Lokmat Sakhi >Parenting > Mother's day 2022 : ‘..ती आहेच स्पेशल!’- शुभांगी गोखले-सखी गोखले सांगतात, मायलेकीच्या नात्याची प्रेमळ गोष्ट; स्वतंत्रही-सोबतही!

Mother's day 2022 : ‘..ती आहेच स्पेशल!’- शुभांगी गोखले-सखी गोखले सांगतात, मायलेकीच्या नात्याची प्रेमळ गोष्ट; स्वतंत्रही-सोबतही!

Mother's day 2022 : मायलेकीच्या नात्याचं देखणं आणि सशक्त रुप- शुभांगी गोखले आणि सखी गोखले. त्यांच्याशी खास संवाद मायेच्या नात्याविषयी..

By सायली जोशी | Published: May 7, 2022 03:11 PM2022-05-07T15:11:00+5:302022-05-07T17:02:10+5:30

Mother's day 2022 : मायलेकीच्या नात्याचं देखणं आणि सशक्त रुप- शुभांगी गोखले आणि सखी गोखले. त्यांच्याशी खास संवाद मायेच्या नात्याविषयी..

Mother's day 2022: ‘..she is special! Independent! interview of Sakhi Gokhale and Shubhangi Gokhale | Mother's day 2022 : ‘..ती आहेच स्पेशल!’- शुभांगी गोखले-सखी गोखले सांगतात, मायलेकीच्या नात्याची प्रेमळ गोष्ट; स्वतंत्रही-सोबतही!

Mother's day 2022 : ‘..ती आहेच स्पेशल!’- शुभांगी गोखले-सखी गोखले सांगतात, मायलेकीच्या नात्याची प्रेमळ गोष्ट; स्वतंत्रही-सोबतही!

Highlightsआपल्या आईसोबत असलेली आपली मैत्री कायम ठेवा असं मला मनापासून सांगावंसं वाटतं, असं सखी अगदी सहज सांगून जाते. मदर्स डे किंवा मातृदिन या संकल्पना अतिशय चांगल्या आहेत. हे दिवसांचे निमित्त असले तरी हा दिवस आपण कृतज्ञ भावनेने सेलिब्रेट करायला हवा.

सायली जोशी-पटवर्धन

मायलेकीच्या नात्याचं एक सुंदर रुप. जितकं देखणं, तितकंच मनस्वी, जितकं घट्ट तितकंच मुक्त, एकमेकींना समजून घेणारं, सोबत करणारं तरी स्वतंत्र. शुभांगी गोखले-सखी गोखले.मदर्स डेचं निमित्त म्हणून या मायलेकींशी गप्पा मारल्या, त्यांच्या नात्याविषयी, सोबत मोठं होण्याविषयी-करिअर-लग्न यांचे निर्णय घेण्यासह परस्परांच्या सोबतीनं जगण्याविषयीही. जसं त्यांचं नातं तसंच या दोघीही मनापासून बोलल्या, आपलं नातं उलगडताना, जगण्याचा प्रवास सांगताना त्या शेअर करतात असं काही जे आईमुलीच्या नात्यासाठी ‘स्पेशल’ आहे. विशेष म्हणजे नातं मायलेकींचं-हक्काचं असलं तरी त्यांच्या बोलण्यात आणि जगण्यात परस्परांविषयी असलेला आदर, आणि एकमेकींना समजून घेण्यातली माया या संवादात कायम जाणवत राहते. शुभांगी ताई सांगतात तसं, लेकीची मैत्रिण होत असतानाच आई म्हणूनही माझ्याविषयी तिला आदर वाटेल असा मी पालकत्वाचा विचार करत गेले, त्याच प्रवासाची ही गोष्ट. शुभांगी गोखलेआणि सखी गोखले यांच्याशी गप्पा..

(Image : Google)
(Image : Google)

१. शुभांगी गोखलेंना विचारलं, लेकीनं अभिनय क्षेत्रातच काम करायचं ठरवलं तेव्हा तिच्या या निर्णयाविषयी काय वाटलं होतं?

शुभांगीताई सांगतात, तिला जे आवडत होतं ते ते ती करत गेली आणि त्यासाठी मी तिला प्रोत्साहन देत गेले. एकदा सहज तिला दिल, दोस्ती दुनियादारी या मालिकेची ऑफर आली. त्यावेळीही ती अभिनय क्षेत्रात येण्याबाबत फारशी उत्साही नव्हती. पण चांगली संधी आणि वेगळा अनुभव म्हणून ही संधी स्वीकारायची असं आम्ही दोघींनी ठरवलं आणि पुढे तिच्या अभिनयाने तिने स्वत:ला सिद्ध केले. त्यानंतर अमर फोटो स्टुडिओ या नाटकातही तिने अतिशय उत्तम अभिनय करत मला एकप्रकारे सरप्राईजच दिले.

खरंतर इतके वर्ष इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांना भेटल्यानंतर आणि गाठीशी भरपूर अनुभव घेतल्यानंतर आपल्या मुलीने या क्षेत्रात यावे असे मला फारसे वाटत नव्हते. या क्षेत्रात काम करण्यासाठी आपल्याकडे आवश्यक असलेले पेशन्स आणि कष्ट हे सगळे तिला झेपणारे आहे असे मला अजिबात वाटत नाही. अमुक अखादी गोष्ट घडणार हे मला अगदी सवयीचे झाले आहे पण तिचा स्वभाव पाहता तिला ते जमेल असे मला अजिबात वाटत नाही. त्यातही तिचा अभ्यासाकडे भरपूर कल होता, तिने तिच्या आवडीचे छान वेगळे करिअर करावे अशी माझी कायम इच्छा होती, ती तिने पूर्णही केली. आर्ट क्यूरेटर म्हणून ती आता काम करत आहे, प्लॅन ए हेच तिचे करिअर असावे आणि प्लॅन बी अभिनय असावा असे मला कायम वाटत होते. सखी अतिशय नॅचरल ॲक्टर आहे. समजून उमजून अभिनय करण्याची कला तिच्याकडे उपजत आहे असं मला वाटतं. ती ताकदीची कलाकार आहे यावर माझा विश्वास आहे.

(Image : Google)
(Image : Google)

२. आईच्या आणि तुझ्या खास नात्याविषयी काय सांगशील असं सखीला विचारलं तर ती म्हणाली..

आई आणि माझं नातं कायम अतिशय मोकळं आणि मैत्रीचं आहे. आम्ही दोघीही एकमेकींना आमच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी शेअर करतो, त्यामुळे आमच्या नात्यात पारदर्शकता आहे. आईने माझ्या आयुष्यात आईच्या भूमिकेबरोबरच बाबाची भूमिका, आजी-आजोबांची भूमिका आणि माझ्या मैत्रीणीची भूमिकाही केली असल्याने ती अनेक पातळ्यांवर लढली आहे. मी अभिनय क्षेत्रात आले तेव्हा माझ्यावर दडपण होतं का असं विचारलं जातं पण दडपण असं नाही म्हणता येणार पण बाबांच्याही आणि आईच्या कामाशी आपण मॅच करावं असं वाटतं आणि ती वेळ आता आली आहे. आणि मला दडपण येत नाही याचं अजून एक कारण म्हणजे आई प्रत्येक गोष्टीत कायम पाठिशी असते. तसंच आमचा कामाचा पिंड खूप वेगळा आहे. तिच्या आणि माझ्या कामाची शैली खूप वेगळी आहे. काम निवडण्याची, विषयांची आमची आवडही बरीच वेगळी आहे. सुरुवातीला काम करताना थोडं दडपण जाणवायचं पण आता मजा येते.

(Image : Google)
(Image : Google)

मी कायमच प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटक करत होते. शाळा, महाविद्यालयातही मी बऱ्याच स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे. पण पुढे याच क्षेत्रात करिअर करायचं असं मी कधीच ठरवलं नव्हतं. पण अचानक दिल दोस्ती दुनियादारी मालिकेची ऑफर आली. त्यावेळी टीव्ही या माध्यमात कधी काम केलेले नसल्याने मी फारच संभ्रमावस्थेत होते. पण ऑडीशन दिल्यानंतर करुन बघायला काय हरकत आहे असं वाटल्याने मी काम सुरू केलं. या क्षेत्रात असणारे कष्ट आणि एकूण त्यातील बारकावे माहित असल्याने ही मालिका करायला आईचा पाठिंबा होता मात्र मी या क्षेत्रात स्वत:ला वाहून घ्यावे असे तिला कधीही वाटले नाही. तिच्या अनुभवातून मला काय करायचे नाही हे कळते पण त्याचबरोबर माणसं कशी ओळखायची, काम कसं निवडायचं अशा अनेक गोष्टी मी तिच्याकडून शिकत असते.

३. मुलगी आणि आईचं नातं एका टप्प्यावर जीवलग मैत्रिणींसारखं होतं, तुमचं नातंही तसंच दिसतं, त्याविषयी काय सांगाल..

शुभांगीताई म्हणाल्या, शालेय जीवनात सखी गुरुकूल पद्धतीच्या शाळेत असल्याने आमची वर्षातून दोन वेळच्या सुट्टीतच भेट व्हायची. त्यामुळे या सुट्टीच्या काळात तिला फिरायला नेणे, खरेदी करणे, काही कार्यक्रमांना नेणे, नातेवाईकांमध्ये नेणे, खायला घालणे असे सगळे व्हायचे. जशी ती मोठी झाली तसे आम्ही एकत्र नाटक आणि सिनेमे पाहायला लागलो. तिच्या लग्नानंतर हे प्रमाण काहीसे कमी झाले असले तरी आजही मी एकटी राहते म्हणून ती तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझ्यासोबत लंच, डिनर असे काही ना काही प्लॅन करतेच याचं मला खूप कौतुक वाटतं.

(Image : Google)
(Image : Google)

सखी अतिशय प्रेमळ आणि समजूतदार मुलगी आहे. सखीला एक चांगली व्यक्ती बनवण्यासाठी शक्य ते सगळे कऱण्याचा मी प्रयत्न केला. तिची मैत्रीण होत असतानाच आई म्हणून तिला माझी काही प्रमाणात आदरयुक्त भिती वाटेल याची मी वेळप्रसंगी काळजी घेतली. अनेकदा तिच्या काही गोष्टींबाबत मी काहीशी शिस्तीची आणि कठोरही भूमिका घेतली. पण तिच्या विकासासाठी ती गरजेची असल्याने तिनेही माझे म्हणणे ऐकले. त्यामुळे आज सखीने अमुक गोष्ट चुकीची केली असे म्हणायला जागा राहू नये याची मी माझ्या परीने पूर्ण काळजी घेतली. माझ्या धाकाचा फायदा झाला असे मला आता वाटते. आमच्यात शेअरींग चांगले आहे, एकमेकींचे काय सुरू आहे, काय प्लॅन आहेत हे आम्हाला माहित असते.

सखी सांगते..

आईने मला आयुष्यात प्रत्येक गोष्ट करण्यासाठी सक्षम केले आहे. ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट वाटते. भारताबाहेर शिक्षण घेण्यासाठी जाणे हा माझ्यासाठी खूप मोठा निर्णय होता, पण आई पाठीशी असल्याने, तिचा आधार आणि सल्ला असल्याने मला ते करणे शक्य झाले. माझ्या सगळ्याच निर्णयांबाबत आई सल्ला तर देतेच, वेळप्रसंगी दटावून अमूक गोष्ट करु नको असेही सांगते. पण एखादी गोष्ट मी करायची म्हणत असेल तर केवळ जिद्द आहे म्हणून नाही तर त्याच्यामागे माझी असलेली पॅशन तिला समजते आणि ती माझ्यासोबत उभी राहते.

आम्ही सगळ्या गोष्टी एकमेकींशी शेअर करतो. इनफॅक्ट सुव्रत आणि तिचं नातंही खूप छान असल्याने ते जावई वगैरे असं नाहीये. त्या दोघांचे गुण इतके जास्त जुळतात की तोच तिचा मुलगा आहे असं वाटावं इतकं. त्यामुळे आई माझी आणि सुव्रत अशा दोघांची मैत्रीण आहे. तसंच माझ्या सासुबाईंशी माझी छान मैत्री असल्याने त्याही आमच्या दोघांच्या मैत्रीण आहेत. एकूण आमच्या कुटुंबात सगळ्याच स्तरावर बरंच स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आम्ही सगळेच मस्त खेळीमेळीने एकमेकांशी मित्रत्वाच्या नात्याने वागत असतो.

(Image : Google)
(Image : Google)

४. मदर्स डे आहे लवकरच, तुमचा सेलिब्रेशनचा काही खास प्लॅन असतो? आहे..?

शुभांगीताई सांगतात, आईवडिल मुलांच्या फायद्यासाठी सगळं सांगत असतात, त्यामागे त्यांचे प्रेम आणि काळजी असते हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. मदर्स डे किंवा मातृदिन या संकल्पना अतिशय चांगल्या आहेत. हे दिवसांचे निमित्त असले तरी हा दिवस आपण कृतज्ञ भावनेने सेलिब्रेट करायला हवा. आईवडिलांकडे अनुभव असल्याने ते आपल्याला काही सूचना देत असतात ते प्रेमाने घ्यायला हवे.

सखी सांगते..

आई सध्या एका मालिकेच्या शूटींगसाठी बाहेरगावी आहे. माझीही एका नाटकाची तालीम सुरू आहे, त्यामुळे मदर्स डेला तर काही वेगळा प्लॅन नाही. पण जेव्हा भेटू तेव्हा आम्ही नक्कीच सेलिब्रेशन करु. आई ही आपल्या प्रत्येकासाठीच एक हक्काची, मायेची जागा असते. आपल्या आईसोबत असलेली आपली मैत्री कायम ठेवा असं मला मनापासून सांगावंसं वाटतं.

Web Title: Mother's day 2022: ‘..she is special! Independent! interview of Sakhi Gokhale and Shubhangi Gokhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.