Lokmat Sakhi >Shopping > लग्नाला छान नटूनथटून जायचंय? या ५ गोष्टी तुमच्याकडे हव्याच, ऐनवेळी धावपळ नको

लग्नाला छान नटूनथटून जायचंय? या ५ गोष्टी तुमच्याकडे हव्याच, ऐनवेळी धावपळ नको

मस्त आवरण्यासाठी तुमच्याकडे या गोष्टी असायलाच हव्यात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 05:11 PM2021-11-25T17:11:31+5:302021-11-25T17:47:44+5:30

मस्त आवरण्यासाठी तुमच्याकडे या गोष्टी असायलाच हव्यात...

Ready to get married? These 5 things you must have | लग्नाला छान नटूनथटून जायचंय? या ५ गोष्टी तुमच्याकडे हव्याच, ऐनवेळी धावपळ नको

लग्नाला छान नटूनथटून जायचंय? या ५ गोष्टी तुमच्याकडे हव्याच, ऐनवेळी धावपळ नको

Highlightsलग्नासाठी तयार होताना काही किमान गोष्टी आपल्याकडे असायलाच हव्यात, कोणत्या ते पाहूया...ऐनवेळी धावपळ नको म्हणीन आधीच करुन ठेवा तयारी...

लग्नाचा सिझन म्हटलं की तरुणींसाठी हा खास काळ. लग्नातील प्रत्येक कार्यक्रमासाठी नटण-मुरडणं म्हणजे एक वेगळीच मजा. मग मेहंदी, हळद इथपासून ते अगदी मुलीची पाठवणी होईपर्यंत आपण काय घालायचं याचं प्लॅनिंग महिलांच्या डोक्यात सुरु असते. आता कोणत्या वेळी कोणते कपडे घालायचे हे जरी ठरलेले असेल तरी प्रत्येक कपड्यावर वेगळा मेकअप हवा ना. लग्नाच्या कार्यक्रमांना किंवा लग्नाला जाताना आपल्याला अचानक आपल्याकडे हे नाही, ते नाही असे आठवते आणि मग आपली धांदली सुरु होते. आयत्या तयारी करणे शक्य नसेल तर मग एखाद्या मैत्रीणीकडून किंवा बहिणीकडून ती गोष्ट तात्पुरती घेतली जाते. पण अशी शेवटच्या घटकेला तयारी करावी लागू नये म्हणून लग्नासाठी तयार होताना तुमच्याक़डे असायलाच हव्यात अशा ५ गोष्टी कोणत्या ते पाहूयात. म्हणजे तुमची ऐनवेळी पळापळ होणार नाही आणि तुम्ही फारशी तयारी न करताही लग्नात चमकू शकाल.  

१. आर्टीफीशियल गजरा - लग्नात तुम्ही कोणतीही हेअरस्टाईल करा, पार्ंपरिक कपड्यांवर गजरा छानच दिसतो. ऐनवेळी खऱ्या, ताज्या फुलांचा गजरा शोधणे शक्य होईलच असे नाही. अशावेळी हा खोटा गजरा तुम्ही नक्की वापरु शकता. त्यामुळे तुम्ही एक छानसा आर्टीफिशियल गजरा आणून ठेवा जो तुम्हाला काठपदराच्या साडीवर किंवा एखाद्या पारंपरिक ड्रेसवर केलेल्या हे्अरस्टाइलला नक्की लावता येईल. लांबून पाहिल्यावर हा गजरा खोटा आहे हे कळतही नाही. तसेच पांढरा रंगाचा असल्याने हा गजरा काळ्या केसांवर उठून दिसतो आणि कोणत्याही रंगाच्या कपड्यांवर सूट होतो. 

(Image : Google)
(Image : Google)

२. मेसी बन - लग्नासाठी तयार होत असताना कपडे, दागिने आणि मेकअप हे तर आपण पटकन करतो पण हेअरस्टाईल काय करायची असा यक्षप्रश्न आपल्या सगळ्यांसमोर असतो. त्यातही आपले केस लहान असतील, खूप कुरळे किंवा खूप सिल्की असतील तर त्याचे काय करायचे आपल्याला कळत नाही. मग इतर सगळा लूक परफेक्ट असूनही आपण परफेक्ट दिसत नाही. मात्र अशावेळी तुमच्याकडे एक मेसी बन असेल तर एक छोटा पोनी बांधून तुम्ही त्यावर हा बन लावू शकता. हा लावायलाही अतिशय सोपा असतो आणि दिसतोही छान. तसेच यामध्ये तुमच्या केसांच्या रंगाप्रमाणे शेडस उपलब्ध असल्याने तुम्ही त्याप्रकारे खरेदी करु शकता. 

३. वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्यांचे सेट - आपण पारंपरिक कपडे घातले की त्यावर बांगड्या आवर्जून घालतो. कधी त्या एकाच रंगाच्या घालतो तर कधी वेगवेगळ्या रंगाच्या एकत्र करुन घालतो. साडी, लेहंगा, पंजाबी ड्रेस अशा सगळ्यावर बांगड्या अतिशय चांगल्या दिसतात. त्यामुळे तुमच्या सौंदर्यात भर पडायला मदत होते. त्यामुळे १२ वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्यांचे सेट तुमच्याकडे असायला हवेत, जे तुम्ही ऐनवेळी पटकन घालू शकता. तसेच या बांगड्यांच्या मध्यभागी किंवा पुढे-मागे घालायलाही गोल्डन किंवा सिल्व्हर रंगाच्या किंवा खड्याच्या बांगड्यांचे सेट तुम्ही आधीपासूनच आणून ठेऊ शकता. 

(Image : Google)
(Image : Google)

४. लिपस्टीक - तुम्हाला आवडणाऱ्या रंगाची लिपस्टीक तुमच्याकडे एखादी जास्तीची असू द्या. तसेच गुलाबी, लाल, मरुन अशा कॉमन रंगाच्या लिपस्टीक आणून ठेवा, जेणेकरुन ऐनवेळी एखाद्या कपड्यावर तुम्हाला नेहमी आवडत असलेली लिपस्टीक मॅच होत नसेल तर तुमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध असतो. तसेच नेहमीची लिपस्टीक तुटली, हरवली तरी तुम्ही दुसरी लिपस्टीक लावू शकता. 

५. पर्स - आपण छान आवरले की मोबाईल, एखादा रुमाल, लिपस्टीक, गाडीची चावी या किमान गोष्टी ठेवण्यासाठी आपल्याला हातात पर्स लागतेच. मग ही पर्स आपल्या कपड्यांना मॅच होणारी असायला हवी. लग्नसामारंभांना जाताना भरजरी कपड्यांवर शोभेल अशी गोल्डन, सिल्व्हर, काळी किंवा मरुन रंगाची एखादी पर्स आपल्याकडे असायलाच हवी. त्यामुळे तुमचा लूक आणखी उठून दिसण्यास मदत होते. ऐनवेळी आता मी हातात काय घेऊ असा प्रश्नही पडत नाही. साडी, लेहंगा, पंजाबी ड्रेस अशा कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर जाताना उपयोगी येईल अशा दोन ते ३ पर्स तुमच्या कलेक्शनमध्ये नेहमीच असायला हव्यात.  
 

Web Title: Ready to get married? These 5 things you must have

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.