Pleasant place in house. | देवघर प्रसन्न करण्यासाठी हे करून पाहा!
देवघर प्रसन्न करण्यासाठी हे करून पाहा!

-कविता भालेराव

देवघराशिवाय भारतीय माणसाच्या घराला घरपण येत नाही. खूपच महत्त्वाची आणि विश्वासाची जागा असते ही.
 देवघराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवं. आणि म्हणूनच देवघराच्या डिझाइनलाही विशेष महत्त्व आहे. देव, देवपूजेचं साहित्य, पूजा करणार्‍या व्यक्ती आणि देवघराचं साहित्य या सर्वांचा विचार देवघराची रचना करताना करावा लागतो.

बंद देवघर

जर आपल्या घरात भरपूर जागा असेल तर पूजाघर हे वेगळं, एखाद्या खोलीसारखं बनवता येतं. ज्यात आपण छानपैकी देव्हारा ठेवून व्यवस्थित स्टोअरेज बनवू शकतो. तिथे बसून निवांत पूजा करू शकतो. जागा मोठी असेल तर आपण काही मोठय़ा पूजापण तिथेच करू शकतो. सहजच 5-6 माणसं आरामात बसून पूजा करू शकतील, अशीपण योजना आपण देवघर करताना करू शकतो. आता बंगला असेल तर आपण देवघरासाठी योग्य दिशेलाच जागा ठेवू शकतो. लिव्हिंग डायनिंग जवळ, स्वयंपाक घराजवळ, अशी देवघरासाठी जागा ठरवू शकतो. 

देवघरासाठी एक स्वतंत्र खोली असल्यामुळे त्याला दरवाजाही सुंदर डिझाइनचा बनवून एक प्रकारची खासगी जागा तयार करू शकतो. भरपूर देवाच्या मूर्ती असतील तर  मात्र देवघर मोठंच  असावं.
 

नुसतंच देवघर

नुसतंच देवघर म्हणजे काय? तर सगळ्या घरांमध्ये स्वतंत्र देवघर करण्यासाठी जागा नसते. तेव्हा योग्य दिशेनुसार देवघर ठेवावं. मग ते कोणत्याही एका खोलीमध्ये ठेवता येतं. 
काही घरात बैठकीच्या खोली,  मुलांच्या खोलीत  स्वयंपाकघरात, पाहुण्यांसाठी केलेल्या खोलीत देवघराला जागा केलेली असते. देवघराला नुसतीच जागा करून भागत नाही. देवघराचं व्यवस्थित नियोजनही करावं लागतं. 
 

देवघराचं नियोजन करताना.

 किती देव आपल्या घरी आहेत. मूर्ती आहेत की तस्बिरी आहेत. काहीजणांकडे एकच मूर्ती ठेवतात. तसे असेल तर ती मूर्ती किती मोठी आहे, ती मूर्ती कशापासून बनवली आहे? याची नीट माहिती घेऊन मगच देवघराची रचना करावी.

 देवघरात ध्यान धारणा करायची आहे का, एकाचवेळी कितीजण पूजेला बसतात, पूजा करताना कोणकोणत्या वस्तू बसल्या जागेवर लागतात याचा विचार करावा.वयस्कर मंडळींना जमिनीवर बसून पूजा करणं अवघड जातं. अशावेळी आपण थोड्या उंचीवर देवघर ठेवू शकतो. सगळ्यांना लाकडाचं देवघर खूप आवडतं.  पण आपल्याकडे जरा जागा असेल तर हे वापरणं योग्य.  शिवाय लाकडी दरवाज्याचं डिझाइन फारच कलाकुसर करून करता येतं. 

छोट्या घंटा लावून दरवाजाचं सौंदर्य वाढवू शकतो. याचा किणकिणता आवाज फारच कर्णमधुर वाटतो. शिवाय देवही बंदिस्त राहात नाही. आत उदबत्ती असेल तर धूर कोंडून राहात नाही.  आपण दिवा लावतो, अगरबत्ती लावतो. हे ठेवण्यासाठी आपल्याला व्यवस्थित जागा हवी. लाकडी देवघरात तेवणारा दिवा ठेवणं योग्य नाही. दिवा ठेवूनही देवघर सुरक्षित ठेवण्यासाठी लाकडी देवघराचा तळभाग संगमरवरी ठेवून त्याची लांबी, रुंदी ही जास्त ठेवावी. 
 संगमरवराचं मंदिरपण अतिशय सुंदर दिसतं आणि ते टिकावू असतं. खूप विविध प्रकारचे डिझाइन, आकार यामध्ये ते उपलब्ध असतं. शिवाय लाइट लावण्याची सोयही असते. हे देवघर स्वच्छ करण्यासाठी अतिशय सोपं असतं.
 आजकाल काच, अक्रॅलिक, मेटल यामध्येही देवघर मिळतात.
 

देवघरात पूजेच्या साहित्यालापण जागा हवी. शिवाय पोथ्या असतात. हे सगळं नीट ठेवलं पाहिजे. त्यासाठी योग्य ते कपाट करणं. किंवा जिथे उंचीवर देवघर आहे त्या ओट्याखालीपण आपण यासाठीचं  स्टोअरेज करू शकतो.
 नैवेद्य दाखवण्यासाठी-ठेवण्यासाठी पण देवघरात जागा हवी किंवा आपण एक स्लायडरपण बनवून घेऊ शकतो. नैवेद्याचं ताट ठेवण्यापुरता बाहेर काढायचा आणि एरवी आत ढकलून द्यायचा.

 देवघरात लाइट महत्त्वाचा असतो. योग्य त्या प्रकाशव्यवस्थेमुळे  देवघराचं  सौंदर्य वाढतं. इलेक्ट्रिकचे लामण दिवेही आपण वापरू शकतो, झुंबर लावू शकतो. देवघराशेजारी मोठय़ा समया ठेवू शकतो. योग्य प्रकाशव्यवस्था देवघराच्या शांततेत आणि पावित्र्यात भरच घालते. देवघरात प्रकाश व्यवस्थेबरोबरच हवा खेळती राहाण्याचा विचारही महत्त्वाचा आहे. छोटा पंखा,  भिंतीतला पंखा किंवा उभा पंखा अशी सोय करता येते. देवघर जिथे आहे त्यालाही एक्सहॉस्ट पंखा गरजेचा असतो. 
 

देवघरात स्टोअरेज करताना तेल, वाती, अगरबत्ती, तूप या साहित्याचा विचार करून कप्पे बनवावे. शिवाय हात पुसायला रुमाल लागतात.  देवाचे वस्त्र असतात. ताम्हण , तांब्या अशा वस्तूंसाठी पण नीट जागा हवी. देवघरातील सजावटीचं सामानपण तिथेच बसेल याची काळजी घ्यावी. छोटं छोटं पण देवघराच्या  सजावटीचं साहित्य खूप असतं. जे एखाद्या सणाच्या वेळेस लागतं. ते सापडलं नाहीतर मग ऐनवेळी धावपळ होते. 

 काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते. तिथे देवघर भिंतीवर अडकवावं लागतं. आणि  उभ्यानंच पूजा करावी लागते. अशा ठिकाणी पूजेचं साहित्य वेगळीकडेपण पटकन हाताला लागेल असं ठेवावं. वर वर पाहता या अगदी साध्या गोष्टी आहेत; पण त्याच फार महत्त्वाच्या असतात. या सगळ्या मुद्दय़ांचा विचार हा देवघर बनवताना झाला तरच देवघरात देवासमोर बसल्यावर शांत अन् प्रसन्नतेचा अनुभव घेता येतो.

(लेखिका इंटिरिअर डिझायनर आहेत)

kavitab6@gmail.com

Web Title: Pleasant place in house.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.