The mind-blowing dialogue opens doors of minds. | मनाची दारं उघडणारा मनमोकळा संवाद!
मनाची दारं उघडणारा मनमोकळा संवाद!

-सोनाली लोहार

आमचे हे म्हणजे नं, एक नंबरचे घुमे. सगळं आपलं मनात ! मी म्हणते कमीत कमी बायकोबरोबर तरी मन मोकळं करावं की नाही; पण नाहीच ! सदा आपली अळीमिळी गुपचिळी.’ 

अशा तक्रारी ऐकल्यानंतर ‘मी बाई काही म्हणजे काहीच मनात लपवून ठेवत नाही, सगळं बोलून टाकते,’ असं म्हणणार्‍या मंडळींचं मला कौतुक आणि खरं तर कुतूहलच वाटायला लागतं. खरंच ही मंडळी सगळं बोलून टाकतात का? म्हणजे सगळं?? 

आपण आपल्या मनातलं सगळं सांगतो का एखाद्याला. तसं प्रत्येकानं सांगावं ही अपेक्षा करणं हे चूक आहे की बरोबर?

 माझी एक मैत्रीण. अगदी सुस्वभावी, शांत, निर्गवी. पण अचानकच तिचं वागणं बदललं. ती जेवढय़ास तेवढं उत्तर द्यायला लागली. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडायला लागली. हळूहळू तिच्याशी होणारा संवाद तिनंच संपवत नेला. प्रयत्न करूनही या अचानक बदलाचं कारण मला कळू शकलं नाही. अशावेळी मन अस्वस्थ होऊन जातं. आपलं काही चुकलं तर नाही ना याची तपासणी करत राहातं. पण बहुदा हाती काहीच लागत नाही. पुढे तिच्या यजमानांची बदली झाली आणि ती दुस-या गावी गेली. ब-याच वर्षांनी कळलं की ती एचआयव्ही पॉझिटिव्ह होती. हे तिला जेव्हा  कळलं त्यानंतर तिनं सगळ्यांपासूनच स्वत:ला तोडून टाकलं आणि सगळं सोडून दूर निघून गेली. मलाच काय पण अगदी त्यांच्या जवळच्या नातलगांनाही तिनं याबद्दल काही कळू दिलं नाही. वैयक्तिकरीत्या मला असं वाटलं की, यात लपवण्यासारख काही नव्हतं, तिनं तिचं मन मोकळं केलं असतं तर तिला कदाचित तिच्या आजूबाजूला एक मोठी सपोर्ट सिस्टीम सापडली असती. पण तिला नाही वाटलं कोणाशी बोलावंसं. अर्थात तिची स्वत:ची याबद्दल काही कारणं नक्कीच असणार.
 असाच एक बडबड्या आणि स्वच्छ मनाचा मित्र त्याचं एक गंभीर प्रेमप्रकरण झालं आणि तुटलं. त्यानंतर बर्‍याच वर्षांनी एक सांगून स्थळ आलं. आईवडीलही मागे लागले होते आणि यालाही मुलगी आवडली. लग्न झालं. हा परत एकदा छान खुशीत टवटवीत दिसायला लागला. फेसबुकवर गळ्यात गळे घातलेले हनिमूनचे फोटो वगैरे टाकून झाले. आम्हा मित्रमंडळींना जोरदार पार्टी दिली गेली. नवीन वहिनींनी अगदी आग्रह करून जेवायला घातलं आणि सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्या. का माहिती नाही; पण हळूहळू आमचा मित्न शांत होऊन गेला. भेटीगाठी कमी झाल्या, भेटला तरी फारसा बोलायचा नाही. एकदा त्याच्या वडिलांचा फोन आला. काहीतरी गडबड आहे, तो आमच्याकडे बोलणार नाही. तू बोलून बघ एकदा. शेवटी एकदा त्याला घरीच बोलावलं आणि बोलतं केलं. या महाशयांनी मधुचंद्राच्या रात्नीच बायकोला आपला भूतकाळ सांगून टाकला. याच्या दुर्दैवानं बायको अत्यंत संशयी स्वभावाची निघाली. तो भूतकाळ होता, आता तसं काही नाही वगैरेवर तिचा काही विश्वास बसला नाही. आता याच्या प्रत्येक गोष्टींवर तिचा वॉच असतो. तो फोनवर कोणाशी बोलतोय, ऑफिसलाच जातोय ना, घरी यायला उशीर का झाला? एक ना दोन तिला त्याच्याविषयी नुसत्या शंका यायला लागल्या. हा मात्र  हैराण होऊन गेला. त्याला वाटणारी पुढची भीती म्हणजे बायकोनं आता त्याच्या त्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला काही त्रास दिला तर काय करायचं. कारण त्या मुलीचंही लग्न झालंय, मुलंबाळं आहेत तिला !

‘मूर्ख आहे ना मी ! उगाच मनातलं सगळं सांगून टाकलं  यार !’ तो डोक्याला हात लावून म्हणाला. कदाचित त्याच्या बायकोला भेटून तिच्याशी बोलता येईल, तिच्या मनातला संशय आणि भीती काढण्याचा प्रयत्नही करता येईल; पण मला खात्रीआहे की यापुढे तो मात्र तिच्याबरोबर आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी वाटू शकणार नाही. त्या दोघांमधल्या संवादाच्या काही खिडक्या कायमच्या बंद झाल्यात.

 अशीच एक नुकतीच घडलेली घटना. चार सख्खी भावंडं. आईवडिलांचं छत्र अकाली हरवलेलं. वेगवेगळ्या ठिकाणी पडेल ते काम करून उपजीविका करणारी ही विशीतली मुलं. त्यांचा एकमेकांशी संपर्क फक्त फोनवरून, तोही अधूनमधूनच. त्यातल्या मधल्या बहिणीनं इतर दोघींकडे 3-4 वेळा आर्थिक मदतीची मागणी केली. रक्कम मोठी असल्यानं मोठय़ा दोघी काळजीत पडल्या. ‘तुला इतके पैसे का हवे ते आधी सांग’, असा दोघींनी धोशा लावला. तिसरी काहीच बोलायची नाही, फक्त रडायची. तिनं शेवटपर्यंत पैसे का हवेत ते सांगितलं नाही. तिची तब्येत हळूहळू ढासळत गेली, फोन येणंही बंद झालं. बहिणींना कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. तिच्यापर्यंत पोहोचून हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार करण्याचाही अवधी मिळाला नाही. ती गेली. बिन आईबापाची चार वेगवेगळ्या ठिकाणी राहून कसंबसं स्वत:चं निभावणारी लेकरं ! उरलेली तिघं आता आयुष्यभर स्वत:ला हा प्रश्न विचारत राहतील की तिला पैसे नक्की का हवे होते? तिला कोणी त्रास देत होतं म्हणून? की अजून काही? का नाही सांगितलं तिनं तिच्या मनातलं? तिला वाचवता आलं असतं का?
खरंच का नाही बोलल्या जात काही गोष्टी?
खरं तर माणसाचा स्वत:चा स्वत:च्या मनाशी एक अखंड संवाद सुरू असतो आणि त्यातला फार कमी भाग हा बाहेरच्या जगाला ऐकू जातो. जेवढं आपल्याला ऐकायला येतं त्यावरून आपण मला तो माणूस कळला किंवा तो माझ्याबरोबर मनातलं सगळं शेअर करतो अशी हास्यास्पद विधानं करतो.
जर कधी तो थोडाफार आवाजही ऐकायला येणं बंद झालं तर मात्र ती धोक्याची सूचना असू शकते आणि अशावेळी तो आतला आणि बाहेरचा संवाद सुरू ठेवण्यासाठी एखादी जोडणारी कडी आवश्यकही ठरते. तरीही, कितीही जवळची व्यक्ती असू द्या, तिचं स्वत:चं असं एक स्वतंत्र अवकाश असतंच ज्यात दुस-या  कोणालाही प्रवेश नसतो. आणि केवळ त्या अवकाशातच ती व्यक्ती स्वत:च्या मनाशी 100 टक्के प्रामाणिकही असते. तोच संवाद आणि त्याच प्रामाणिकपणानं तिनं बाह्यजगात किंवा व्यवहारातही करावा ही अपेक्षा करणं कितपत योग्य आहे हा विचार करण्याचा मुद्दा आहे. आपण स्वत:च स्वत:ला हा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर कदाचित आपल्याला मिळूही शकेल.
पण शेवटी संवाद सुरू राहाणं सगळ्यात महत्त्वाचं. स्वत:चा स्वत:शी, बाहेरच्या जगाशी, बाहेरच्या जगाचा स्वत:शी. कारण हा संवाद सुरू राहिला तरच नकळत काही बंद कुलपाच्या किल्ल्या सापडू शकतात !

(लेखिका व्हॉइस थेरपिस्ट आहेत) 

sonali.lohar@gmail.com


Web Title: The mind-blowing dialogue opens doors of minds.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.