Lokmat Sakhi >Mental Health > लोक काय म्हणतील ? समाज काय म्हणेल? या भीतीने किती काळ कुढत जगणार?

लोक काय म्हणतील ? समाज काय म्हणेल? या भीतीने किती काळ कुढत जगणार?

मानसिक आजार हे बायो-सायको - सोशल या तिनही कारणांच्या एकत्रित परिणामातून उद्भवतात. त्यामुळे त्यावर उपाय सुद्धा या तीन पातळ्यांवर करणे गरजेचे असते. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक या तिन्ही पातळ्यांवर जर बदल घडले तर आपण महिलांच्या मानसिक समस्यांना आळा घालू शकू.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:24 PM2021-05-06T16:24:03+5:302021-05-06T16:29:59+5:30

मानसिक आजार हे बायो-सायको - सोशल या तिनही कारणांच्या एकत्रित परिणामातून उद्भवतात. त्यामुळे त्यावर उपाय सुद्धा या तीन पातळ्यांवर करणे गरजेचे असते. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक या तिन्ही पातळ्यांवर जर बदल घडले तर आपण महिलांच्या मानसिक समस्यांना आळा घालू शकू.

How long will you live with fear? social pressure, family pressure? | लोक काय म्हणतील ? समाज काय म्हणेल? या भीतीने किती काळ कुढत जगणार?

लोक काय म्हणतील ? समाज काय म्हणेल? या भीतीने किती काळ कुढत जगणार?

Highlightsआपले विचार, गोंधळ आणि मनातली घालमेल याबाबत आपण आपल्या समविचारी लोकांबरोबर जर चर्चा केली तर काही प्रमाणात मानसिक तणाव कमी होऊ शकतो.


डॉ. निलेश मोहिते

अन्याय सहन करणं किंवा त्या विरोधात लढणं ह्या दोन्ही गोष्टी मानसिक दृष्ट्या थकवून टाकणाऱ्या असतात. आणि त्यातून बऱ्याच स्रियांमध्ये मानसिक आजार निर्माण होतात. माझ्याकडे समुपदेशन घेणाऱ्या बऱ्याचश्या स्रियांच्या मानसिक समस्येचे मूळ हे पुरुषसत्ताक सामाजिक मानसिकता असते. त्यामुळे जर आपल्याला त्यातून निर्माण होणारे मानसिक आजार रोखायचे असतील तर वैयक्तिक कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. मानसिक आजार हे बायो-सायको - सोशल ह्या तिनही कारणांच्या एकत्रित परिणामातून उद्भवतात त्यामुळे त्यावर उपाय सुद्धा ह्या तीन पातळ्यांवर करणे गरजेचे असते. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक या तिन्ही पातळ्यांवरती जर आपण खबरदारी घेतली तर आपण काही प्रमाणात या मानसिक समस्यांना आळा घालू शकू.

वैयक्तिक पातळीवर काय करता येईल?

 वैयक्तिक आयुष्यात घडणारे बदल हे बऱ्याच वेळा समाजात किंवा कुटुंबात घडणाऱ्या बदलांपेक्षा जलद असतात त्यामुळे दोन्ही पातळ्यांवर समन्वय साधणे कठीण होऊन जाते. शिक्षणामुळे बऱ्याच वेळा मुलींना आपल्या हक्काची अधिकाराची जाणीव होते परंतु त्याच वेळी कुटुंब आणि समाज हे हक्क आणि अधिकार मानायला तयार नसतो आणि त्यातून मानसिक द्वंद्व सुरू होते. अश्यावेळी आपल्याला बदलाचा वेग थोडा कमी करून आपले कुटुंब आणि समाज यांना बरोबर घेऊन जावे लागते. आमच्या कॉलेजच्या ग्रुप मध्ये एक मुलगी होती. तिचे आई-वडील फारसे शिकलेले नव्हते परंतु तिच्या आधुनिक विचारांना नेहमी सपोर्ट करायचे आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच फारच आश्चर्य वाटायचं. खूप खोदून विचारल्यावर तिने यामागचे गुपित उघड केले होते. समजलेले नवीन विचार आणि संकल्पना ती नेहमी आपल्या आई वडिलांनां समजावून सांगायची. त्यावर चर्चा करायची. नवीन विचार घरच्यांना पचनी पडण्यासाठी वेळ द्यायची त्यातूनच हळूहळू तिचे अशिक्षित आई वडील सुद्धा बदलले. सतत संवाद ठेवल्यामुळे आणि बोलत राहिल्यामुळे बदलाची प्रक्रिया थोडी सुलभ झाली. संवाद साधतांना आपल्याला एक गोष्ट नेहमी ध्यान्यात ठेवणं गरजेचं आहे की बदलाची प्रक्रिया ही खूपच हळुवार असते आणि शेकडो वर्षांचे आचार,विचार आणि संस्कार एकाएकी बदलणे शक्य नसते. बऱ्याच वेळा बदलाच्या वेगापायी आपण संवादच हरवून बसतो आणी तिथेच मोठा गोंधळ होतो. आपले विचार, गोंधळ आणि मनातली घालमेल याबाबत आपण आपल्या समविचारी लोकांबरोबर जर चर्चा केली तर काही प्रमाणात मानसिक तणाव कमी होऊ शकतो.

कौटुंबिक स्तरावर काय करता येईल?

आपल्या कुटुंबातील स्त्रियांना पुरुषसत्ताक मानसिकतेतून मानसिक आजार निर्माण होऊ नयेत याची खबरदारी कुटुंबाने घेणे गरजेचे आहे. स्री ही फक्त चूल आणि मुलं ह्यापुरताच मर्यादित नसून कुटुंबाचा आणि समाजाचा सर्वात महत्वाचा भाग आहे ही बाब कुटुंबाने मान्य करणं गरजेचं आहे. स्री आणी पुरुषांना आपल्या राज्यघटनेने समान हक्क आणि अधिकार दिलेले आहेत आणि आपल्या कुटुंबातील सर्व स्त्रियांना त्यांचे हक्क आणि अधिकार उपभोगू देण्याचं बळ, स्वातंत्र्य देणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे. रोजच्या कौंटुंबिक व्यवहारात स्रियांना बऱ्याच वेळा भेदभावाची वागणूक दिली जाते. स्त्रीला सुद्धा मन असतं आणी ती ह्या भेदभावामुळे मानसिक दृष्ट्या दुखावली जाऊ शकते हेच कोणाच्या फार लक्षत येत नाही. त्यांना स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य सुद्धा नाकारले जाते. जुन्यापिढीचे सगळे आचार विचार बदलणं अतिशय कठीण असते त्यामुळे नवीन पिढीमध्ये लहानपणापासूनच स्त्रीपुरुष समानतेचे विचार आणी कृती रुजवणं ही कुटुंबाची महत्वाची जबाबदारी आहे. लहानपणापासून समानतेच्या, स्वातंत्र्याच्या वातावरणात वाढलेल्या स्रियांना पुढे जाऊन स्वतःचे मानसिक ताण योग्य पद्धत्तीने हाताळता येतात.

सामाजिक स्तरावर काय करता येईल?


 सामाजिक पातळीवर जर समानता नसेल तर वैयक्तिक आणि कौंटुंबिक पातळीवरची समानता फारशी उपयोगाची नसते. लोक काय म्हणतील...? समाज काय म्हणेल..? याची भीती स्रियांना अगदी लहान वयापासून दाखवली जाते. ह्या भीतीच्या नावाखाली राजरोस पणे तिचे अधिकार आणी हक्क नाकारले जातात. आपल्यापेक्षा जास्त शिकलेली किंवा उच्चपदावर असलेली स्री बऱ्याच पुरुषांना/समाजाला सहन होतं नाही. अजूनही तीला समाजात दुय्यम समजले जाते आणी त्यातून मानसिक द्वंद्व निर्माण होते. त्यामुळे आपल्या सामाजिक जीवनात स्रियांचं जीवनमान, त्यांचा सामाजिक जीवनातील सहभाग,निर्णयातील योगदान कसे वाढवता येईल ह्याकडे आपण समाज म्हणून लक्ष दिले पाहीजे. शिक्षणामधून स्रियांना सक्षम करणे हा एक महत्वाचा मार्ग आहे. ज्या समाजातील महिला शिकलेल्या असतात त्या समाजात मानसिक समस्या योग्य प्रकारे सांभाळल्या जाण्याची शक्यता जास्त असते.

(लेखक सामाजिक मनोविकार तज्ज्ञ असून आसाम आणि अरुणाचल प्रदेशातल्या दुर्गम भागात मानसिक आरोग्य याचविषयात काम करतात.)

nmohite9@gmail.Com
 

Web Title: How long will you live with fear? social pressure, family pressure?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.