- नीरजा पटवर्धन

ठकू, हे बघ तुमचा तो कोण सब्यसाची काय म्हणतोय. भारतीय स्त्रियांना साडी नेसता येत नसेल तर लाजा वाटल्या पाहिजेत म्हणे! चला एकाला तरी संस्कृतीची चाड आहे या जगात. साडी म्हणजे आपली संस्कृती आहे. यासाठी म्हणूनच सांगतो की स्त्रियांनी साडीच नेसावी. आख्ख्या जगात कुठेही अशा प्रकारचं वस्त्र नाही. फार बुद्धिमान होते आपले भारतीय लोक.’ शेजारचे सांस्कृतिक काका राष्ट्रप्रेमानं निथळत म्हणाले. ‘मीपण साडीच घातलीये, तिही नव्वारी.’ सांस्कृतिक काकांची सांस्कृतिक पत्नी सलवारीला पदर फुटलेला असा एक ड्रेस घालून बाहेर येत म्हणाली. साडी ‘घालणे’ हे ठकूच्या कानाला जोरदार चावलं तरी समोरचा नव्वारीच्या नावानं असलेला विनोद बघून तिला काही हसू आवरेना. आजच्या जगाचा विचार केला तर अंगाभोवती वेगवेगळ्या प्रकारे कापडाचे वेढे घालून बनवायची वस्त्रं ही केवळ भारतीय उपखंडात किंवा भारतीय उपखंडात मूळ असलेल्या लोकांच्यातच दिसतात. त्यामुळे भारतीयांनाच केवळ ही भन्नाट आयडिया सुचलेली आहे असा गैरसमज व्हायला भरपूर वाव असतो. जेव्हा मानवाने कपडे घालायला सुरुवात केली तेव्हा प्राण्यांचे कातडे वा कापड अंगाभोवती गुंडाळूनच सुरुवात केली. मग त्या गोष्टी अंगावर टिकवण्यासाठी, उबेसाठी वेगवेगळी साधनं आणि पद्धती वापरल्या गेल्या. प्राण्यांचे कातडे गाठी मारून अंगावर टिकवणं शक्य नव्हतं. तिथे काटे, सुया वगैरेंचा वापर झाला आणि त्यातून शिवणकलेचा जन्म झाला. मात्र कापड हे कातड्यापेक्षा अर्थातच पातळ होतं. परत ते हवं तेवढं बनवता येत होतं. आणि कातड्यापेक्षा लवचिक असल्यानं गाठी मारणं, खोचणं वगैरे शक्य होतं. यातून मग कापड गुंडाळून बनवायच्या वस्त्रांचा इतिहास तयार झाला.
हे सारखं गुंडाळणं गुंडाळणं म्हणण्यानं काहीतरी बोळा वा बोंगा प्रकारची वस्त्रं डोळ्यापुढे येत असतात. तेच ड्रेप किंवा रॅप असं टोपीकराच्या भाषेत म्हणलं की एकदम टापटीप, नीटनेटकं वाटतं. आपल्याकडे नेसणं, बांधणं अशी क्रि यापदं आहेत. हिंदीत तर ओढना असेही क्रियापद वापरलं जातं. काही प्रकारच्या साड्यांच्या नेसणीला बोलीभाषेत चक्क लावणं हेही क्रियापद वापरलं जातं. विशेषत: जी साडी निºया घालून नेसायच्या ऐवजी वेगवेगळ्या प्रकारे कमरेभोवती वेढे घेऊन लिंपल्यासारखी नेसली जाते त्याला साडी लावणं असंच म्हटलं जातं. साडी पूर्णपणे व्यवस्थित न नेसता नुसतीच अंग झाकण्यासाठी तात्पुरती नेसली जाते तिला साडी उभी लावणं असाही शब्द आहे; पण या सगळ्यांसाठी सध्या सोयीचं आणि त्यातल्या त्यात चपखल असं एकच काही म्हणायचं तर गुंडाळणे हा शब्द वापरण्याशिवाय पर्याय नाही. तर तोच वापरूया आणि त्यातले बोळापण, बोंगापण विसरायचा प्रयत्न करूया.
जगभरात जिथे जिथे कापडापासून (लिनन, सुती किंवा लोकर) वस्त्रसज्जेची सुरुवात दिसते तिथे तिथे ही अंगाभोवती गुंडाळून तयार केलेली वस्त्रं दिसतात. कंबरेभोवती कापड गुंडाळून घेतल्यावर कमरेपासून खालचा भाग झाकला जातो. आता हे कापड तिथेच राहायला हवं तर मग तिथे गाठ मारायला हवी. वेगवेगळे स्कर्ट ते लुंगी यातून तयार झाले. वरच्या भागासाठी दुसरं कापड गुंडाळून घेतलं. शाली, खेस, चादर, उत्तरीय, उपरणे, ओढणी इत्यादींचा जन्म झाला. खालचं आणि वरचं कापड एक केलं. खालच्या कापडाचा गाठीच्या पुढचा भाग खांद्यावरून घेतला. साडीच्या पूर्वजाचा जन्म झाला. इतकी साधी गोष्ट आहे. आणि अर्थातच ही फक्त भारतात घडलेली नाही.   विविध संस्कृतींमध्ये गुंडाळायचे कपडे हे शाल, ओढणी यासारखेच मुख्यत्वेकरून दिसतात. आफ्रिकन आणि काही दक्षिण अमेरिकन संस्कृतीमध्ये डोक्याला गुंडाळायच्या टापश्या दिसतात; परंतु त्यापलीकडे गुंडाळलेल्या कपड्यांची विविधता ही मात्र भारतीय उपखंडातच टिकून आहे. त्या वस्त्रांबद्दल पुढच्या वेळेला जाणून घेऊया...

चित्र १- मेसोपोटेमियन, सुमेरियन मनुष्य (इसपू २२००)


जगभरातल्या सर्वात प्राचीन मानल्या गेलेल्या संस्कृतींपैकी सिंधू संस्कृतीबरोबरच इजिप्शियन आणि मेसोपोटेमियन संस्कृतींमध्ये गुंडाळलेली वस्त्रं दिसतात. वस्त्र गुंडाळलेली एक मूर्ती मेसोपोटेमिया (सुमेर)मध्ये सापडलेली आहे. ही मूर्ती पूर्ण आहे त्यामुळे ते वस्त्र आधी कमरेशी गुंडाळून मग खांद्यावर घेतलेलं असावं हे कळतं.ज्यांना साडी नेसता येते त्यांना हे वाचून आपली सहावारी साडी मेसोपोटेमियाची कृपा आहे असं वाटेल; पण ते तसं नाही. हे अगदी साध्या प्रकारचं गुंडाळणं आहे आणि ते बहुतेक सगळीकडेच सुरुवातीच्या काळात दिसतं. याच मेसोपोटेमियामध्ये कमरेशी कापड गुंडाळून बनवलेला स्कर्टही आहे आणि कापड खांद्यावरून मागे पुढे नेऊन, बांधून तयार केलेला टॉपही आहे. या वर्णनानं हा ड्रेस एखाद्या हॉट वगैरे तरुणीचा आहे असा समज होईल, तर तसे अजिबात नाही.
हा ड्रेस सैन्यातल्या पुरुषांचा आहे. स्त्रियांच्या कपड्यातही स्कर्ट आहे आणि बांधून बनवलेल्या टॉपऐवजी शालीसारखी गुंडाळलेली केप आहे. एकच कापड कमरेभोवती वा छातीभोवती गुंडाळून मग खांद्यावरून घेऊन बनवलेला ड्रेस आहे. यासाठी भरपूर रूंद कापड लागत असे. याचा अर्थ तेवढं रूंद मागे अस्तित्वात होतं असं म्हणायला हरकत नाही.

चित्र २- मेसोपोटेमिया ड्रेपिंग


जगातल्या सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी तिसरी म्हणजे इजिप्शियन संस्कृती. त्यांचे कापड लिनन होतं. सुती कापड त्यांना माहिती झालेलं नव्हतं; पण कपडे अंगाभोवती गुंडाळून वस्त्रं बनवण्याची आयडिया त्यांना माहिती होती. कमरेशी कापडाची पट्टी गुंडाळून लंगोटासारखे वस्त्र मग त्यावरून मिनीस्कर्टसारखे वस्त्र असा सर्वसामान्य इजिप्शियन पुरुषांचा पोशाख दिसतो. हा मिनीस्कर्ट म्हणजे एक प्रकारची लुंगीच. अगदी कमी पन्ह्याच्या कापडाची लुंगी. कधी कधी हुद्द्यानुसार या स्कर्टची लांबी पार घोट्यापर्यंतही असे. कमरेवरच्या शरीरावर कापडाच्या पट्ट्या वेगवेगळ्या प्रकारे गुंडाळलेल्या असत. या पट्ट्यांचा उपयोग अंग झाकण्यापेक्षा विविध कामं करताना घाम शोषून घेण्यासाठी होत असे. स्त्रियांच्या कपड्यांमध्येही या सगळ्या गोष्टी असतच. तसेच मोठ्या चौरस आकाराचं कापड शरीराभोवती विशिष्ट प्रकारे गुंडाळून एक गाऊनसारखं वस्त्रही वापरलं जात होतं. पण इजिप्तच्या गुंडाळलेल्या वस्त्रसज्जेचं सर्वात महत्त्वाचं प्रकरण ज्याचं तंत्र आजही डिझाइनर्सना मोहात पाडतं ते म्हणजे इजिप्शियन चुण्या. अगदी बारीक, पट्टीनं आखून बनवल्या असाव्यात अशा एकसारख्या चुण्या. वेगवेगळ्या दिशेनं या चुण्या घातलेल्या असत. त्यामुळे कापड अंगाभोवती बसवल्यावर त्या चुण्या विशिष्ट प्रकारे अंगाभोवती पडत असत. इथे परत कपड्यांचा मूळ उद्देश शरीर सजवणं हाच असणार हे अधोरेखित होतं.

चित्र ३- इजिप्शियन सीन


यानंतर आलेल्या प्राचीन संस्कृती म्हणजे ग्रीक आणि मग रोमन. या दोन्ही संस्कृतींमध्ये शिवलेल्या आणि गुंडाळलेल्या दोन्ही प्रकारचे कपडे आहेत. शिवलेले कपडे हे शक्यतो अंगाबरोबर असलेला एक पहिला पापुद्रा या स्वरूपाचे, तर गुंडाळलेले कपडे हे पूर्ण आकृतीचा आकार-उकार ठरवणारे, माणसाला तपशील देणारे, माणसाचे तपशील दाखवणारे वगैरे आहेत. कापड लिनन आणि लोकरीची आहेत; पण सुती कापडही दिसतं.
भरपूर रूंद असलेलं कापड घेऊन त्याला ठरावीक घड्या घालून बनवायचं कायटोन, पेप्लॉस, एक्झोमिस अशा नावांचे साध्या ट्यूनिकसारखे ड्रेसेस बघायला मिळतात. दोन्ही खांद्यांवरून किंवा एकाच खांद्यावर आणि उंचीनुसार ही नावं ठरतात. शालीसारखे एका किंवा दोन खांद्यांवरून वागवायचं प्रकरणही आहे. त्याला पुरुषांच्यात हायमेशन आणि स्त्रियांच्यात डायप्लेक्स म्हणलं जात असे.

चित्र ४- ग्रीक सीन


ग्रीकांच्या लगेच नंतरच्या रोमन संस्कृतीनं ग्रीक वेशसज्जेतल्या अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत. पण, रोमन संस्कृतीतलं महत्त्वाचं असं गुंडाळलेलं वस्त्र म्हणजे टोगा. हे वस्त्र मानाचं होतं. समाजातल्या ठरावीक स्तरातील पुरुषांनाच हे वस्त्र वापरायचा अधिकार होता. स्त्रियांसाठी एक ओढणीसारखे वस्त्र डोक्यावरून घेतलेलं असे त्याला पल्ला असं नाव होतं. हे सभ्य स्त्रियांसाठी अनिवार्य होतं.

चित्र ५- रोमन सीन


टोगा. हा शब्द आपल्याकडे मुघल वेशभूषेमध्ये किंचित रूप बदलून चोगा म्हणून आलेला आढळतो. तेही सर्वात बाहेरचं असलेलं वस्त्र आहे; पण टोगा नेसला जातो चोगा हा अंगरख्यासारखा शिवलेला असतो. स्त्रियांच्या डोक्यावरून घ्यायच्या छोट्याा ओढणीसदृश वस्त्राला पल्ला म्हणलं जाणं आणि आपल्याकडे साडीच्या पदरालाही पल्ला म्हणलं जाणं ही अजून एक गंमत इथे दिसते. आता या गमती नुसत्या योगायोग म्हणून आहेत की मानवाच्या स्थलांतरात, कपड्यांच्या प्रवासात यांचा खरंच एकमेकांशी संबंध आहे? हा एक वेगळा विषय आहे.
 


Web Title: Nesuch's narratives, cloth-stunts
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.