Size India.. what happened if we get our dress in this size.. | आपल्या मापाचे कपडे देणारी साइज इंडिया प्रत्यक्षात मिळू लागली तर..
आपल्या मापाचे कपडे देणारी साइज इंडिया प्रत्यक्षात मिळू लागली तर..

-अदिती मोघे

तुमचं असं होतं का?  म्हणजे मॉलमध्ये गेल्यावर पाश्चिमात्य ब्रॅण्ड्सचे कपडे घेऊन त्यांची साइझ चेक करताना हसावं की रडावं तेच कळेनासं होतं. अनेक विख्यात ब्रॅण्ड्सचे लार्ज साइझचे कपडे स्मॉल साइझसारखे वाटतात. 

कधी विचार केला की असं का होत असेल?

वेगवेगळ्या प्रांतातल्या भौगोलिक परिस्थितीनुसार, हवामानानुसार, तिथे शतकानुशतकं विकसित होत गेलेल्या माणसांची उंची, अंगकाठी, रंग, आकार यात फरक होत गेला. ते फरक आणि वैविध्य हेच तर सौंदर्य आहे. ते वेगळेपण, तिथले पोशाख, पेहराव, प्रघात, सौंदर्याच्या व्याख्या यामुळे आणखी खुलून दिसतं. निसर्गानं किती      त-हेत-हेची माणसं घडवली आहेत. पण इतक्या वर्षांच्या आपल्या उत्क्रांतीमध्ये आपण हे वेगळेपण साजरं करणं सोडून सगळं मोनोटोनस करण्याच्या दिशेनं प्रवास करायला लागलो आहोत.
सोशल मीडियावर वावरताना तर फॅशन, ट्रेण्ड्स, स्टाइल, लेटेस्ट कलेक्शन्स, सततच्या नावीन्याचा अट्टाहास याचा अतिरेक होताना जाणवतो. प्रत्येकाला आपण सतत सुंदर  आणि  तरुण  दिसायला हवं असतं. आणि त्यातूनच मग साइझ झिरो, अतिरेकी बारीक म्हणजे सुंदर अशा अनैसर्गिक व्याख्या बनत गेल्या.

जसा प्रांत वेगळा, भाषा वेगळी तसंच माणसांची शरीरंसुद्धा वेगवेगळी असणं साहजिकच आहे, तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या शरीरासाठी बनणारे कपडे एका प्रमाण पद्धतीनं कसे बनू शकतील?

जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सचे कपडे पाहातो तेव्हा त्यावर डकवलेली मापं ही अमेरिकन आणि  युरोपिअन असतात. आकार मापायच्या त्या वेगळ्या खंडांमधल्या पद्धतीत आपली भारतीय शरीरं कशी बसतील आणि का बसावीत? पण याचा विचार मात्र होत नाही. उलट आपण त्या आकारात बसत नाही यातून स्वत:विषयीचा न्यूनगंड मात्र निर्माण होत जातो. हे त्रासदायक असलं तरी वास्तव आहे.

पण केंद्रीय वस्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी,  ‘व्हायब्रण्ट गुजरात ग्लोबल समीट’मध्ये, भारतीय वस्र उद्योग लवकरच भारतीय आकारानुसार कपडे बनवण्याचं धोरण अंगीकारेल, अशी घोषणा केली आहे.  ही घोषणा स्वागतार्ह अशी आहे. यातून आपल्या देशात बॉडी इमेजबद्दल निर्माण झालेला न्यूनगंड नक्कीच कमी होऊ शकेल.  अर्थात ‘साइझ इंडिया’ साकारण्यापूर्वी या संदर्भातला सखोल अभ्यास आणि संशोधन केलं जाणार आहे. 

माणसानं कपडे घालायला सुरुवात केली ते थंडी वा-यापासून बचाव, लज्जारक्षण अशा मूलभूत कारणांसाठी.  तिथपासून सुरू झालेल्या या कपड्याच्या प्रवासात लक्ष वेधून घेण्यापायी फॅशनचं स्टेशन लागलं  माणूस  कसा आहे  यापेक्षा  कसा दिसतो आहे  याला जास्त महत्त्व येत गेलं ते याच स्टेशनमुळे.

सातत्यानं वेगवेगळ्या राजवटींनी भारतावर राज्य केलं. त्यादरम्यान वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाप होऊन उत्तम साहित्य, कला, विचार, परंपरा याचं फ्युजन तयार झालं. पण त्याचबरोबर इथलं, या मातीतलं जे जे काही होतं, त्याकडे दुजाभावानं आपणच बघायला लागलो. आणि आता आपण सतत आपलं असणं कमी महत्त्वाचं लेखत चाललो आहोत. 

मी काही महिन्यांपूर्वी लडाखला गेले होते फिरायला. तिथे एक ‘लडाखी वुमन्स कॅफे’ नावाची जागा होती. पारंपरिक लडाखी पद्धतीचे पदार्थ, पेयं तिथे मिळत होती. मी मुद्दामून त्याचा आस्वाद घ्यायला गेले आणि त्या कॅफेच्या मालक बाईशी गप्पा झाल्या. ती मला तिच्या लहानपणाबद्दल सांगत होती. आमच्या लहानपणी जेव्हा भारतातल्या इतर भागांमधले शिक्षक इथे शिकवायला यायचे तेव्हा ते आम्हाला लडाख काय बेकार प्रांत आहे, आमचं अन्न किती बेचव आणि मागास आहे असं सांगायचे. त्याचा आमच्यावर इतका परिणाम झाला की खरोखरच आपण जिथे राहतो ती जागा, आपली खाद्यसंस्कृती हे सगळं फारच मागास आहे अशी खात्नीच आम्हाला झाली. आज जगभरातून माणसं इथे येतात. आमचा प्रांत, आमची खाद्यसंस्कृती यांचा आनंद घेतात. आता आता आम्हाला जे आपलं आहे ते आपलं आहे आणि तेच आपण पुढे न्यायला हवं हा विश्वास  येतो आहे. हा विश्वास आमचा आमच्यात निर्माण करायला मात्र खूप वेळ गेला.

तसंच पेहेरावाचं आहे, नाही का? 

कदाचित जेव्हा औपचारक पद्धतीनं, आपले कपडे आपल्या माणसांच्या आकारमानानुसार बनायला लागतील, त्यात त्या आकाराबद्दलची मान्यता येईल.
कपड्याचं माप ही वरवर खूप साधी गोष्ट वाटते; पण या छोट्या गोष्टीनं लोकांच्या मानसिकतेवर मात्र खूप मोठा प्रभाव पाडला आहे. त्यामुळे कपड्यांच्या बाबतीत ‘साइज इंडिया’ प्रत्यक्षात राबवली जाईल तेव्हा त्यामुळेही मोठय़ा प्रमाणावर मानसिकता बदलेल. 

भारतीय वस्त्रोद्योग हे क्षेत्र खूप मोठं आणि प्रचंड मोठय़ा  आर्थिक उलाढालीचं आहे. त्यामुळे सुरुवातीला हे बदल मान्य होताना जड जाईलच. पण तसाही कुठला बदल सोपा असतो? तसा हाही नसेल; पण तो आवश्यक आणि महत्त्वाचा आहे.

आपला रंग, आपले आकार आपले आहेत. आपण ते स्वीकारले पाहिजेत, या भूमिकेतून उचललं गेलेलं हे पाऊल निश्चितच महत्त्वाचं आहे.

(लेखिका चित्रपट लेखिका आहेत़  त्यांचा स्वत:चा साडी निर्मितीचा ब्रॅण्ड आह़े)  

aditimoghehere@gmail.com

Web Title: Size India.. what happened if we get our dress in this size..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.