Lokmat Sakhi >Mental Health > आत्ता याक्षणी तुम्हाला काय आठवतंय? डोळ्यात पाणी येतं की चेहऱ्यावर गोड हसू, जगणं सोपं कशानं होतं..

आत्ता याक्षणी तुम्हाला काय आठवतंय? डोळ्यात पाणी येतं की चेहऱ्यावर गोड हसू, जगणं सोपं कशानं होतं..

प्रभात पुष्प -५ आठवणी येतात तेव्हा त्याकाळी पैसे किती खर्च झाले, हे आठवत नाही, आठवतात ते प्रसंग-माणसं-क्षण.. आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 06:16 PM2022-06-21T18:16:25+5:302022-06-21T18:18:25+5:30

प्रभात पुष्प -५ आठवणी येतात तेव्हा त्याकाळी पैसे किती खर्च झाले, हे आठवत नाही, आठवतात ते प्रसंग-माणसं-क्षण.. आणि..

Prabhat Pushpa 5 : memories make you rich, how you create happiness with memory, that's a way of life. prabhat pushpa | आत्ता याक्षणी तुम्हाला काय आठवतंय? डोळ्यात पाणी येतं की चेहऱ्यावर गोड हसू, जगणं सोपं कशानं होतं..

आत्ता याक्षणी तुम्हाला काय आठवतंय? डोळ्यात पाणी येतं की चेहऱ्यावर गोड हसू, जगणं सोपं कशानं होतं..

Highlightsआपल्याकडे अनुभव किती, आठवणी किती, आपण लोळत पडलो, रडत राहिलो की काही क्षण हसरे केले, हे महत्त्वाचं..

-अश्विनी बर्वे


आजवर तुमच्या शिक्षणासाठी किती पैसे खर्च झाले आहे माहीत आहे का? म्हणजे आठवतंय का? नाही ना? पण शाळेच्या आणि कॉलेजच्या आठवणी मात्र तुम्ही नेहमी काढत असणार !
एवढंच कशाला आपल्या आई-वडिलांच्या, मुलांच्या दवाखान्यासाठी किती पैसे खर्च झाले, हे आपण काही दिवसांनी विसरून जातो; पण त्यांच्या चैतन्यदायी आठवणी मात्र नेहमी लक्षात राहतात. आपण भावंड जमलो की त्याबद्दल आपण बोलतो, हसतो. त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर जे स्मित असतं ना ते खूपच लोभस असतं. एवढंच कशाला, प्रेग्नंट असताना किती त्रास झाला, हे आई मूल झालं की अगदी विसरून जाते. उलट बाळाच्या कितीतरी आठवणी आयुष्यभर आठवत बसते. त्यांना उजाळा देत असते.
कारण पैशांना आठवणी नसतात, अनुभवांना असतात.
चांगला–वाईट काळ, समृद्धीचा आणि गरिबीचा काळ, भविष्य सुरक्षित असण्याचा काळ आणि उद्या काय वाढून ठेवलं आहे हे माहीत नसण्याचा काळ. जीवन एखाद्या चक्रीत बसलो आहे, असं वाटण्याचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. आर्थिक स्थिती कशीही असो, विपुल असो सारे की वानवा असो त्या त्या दिवसांच्या आठवणी असतातच. तेव्हा घेतलेल्या अनुभवांच्या आठवणी. काहीवेळेस खिसा पूर्ण भरलेला असतो तर काहीवेळेस पूर्ण रिकामा. काहीवेळेस पुरेसा पैसा असतो तरी आपण चिडचिड करतो. काहीवेळेस पुरेसा पैसा नसतो तरी आपल्या चेहऱ्यावर स्मित असते.
कधीकाळी एकमेकांबरोबर बसून आपण किती हसलो, याची आठवण काढली तरी अनेकदा आपल्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू येतात आणि कधी तर आपण एकटेच बसून किती रडलो, हे आठवलं तरी आपल्या चेहऱ्यावर स्मित उमटतं. या सगळ्यामध्ये जीवन आपल्याला आपला स्वतःचा इतिहास निर्माण करण्याचा अनुभव देते आणि त्या आठवणींनी आपले जीवन भरून जाते..
प्रथम आपण कोणाच्या मदतीशिवाय सायकल चालवायला शिकलात, कोणाच्या मदतीने गाडी शिकलात ? आपल्याला प्रथम कोणी मैत्रीसाठी विचारले? आपल्या मुलाचे पहिले रडणं, पहिलं पाऊल, पहिला शब्द, पहिला पापा, आपल्या पालकांनी आपल्याला दिलेली पहिली भेट आणि आपल्या मुलाने/मुलीने दिलेली पहिली भेट.

(Image : Google)

आपलं पहिलं बक्षीस, लोकांनी पहिल्यांदा स्वीकारलं तो दिवस, आपला स्टेज वरचा पहिला कार्यक्रम..... ही यादी न संपणारी आहे. अनुभवांच्या आठवणी या कालातीत असतात. कोणत्याही गोष्टीसाठी पैसा लागतो, हे कोणी नाकारू शकत नाही; पण वस्तुस्थिती हीच शिल्लक राहते की त्या अनुभवासाठी किती पैसा खर्च झाला, हे विसरले जाते; पण तो अनुभव नाही, कधीच नाही.
आर्थिक मंदी येते-जाते; पण आपल्या जीवनाच्या गुणवत्तेत मंदी यायला नको. कदाचित आपण आपल्या पालकांच्या काही इच्छा पूर्ण करू शकणार नाही; पण काही तर नक्कीच पूर्ण करू शकू. आपण आपल्या मुलाला पर्यटनस्थळी नेऊ शकणार नाही; पण स्थानिक बागेत नेऊन त्याच्या बरोबर खेळू शकू ! किंवा घरात त्याच्या बरोबर मस्ती करू शकू. पैशामुळे या सगळ्यांची किंमत कमी होणार आहे, असं नाही किंवा तुमच्या बाळाला तुमच्या मांडीवर घेतल्याने त्याची किंमत कमी होणार नाही.
आपल्याकडे अनुभव किती, आठवणी किती, आपण लोळत पडलो, रडत राहिलो की काही क्षण हसरे केले, हे महत्त्वाचं..

ashwinibarve2001@gmail.com

Web Title: Prabhat Pushpa 5 : memories make you rich, how you create happiness with memory, that's a way of life. prabhat pushpa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.