The richness of the mind is greater than money .. When it comes to experiencing ... | पैशापेक्षाही मनाची समृध्दी मोठी असते.. जेव्हा ती अनुभवायला मिळते तेव्हा...     

पैशापेक्षाही मनाची समृध्दी मोठी असते.. जेव्हा ती अनुभवायला मिळते तेव्हा...     

- डॉ. दीना नाथ
पावसाळ्याचे दिवस संपत आले असले तरी अधून मधून भुरभुरणारा पाऊस सुरूच होता. सर्दी-खोकला-ताप-मलेरिया-हगवण यातून थोडी उसंत मिळू लागली होती. थंडी अजून सुरू झाली नव्हती.
त्या अडीच-तीनशे पाडय़ांसाठी आठवडे बाजाराचं गाव म्हणजे स्वर्गच. धान्य, मोहाची फुलं, गूळ, कोंबडय़ा, शेळ्या असं सर्व किडूक-मिडूक विकून बाजार करायचा. थोडीफार मजा आणि संध्याकाळी आपापल्या गावाकडे परत. या गर्दीत त्या काळात छोटे ट्रान्झिस्टर  कानाला लावून किंवा मोठय़ानं वाजवत फिरणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण. सेल फोन तर सोडा; पण या सर्व पाडय़ांपैकी चार-दोन गावातच एखाद्या तालेवाराकडे फोन असायचा. बाजारचा दिवस म्हणजे आजारी असणा-यांसाठी; पण ‘टोचून घ्यायचा’ दिवस.
अशाच एका बाजाराच्या दिवशी 14-15 वर्षाच्या मीराला बैलगाडीतून तिच्या आई-वडिलांनी आणलं. थोडा धक्का बसला तर विव्हळत होती इतक्या संधिवाताच्या वेदना. गेले 2-3 आठवडे सहन करत होती. डांगमधल्या एका लहान पाडय़ावरील मीरा जवळपास 25 कि.मी. बैलगाडीतून इतक्या खराब रस्त्यानं आली तर किती वेदना झाल्या असतील असं तिला बैलगाडीतच तपासताना वाटत होते. वेदना कमी व्हाव्यात म्हणून खाली चारा, त्यावर घोंगडी व वर पातळ मऊ चादर असं तिला बैलगाडीतून आणलं होतं.
डांग हा महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याला लागून असलेला गुजरातचा अगदी छोटा दुर्गम जिल्हा. घनदाट जंगल, विखुरलेली छोटी छोटी गावं. त्या काळात तर रस्ते आणि वीज यांचा पत्ताच नव्हता. मराठी समजू शकणारी डांगी भाषेत बोलणारी माणसं. 
मीराला तपासून एक वेदनाशामक इंजेक्शन दिलं. तासाभरात तिला थोडं फार बरं वाटू लागलं. साधारण एक आठवडय़ाच्या गोळ्या देऊन दुपारी 3 वाजता त्यांना परत पाठवून दिलं. तोवर बरोबर आणलेली नागलीची भाकर खाऊन मीराच्या वडिलांनी बैल परत गाडीला जुंपले. अंधार पडायच्या मागे-पुढे ते घरी पोहोचतील असे निघाले.
आठवडाभरानं मीरा परत आली. वेदना कमी तर झाल्या; पण अजून त्रस होताच. खूप दिवसांनंतर ती आता रात्री झोपू शकत होती आणि त्यामुळे तिची आईसुद्धा. यावेळेला पंधरा दिवसांची औषधं देऊन तिला पाठवलं.
परत आली पंधरा दिवसांनी तेव्हा बरीच बरी होती. भाडय़ाच्या जीपमधून काही अंतर पायी चालून आली होती. तिच्या कोवळ्या चेह-यावरचा आनंद आणि आत्मविश्वास सुखावून गेला. हळूहळू घरातील आणि शेतातील कामही करता येतील, असा तिला विश्वास वाटू लागला.
ती येत राहिली. बरी होत राहिली. दवाखाना संपला की संध्याकाळी आम्ही दोघे मित्र दवाखान्यात आलेला शीण घालवण्यासाठी आजूबाजूला भटकत असू. एम-80 नावाची एक छोटी मोपेड आमच्याकडे होती. त्यावर स्वार होऊन वेळेच्या उपलब्धीनुसार फिरणं व्हायचं. लोकांच्या भेटी व्हायच्या.
एका संध्याकाळी आम्ही डांगच्या दिशेनं निघालो होतो. असं वाटलं की मीराच्या घरी जाऊन यावं. खराब रस्ते-चिखल आणि संपत आलेला दिवस त्यामुळे आम्ही मीराच्या लहान गावात पोहोचलो तेव्हा सूर्य मावळला होता. तिच्या वडिलांचं नाव सांगून शोधत तिच्या घरी पोहोचलो. अठराविश्वे दारिद्रय़ असलेलं गाव. विजेचा पत्ता नाही. आम्हाला पहाताच मीराचा बाप लगबगीनं पुढे आला. कुडाच्या भिंतीचं घर. थोडय़ाशा उंच जोत्यावर. माती आणि शेणानं सारवलेलं घर आणि त्यापुढे ओटा. घरातली एक फाटकी चादर ओटय़ावर अंथरून त्यात आम्हाला त्यावर प्रेमानं बसवलं. ग्लासभर पाणी पिऊन होईस्तवर आजूबाजूच्या घरातील काही मुलं-माणसं गोळा झाली. यावेळी आपल्या गावात कोण आले याचं सर्वाच्या चेह-यावर नवल. माङया अंडेरला (म्हणजे मुलीला) बरं करणारे हेच डॉक्टर अशी आमची ओळख त्यांनी सर्वाना  करून दिली.  मीराला आता छान वाटू लागल्यानं तीही घराच्या दारात उभी होती. काही मिनिटं पावसा-पाण्याच्या-शेतीच्या गप्पा झाल्या आणि आम्ही निघालो.
ओटय़ावरून उठून आम्ही दोन-तीन पावलं पुढे निघालो. तसा मीराचा बाप आमच्या समोर आला. त्याच्या चेह-यावर अजीजीचे भाव होते. तो म्हणाला - ‘तू माझ्या लेकीला बरं केलंस. माझ्या घरी पहिल्यांदाच आलास आता तुला चहापण पाजू शकत नाही. 
आमच्याकडे दूध तर नसतंच. गावात एक छोटं किराणा दुकान आहे. बाजूच्या गावातला माणूस ते चालवतो आणि संध्याकाळी बंद करून निघून जातो. घरात साखर-गुळपण नाही आणि चहाची पत्ती नाही. नाही तर तुला कमीत कमी बिनदुधाचा चहा तरी पाजला असता. आमची सर्वाची जेवणंपण आत्ताच झाली. तुला मी फक्त पाणीच पाजू शकतो.’
त्याच्या हातात एक कोंबडी होती. आम्हाला म्हणाला,  ‘एवढं माझं ऐक. तुला देण्यासारखी एवढी एक कोंबडीच माझ्याजवळ आहे. ती घेऊन जा.’
 डोक्यात वीज कडाडली. लख्ख प्रकाश पडला. आत्तार्पयतच्या आयुष्यात किती सुखवस्तू कुटुंबं बघितली असतील. घरात मावणार नाही एवढी समृद्धी असणा-या काही जणांची मनं किती कोती असतात हेही पाहिलं होतं. पण एका दरिद्री अशिक्षित माणसाची समृद्धी पाहून धन्य झालो!


(लेखक गेली तीस र्वष आदिवासी, ग्रामीण,  निमशहरी भागात वैद्यकीय व्यवसाय करतात)

deena20nath@gmail.com

 

                                                                                                                                  

Web Title: The richness of the mind is greater than money .. When it comes to experiencing ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.