावनमध्ये केलं जायचं. आई तुळशीकडे दिवा लावून आयतार मांडलेली पूजा पाटासह किंवा सुपात केळीच्या पानासह घेऊन ते तुळशी वृंदावनासमोर ठेवायची. तुळशीला हळद-कुंकू लावून, पाणी वाहून, निरांजन ओवाळून पूजलेला आयतार तुळशी वृंदावनामध्ये घंटी वाजवून विसर्जन केला जायचा आणि सगळ्यांना प्रसाद दिला जायचा. विसर्जन करण्यापूर्वी सुपारी आणि हळकुंड काढून देवघरात ठेवली जायची आणि तीच पुढच्या प्रत्येक पूजेला वापरली जायची. परंतु शेवटचा आयतार पूजनाचं विसर्जन आई नेहमीपेक्षा लवकर करायची. कारण ती म्हणायची की शेवटचा आयतार म्हणजे तो म्हातारा होतो म्हणून त्याचं विसर्जनपण लवकर म्हणजेच दुपारी तीन-साडेतीनपर्यंत करायला हवं. आणि ती तसंच करायची. त्या दिवशी पूजा सकाळी लवकर करायची. पूजेला मुद्दाम शेरवड्याची पांढरी पानं आणि पांढरीच फुलं वापरायची. पूजा विसर्जन करताना हळकुंड आणि सुपारी काढून ती देवघरात ठेवायची. आणि हरितालिकेच्या दिवशी अंघोळ करताना त्या हळदीचा लेप अंगाला लावायची. अंघोळीनंतर सुपारी खाऊन ती हे आयतार पूजनाचं व्रत पूर्ण करायची. 
आई करत असलेले हे आयतार पूजन म्हणजे एक साग्रसंगीत सोहळा असायचा. आमच्यापर्यंत हे पूजन म्हणजे केवळ प्रथा म्हणून पोहोचलं नव्हतं. या प्रथेतला आनंद घेण्याची रीत आईनं शिकवली होती. आणि म्हणूनच आजही गोव्याच्या बाहेर असतानाही श्रावणातल्या रविवारी या आयतार पूजनाच्या आठवणी मनात पिंगा घालतात.

( मूळच्या गोव्याच्या असलेल्या लेखिका उद्योजिका आहेत)

nitakanyalkar@hotmail.com

Web Title: That special Sunday in Shravan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.