Lokmat Sakhi >Shopping > दिवाळीत सुंदर ट्रॅडिशनल साडी घ्यायचा विचार करताय? ५ पारंपरिक साड्या, सांगा यापैकी कोणती निवडाल?

दिवाळीत सुंदर ट्रॅडिशनल साडी घ्यायचा विचार करताय? ५ पारंपरिक साड्या, सांगा यापैकी कोणती निवडाल?

दिवाळीच्या तीन दिवसांपैकी एका दिवशी तरी ट्रॅडिशनल लूक केला जातो. पारंपरिक काठपदर साडीशिवाय ट्रॅडिशनल लूकला शोभाच नाही. म्हणूनच तर दिवाळीत सुंदर ट्रॅडिशनल साडी घ्यायची असेल तर या ५ प्रकारच्या मुख्य पारंपरिक साड्यांवर एकदा नजर टाकाच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 06:16 PM2021-10-25T18:16:12+5:302021-10-25T21:38:47+5:30

दिवाळीच्या तीन दिवसांपैकी एका दिवशी तरी ट्रॅडिशनल लूक केला जातो. पारंपरिक काठपदर साडीशिवाय ट्रॅडिशनल लूकला शोभाच नाही. म्हणूनच तर दिवाळीत सुंदर ट्रॅडिशनल साडी घ्यायची असेल तर या ५ प्रकारच्या मुख्य पारंपरिक साड्यांवर एकदा नजर टाकाच.

Thinking of wearing a beautiful traditional sari for Diwali? 5 Traditional sarees, which one to choose? | दिवाळीत सुंदर ट्रॅडिशनल साडी घ्यायचा विचार करताय? ५ पारंपरिक साड्या, सांगा यापैकी कोणती निवडाल?

दिवाळीत सुंदर ट्रॅडिशनल साडी घ्यायचा विचार करताय? ५ पारंपरिक साड्या, सांगा यापैकी कोणती निवडाल?

Highlightsदिवाळीची तुमची साडी खरेदी अजून झालेली नसेल, तर चटकन या ५ पारंपरिक साड्यांवर एक नजर टाका आणि यंदा दिवाळीत कोणत्या पद्धतीची साडी घ्यायची, हे ठरवून घ्या. 

दिवाळीची छान संध्याकाळ, लक्ष्मीपुजनाचा रंगत आलेला सोहळा, बाहेर होणारी फटाक्यांची आतिषबाजी आणि घरात नवनविन कपडे घालून सजलेली मंडळी. अशा सगळ्या परफेक्ट दिवाळी सेलिब्रेशन थीममध्ये मॅच होण्यासाठी पारंपरिक काठपदर साडी दिवाळीच्या दिवशी हमखास नेसणाऱ्या महिलांची संख्या खूप जास्त आहे. काठपदर साडी, त्यावर सगळे ट्रॅडिशनल दागिने, नाकात नथ, कपाळावर ठसठशीत चंद्रकोर असा सगळा थाट करून दिवाळी साजरी करण्याचा आनंदच वेगळा. दिवाळीची तुमची साडी खरेदी अजून झालेली नसेल, तर चटकन या ५ पारंपरिक साड्यांवर एक नजर टाका आणि यंदा दिवाळीत कोणत्या पद्धतीची साडी घ्यायची, हे ठरवून घ्या. 

 

एकदा बघा तरी हे साड्यांचे प्रकार
१. पैठणीचा तोरा

साड्यांचा विषय निघाला की पैठणीचा उल्लेख झाल्याशिवाय विषयाला पुर्णत्व येतच नाही. अशी साड्यांची महाराणी पैठणी जर यावर्षी दिवाळीला नेसणार असाल, तर क्या बात है... हल्ली पैठणीमध्ये अनेक नवनवीन प्रकार आले आहेत. लोटस पैठणी, डॉलर पैठणी हे पैठणीचे प्रकार तर सध्या जोरात विकले जात आहेत. पण याव्यतिरिक्त बालगंधर्व पैठणी, पेशवाई पैठणी, महाराणी पैठणी या प्रकारातही पैठणी उपलब्ध आहेत. विणकामाच्या चिन्हांवरून पैठणीला ही नावे पडली आहेत. बालगंधर्व पैठणी ही सगळ्यात सुंदर पैठणी मानली जाते. पेशवाई पैठणीचं नक्षीकाम अधिक सुबक असतं तर महाराणी पैठणी ही नावाप्रमाणेच महागडी आणि शाही पैठणी म्हणून ओळखली जाते. ५ हजारांपासून अगदी बेसिक पैठणी मिळायला सुरुवात होते. 

 

२. कांजीवरम 
तामिळनाडूची कांजीवरम साडी तर दक्षिणेतच नाही, तर आता संपूर्ण भारतात आणि जगभरात ओळखली जाते. गर्भरेशमी काठ आणि अतिशय तलम पोत, हे या साडीचं वैशिष्ट्य. वेगवेगळी नक्षी आणि वेगवेगळ्या रंगात ही साडी उपलब्ध आहे. अगदी ३ हजारांपासून ते ५० हजारांपेक्षाही जास्त किमतीत कांजीवरम साडी मिळते. एवढी अफाट व्हराईटी या साडीत बघायला मिळते. दक्षिण भारतात तर कांजीवरम साडी नेसल्याशिवाय कोणताही शुभ प्रसंग पुर्ण होत नाही. तिकडे लग्न समारंभात तर कांजीवरम साडी नेसण्याचं प्रमाण एवढं जास्त आहे की कांजीवरम साडीला त्या भागात ब्राईडल सिल्क साडी म्हणूनही ओळखलं जातं. 

 

३. बनारसी साडी 
Traditional Indian Saree असं जर कुणी म्हटलं तर त्याचा अर्थ त्याला बनारसी साडी पाहिजे आहे. एवढी या साडीची लोकप्रियता आहे. भारतातली प्राचीन साडी म्हणून बनारसी साडी ओळखली जाते. काही वर्षांपुर्वी तर बनारसी शालू नेसूनच महाराष्ट्रीयन नवरी बोहल्यावर चढायची. आता शालू व्यतिरिक्तही इतर अनेक प्रकारांमध्ये बनारसी साड्या उपलब्ध आहेत. बनारसी साडी हे एक महागडे वस्त्र असले तरी बजेटमध्ये खरेदी करायची असल्यास ४- ५ हजारांमध्येही चांगल्या प्रकारची बनारसी साडी बाजारात मिळते. बनारसी साडीचा लूक अतिशय भारदस्त असल्यामुळे सणसमारंभात या साडीला खूपच मागणी असते. 

photo credit- google

४. इरकल साडी
मुळची कर्नाटकातली असणारी ही साडी महाराष्ट्रीयन महिलांनी चांगलीच उचलून धरली आहे. कॉटन आणि सिल्क या दोन्ही प्रकारात इरकल साडी उपलब्ध असते. अगदी चापूनचोपून बसणारी आणि टिपिकल लूक देणारी साडी म्हणून इरकल साडी ओळखली जाते. महाराष्ट्रात सोलापूरमध्ये या साडीचे मोठे मार्केट आहे. सहावारी आणि नऊवारी अशा दोन्ही प्रकारात ही साडी उपलब्ध असून याची किंमतही खूप जास्त नाही. ५०० रूपयांपासून या साड्यांचे प्रकार बाजारात उपलब्ध असून अगदी २ ते  ३ हजारात तुम्हाला अतिशय उत्तम दर्जाची इरकल मिळू शकते. इरकलची बहिण भासणारी खण साडी मागच्यावर्षी दिवाळीत ट्रेंडिंग होती. आता जरा खण साडीचा ट्रेण्ड कमी झालेला दिसून येतो. 

 

५. नारायण पेट
साड्यांच्या विश्वात नारायण पेट हे देखील एक मानाचे नाव. खासकरून महाराष्ट्रात तर ही साडी मोठ्या प्रमाणावर दिसून येते. काठावरून जशी पैठणी ओळखता येते, तशीच नारायण पेटही ओळखता येते. या साडीच्या काठावर एका विशिष्ट प्रकारचे त्रिकोणी डिझाईन असते. साडीचा पोत अतिशय मऊ आणि मुलायम असतो. तसेच ही साडी वजनालाही अतिशय कमी असते. त्यामुळे कॅरी करायला नारायण पेट अतिशय सोपी जाते. ३ ते ४ हजारांपासून पुढे नारायण पेट विकल्या जातात. 

 

Web Title: Thinking of wearing a beautiful traditional sari for Diwali? 5 Traditional sarees, which one to choose?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.