PAD Bank runs to help womens and girls in times of need. | अडचणीच्या वेळेस मदतीला धावणारी पॅड बॅंक
अडचणीच्या वेळेस मदतीला धावणारी पॅड बॅंक

 डिजिटल पॅड बॅँक ही कल्पना नक्की काय आहे?

दोन वर्षांपूर्वी आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं होतं, त्यावेळी काही महिलांनी या शिबिरात स्रीरोगतज्ज्ञ आणि त्वचारोग-तज्ञांना बोलवा, अशी मागणी  केली. खोलात जाऊन माहिती घेतली तेव्हा समजलं की अनेक महिला पाळीदरम्यान कपड्याचा वापर करतात. अस्वच्छतेमुळे संसर्गाच्या समस्या आहेत. अनियमित पाळीचे प्रश्न आहेत.  वेगवेगळ्या गटातील महिलांशी बोलले तेव्हा त्याचं गंभीर स्वरूपही लक्षात आलं.  वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा केली.  देशातील 85 टक्के  स्त्रिया आजही मासिक पाळीदरम्यान कपडा वापरतात. वस्ती, चाळीमधील स्रिया मासिक पाळीवेळी वापरायचं कापड इतर कपड्यांच्या खाली कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीनं वाळवतात.
मासिक पाळीदरम्यान पुरेशा स्वच्छतेची काळजी न घेतल्यानं 27 टक्के स्रियांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो ही स्थिती चिंताजनक आहे. प्रत्येक  स्त्रिला/ मुलीला सॅनिटरी पॅड मिळावं हीच इच्छा बाळगून मी  फाउण्डेशनची स्थापना केली. 28 मे 2017 रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्तानं डिजिटल सॅनिटरी पॅड बँकेची सुरुवात झाली.

पॅड बॅँकेचं काम कसं चालतं?

देश-विदेशातून सॅनिटरी पॅड्स आमच्या पॅड बँकेत येतात. सुरुवातीला काही बचतगटांकडून पॅड्स घेऊन या बॅँकेची सुरुवात केली. मात्र नंतर वेगवेगळ्या संस्था जगाच्या कानाकोपर्‍यातून या बॅँकेत पॅड्स देत आहेत. काही कुटुंब वैयक्तिक पातळीवर नियमितपणे पॅड्स देतात, तर काही निवासी वसाहती, महाविद्यालयीन समूह अशा अनेक मार्गांनी बँकेत पॅड्स जमा केले जातात. 
 आमच्या पॅड बँकेच्या एक लाख सात हजार महिला सदस्य असून, त्यांना आम्ही दरमहा नियमितरीत्या 10 सॅनिटरी पॅड मोफत देतो. बँकेतर्फे महिलांना ओळखपत्र देण्यात आलं आहे. 13 शाळांमध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, डिस्पोझेबल मशीन बसवल्या आहेत. या शिवाय, प्रथमोपचार पेटी असते. आम्ही ‘मेन्यस्ट्रअल हेल्थ किट’ तयार केलंय. 

या किटमध्ये सॅनिटरी पॅड्स, दोन निकर्स, पेनकिलर्स, हॅण्ड सॅनिटायजर असं साहित्य आहे. अशा पद्धतीचे किट्स शाळांमध्ये देण्यात येतं. हे किट्स मुख्याध्यापकांना त्यांच्या कक्षात दर्शनी भागात ठेवण्यास सांगितलं आहे. जेणेकरून शाळेत कोणत्याही विद्यार्थिनीला त्नास झाल्यास या किटच्या माध्यमातून मदत करता येते. अभिनेता अक्षय कुमारनेही पॅडमॅन चित्नपटानंतर आवर्जून हे किट्स आमच्याकडून नेलं. 

हे काम मग वाढत कसं गेलं?
 

पूर्वी केवळ काही ठरावीक भागांतून पॅडची मागणी व्हायची आता मात्न देशातच नाही तर परदेशातूनही मागणी वाढतेय. नैरोबी, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, पंजाब, हरियाणा, चंदीगडमधून आम्हाला पॅड्सची मागणी करणारे ई-मेल येत आहेत. दक्षिण आफ्रिकेतील एका महाविद्यालयानं पाच हजार सॅनिटरी पॅड्सची मागणी केली होती.  

ती नुकतीच आमच्या पॅड बॅँकेमार्फत  पूर्ण केली आहे. तिथल्या विद्यार्थिनींसाठी हे पॅड्स त्यांच्या शरीरयष्टीप्रमाणे बनवण्यात आले आहे. या मुली दक्षिण आफ्रिकेत ज्या भागात राहातात तिथे या पॅड्सची उपलब्धता खूपच कमी आहे. त्यामुळे आमच्या बॅँकेतून गेलेल्या या पॅड्सची त्यांना मदत झाली. 
पॅड बँक एकच आहे; पण भविष्यात अनेक शाखा सुरू व्हाव्यात, अशी इच्छा आहे.

ऐच्छिक पिरीअड लिव्ह अशीही तुमची मागणी आहे. ती काय आहे आणि का? 

मासिक पाळीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन म्हणून ‘ऐच्छिक पिरिअड लिव्ह’ द्यावी, असं आम्ही म्हणतोय. शाळा-महाविद्यालय आणि कार्यालयांमध्ये मुलींना/महिलांना चार दिवस ‘ऐच्छिक पिरिअड लिव्ह’ द्या, अशी मागणी आहे. चीनच्या संसदेत ‘ऐच्छिक पिरिअड लिव्ह’ संसदेत मंजूर करण्यात आली असून, इंडोनेशिया, इटली येथे याबद्दल विचार सुरू आहे. 
मासिक पाळीसंदर्भात मोकळेपणा, जनजागृतीसह आपल्याकडेही याचा विचार व्हावा म्हणून ही मागणी आम्ही लावून धरत आहोत.

मुलाखत आणि शब्दांकन - स्नेहा मोरे

moresneha305@gmail.com


Web Title: PAD Bank runs to help womens and girls in times of need.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.