The life risk battle of Murmgaon women of prohibition of alcohol. | जीव धोक्यात घालून मुरूमगावच्या महिला लढता आहेत दारूबंदीची लढाई!
जीव धोक्यात घालून मुरूमगावच्या महिला लढता आहेत दारूबंदीची लढाई!

-पराग मगर

मुरूमगावच्या महिलांनी धाडसानं गावात पकडलेली दारू पोलिसांच्या स्वाधीन केली. त्यानंतर गावात अवैधरीत्या दारू विक्री होऊ नये म्हणून सवितासह मुरूमगावातील 25 ते 30 महिला दारूविक्री किंवा दारूची वाहतूक होत आहे का, हे पाहण्यासाठी रात्रीला संपूर्ण गावभर फिरायच्या. वर्षभर हा प्रकार सुरू असल्यानं उघड दारूविक्री थांबली; पण अनेकजण बाहेरून दारू पिऊन यायचेच.  

सविताचा नवरादेखील त्यातलाच. महिलांमुळे गावात दारू मिळत नसल्यानं त्यालाही बाहेर जाऊनच प्यावी लागत होती. बायकोदेखील यात सक्रिय असल्यानं सवितावर त्याचा राग होताच. रात्री घरी येताच ‘तुझ्यामुळे बाहेर जाऊन महागडी दारू प्यावी लागते’, असं म्हणत नव-यानं तिला मारण्यासाठी कु-हाड हाती घेतली. भेदरलेल्या सविताला पळूनही जाता येत नव्हतं. 
नव-यानं एका हातात कीटकनाशकाची बाटली घेत ‘विष पी, नाहीतर कु-हाडीनं तुझा मुडदा पाडतो’ अशी धमकी सविताला दिली. घाबरलेल्या सवितानं सरळ विषाची बाटली तोंडाला लावली. महिलांना हा प्रकार कळला. अत्यवस्थ सविताला रुग्णालयात हलविण्यात आलं. थोडक्यात ती बचावली. पोलीस तक्रार न झाल्यानं ही घटना गावाच्या इतिहासात जमा झाली.. 
मुरूमगाव हे राज्य महामार्गावरील गाव. छत्तीसगडकडे जाणारी अवजड वाहनं याच गावावरून जातात. त्यामुळे येथील मार्केट परिसर आणि हॉटेल व्यवसायही वाढला आहे. याच हॉटेल्समधून बरेचदा चोरून-लपून दारूची विक्री होते. त्यावरही गाव संघटनेच्या महिला करडी नजर ठेवून असतात. एका घरात दारूसाठा असल्याचा संशय महिलांना आला. त्यांनी अंगणात आणि घराभोवती शोधमोहीम सुरू केली. हा शोध थांबावा यासाठी घरातील महिलेनं सीताबाईचा हात पिरगाळत भिंतीजवळ नेलं आणि जोरात गळा आवळला. इतर महिलांनी कशीबशी तिची सुटका केली. याप्रकरणी सदर महिलेला तीन महिने तुरुंगवासही झाला. 
उघड दारू विक्री करता येत नसल्यानं दुचाकीवरून पाहिजे त्याला दारू पुरविण्याचा प्रकार सुरू झाला. दुचाकीला असलेल्या डिक्कीत दारू ठेवून त्याची विक्री एकजण करीत असल्याचं निशाला समजलं. काही जणींना घेऊन तिनं पाठलाग सुरू केला. 
महिला आपल्या मागावर आहे हे कळताच या विक्रेत्यानं एका बाटलीतील दारू फेकून त्यात आपली लघवी भरून ठेवली आणि मुद्दाम रस्त्यालगत थांबला. निशानं चौकशी केली असता त्याने तीच बाटली समोर धरली. तूच बघ काय आहे, असे म्हणत लघवीनं भरलेली बाटली निशाच्या हातावर रिती केली. हा गलिच्छ प्रकार लक्षात येताच निशाला धक्का बसला. तिनं महिलांसह तडक पोलीस स्टेशन गाठलं. घडलेला प्रकार सांगितला. पण ‘तुम्हाला हे धंदे सांगितलेच कुणी’, असं म्हणत पोलिसांनी या महिलांनाच रागवायला सुरुवात केली; पण महिला खंबीर होत्या. या विक्रेत्यावर अँट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविला गेला. पण त्या विक्रेत्यानं सरळ जाऊन निशाचे पाय धरले आणि पुन्हा असं करणार नाही, अशी कबुली दिली. 
जिवावर बेतणारे असे एक ना अनेक प्रकार मुरूमगावमध्ये महिलांच्या वाट्याला नेहमीच येतात. 
मुरूमगावच्या महिलांनी पहिल्यांदा गाडीचा पाठलाग करत दारू पकडली असता दारू विक्रेत्यानं थेट महिलांच्या अंगावर गाडी चढविण्याचा प्रयत्न केला; पण  पोलिसांनी तक्रार नोंदवून घेताना सुरुवातीला आम्हालाच खोटे ठरविण्यात आल्याचं महिला सांगतात. महिलांनी नंतर थेट गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं. त्यांनाही महिलांच्या या मोहिमेची माहिती होतीच. 
पोलीस अधीक्षकांनी महिलांचं कौतुक केलं. आणि आरोपीच्या अटकेसाठी कसोशीनं प्रयत्न सुरू असल्याचं सांगत पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी भक्कम राहील, असं आश्वासन दिलं. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असल्यानं सीमेलगतच्या जिल्ह्यांमधून, राज्यांमधून मोठय़ा प्रमाणात दारूची तस्करी गडचिरोलीत होत आहे. अवैध वाहतूक होत आहे. पण मुरूमगावच्या महिला मात्र जागरूक  आहेत. आज त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. जिवालाही धोका आहे; पण ‘दारूची विक्री होणार का बाप्पा, नाय रे बाप्पा, नाय रे बाप्पा.’ म्हणत मुरूमगावच्या दबंग महिला गावातल्या दारूबंदीवर ठाम आहेत. 
(सुरक्षेच्या दृष्टीनं लेखातील महिलांची नावं बदललेली आहेत.)
उत्तरार्ध.

(लेखक गडचिरोली येथील मुक्तिपथ अभियानात  कार्यरत आहे)

parag_magar@searchforhealth.ngo


Web Title: The life risk battle of Murmgaon women of prohibition of alcohol.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.