ऐश्वर्या दांडेकर (समुपदेशक)
साधं डोकं दुखलं, पित्त झालं, एवढंच काय टाचेला भेगा पडल्या तरी कुणीतरी सल्ले देतंच की तुझा स्ट्रेस कमी कर, कामाचा ताण कमी कर! ज्याचं त्याचं कारण स्ट्रेस, कुणी हार्ट अटॅकने गेले तरी स्ट्रेस कुणी अगदी आत्महत्या केली तरी स्ट्रेस आणि कुणी झोप काढली निवांत तरी कारण तेच स्ट्रेस!
इतकं सुलभीकरण झालं आहे ताणाचं की आपल्याला स्ट्रेस आला तर आपलं काय होणार याचाही स्ट्रेस येतो.
त्यात लोक सांगतात की अगदी लहान बाळांना, लहान मुलांनाही स्ट्रेस येतो. कुणी लगेच मदतीला धावतं की मनातलं बोलावंसं वाटलं तर बोला, मी आहे. स्ट्रेस कमी करा.
पण कसा करायचा स्ट्रेस कमी?
मुळात अनेकदा आपल्या आयुष्यात ताण असा फार काही वेगळा आहे असंच वाटत नाही.
पोआपाण्यासाठी नोकरी करणं आलंच, नोकरीत ताण आहे. ट्रॅफिकमध्ये अडकून जीव कंटाळतो, वेळेत पोहोचू का ताण आहे. मुलांचं शिक्षण, अभ्यास, नोकरी याचा ताण येतोच. मुलांना जोडीदाराला वेळ देताच येत नाही याचा ताण. आपली काही स्वप्न अर्धवटच राहून गेली याचाही ताण येतो.
ताणच नाही, टेंशनच नाही असं जगात कोण आहे?
मग प्रश्न हाच की हा ताण हाताळायचा कसा?
किती बागुलबुवा करायचा ताणाचा?
ताण हाताळायला शिकायचं म्हणजे काय करायचं? पळून तर जाता येत नाही वास्तवापासून मग करायचं काय?
त्याहून महत्त्वाचं म्हणजे जेव्हा खरंच खूप ताण येतो, आपण एकटं पडलो आहोत, असं वाटतं तेव्हा जो ताण येतो त्याचं काय करायचं? तेव्हा तर मदतीची गरज असतेच, पण त्यावेळच्या एकटेपणाला उत्तर नसते.
सगळीकडचे रस्ते जणू बंद झाले आहेत आणि आपण बंद दारापाशी उभे राहून दार ठोठावतो आहोत, असं वाटतं. परिस्थितीच्या कात्रीत सापडतो. अशावेळी येणाऱ्या ताणाचं काय करायचं?
प्रश्न अनेक आहेत आणि मनातलं बोला, मनातलं बोला असं सांगून सहजी त्याची उत्तरंही मिळत नसतात.
आपल्यालाच आपल्या किरकोळ ते जास्त स्ट्रेसचं काहीतरी करावं लागणार असतंच..
ते कसं करायचं हाच प्रश्न आहे.
काय करायचं ताणाचं?
१. स्वीकार. आपण जिवंत आहोत, रोज काम करतो, जगतो. संसार आहे म्हणजे आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा ताण येणार हे मान्य करायचं. स्वीकार ही सगळ्यात महत्त्वाची गाेष्ट. त्यामुळे ताणाचा बाऊ न करता त्यातला आनंद आणि तो हाताळणं दोन्हीही जमलं पाहिजे.
विराट कोहली खेळतो तेव्हा त्यालाही ताण येत असेलच तो त्या ताणाचं रूपांतर ऊर्जेत करतो आणि स्वत:च्या गुणवत्तेवर काम करून ती ऊर्जा वापरतो.
२. ताण नेमका कशाचा आला हे पाहून त्यावर आपल्याकडे काही तोडगा आहे का हे शोधायचं, तोडगा असेल तर तातडीने ती कृती करायची. कृती केली की ताण कमी होतो हे या प्रश्नाचं सोपं उत्तर आहे.
३. स्वयंसूचना महत्त्वाच्या. स्वत:शी आपण काय बोलतो याकडे लक्ष द्या. स्वत:शी जर सकारात्मक आणि कृतीयोग्य बोलू लागलो तर ताण कमी होऊन आपल्याला मार्ग दिसू लागतात.
४. ताण आला की आपल्या शरीरात काही बदल होतात. त्याकडे लक्ष द्यायचं. ताण आल्यावर शक्यतो बोलायचं चिडायचं नाही. उलट आपल्याकडे बारकाईने पाहत अनावश्यक रिॲक्शन टाळून आपल्या कृतीकडे अधिक लक्ष द्यायचं.
५. स्ट्रेस आहे म्हणत आपली कर्म कहाणी आल्या गेल्याला, सोशल मीडियात न सांगता, जवळच्या माणसांना सांगून त्यांनी काही उपाय सुचविल्यास ते तातडीनं करणं योग्य. आपला आहार आणि व्यायाम यांच्याकडे अधिक लक्ष देणं चांगलं.
६.. श्वासाचे तंत्र, व्यायाम, प्राणायाम शिकून घेतले तर लक्षात येतं की श्वासावर काम केलं की आपला ताण कमी होऊन, आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते.
७. आपल्याला आवडत्या गोष्टी करणं, आवडते पदार्थ खाणं, आवडत्या व्यक्तींसाठी वेळ देणं हे ही जमतं.
८. लक्षात ठेवा विचार कमी कृती जास्त हाच ताण कमी करण्याचा अत्यंत सोपा आणि योग्य मार्ग आहे.
