Meri Zindagi- First woman rockband from uttarparadesh. | महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा उत्तर प्रदेशातला महिला रॉक बॅण्ड
महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा उत्तर प्रदेशातला महिला रॉक बॅण्ड


-माधुरी पेठकर


जानेवारी ते मार्चदरम्यान उत्तर प्रदेशात अलाहाबादच्या त्रिवेणी संगमावर कुंभमेळा पार पडला. या कुंभमेळ्यात साधुसंतांच्या मंत्रोच्चारांनी वातावरण भारलेलं असताना सहा महिलांनी आपल्या सुरांचा, शब्दांचा वेगळा ठसाही उमटवला. उत्तर प्रदेशातल्या या सहा महिला ‘मेरी जिंदगी’ या भारतातल्या पहिल्या महिला रॉक बॅण्डच्या सदस्य असून, यंदा पहिल्यांदाच त्यांनी कुंभमेळ्यात आपल्या गाण्यांचं सादरीकरण केलं. हजारो लोकांनी त्यांची गाणी ऐकली. त्यांच्या सूर-तालावर ठेका धरला. 

आपल्या गाण्यातून या महिला जे सांगू पाहत होत्या ते उपस्थितांपर्यंत पोहोचत होतं. त्यांना ते पटतही होतं. लोकांनी या महिलांना टाळ्या वाजवून, प्रत्यक्ष भेटून त्यांचं कौतुक करत दाद दिली. अनेकांनी या आगळ्या-वेगळ्या रॉक बॅण्डसोबत सेल्फीही काढलेत. कुंभमेळ्यानंतर उत्तर प्रदेशातल्या ‘मेरी जिंदगी’ या महिला रॉक बॅण्डची चर्चा मोठय़ा प्रमाणात झाली असली तरी गेल्या नऊ वर्षांपासून हा रॉक बॅण्ड कार्यरत आहे.

गीतरचना, गायन, वाद्यवादन या सर्व जबाबदार्‍या या रॉक बॅण्डमधील महिलाच पार पाडतात. उत्तर प्रदेशात अजूनही दर पाच मुलींमधल्या एका मुलीचं लहानपणीच लग्न लावून दिलं जातं. एकदा लग्न झालं, की त्या कोवळ्या वयातल्या मुलीची स्वप्नं तिथेच मरतात. याबाबतची जाणीवजागृती सर्वसामान्य माणसांपर्यंत होणं जास्त गरजेचं होतं म्हणून त्यांनी यंदा कुंभमेळ्यात आपल्या गाण्यांचं सादरीकरण केलं. 

बॉलिवूड चित्रपटातलं एकही गाणं न वाजवताही हा रॉक बॅण्ड उपस्थितांना खिळवून ठेवतो. टाळ्या वाजवून दाद देण्यास भाग पाडतो. या गाण्यांच्या विषयांची सामाजिक पार्श्वभूमी हे या रॉक बॅण्डचं मुख्य आकर्षण आहे. स्त्री-पुरुष समानता, बालहत्या, बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या, मुलींचं शिक्षण या विषयांवर ‘मेरी जिंदगी’ने आतापर्यंत 70 गाणी रचली. लहान वयातील मुलींच्या लग्नाचा प्रश्न मांडणारं   ‘माई री मेरा ब्याह न रचाना’,  स्त्री भ्रूणहत्येवरचं  ‘तेरी गलियो मे ना आयेंगे कभी आज के बाद मां, मेरी मां’ ही गाणी उत्तर प्रदेशात लोकप्रिय होऊ लागली तशी या बॅण्डला, यातल्या महिलांनाही ओळख मिळाली. प्रसिद्धी मिळाली. युनिसेफ, ब्रेक थ्रू, बीबीसी मीडिया अँक्शन, वॉटर एड इंडिया, समाख्या महिला संघ (उत्तर प्रदेशातील शासकीय संस्था) यांच्याकडून ‘मेरी जिंदगी’ला सादरीकरणासाठी आमंत्रणं यायला लागली. यामुळे या रॉक बॅण्डला सादरीकरणासाठी व्यासपीठ आणि आर्थिक बळही मिळालं. पण ‘मेरी जिंदगी’ची सुरुवात झाली तेव्हा मात्र हे चित्र नव्हतं. जया तिवारी यांनी हा बॅण्ड सुरू केला. संगीतात पीएच.डी. केलेल्या जया यांच्या घराशेजारी एक अनाथालय होतं.

या अनाथालयातल्या मुलांना पालक दत्तक घेत होते; पण मुलींना कोणी दत्तकच घेत नव्हतं. यामुळे जया तिवारी व्यथित झाल्या. ही परिस्थिती बदलायला हवी त्यासाठी काहीतरी करायला हवं म्हणून त्यांनी त्या अनाथालयातल्या मुलींना घेऊनच एक म्युझिक ग्रुप सुरू केला. पण हा ग्रुप फार काही काळ टिकला नाही. पण म्हणून जया तिथेच थांबल्या नाहीत. त्यांनी आपल्या म्युझिक ग्रुपसाठी पुन्हा मुलींचा, महिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांची शिष्य असलेली निहारिका दुबे हिची साथ मिळाली. निहारिका मेरी जिंदगीमध्ये सिन्थेसायझर वाजवते. मग ड्रम वाजवणारी अनामिका झुनझुनवाला आली. पूर्वी, स्वस्तिका, सौभाग्या या मेरी जिंदगीच्या सदस्य झाल्यात.

सुरुवातीला या रॉक बॅण्डची खूप हेटाळणी झाली. लोकं नावं ठेवायचे. पण म्हणून यातली एकही सदस्य मागे हटली नाही. सुरुवातीला तर वाद्यं घेण्यासाठीही या बॅण्डच्या महिलांकडे पैसे नव्हते. मग त्यांनी घरातले चमचे, वाट्या, ताटं, चिमटे हे घेऊन गाण्यांना चाल द्यायला सुरुवात केली. या ग्रुपमधल्या सर्व सदस्या या सामान्य घरातल्या. आपल्या छोट्या छोट्या प्रश्नांसाठी संघर्ष करणा-या. गाण्यांच्या सरावासाठी आपली रोजची कामं पहाटे लवकर उठून आटोपायच्या आणि सकाळी साडेसातला एका सार्वजनिक उद्यानात जमायच्या. या ग्रुपमध्ये काही शाळा-कॉलेजात जाणा-या मुलीही होत्या. त्यांचे वर्ग बुडू नये म्हणून त्यांनी सरावासाठी सकाळची वेळ निवडली. उद्यानाच्या परिसरातले लोकं त्यांच्याकडे उत्सुकतेनं पाहायचे. त्यांची गाणी ऐकून प्रोत्साहन द्यायचे.

त्यातूनच या महिलांना प्रेरणा मिळत गेली. गाणी तयार झाली. मग जागोजागी या महिला आपली गाणी सादर करू लागल्या. ‘ड्रीमिंग के कुकर की सीटी को बजने दो, मेरे हौसलो के शंख नाद को बढने दो’ हे या रॉक बॅण्डचं एक गाणं. उत्तर प्रदेशातल्या कुठल्या गावातल्या गल्ली मोहोल्यात ते म्हटलं की ऐकणार्‍या महिला, मुली आपापल्या स्वप्नात रंगून जातात. 

कुकरची शिट्टी हीच आम्हा महिलांच्या नशिबात आहे. पण ही शिट्टी आम्हाला आमच्या चौकटीच्या जगण्यातून एक पाऊल पुढे टाकून स्वत:चं स्वप्न बघण्याचं बळही देते. याच बळावर जया तिवारी यांनी मेरी जिंदगी हा रॉक बॅण्ड उभा केला. स्वप्न बघण्याचा आणि ते पूर्ण करण्याचा अधिकार आपल्यालाही आहे हेच ‘मेरी जिंदगी’ या रॉक बॅण्डला आपल्या गाण्यातून उत्तर प्रदेशातल्या गावागावातल्या महिलांपर्यंत पोहोचवायचं आहे. काहीतरी बदल घडेल या विश्वासावरच उत्तर प्रदेशात ‘मेरी जिंदगी’चे सूर निर्धाराने उमटत आहे.

madhuripethkar29@gmail.com

Web Title: Meri Zindagi- First woman rockband from uttarparadesh.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.