In a small African village, women stand up for electricity in every home. | आफ्रिकेतल्या एका छोट्या गावातील महिलांनी आपल्या घरात आणला दिव्यांचा प्रकाश
आफ्रिकेतल्या एका छोट्या गावातील महिलांनी आपल्या घरात आणला दिव्यांचा प्रकाश

-डॉ. विनिता आपटे

द क्षिणी टांझानियाच्या चेकेलेनी गावात संध्याकाळ उतरली होती. आपल्याकडच्या छोट्या खेड्यांमध्ये संध्याकाळच्या वेळी जसे सगळे पारावर गप्पा मारायला जमतात तशीच चेकेलेनी गावातली मंडळी कामं आटोपून गप्पांचा फड जमवत होती. बाजूच्या एका छोट्या जागेत मात्र  अनेक छोट्या मुला-मुलींचा घोळका मात्र हिरिरीनं कसली तरी चर्चा करत होते. मला त्यांच्याविषयी उत्सुकता वाटली म्हणून मी त्यांच्यातच सामील झाले. त्या घोळक्यामध्ये फक्त तरुण-तरुणीच नव्हत्या, तर ब-याच आयाबायापण होत्या. अगदी 10 वर्षांच्या मुलांपासून ते 80  वर्षांच्या बायकांचा गोतावळा होता तो. गाव महिलाप्रधान होतं हे लक्षात येत होतं. फातिमा लोंगो 10 वर्षांची शाळकरी मुलगी. आपल्या आईचे आभार मानत म्हणाली, ‘मरियम म्हणजे माझी आई नेहमी घरातच असायची. आमच्या पलीकडे तिचं विश्वच नव्हतं; पण मिणमिणत्या केरोसीन दिव्याच्या उजेडात आम्हाला अभ्यास करताना बघून तिला खूप वाईट वाटायचं. ती त्याचवेळी घरात चुलीवर स्वयंपाक करत असायची आणि कमी उजेडामुळे तिलाही अनेकदा हात भाजून घ्यावे लागायचे. पण केरोसीनच्या दिव्यांमुळे होणा-या  भीषण अपघातांमुळे तिला तेव्हाही  सतत आमची काळजी लागलेली असायची. 
अशातच तिला एकदा सरकारी योजनेतून एक सौरऊर्जेवर चालणारा कंदील मिळाला. आमची खोली बया पैकी उजळली. आता जवळपासची मुलं आमच्याकडे यायला लागली; पण माझी आई एवढय़ावरच थांबली नाही. तिनं सौरऊर्जेच्या उपकरणांची माहिती मिळवायला सुरुवात केली. आमच्याकडे असलेला कंदील कसा आहे, तो तयार करायचा झाला तर त्यासाठी काय काय लागेल, एकेक गोष्टी शिकण्याचा आणि त्या मिळवण्याचा तिनं ध्यासच घेतला.’ मरियमचा उत्साह बघून गावातल्या आणखी चार महिला तिच्या मदतीला आल्या. आता या पाच अशिक्षित पण उत्साही ग्रामीण मातांनी चेकेलेनी गावात सूर्यास्तानंतर प्रकाश आणायची कल्पना राबवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. सतत सरकार दरबारी खेटे घालायचे, गावातल्या बुझुर्ग पण जाणत्या बायकांशी चर्चा करायची. यासगळ्यातून त्यांनी एक आराखडा तयार केला. दरम्यानच्या काळात  सरकारच्या ‘रुरल वुमन लाइट अप आफ्रिका’ या योजनेविषयी त्यांना माहिती समजली.  मग त्याही या योजनच्या भाग झाल्या आणि झपाट्यानं कामाला लागल्या.  या महिलांची सर्वात पहिली गरज ही तांत्रिक गोष्टी शिकून घेण्याची होती. त्यासाठी गावातल्या पुरुष अभियंत्यांची मदत घ्यावी या विचारानं त्यांनी काही अभियंत्यांशी संपर्क केला; पण त्यांच्याकडून त्यांना उत्तेजन मिळणं तर दूरच पण टोमणे ऐकून घ्यावे लागले. बायकांनी अशा गोष्टी करत फिरण्यापेक्षा घर सांभाळण्याचे सल्लेही दिले गेले.

सल्ल्यांकडे दुर्लक्ष कर आणि कामावर लक्ष दे’ असं सांगून पुन्हा एकदा सौरऊर्जा हेच आपलं लक्ष्य आहे हे आईला पटवून दिलं. नंतर या पाच महिलांनी मोठय़ा शहरात जाऊन रीतसर शिक्षण घेतलं. सहा महिने अथक परिश्रम घेऊन चेकेलेनी गाव प्रकाशमान केलं. 

ज्या दिवशी गावातल्या सगळ्या म्हणजे 200 कुटुंबांकडे विद्युत गरज भागवण्यासाठी सौरऊर्जेचे दिवे आणि उपकरणं लागली तो दिवस मरियमच्या आयुष्यातला क्रांतिकारी दिवस होता. त्यानंतर तिनं या उपकरणांची देखभाल करण्यासाठी प्रशिक्षण सुरू केलं. सर्वप्रथम चेकेलेनी गावातल्या सगळ्या महिलांना तिनं प्रशिक्षण दिलं. 
घरातली उपकरणं देखभालीचं तंत्र आत्मसात केलेल्या महिला आत्मविश्वासानं नव्या कामासाठी सज्ज झाल्या. गावातल्या शाळा, कॉलेज आणि सार्वजनिक इमारतींमध्ये त्यांनी सौरविद्युतीकरण करण्यासाठी तिथल्या लोकांना उद्युक्त केलं आणि त्या इमारतींमध्येच चार्जिंग स्टेशन्स निर्माण केली. जेणेकरून ज्या कुटुंबाना स्वत:ची घरं नाहीत ते त्यांची उपकरणं त्या स्टेशन्सवरून चार्ज करून घेऊ शकतील. तोपर्यंत अर्थातच आजूबाजूच्या गावांमध्ये याची बातमी पसरलीच होती. मग या महिलांनी दक्षिण टांझानियातील मत्वारा आणि  लिंडी या दुर्गम जिल्ह्यामध्ये असाच प्रयोग राबवला.  पूर्ण अशिक्षित असूनही आणि टांझानियाच्या बाहेर कधीही न पडलेल्या महिलांनी ऊर्जा क्षेत्रात केलेली ही एकप्रकारची क्रांतीच म्हणावी लागेल. संपूर्ण समुदायाला त्यांच्या स्वत:च्या सौरयंत्रणेचा फायदा होऊ शकेल यासाठी स्थानिक पातळीवर उपकरणं खरेदी केली जातात. 
गावकरी त्यांच्या उपकरणांचा खर्च पाच वर्षांच्या हप्त्यांमध्ये परत करतात आणि त्याची देखभाल करतात. या निधीतून महिला अभियंत्यांना त्यांच्या कामासाठी मासिक वेतन मिळण्याची हमीदेखील मिळते. या महिलांनी ग्राम समित्या स्थापन करून त्या समित्यांची अधिकृत नोंदणी बँकांकडे केली आहे. यामुळे पैसे जमा करणं, त्याचा योग्य विनियोग करणं शक्य होतं आहे. यातल्या अनेक महिला  ‘रोल मॉडेल’   म्हणून ओळखल्या जातात. 
 या प्रकल्पामुळे  प्रत्येक घराला तर प्रकाश मिळालाच, पण घरासमोरचा दिवा पथदर्शक म्हणूनही काम करतोय. 
रस्त्यावरील अंधार दूर होण्यासाठी मदत झाल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन होणा-या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. छोट्या गावातील महिलांची ही कामगिरी खरोखरच वाखाणण्यासारखी आहे यात शंकाच नाही.

(लेखिका तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक संचालक आहेत.)

saptevh@gmail.com


Web Title: In a small African village, women stand up for electricity in every home.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.