- गौरी कोठारे
जया बच्चन यांची एक मुलाखत सध्या फार गाजते आहे. छोट्या छोट्या तुकड्यात रील व्हायरल होतात आणि त्यावर चर्चाही होते. त्यातलाच एक तुकडा. जया बच्चन म्हणतात, मी फार कडक शिस्तीची आई होते. माझ्या मुलांना माझा धाकही होता आणि शिस्तही. गोष्टी वेळच्या वेळी करणं, नीट वागणं याला काही पर्याय नसतो. आजकाल मुलं जशी वागतात ते पाहून मला प्रश्न पडतो की मुलांना धाक नाही का?
त्यांच्या या अर्थाच्या विधानावर अर्थातच चर्चा झाली.
पण प्रश्न खरंच असा आहे की आजकाल कायम चर्चा होते की, मुलांना धाक नाही? मुलं आई-बाबांचं ऐकत नाही. चारचौघात कशीही बसतात, लोळतात, दंगा करतात आणि आई-वडील मुलाचं मन दुखावू नये म्हणून त्याला काही बोलतही नाहीत. त्याच्या कलानं घेतात. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी मुलं दंगा करतात, प्रचंड आरडाओरडा करतात, वस्तू तोडतात. बस ट्रेनच नाही तर विमानातही सीटला लाथा मारतात. त्याचा त्रास पुढे बसलेल्यांना होतो. उर्मट उत्तरंही देतात.
हे सारं मान्य करणं किंवा मुलांना सामाजिक शिष्टाचारच न शिकवणं म्हणजे त्यांच्या कलानं घेणं असतं का?
चारचौघात ओरडू नये, मोठ्यानं बोलू नये, लाथा मारू नये, रस्ता अडवू नये, मोठ्यानं मोबाइलवर गाणी किंवा कार्टून लावू नये. खाऊन पदार्थ फेकू नये, कचरा करू नये, हे सारं मुलांना सांगणं. त्यांनी शिष्टाचार पाळणं म्हणजे काही बालमनावर आघात होतात का?
हे मान्यच आहे की, हे सारं मुलं मोठ्यांचं पाहून शिकतात, मुलांनी जसं वागावं असं अपेक्षित असतं तसं पालकांनी कायम वागायला हवं, कारण मुलं पालकांची वर्तणूक पाहतच असतात. पण अनेकदा पालक मुलांसमोर हतबल दिसतात तसं होऊ नये. आपण समाजात वावरताना सामाजिक नियम पाळणं गरजेचं आहे एवढं तरी मुलांना शिकवायलाच हवं..
