Protect the environment - even everyone's responsibility! | पर्यावरण रक्षण - ही तर प्रत्येकाची जबाबदारी!
पर्यावरण रक्षण - ही तर प्रत्येकाची जबाबदारी!

-डॉ. विनिता आपटे

किती हे उघडेबोडके डोंगर, या घाणीनं भरलेल्या नद्या, तिथे कुठे तर नदीत पाण्याऐवजी कचराच दिसतोय भगवान, काही शतकांपूर्वी सुजलाम सुफलाम असलेल्या या पृथ्वीची ही काय अवस्था करून ठेवलीय. मला नाही आता जायचं पुढे. आपण परत जाऊ .’

शंकरासोबत पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेली पार्वती खचून गेल्यासारखी दिसत होती. पण शंकर भगवान तिला म्हणाले, ‘काही ठिकाणी खूप चांगली कामं करणारी माणसं आणि गटही आहेत. आता बघ खाली काय मस्त सोन्यासारखी जमीन दिसते आहे.  हा भारतातल्या बिहार राज्याचा भाग आहे. इथल्या शेतक-याना सूर्यफुलांची शेती करायला थेट महाराष्ट्रातील एक संस्था मदत करते. त्यांना अल्पदरात सूर्यफुलांची रोपं देण्याचं काम करते ही संस्था. बिहारचा शेतकरी गरीब त्याच्याकडे अशा बियाणांसाठी पैसे नसतात त्यामुळे महाराष्ट्रातली संस्था त्यांना रोपं देते. सूर्यफुलाला बाजारपेठ चांगली आहे त्यामुळे शेतक-याना फायदा मिळतो. रोपं महाराष्ट्रात तयार केली जातात त्यामुळे तिथल्या गटांनापण काम मिळतं, असे दुहेरी फायदे होतात. आता हे गट सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण देतायेत त्यामुळे जमिनीचा कस सुधारून पर्यावरणाला मदत होते.  

पोलंड किंवा युरोपमध्ये असलेली जंगलं नष्ट होऊ नयेत म्हणून शाळेतल्या मुलांना घेऊन झाडं लावायची मोहीम सुरू केली आहे.
या मुलांना वयाच्या दहाव्या वर्षी एक झाड लावायला शिकवलं जातं आणि ते झाड संपूर्णपणे त्याच्या जबाबदारीवर वाढवावं म्हणून त्या मुलांना वयाची 70 वर्षं पूर्ण केलेले आजी-आजोबा प्रशिक्षण देतात ‘प्लॅण्ट फॉर प्लॅनेट’ हे या मोहिमेचं नाव. या मोहिमेत जवळपास सगळी मुलं सहभागी होताहेत. 
विकसित देशांमध्ये यंत्रणा वापरून कचरा व्यवस्थापन केलं जातं; पण महाराष्ट्रात पनवेलसारख्या शहरात गणेश कडू आणि त्यांच्या पत्नी हौसेनं कचरा व्यवस्थापनाचे धडे देत आहेत. त्यांनी त्यासाठी त्यांच्या कल्पनेतून एक साधी छोटी बॅग तयार केली आहे. या बॅगेतल्या दोन भागांमध्ये कच-यातून खत निर्माण होऊ शकतं याचं प्रात्यक्षिक दाखवून घरातला कचरा जिरवून घरातल्या कोप-यात बाग फुलवता येते हे या दोघांचं सांगणं आहे. हळूहळू या त्यांच्या कार्यात बर्‍याच महिला सामील होतायेत.

सर्वत्र झाडं लावण्याचा सपाटा सगळ्यांनीच सुरू केला आहे. त्यातून प्रदूषणाच्या समस्या कमी व्हायला मदत होईल. अलाहाबादजवळून जाणा-या गंगेच्या किना-यावर ‘गंगा’ नावाचा कॉलेज युवतींचा गट काम करत आहे. या युवती गंगेच्या किनार्‍यावर दिवे विकणा-या  मुलांना गंगेत दिवे सोडल्यामुळे होणा-या प्रदूषणाची माहिती देतात, त्यांना असे दिवे गंगेत न सोडण्यासाठी सातत्यानं जागृती करतात; पण त्याचबरोबर त्यांना हेपण माहिती आहे की या दिव्यांवरच त्यांची उपजीविका अवलंबून आहे. त्यासाठी त्यांनी काही संस्था आणि कंपन्या यांच्या मार्फत निधी गोळा करून याच मुलांना हाताशी धरून तिथले घाट साफ करायची मोहीम हाती घेतली आहे. या सगळ्याचा निश्चितच चांगला परिणाम होतो आहे. तैवानसारख्या एका छोट्या देशात यंत्राच्या साहाय्यानं प्लॅस्टिकचं रूपांतर धाग्यामध्ये करून त्यापासून स्कार्फ आणि ब्लँकेट्स केली जातात. तिथली  ‘हेल्प ओ’ ही संस्था अशा तयार झालेल्या वस्तू गरजू मंडळींना देतात. प्लॅस्टिक गोळा करून आणायचं आणि त्याचं रूपांतर अशा पद्धतीनं करायचं ही कल्पनाच किती छान आहे!

आंध्र प्रदेशातील एका गावात राहणारी बाई व्याकम्मा आपल्या जवळच्या बायकांना गोळा करून घरातल्या जुन्या चादरी, कपडे यांच्या सुंदर पिशव्या शिवते आणि किराणा दुकान किंवा भाजी बाजाराच्या जवळ उभी राहून विकते. किंमत फार नाही; पण घरातून निघताना पिशवी घेतली नाही म्हणून प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरण्याऐवजी या आकर्षक स्वस्त पिशव्या लोकं आवर्जून घेतात. तिच्या गल्लीतल्या बायकांनापण पैसे मिळतात आणि पर्यावरणालाही प्लॅस्टिकपासून वाचवता येतं. 

शंकर भगवान पुढे म्हणाले, ‘जगभरात खूप संस्था चांगली कामं करताहेत; पण पर्यावरण रक्षण आणि त्यासाठी प्रयत्न ही खरं तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. स्वयंशिस्त हा त्यावरचा खरा उपाय आहे. आता जर प्रत्येक मानवानं पर्यावरण वाचवण्यासाठी स्वयंशिस्तीतून काम केलं नाही, मला काय करायचंय ही वृत्ती सोडली नाही तर मग भविष्य कठीणच आहे. प्रत्येक देशाचं सरकार कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मोठय़ा योजना राबवत आहेत. सौरऊर्जेचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढतो आहे.  भारतात कोचीनचा विमानतळ संपूर्ण सौरऊर्जेवर चालवला जातो हे एक मोठं उदाहरण आहे. गुजरातमध्ये तर ‘बेअर फूट’ नावाची संस्था सौरऊर्जेचे दिवे, उपकरणं तयार करायला शिकवायचं काम करते. आणि या प्रशिक्षण केंद्रात आफ्रिका, श्रीलंका आणि इतर वेगवेगळ्या देशांमधून बायका, मुलं शिक्षण घेऊन स्वयंरोजगार मिळवतात. 

नवीन पिढीतले तरुण प्रत्येक गोष्ट नैसर्गिक पद्धतीनं करायचा प्रयत्न करताहेत. दिल्लीमधला एक युवक सुब्रतो त्याच्या शिक्षणाचा एक भाग म्हणून संशोधन करताना सोलरवर चालणारी गाडी विकसित करतोय यापूर्वी त्याने सोलारवरची स्कूटर तयार केली होती.

याबरोबरच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग खूप वाढतो आहे. तरीही अजून खूप काही करायची गरज आहेच. निसर्ग अधून मधून रौद्र रूप धारण करून धोक्याची घंटा सतत वाजवतोच आहे. शिवाय आता सगळ्यांनाच या धोक्याची जाणीव झालेली आहे. तरीही मला वाटतं आता कृती बरोबरच सतत काय करावं याचा पाठपुरावा करायला हवा. आपल्याच आजूबाजूच्या लोकांना सगळ्या उपक्रमात ओढून घ्यायला हवं. जर सगळ्यांनी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारली तर ब-याच गोष्टी सोप्या होतील. चंगळवाद थोडा कमी केला नाही तर मात्र  मला तिसरा डोळा उघडण्याशिवाय पर्याय राहाणार नाही . पार्वतीबरोबर आपल्या पृथ्वी प्रदक्षिणेदरम्यान भगवान शंकरांनी दिलेला हा इशारा खरं तर पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसानं समजून घ्यायला हवा.  पर्यावरण रक्षणातली आपली जबाबदारी प्रत्येकानं उचलली तर धोक्याच्या कडेवर उभी असलेली आपली पृथ्वी आपण नक्कीच वाचवू शकतो !

(लेखिका ‘तेर पॉलिसी सेंटर’च्या संस्थापक संचालक आहेत.)

aptevh@gmail.com


Web Title: Protect the environment - even everyone's responsibility!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.