>सुखाचा शोध > Solo travel-  तुम्ही कधी एकटीने प्रवास केलाय, एकटीनं प्रवास करण्याच्या बिंधास्त रंगाची ही पहा जादू !

Solo travel-  तुम्ही कधी एकटीने प्रवास केलाय, एकटीनं प्रवास करण्याच्या बिंधास्त रंगाची ही पहा जादू !

प्रवास म्हणजे कुटुंंबासोबतच करायची गोष्ट असं कुठं आहे? सोलो ट्रॅव्हल हा ट्रेण्ड म्हणतो अनोळखी प्रवासात शोधा स्वत:ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 01:21 PM2021-03-29T13:21:25+5:302021-03-29T13:30:01+5:30

प्रवास म्हणजे कुटुंंबासोबतच करायची गोष्ट असं कुठं आहे? सोलो ट्रॅव्हल हा ट्रेण्ड म्हणतो अनोळखी प्रवासात शोधा स्वत:ला!

Solo travel - traveling solo to find yourself. | Solo travel-  तुम्ही कधी एकटीने प्रवास केलाय, एकटीनं प्रवास करण्याच्या बिंधास्त रंगाची ही पहा जादू !

Solo travel-  तुम्ही कधी एकटीने प्रवास केलाय, एकटीनं प्रवास करण्याच्या बिंधास्त रंगाची ही पहा जादू !

Next
Highlightsस्वतःला समजून घेण्यासाठी, स्वतःमध्ये डोकावण्यासाठी तर एकेकटे प्रवास म्हणजे वरदानच! अनोळखी प्रदेश पालथा घालता घालता आपल्याला स्वतःला देखील नीटच ओळखू शकतो.

प्राची पाठक

‘ए क्या बोलती तू,  आती क्या खंडाला’,
असे म्हणता येईल असे कोणीतरी आपल्या सोबत असावे, त्याच्यासोबत भटकायला जावे, असे वाटते नां?
खंडाळा जाऊ देत, गेला बाजार "किसी डिस्को मैं जाये, किसी हॉटेल मैं खाये" निदान इतके तरी कुणासोबत जावे असे वाटतेच.
"चला फिरायला जाऊ" असे जेंव्हा जेंव्हा मनात येते, तेंव्हा तेंव्हा ते कुणाच्या तरी सोबत करायचे आहे, ग्रुपमध्ये करायचे आहे असेच आपले प्रोग्रामिंग होऊन गेलेले असते. डोक्यात कोरून ठेवले जसे! एकटीने सहजच उठून सिनेमा बघायला जावे, एखाद्या कार्यक्रमाला जावे, चित्र प्रदर्शन बघायला जावे, दोन दिवस फिरायला जावे, असे फारसे मनात येत नाही. कारण तसे करणे म्हणजे दिमाग का दहीं! एकटीच कुणी फिरतांना दिसली अजूनही अनेकांना आश्चर्य वाटते. कोणी आओ मिलो चले म्हणायला नसेल, तर पळून जावेसे वाटते अगदी. "पळून जाणे" ही एकच गोष्ट अगदी मनापासून एकटीने करू शकतो, असे वरचेवर आपल्याला वाटत असते. 

आधीच आपण धडपडून करिअर वगैरेंच्या मागे लागलेलो असतो. एक रुटीन शोधत असतो. "स्टेबल व्हा आयुष्यात" चे तुणतुणे लोकांनी आपल्या कानी कपाळी लावलेले असते. अशा सगळ्यांत फिरायला कुठून वेळ काढणार? नुकतीच नोकरी वगैरे पकडलेली असते, तर सुट्टीचा प्रश्न येतो. फिरणे करू की सावकाश, रिटायर झाल्यावर इतके ते लांबते मग! मग उलटे बोलणारे लोक सापडतात. "तरुण असतांनाच फिरायला पाहिजे जगात कुठेही. स्वस्त आणि मस्त फिरून होतो. अंगात ऊर्जा असते". आपण हे वाक्य घोकतो आणि बाकीच्या रेट्यात परत विसरून जातो. दुसऱ्यांचे ट्रिपचे सेल्फी डोळे विस्फारून बघत बसा, इतकेच उरते मग आयुष्यात. फिरायला जायचे म्हणजे पैसे देखील खूप लागणार, असेही मनात येत असते. आता कुठे आपण शिकून नोकरीला लागत असतो, काहींचे शिक्षण सुरु असते. कुणाला घरात पैसे मागावे लागणार असतात. त्यात मौजमजेला किती पैसे कुणाकडे मागणार किंवा स्वतः खर्च करणार, ही मर्यादा असतेच. मग आपण परत स्वप्नंच बघायची. पाठीला लावलेली सॅक, त्यात पाण्याची बाटली, थोडा खाऊ, स्पोर्ट शूज पायांत, हातात कॅमेरा, डोक्यावर कॅप. सगळा लवाजमा फक्त एकेक करून जमा करून ठेवायचा. पैसे साचतील तेंव्हा जाऊ, वेळ मिळेल, ग्रुप जमेल तेंव्हा जाऊ. खयाली पुलाव जोरदार. मग कोणी भारीतले ऍप्स डाऊनलोड करते. त्यात कसे सगळे रस्ते दिसतात. पत्ता विचारायची गरजच नाही. काय काय सोयी, प्रौढीने सांगते आपल्याला. कसेबसे सॅकपासून सगळे जमले की आपले गाडे ऍप पाशी अडते मग. ते शिकायला हवे. जणू काही रस्ता चुकूच नाही, असा नियम आहे! कुणाला रस्ता विचारला, तर महा पाप होणार आहे. "शी, रस्त्यावरच्या अनोळखी माणसांशी काय बोलायचे", असा काही नियम आहे का, असेही आपण स्वतःला विचारात नाही. अनोळखी लोकांपासून सावध राहा, असे किती सातत्याने आपण लहानपणापासून इतरांकडून ऐकत असतो. सगळे जणू आपल्यालाच लुटायला येणार आहेत, इतका सावधपणा काय कामाचा? कोणी बरोबर असलेले चांगले, हे डोक्यात घुसते, ते अशाच प्रकारांत. 


ट्रीपला जायचे म्हणजे गाडी -घोडे हवेतच. म्युझिक सिस्टीम हवी त्यात. ही भारीतली गाणी. पायी जाणे, एकटीने/ जाणे, स्थानिक बसने फिरणे, शेअर टॅक्सी रिक्षाने जाणे, सायकलवर जाणे, कधी बाईक नेणे असे ऑप्शन्स चटकन मनात येत नाहीत. बाईक मनात आली, तर ती पण एकदम स्पोर्ट्स बाईक पाहिजे नाहीतर रॉयल एखादी. सगळे कसे फोटोजेनिक छान छान दिसले पाहिजे.  प्रवासात चेहरा जराही काळवंडायला नको. गोरेगोमटे, चिकणे दिसायचे. कडक इस्त्रीचे, स्वच्छ कपडे दिसायला हवेत, असले बालिश काहीतरी आपण पाहिलेले असते. तेच मनात घोळवत बसतो मग आपण!
असे हजारो प्रश्न आणि शंका मनात असतील तर ते सगळे मिटणार कधी, प्लॅन्स बनणार कधी? आणि फिरायला जाणार कधी? सोबत मिळणार कधी? 
हे सगळे डिलीट मारून मनाची पाटी कोरी करून एकट्याने फिरायला जाणार? एकटीने फिरायचे धाडस करणार? हे नुसतेच थ्रिल नाही, आपल्या मनात डोकावायची उत्तम संधी असते असे फिरणे म्हणजे. सगळा कस पणाला लागतो. सहजच घडलेले, आखून रेखून न केलेले भटकणे. मनात आले, उठले, थोडीशी तयारी केली, काही सामान -खाऊ घेतला, थोडेसे पैसे गाठीशी आणि वाट मिळेल तिकडे फिरून आले. कधी जवळ, कधी दूर. कधी एकाच दिवसाची ट्रिप, कधी तीन- चार दिवसाची. कधी असेच वाटेत कुणी सोबत घेतले ती नवी साथ. अनोळखी प्रदेश पालथे घालणे, अनोळखी लोकांशी बोलणे, परिसराचे ज्ञान मिळविणे, दिशा समजणे, भूगोलाचा वस्तुपाठ मिळणे...बाहेर फिरून स्वतःला आतून ओळखायची संधी मिळणे. असे सगळे पॅकेज असते हे. त्यांना फिरस्ते म्हणतात. स्वस्त आणि मस्त पॅकेज. अनेक गोष्टी शिकायची संधी. ह्यासाठी मेंदू थोडा खर्च होतो पण. एनर्जी लागते. फिटनेसवर काम करावे लागते. शरीर- मनाचे सर्व्हिसिंग करायचे असेल, तर असे एकटे वर्षातून एकदा तरी फिरलेच पाहिजे.  
एकटीने फिरणे, विविध ठिकाणी पायी भटकणे आणि न भरकटता योग्य वाट पकडून राहणे हे एक उत्तम मेडिटेशन आहे!
 मुलीच्या जातीने असे फिरू नाही, सुरक्षेचे काय, वगैरे मनात आणून घरीच बसायचे नाही. धोक्याचे भान ठेवून घ्यायची रिस्क म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क. तिची मजा असते वेगळी. खूप काही शिकतो आपण त्यातून. 
सोलो प्रवास खरोखर आनंददायी असतात. आत्मविश्वास वाढवितात. संवादकौशल्य वाढते. निर्णय सर्वस्वी आपले असतात. आपण घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी आपण घ्यायची सवय लागते. स्वतःला समजून घेण्यासाठी, स्वतःमध्ये डोकावण्यासाठी तर एकेकटे प्रवास म्हणजे वरदानच!
अनोळखी प्रदेश पालथा घालता घालता आपल्याला स्वतःला देखील नीटच ओळखू शकतो.
म्हणून कधीतरी तरी एकटा चलो रे..

(लेखिका मानसशास्त्रासह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)

Web Title: Solo travel - traveling solo to find yourself.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.