Let's vote! | चला मतदान करूया!
चला मतदान करूया!

-सोनाली लोहार

मम्मा, मतदार यादीत माझं नाव आहे का? प्लीज मला चेक करायला मदत कर ना ’ - लेक विचारत होती. मी हसून विचारलं, ‘मग, कोणाला मत देणार तू?’ हं.. बघू , आधी गुगलवर कॅण्डिडेट्सचे बॅकग्राउण्ड चेक करेन आणि मग ठरवेन.’ 

समाधान वाटलं ऐकून. मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणं आणि अंधानुकरण न करणं या दोन्ही गोष्टी आजच्या तरुण पिढीला महत्त्वाच्या वाटताहेत ही चांगली गोष्ट आहे.

याउलट गेल्या चार-पाच निवडणुकांचा अनुभव पदराशी असलेली एक पिढी आहे. काहीशी उदास. काहीशी निरुत्साही. ‘कशाला करायचं मतदान! काही चांगले पर्यायच उभे करत नाहीत ही मंडळी. सगळे एकजात सारखे. पक्षाला आणि विचारसरणीला डोळ्यांसमोर ठेवून इतकी वर्ष केलं आम्ही मतदान, पदरात काय पडलं?’  अशी एक भावना. 

‘शेवटी काय सगळं राजकारणच! खुर्ची, सत्ता आणि पैसा तिन्हीसाठी चाललेली यांची प्रचंड धावपळ. समाजसेवा, समाजकारण वगरै काही नाही हो. हा सगळा ‘बिझनेस’ आहे. त्यात सामान्य माणसाला फक्त मतं मागताना गणतीत धरलं जातं.’ ही दुसरी भावना. प्रस्थापित पक्ष तुम्हाला उमेदवारी देणार नाहीत पण तुम्हाला बदल तर घडवायचाय. मग तुमच्या प्रभागासाठी स्वतंत्ररीत्या उमेदवारी अर्ज भरून तुम्हीच सक्रिय राजकारणाचा भाग का बरं नाही होतं, असं विचारल्यावर उत्तर येतं - ‘काय गंमत वाटतेय का हो तुम्हाला सगळी ही? स्वबळावर एखाद्या सामान्य माणसानं निवडणूक लढवायची म्हणजे खाऊ आहे का ? त्यासाठी अमाप पैसा लागतो. हाताशी गुंडांची फौज लागते. पोराबाळांच्या जिवावर तुळशीपत्न ठेवायची मनाची तयारी लागते. आपण मध्यमवर्गीय माणसं कुठे या सगळ्यात पडणार ! होऊ दे जे होऊ घातलंय ते! त्यांच्या निवडणुकांनी आमच्या मागचं पोटाची खळगी भरण्यासाठी 8 ते 6 नोक-या करण्याचं शुक्लकाष्ठ का सुटणारे? नाही ना? मग कशाला या चर्चा तरी करायच्या! असो. चहा घेणार का तुम्ही ? आमचा होऊन गेलाय आत्ताच म्हणून विचारतोय!’ 

स्वत:ला अशा उदासीनतेच्या आणि निष्क्रियतेच्या खाईत ढकलून देताना आपण मध्यमवर्गीय माणसं काही महत्त्वाच्या गोष्टी मात्र साफ विसरतो. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत मान मोडून प्रामाणिकपणे  काम करणारा, पोराबाळांना उत्तम शिक्षण मिळावं म्हणून छाती फुटेस्तोवर धडपड करणारा, रोज सकाळी नियमानं वर्तमानपत्नाची घडी घालून नेणारा आणि ट्रेनच्या गर्दीत का होईना पण ते वाचणारा, सीमेवर शहीद झालेल्यांची पार्थिवं बघून गलबललेला, भेसळयुक्त  बांधकामामुळे पडलेल्या पूलदुर्घटनेतल्या मृतांच्या कलेवरांना स्ट्रेचरवर ठेवायला मदत करणारा असा हा मध्यमवर्गीय नागरिकच खरतर एक उत्तम प्रशासक होऊ शकतो. कारण त्यासाठी लागणारे सगळे गुण त्याच्यात परिस्थितीनेच ठासून भरले असतात.

दुसरी गोष्ट तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले काही राजपुत्र आणि राजकन्या असूही शकतील; पण तो त्यांचा दोष म्हणता येणार नाही. ती त्यांची अपरिहार्यता म्हणूूया. पण एवढं सगळं असूनही काही दगड हे दगडच राहातात. त्यांना कितीही शेंदूर फासला तरी त्यांचा देव होत नाही. आणि अशा शेंदूर फासलेल्या दगडासमोर हात जोडायचे की नाही हे ठरवणारे जर कोणी असू तर ते म्हणजे आपणच, मध्यमवर्गीय जनता. नका करू ना पूजा, नका देऊ त्यांना राजगादी! आणि त्यातूनही यातही खरोखरच एखादा झळाळता हिरा असूही शकतो. राजवर्खाची झूल उतरवून ठेवून स्वत:च्या कर्तृत्वानं आणि प्रामाणिक तळमळीनं समाजप्रिय झालेला असा एखादा जर असेल तर त्याला नक्कीच संधी दिली गेली पाहिजे. त्यात गैर काहीच नाही. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट. आपण एवढे नकारात्मक होत चाललो आहोत की अशी काही मंडळी आपल्या डोळ्यांसमोरही येत नाही जी खरोखरच अत्यंत कठीण हलाखीच्या परिस्थितीत काबाडकष्ट करून उच्चशिक्षित झाली आहेत. समाजासाठी काही करण्याच्या प्रामाणिक भावनेतून समाजकार्यात उतरलीत. जी आजही तितक्याच प्रामाणिकपणे सत्ता असो वा नसो काम करताहेत. ज्यांच्या निष्ठा या फक्त आणि फक्त समाजाप्रति आहेत. पैसे, गुंडशाही, राजकीय पाठिंबा या कशाचीही या मंडळींना कधीही आवश्यकता भासली नाही.  

आहेत ना अशीही मंडळी आहेत आजूबाजूला. त्यांना पुढे आणूया, संधी देऊन बघूया. आपण जनतेनेच आता अधिक डोळस होण्याची गरज आहे. किंबहुना त्याहीपलीकडे जाऊन, मला माझ्या देशात जर बदल हवा असेल तर तो बदल  मीच  का असू नये इथपर्यंत स्वत:ला विचारण्याची आणि  हे विचार तरुण पिढीतही रूजवण्याची गरज आहे. 

माझ्या ओळखीत एक मुलगा आहे. रक्तदान शिबिरं भरवतो, झोपडपट्टीत जाऊन स्वत: हातात खराटा घेऊन नालेसफाई करतो.  झोपड्यांना  रंग लावतो. भीक मागणा-या  मुलांना गोळा करून त्यांना शाम्पू-साबण देऊन अंघोळ करायला लावतो. रात्रीच्या शाळेत शिकवायला जातो. हा स्वत:ही उच्चशिक्षित आहे. पण या सगळ्या व्यापात  त्याला नोकरी करायला मात्र जमत नाहीये. पैशाची अडचण असतेच पण जमवतो काहीबाही. त्याचे वडील  त्याच्या या सगळ्या कामाचं वर्णन  ‘उकिरडे फुंकतोय’ या  दोनच शब्दात करतात.

हे दुर्दैव आहे! ही मानसिकता जेव्हा 100 टक्के बदलेल त्याचवेळी देश बदलेल. खरं तर हाच मुलगा एक आदर्श नेता, एक आदर्श राजकारणी बनू शकेल. नव्हे. त्यानं बनायलाच हवं. अशा मुलांचीच तर आता देशाला गरज आहे.

आता परत एकदा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेत.चला, काही अशीच लायक व्यक्तिमत्त्वं शोधूया. नसतील तर ती घडवूया आणि पुढे आणूया. चिकण्या- चुपड्या भाषणबाजीला आणि प्रलोभनांना बळी न पडता बुद्धीला साक्षी ठेवून फक्त आणि फक्त उत्तम कार्याला मत देऊया; पण मतदान मात्र  नक्की करूया! घरी बसून परिस्थितीला नावं ठेवत उदास सुस्कारे सोडत बसण्यात काहीच अर्थ नाही. जे हवं ते ठासून मागूया! जे नको ते मागे सारूया! चला लोकशाही टिकवूया!

(लेखिका व्हॉइस थेरपिस्ट आहेत) 

sonali.lohar@gmail.com


Web Title: Let's vote!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.