Lokmat Sakhi >Mental Health > 'माझ्या वाईट दिवसात आलिया सोबत होती म्हणून..' आलिया भटची बहीण शाहीनचा डिप्रेशन झगडा

'माझ्या वाईट दिवसात आलिया सोबत होती म्हणून..' आलिया भटची बहीण शाहीनचा डिप्रेशन झगडा

आपल्या छोट्यातल्या छोट्या शारीरिक दुखण्यावर कौतुकानं भडभडून बोलणाऱ्यांना मेन्टल हेल्थ हायजिन म्हणजे काय? हे माहीत नसतं. नैराश्याचा सामना करुन त्यातून बाहेर पडलेली आलिया भटची बहीण शाहीन भट सांगतेय मेण्टल हायजिनचे स्वत: केलेले आणि अनुभवलेले उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 03:36 PM2022-01-11T15:36:42+5:302022-01-11T15:52:04+5:30

आपल्या छोट्यातल्या छोट्या शारीरिक दुखण्यावर कौतुकानं भडभडून बोलणाऱ्यांना मेन्टल हेल्थ हायजिन म्हणजे काय? हे माहीत नसतं. नैराश्याचा सामना करुन त्यातून बाहेर पडलेली आलिया भटची बहीण शाहीन भट सांगतेय मेण्टल हायजिनचे स्वत: केलेले आणि अनुभवलेले उपाय.

Alia Bhatt's sister Shaheen Bhatt tell about what is mental hygiene and what need to do for this with her own experience. ? | 'माझ्या वाईट दिवसात आलिया सोबत होती म्हणून..' आलिया भटची बहीण शाहीनचा डिप्रेशन झगडा

'माझ्या वाईट दिवसात आलिया सोबत होती म्हणून..' आलिया भटची बहीण शाहीनचा डिप्रेशन झगडा

Highlightsमनातल्या निराश भावनेबद्दल मनमोकळं बोलायला हवं. आपल्या मनातली निराशा काढून टाकण्यासाठी आपल्याशी बोलणारी, आपलं ऐकून घेणारी योग्य व्यक्ती शोधणं हे खूप आवश्यक आहे.रोज मनात येणारे निराश, दु:ख, पराभूत, नकारत्म विचार भावना कागदावर लिहून काढाव्यात. आपल्या मनात काय चाललंय याचा  आपल्याला कानोसा घेता येतो.

- माधुरी पेठकर

आज मी किती छान दिसतेय, आज नाश्त्याला मी तयार केलेला हा मस्त पदार्थ, आज मुलासोबत/ मुलीसोबत घालवलेला क्षण/ दिवस, आज मनात आलेला छान विचार, आज जमलेलं मस्त काम, आज भेटलेली मस्त मैत्रिण, आज काढलेलं सुंदर चित्र, आज लिहिलेली सुंदर कविता....असं आजचं छान/ सुंदर या नावानं जाणारं भरपूर काही आहे, जे आपण सर्व सोशल मीडियावर शेअरिंगच्या नावानं पोस्ट करत असतो. आपल्या  'छान'चं इतरांनाही कौतुक वाटतं. आपण शेअर केलेल्या छान आणि आनंदी कॅटेगिरीतल्या सोशल मीडियातील पोस्टना भरपूर लाइक्स , ढीगभर छान छान प्रतिक्रिया येतात  . पण नेहमीच सोशल मीडियावर आपण छान , आनंदी,सुंदर या कप्प्यात फिट बसणारेच अनुभव शेअर करायचे  असतात का? का नाही आपण  सोशल मीडियावर आज मला उदास वाटतंय, मनात निराशाजनक विचार येतात, अपमानित झाल्यासारखं वाटतंय, भीती वाटतेय अशा 'ग्रे आणि डार्क'शेडमधल्या भावना, अनुभव आणि विचार   मुक्तपणे शेअर करत? का नाही  रडक्या/ उदास/ चिडलेल्या/ घाबरलेल्या अवस्थेतील चेहऱ्याचा फोटो टाकत? असा प्रश्न शाहीन भट विचारते. 

Image: Google

मनातल्या या नकारात्म भावना बोलल्याच जात नाही. जितक्या जास्त बोलल्या जातील तितकी माणसं मोकळी होतील, त्यांना त्यांच्या प्रश्नांवर उत्तरं सापडतील.आज मानसिक ताण तणाव यावर बोललं जातंय, पण जितकं बोललं जातंय त्याच्या दहापट दाबून टाकलं जातंय. असं बोलणं, आपल्याला असं होतंय, वाटतंय हे व्यक्त करणं हे चुकीचं आहे, वाईट आहे, लोक काय म्हणतील? काय विचार करतील? असा विचार मनात येतो .  शारीरिक आजारांवर अगदी टीचभर आजाराचं मणभर कौतुक होतं तिथे मानसिक आजार म्हणजे शरमेची बाब असं वाटण्याचं प्रमाण अजूनही जास्त आहे.  आपला समाज  मानसिक आरोग्याला महत्त्व देण्यात, मानसिक आरोग्य / समस्या समजून घेण्यात कमी पडतोय, असं म्हणणारी शाहीन भट मनातल्या प्रत्येक भावनेला व्यक्त करुन तिला मोकळं होण्याची वाट करुन द्यायला हवी ही गरज व्यक्त करते. 

Image: Google

कोण आहे शाहीन भट?

मानसिक आरोग्याबाबतच्या असंवेदनशिलतेबद्दल प्रश्न विचारणारी, मानसिक स्वास्थ्याच्या जागरुकपणाबद्दल बोलणारी ही शाहीन  भट कोण हे भलेही 2018 पर्यंत फारसं कोणाला माहीत नव्हतं. पण 'आय हॅव नेव्हर बीन (अन) हॅपिअर' हे तिचं पुस्तक प्रकाशित झालं आणि शाहीन भटची स्वतंत्र ओळख जगाला झाली. पूजा, आलियासारखी महेश भटची शाहीन ही मुलगी आहे एवढंच जगाला माहीत होतं.

Image: Google

दिग्दर्शक, निर्माता, अभिनय अशा क्षेत्रात  तिच्या कुटुंबातील  माणसं फोकस मधे असताना , लाइम लाइटमधे चमकत असताना शाहीन मात्र कुठेच नव्हती. आपण 'आउट ऑफ फोकस' असा शिक्का स्वत:वर वयाच्या बाराव्या वर्षी शाहीननं स्वत:च मारला आणि तिनं स्वत:ला स्वत:च्या एका खोलीत कोंडून घेतलं, मनातल्या अंधारात तिच्या सर्व भावना दडवून ठेवल्या.  पण एक वेळ आली आणि शाहीनच्या मनातल्या  अव्यक्त खळबळीची कुणकुण तिच्या आईला लागली, वडिलांना लागली. वडिलांनी तिला एकच सल्ला दिला, शाहीन मनात जे आहे ते व्यक्त कर, लिहून काढ. तेव्हा कुठे हिंमत करुन शाहीननं आपल्या मानसिक अवस्थेबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टला खूप प्रतिक्रिया आल्यात. या अनुभवांचं तू पुस्तक कर अशी मागणी प्रतिक्रिया देणारे करु लागले. व्यक्त होण्याचं,  आपल्या मनातल्या भावना उलगडून् दाखवण्याचं महत्त्व शाहीनला कळलं होतं. तिच्यावर उपचार सुरु होते, तिचं समुपदेशन सुरु होतं. समुपदेशानासोबतच ती यावर कुटुंबातल्या तिच्या जवळच्या व्यक्तींशी, तज्ज्ञांशी बोलत होती. हे सर्व सुरु असताना आपल्या मनातल्या भावनांना तिनं पुस्तकातून व्यक्त करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. 2018 मध्ये शाहीनचं पुस्तक प्रकाशित झालं आणि कित्येकांना आपली उदासिनता आपल्या मनातल्या अंधारात लपवून ठेवलेल्यांना व्यक्त होण्याची एक प्रकाशवाट सापडली.

शाहीन भट हिचं 'आय हॅव नेव्हर बीन (अन) हॅपिअर' हे पुस्तक आता  ऑडिओ बुक रुपातही रिलीज झालं. या निमित्तानं शाहीनच्या मुलाखती प्रसारमाध्यमांमधे छापून येताय, दाखवल्या जाताय.

Image: Google

मानसिक आरोग्याबद्दल शाहीन भट काय म्हणते?

1. 2018 ते 2022 या काळात मानसिक आरोग्य, मानसिक सुदृढता याबाबत समाज खूप काही बदलला आहे असं नाही, असं शाहीन खेदानं म्हणते.  अजूनही मानसिक आरोग्याबाबत आपला समाज पुरेसा साक्षर नाही, जागृत नाही.  अजूनही बहुतांश लोकांना नैराश्य , भीती या मानसिक आजारांविषयी माहीती नाही. काय असतात हे आजार , का होतात, हे आपले आपण कसे समजून घ्यायचे, इतरांचे समजून घेऊन त्यांना काय आणि कशी मदत करायची? याबाबत लोकांना माहीती नसल्यानं  सतत पाॅझिटिव्हिटी, हॅपिनेस व्यक्त करण्याच्या अट्टाहासात मानसिक आजाराची ही डार्क शेड समोर येत नाही. स्वत:च्या अनुभवावरुन शाहीन यावरचा मार्ग व्यक्त होणं, याबाबत जास्तीत जास्त बोलणं, याबाबत मोकळेपणानं चर्चा होणं हाच असल्याचा सांगते.

2. शाहीन म्हणते,  प्रत्येक व्यक्तीचा मानसिक आजार हा एकसारखा नसतो. समजा दोघांनाही नैराश्य आहे , पण म्हणून दोघांचा आजार हा सारखा आहे असं नाही. आपल्या मानसिक समस्यांना सामोरं जाण्याची, ती व्यक्त करण्याची पध्दत प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळे सर्व निराश व्यक्तींना, भीतीग्रस्त रुग्णांना एकच सल्ला, एकच उपदेश, एकच थेरपी चालत नाही. मानसिक आजाराच्या बाबतीत 'फिक्स' नसतं काही. त्या व्यक्तीप्रमाणे तिची समस्या आधी स्वत: त्या व्यक्तीने , तिच्या कुटुंबानं, मित्र परिवारानं, डाॅक्टरांनी, समुपदेशकांनी समजून घ्यायची असते.

Image: Google

3. आपल्या मनातले निराश विचार, उदास , वैफल्यग्रस्त भावना, असुरक्षितता याबाबत लिहून पुस्तकाद्वारे व्यक्त करताना तुला भीती वाटली नाही का? असा प्रश्न  माध्यमं शाहीनला विचारतात,  तेव्हा शाहीन म्हणते,  की भीतीपेक्षा असुरक्षितता या भावनेत ताकद असते. आणि कशाच्याही बाबतीतली आपली  मनातली असुरक्षितता बोलून् दाखवायला हवी. व्यक्त व्हायला हवी म्हणजे मनातली भीती कमी होते.

 

शाहीन म्हणते, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीकडे मी माझ्या मनातल्या  असुरक्षित भावना, विचार व्यक्त केलेत. त्यांनी माझं ऐकून घेतलं,  मनात खोलवर रुतून बसलेले उदासिनतचे, एकटेपणाचे, पराभूतपणाचे कणनकण बाहेर काढण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मीही त्यासाठी वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी, त्यावर बोलण्यासाठी वेगवेगळी माणसं शोधली.

Image: Google

मेन्टल हायजिन म्हणजे , त्यासाठी काय करायचं? शाहीन सांगते..

1.  आपल्या छोट्यातल्या छोट्या शारीरिक दुखण्यावर कौतुकानं भडभडून बोलणाऱ्यांना हेल्थ हायजिन माहीत नसतं.   शाहीन म्हणते, की जसं आपण रोज उठून दात घासतो,   रोज आंघोळ करुन शरीरावरील घाण आपल्यापासून मोकळी करुन टाकतो तसंच मनही हायजिन ठेवायचं असतं. मनातला प्रत्येक विचार, भावना जी नकारात्मकतेकडे झुकते ती रोज आणि सतत व्यक्त करुन बाहेर काढायला हवी. पोषक आहार घेणं, व्यायाम करणं, शांत आणि पुरेशी झोप घेणं या केवळ शारीरिक आरोग्याच्याच गरजा नसून मानसिक आरोग्यासाठीही या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं शाहीन म्हणते.

2. आपल्या मनातली निराशा काढून टाकण्यासाठी आपल्याशी बोलणारी, आपलं ऐकून घेणारी योग्य व्यक्ती शोधणं हे खूप आवश्यक आहे. आणि जे हा शोध घेण्याच्या परिस्थितीत नसतात त्यांच्यासाठी इतरांनी अशा व्यक्ती उपलब्ध करुन देणं गरजेचं आहे. कारण मानसिक समस्या ज्यांना भेडसावतात त्यांना बोलणारी तोंडं नको असतात, त्यांचं शांतपणे, समजूतदारपणे ऐकणारे कान हवे असतात. 

Image: Google

3. शाहीन म्हणते आपल्या मनात उदास भावना आहेत, निराशाजनक विचार आहेत तर ते सरळ कागदावर लिहून काढावेत. यामुळे आपल्या मनात नेमकं काय चाललंय हे आपलं आपल्याला उमगतं, त्यावरचा मार्ग शोधण्यास त्याची मदत होते. तसेच मन मोकळं व्हायला लिहून काढण्याची प्रक्रिया खूप मदत करते. आपलं लिहिणं हे आपल्याला आपल्या मनाचा आरसा दाखवतात. याबाबतीत स्वत:चा अनुभव सांगतांना शाहीन म्हणते की मी जशी लिहित गेली तशी जास्त मोकळी होत गेली. मन हलकं झालं. विशिष्ट विचारांच्या वेळेस मला कोणाचा आधार घ्यायला हवा, मी कोणाकडे मोकळं व्हायला हवं, ते मला कळू लागलं. मी त्यांच्याशी बोलत गेले आणि मार्ग सापडत गेला. आपल्याला घरातल्या सगळ्यांनीच या प्रवासात सोबत केली पण विशेष सोबत केली ती आलियानं. आलियाला जेव्हा कळलं की माझ्या मनात आत्महत्येचे विचार होते, तेव्हा आपल्या बहिणीला समजून घेण्यात आपण कमी पडलो म्हणून ती स्वत: दुखी झाली, स्वत:ला दोष देऊ लागली. तेव्हा तिला या विचारातून बाहेर काढण्यासाठी मी तिची मदत केली. त्यानंतर आलिया जेव्हा केव्हाही मला गरज असते, मला जेव्हा केव्हाही आतून भरुन येतं, तेव्हा ती माझ्याजवळ असते. ती माझी बहिण, मैत्रिण, माझी आई, माझं मूल सर्व काही आहे. माझ्या गरजेच्या वेळेस ती माझा मानसिक आधार बनते आणि तिच्या गरजेच्या वेळेस मी तिचा मानसिक आधार बनते.

शाहीन म्हणते, मानसिक आरोग्य जपायचं असेल , मानसिक समस्येच्या विळख्यातून आपली किंवा आपल्या प्रिय माणसांची सुटका करायची असेल तर हाच मार्ग आहे.
 

Web Title: Alia Bhatt's sister Shaheen Bhatt tell about what is mental hygiene and what need to do for this with her own experience. ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.