Life on hold in America | अमेरिकेतली  होल्डवरची आयुष्यं

अमेरिकेतली  होल्डवरची आयुष्यं

- गौतम पंगू

कोरोनामुळं इथल्या जीवनात घडलेल्या बदलांतला एक काहीसा अनपेक्षित्य बदल म्हणजे सायकलींचा तुटवडा.  लॉकडाऊनच्या काळात बंद पडलेल्या जिम्स, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्यातला धोका, घरी बसून आलेला वैताग आणि बाहेरची छान हवा यांचा परिणाम होऊन लोकांनी भराभर सायकली खरेदी करायला सुरु वात केली.  दुकानांतली सायकलींची शेल्फ अक्षरश: ओस पडली. ऑनलाइन ऑर्डर द्यावी तरी नवी सायकल कमीतकमी  दोन-तीन महिन्यांशिवाय मिळत नाही असं दिसत होतं.
 नवीन सायकल घ्यायचं माझ्याही डोक्यात होतं, पण त्यात यश येत नाही असं दिसल्यावर मी ‘फेसबुक मार्केटप्लेस’ वर कोणी वापरलेली सायकल विकतंय का याचा शोध घेतला. शेजारच्याच सबर्बमधल्या ओमार नावाच्या माणसानं जाहिरात दिली होती. मेसेज पाठवून त्याचा पत्ता घेतला आणि ठरलेल्या वेळी त्याच्या घरी जाऊन पोचलो. सोबत मुलीलाही घेऊन गेलो होतो.  एका सुबकशा कम्युनिटीत त्याची अपार्टमेण्ट होती.  घरी तो एकटाच होता. त्याची सायकल चांगल्या स्थितीत होती आणि किंमतही वाजवी होती,    त्यामुळं सौदा पटकन झाला. तो सामानाचं पॅकिंग करत असावा, कारण      लिव्हिंग रूममध्ये काही उघडी, सामानानं अर्धवट भरलेली खोकी होती,   ब-याच वस्तू आजूबाजूला पसरल्या होत्या. 
‘दुस-या घरी मूव्ह करतोयस का?’ मी सहज विचारलं. 
‘हो. दोन विद्यार्थ्याबरोबर एक अपार्टमेण्ट शेअर करणार आहे,’ तो म्हणाला. 

‘तू विद्यार्थी आहेस?’ मी विचारलं. 

त्यानं हिंदीत बोलायला सुरु वात केली,  ‘ नही यार. मी  ‘एचवन’  व्हिसावर आहे, कोरोनामुळं कंपनीत डाऊनसायङिांग झालं आणि माझा जॉब गेला.    ‘एचवन’ वर असताना जॉब गेला तर 6qदिवसांत नवा जॉब  शोधावा  लागतो, नाहीतर स्टुडण्ट किंवा व्हिजिटर व्हिसावर जावं लागतं. यातलं काहीच झालं नाही तर देश सोडून जावं लागतं!’ 
एचवन चे हे नियम मलाही चांगलेच माहित होते. 
आणि आताच्या परिस्थितीत जॉब मिळणं सोपं नाही. म्हणून मग कुठल्यातरी युनिव्र्हसिटीत फॉल सेमिस्टरसाठी अॅडमिशन घेऊन स्टुडण्ट व्हिसा मिळवण्याची खटपट चाललीय. कमीत कमी अमेरिकेत राहता तरी येईल.ण    तोपर्यंत जादाचं सामान एका मित्रच्या घरी ठेवणार आहे!’ क्षणभर थांबून तो म्हणाला,  ‘  दोन वर्षांपूर्वी भारतातून अमेरिकेत आलो तेव्हा  व्हिसा मिळेपर्यंत खूप लफडी झाली, आणि आता हे नाटक!’’ 
‘कसली लफडी?’
‘दोस्ता, माझं नाव ओमार अन्वर आहे. इथल्या सरकारचं मुस्लिमविरोधी धोरण माहितीय नं तुला? एक्स्ट्रा बॅकग्राउंड चेकिंगमुळं व्हिसा मिळायला       तब्बल तीन महिने लागले होते! ’ 
खाली कार्पेटवर पसरलेल्या सामानात थोडी खेळणी दिसत होती. मी  विचारलं  ‘ तू एकटाच राहतोस? मग ही खेळणी कुणाची?’
तो हसला,  ‘ ती माझ्या  मुलीची खेळणी आहेत. पाच वर्षांची छोकरी आहे माझी. मार्चमध्ये लॉकडाऊन सुरु  व्हायच्या थोडं आधी माझी बायको       मुलीला घेऊन फॅमिली इमर्जन्सीमुळं भारतात गेली. परत यायच्या आधी   तिला पासपोर्टवर एचफोर (डिपेडंण्ट) व्हिसा स्टॅम्प करून घ्यायला लागणार होता, पण आतापर्यंत दुतावास बंद होते आणि आता तर अमेरिकेनं डिसेंबरपर्यंत नवीन एचफोर व्हिसा देणंच बंद करून टाकलंय!’
‘म्हणजे आता डिसेंबरपर्यंत ते लोक भारतात आणि तू इथं?’
‘दुसरा काय पर्याय आहे? त्यात आता माझाच जॉब गेला, त्यामुळं अजूनच गोंधळ झालाय! आता आम्ही नक्की कधी भेटणार काय माहित? तुम्हारी बेटी को देख के मुझे मेरी समीराकी बहोत याद आ रही है! ’ तो काहीशा भरल्या गळ्यानं म्हणाला. काय बोलावं मला कळलं नाही. 
‘सगळं छान चालू होतं. आम्ही विचार करत होतो की यावर्षी इथं स्वत:चं घर घ्यायचं, कदाचित अजून एक बाळ.  पण आता सगळंच होल्डवर आहे!’’ कारपेटवरची खेळणी एका बॉक्समध्ये भरून बॉक्स बंद करत तो अर्धवट स्वत:शी, अर्धवट माझ्याशी बोलत होता.  माझ्यासारख्या अपरिचित  माणसाला पहिल्याच भेटीत हे सगळं सांगावं, यावरूनच त्याच्या व्यथेची खोली उघड होत होती.  त्या बॉक्समध्ये सामानाबरोबरच त्या कुटुंबाची स्वप्नंही बंद होतायत असं मला वाटलं!


‘इमिग्रेशन’ हा अमेरिकेत राहणा-या भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय!   बहुसंख्य भारतीय इथं कायदेशीर मार्गानंच येतात, पण इमिग्रण्टसची संख्या प्रचंड असल्यानं आणि एकूणच प्रक्रि या किचकट असल्यानं ग्रीनकार्ड किंवा सिटिझनशिपची मोक्षप्राप्ती होईपर्यंत डोक्यावर सतत टांगती तलवार असतेच.  त्यात पुन्हा प्रत्येक सरकारचं याबाबतीतलं धोरण वेगळं! ट्रम्प सरकारनं सत्तेवर आल्यापासून याबाबत अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. बेकायदेशीरच काय, कायदेशीर स्थलांतरही जितकं अवघड करता येईल  तितकं करायचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ओमार ज्या एचवन व्हिसावर अमेरिकेत आला तो व्हिसा दरवर्षी जवळजवळ 65000 भारतीयांना     मिळतो. याचा काही प्रमाणात गैरवापर नक्कीच झालाय, पण हा व्हिसा विशेष प्राविण्य असणा-या  लोकांनाच मिळत असल्यानं ‘एचवन व्हिसावर येणारे   लोक सर्वसामान्य अमेरिकन लोकांच्या नोक-या  बळकावतात’ हा युक्तिवाद किती बेगडी आहे हे अनेकदा सिद्ध झालंय. कोरोनामुळं निर्माण झालेल्या अनिश्चिततेला समजून घेऊन कॅनडासारख्या अमेरिकेच्या शेजा-यानं इमिग्रेशनबद्दल बरंच सहृदय धोरण स्वीकारलंय, पण अमेरिकन सरकारनं मात्र काही प्रकारच्या व्हिसा आणि ग्रीनकार्डसवर तात्पुरती बंदी आणून उलटीच पावलं उचललीयेत.  नोव्हेंबरमधल्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून आपल्या मतदारांना खूष करायला खेळलेली ही चाल आहे असा अनेकांचा अंदाज आहे. या निर्णयावर अमेरिकन उद्योगधंद्यांकडून सरकारवर सडकून टीका झालीये, ‘निष्ठुर, अमानुष, क्रूर’ अशा शेलक्या शब्दांत या निर्णयाची संभावना झाली आहे. सरकारवर खटले भरण्यात   आलेत, आणि या दबावाला बळी पडून का होईना, पण सरकारनं या निर्णयाला काही बाबतीत अपवाद करायचं ठरवलंय!
पण या सगळ्यांत भरडले जातात ते चांगल्या आयुष्याच्या शोधात आलेले आणि त्यासाठी कष्ट करायची तयारी असणारे ओमारसारखे लोक!             ‘ अमेरिकेत राहायची इतकी तडफड न करता सरळ भारतात परत जा की’ असा सल्ला तरी एखाद्याची वैयक्तिक परिस्थिती समजून न घेता कसा द्यायचा? कोरोनामुळं लोकांना बाहेरच्या जगापासून वेगळं व्हावं लागलं,  पण या कठीण काळात कुटुंबातल्या सदस्यांना एकमेकांपासून वेगळं व्हावं   लागू नये असं नक्कीच वाटतं.  ओमारच्या नोकरीचा प्रश्न सुटो, तो आणि त्याचे कुटुंबीय एकत्र येवोत आणि त्याची ती  बंद खोकी लवकरच पुन्हा उघडोत हीच इच्छा!

( केमिकल इंजिनिअर असलेले लेखक औषधनिर्माण उद्योगात जेष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करतात. ते गेली वीस वर्ष अमेरिकेत वास्तव्यास आहेत)

gautam.pangu@gmail.com

 

 

 


 

Web Title: Life on hold in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.