lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > अंगात येणं हा आजार आहे का? मनाच्या आजाराशी त्याचं नातं असतं?

अंगात येणं हा आजार आहे का? मनाच्या आजाराशी त्याचं नातं असतं?

ग्रामीण भागातच नाही तर शहरातही अनेकींच्या अंगात येतं, ते खरं की खोटं, यासाऱ्याचे काय अर्थ होतात? त्याचा मनावर परिणाम होतो तो काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:13 PM2021-06-18T16:13:45+5:302021-06-18T16:15:48+5:30

ग्रामीण भागातच नाही तर शहरातही अनेकींच्या अंगात येतं, ते खरं की खोटं, यासाऱ्याचे काय अर्थ होतात? त्याचा मनावर परिणाम होतो तो काय?

hysteria, mental illness, misunderstanding, women in crisis | अंगात येणं हा आजार आहे का? मनाच्या आजाराशी त्याचं नातं असतं?

अंगात येणं हा आजार आहे का? मनाच्या आजाराशी त्याचं नातं असतं?

Highlightsयोग्य उपचार व कुटुंबातील व्यक्तींची साथ असेल तर यातून बाहेर पडणं सहज शक्य आहे.  

रुपाली भोसले

महिला व मानसिक आरोग्य याविषयी जाणून घेत असताना अंगात येणं याचा महिलांच्या मानसिक आरोग्याशी काय संबंध आहे हे जाणून घेणे फार  गरजेचे आहे.  धार्मिक कार्यक्रम, सण-समारंभ, जत्रा या वेळी महिलांच्या अंगात आलेलं बघतो तसेच काही पुरुषांच्यापण अंगात येते. हे अंगात येणं खरं की खोटं?
अंगात आलेली व्यक्ती एका लयीमध्ये हात व पायांची हालचाल करत घुमायला सुरवात करते. अंगात येण्याची क्रिया ही थोडा वेळ चालते. बहुतांश वेळा ज्यांच्या अंगात येतं त्या स्त्रिया असतात. महिला प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहून जगत असतात. समाजामध्ये स्त्रियांचं असणारं दुय्यम स्थान, स्त्रीकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन ती समंजस, दयाळू, प्रेमळ, सहनशील असावी हे तिच्यावर लहानपणापासून  बिंबवलेले असते. मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावना, विचार हे मोकळेपणाने बोलले जात नाहीत.  कितीही त्रास झाला तरी त्याविषयी बोलायचे नाही असे लहानपणापासून तिच्यावर संस्कार केले जातात. आपली आई, आजी या जसं वागतात तसचं वागण्याचा प्रयत्न मुली करत असतात आणि त्यामुळे बऱ्याच महिलांना अन्याय अत्याचार सहन करावा लागतो, काहीही घडलं तरी त्यासाठी तिलाच जबाबदार धरलं जातं. हे सर्व ती निमुटपणे सहन करत असते. 
बहिणाबाईच्या भाषेत सांगायचे झाले तर,  
  ‘माझं दु:ख, माझं दु:ख तळघरात कोंडले
  माझं सुख, माझं सुख हांड्या झुंबर टांगले!’

अशा पद्धतीने महिला जगत असतात. हे सहन करत असताना तिला कुठे व्यक्त होता आलं नाही  तर यामध्ये तिची घुसमट होते. यामुळे प्रचंड ताणांना तिला सामोरं जावं लागतं. उदाहरणार्थ जर एखाद्या फुग्यामध्ये आपण खूप हवा भरली तर एका मर्यादेपलीकडे हवेचा दाब सहन न झाल्यामुळे फुगा फुटतो तसेच आपल्या मनाचे पण असते. मनामध्ये येणाऱ्या भावना, विचार यांचा निचरा झाला नाही तर मनाची अवस्था हवा भरलेल्या फुग्यासारखी होते. फुगा फुटू नये म्हणून प्रमाणातच हवा भरावी लागते जास्तीची हळूहळू सोडून द्यावी लागते त्याप्रमाणेच मनात साठलेले भावना विचार यांना वाट करून देण्यासाठी अंगात यायला सुरुवात होते. 
 माझ्या संपर्कात आलेल्या एका ताईंचे उदाहरण घ्यायचे झाले तर गेली दहा वर्षे झाली त्या एकत्र कुटुंबामध्ये राहतात. तीन मुली आणि घरातील लोकांना असणारी मुलाची अपेक्षा यामुळे घरातील लोकांकडून होणारा  अपमान, टोमणे  सहन करत होत्या. त्यातच आर्थिक परिस्थिती बेताची. नवरा मिळेल ते काम करायचा. घरामध्ये खुप देव-धर्म करणं चालू होतं. सतत कोणत्या ना कोणत्या तणावाखाली वावरत असे, मनात येणाऱ्या भावना बोलण्यासाठी कुठेच वाव नव्हता. घराच्या बाहेर पडून कोणाशी बोलायची सोय नव्हती. नवरा फक्त कामापूरतच बोलायचा, यासगळ्याचा परिणाम म्हणून नवरात्रामध्ये अचानक तिच्या अंगात यायला सुरू झालं. त्या दिवसापासून घरातल्यांची तिच्याबरोबर वागण्याची पद्धत बदलली टोमणे मारणे बंद झाले व मान मिळू लागला आणि मग अंगात येणं तसंच पुढे चालू राहिलं . 
  अंगात येणं हा एक मानसिक आजार असून ‘हिस्टेरिकल डिसोसिएशन’ या प्रकारामध्ये मोडतो. मनामध्ये विचार, भावना, ताणतणाव साठलेले असल्यामुळे ही क्रिया घडते याबद्दल इतरांना व स्वतः त्या व्यक्तीला सुद्धा जाणीव नसते. स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मनाने केलेली ही कृती असते. कोंडमारा सहन करण्याची इच्छा संपल्यावर अबोध मन ही क्रिया घडवते. आशिक्षित, कौटुंबिक समस्या असलेल्या किंवा समाजात न मिसळणाऱ्या एकलकोंडया व्यक्तींमध्ये अंगात येण्याचे प्रमाण जास्त असते. पुढे जाऊन कधीकधी हेच अंगात येणं व्यावसायिक रूप धारण करते.  ज्यावेळी घरातील आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशावेळी याचा उपयोग उत्पन्न मिळविण्यासाठी केला जातो.  
अंगात येणं हा मानसिक आजार असल्यामुळे ताणतणावामधून याची सुरवात होते त्यांना त्यावर उपचार करण्यासाठी मनोविकार तज्ज्ञांच्या उपचाराची गरज असते, उपचार घेतल्यावर हा आजार बरा होतो. अंगात येण्यामुळे त्या व्यक्तीच्या शारिरीक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. अंगात आल्यामुळे तात्पुरत बरं वाटत असले तरी मनात साठलेल्या भावना व विचार हे योग्य पद्धतीने बाहेर न पडल्यामुळे त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होत असतो. मानसिक आरोग्य चांगले नसेल तर सहाजिकच त्याचा परिणाम शारिरीक आरोग्यावर होतो. त्या व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे या सर्वाचा कौटुंबिक नातेसंबंधांवर परिणाम  होतो. हा आजार बरा करायचा असेल तर ती व्यक्ती व तिचे कुटुंबिय यांचे सोबत काम करणे गरजेचे आहे. योग्य उपचार व कुटुंबातील व्यक्तींची साथ असेल तर यातून बाहेर पडणं सहज शक्य आहे.  आधार व उपचार यामधून नक्कीच मार्ग निघू शकतो. 


(मानसमैत्रीण परिवर्तन संस्था)
मनोबल आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन – 7412040300
www.parivrtantrust.in

Web Title: hysteria, mental illness, misunderstanding, women in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.