Is it healthy to eat Idli Dosa frequently? | इडली-डोसे रोज की कधीतरी?
इडली-डोसे रोज की कधीतरी?

-वैद्य राजश्री  कुलकर्णी

हल्लीच्या धावपळीच्या जीवनात सकाळी नास्ता बनवणं ही एक किचकट गोष्ट वाटू शकते! मग पटकन खाता येतील असे ब्रेड, बिस्किट्स असे बेकरीचे पदार्थ आणले जातात. बेकरीच्या पदार्थांइतकेच आवडीनं खाल्ले जाणारे पदार्थ म्हणजे इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे यासारखे दाक्षिणात्य पदार्थ. हे पदार्थ नास्त्याला करणं  खूप सोपं झालंय. कारण डाळ, तांदूळ भिजवा, वाटा, आंबवा ही कामं आता घरी करायची गरज उरली नाही! नाक्या नाक्यावर या पदार्थांची तयार पिठं उपलब्ध असतात. 

आंबवणं म्हणजे नेमकं काय?

आंबवणे ही प्रक्रिया काही तशी आपल्यासाठी नवीन नाही. अगदी पूर्वापार चालत आलेली आहे. अगदी आयुर्वेदाच्या हजारो वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ग्रंथांमध्येदेखील या प्रक्रि येचा केवळ उल्लेखच नव्हे तर औषधी वापरदेखील केलेला आहे. आसव आणि अरिष्ट अशा दोन औषधी कल्पना या पूर्णत: आंबवणे किंवा फरमेन्टेशन या प्रक्रियांवर आधारित आहेत! हजारो वर्षांपासून आपण दुधापासून दही बनवत आहोत! पूर्वी पदार्थ टिकाऊ व्हावा म्हणूनदेखील या प्रक्रि येचा वापर केला जात असे. 

लोणची, आसव, अरिष्ट ये सगळे पदार्थ लवकर खराब होत नाहीत. भरपूर टिकतात! परंतु हे पदार्थ आंबण्याची क्रि या होते म्हणजे नेमकं काय होतं याचा शोध मात्न अनेक शतकं लागला नव्हता! ज्यावेळी सूक्ष्मदर्शीचा शोध लागला तेव्हा हळूहळू काही गोष्टी स्पष्ट झाल्या; की असे बदल होण्यामागचे कारण म्हणजे विशिष्ट प्रकारचे जंतू किंवा जीवाणू असतात. जीवाणू म्हटलं की आपले लगेच कान टवकारले जातात! कारण जीवाणू म्हणजे आजार, रोग असं समीकरण आपल्या डोक्यात पक्कं  बसलेलं असतं; पण काही जीवाणू आपल्याला उपकारकदेखील असतात जे आपल्या आतड्यांमध्ये राहून उपयोगी काम करतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात!  पदार्थांचे गुणधर्म बदलतात. म्हणूनच ज्यांना  ‘लॅक्टोज इन्टॉलरन्स’ असतो त्यांना यामुळे नुसतं दूध प्यायलं तर कधी कधी त्रास होतो; पण त्यांना दह्यानं काही त्रास होत नाही. किण्वन (आंबवणे) ही प्रक्रिया प्रामुख्यानं रासायनिकदृष्ट्या पचायला अवघड असणारे पदार्थ जैविक क्रियेद्वारे सोप्या पदार्थांमध्ये बदलतात.

सध्या आपण वापरात असलेल्या काही गोष्टींचा विचार केला तर इडली, डोसा, ढोकळा, ब्रेड हे मुख्यत: वापरले जाणारे पदार्थ आहेत! यात धान्य, कडधान्य यांचा वापर केला जातो. आंबवण्याची प्रक्रिया झाल्यामुळे हे पदार्थ हलके आणि सच्छिद्र होतात. चवदार लागतात. बेकरीचे पदार्थ बनवताना प्रामुख्यानं यीस्ट किंवा खमीर यांचा वापर करून आंबवण्याची प्रक्रिया केली जाते, तर दही बनवताना आधीचं दही किंवा लिंबू यांचा वापर केला जातो. ढोकळा बनवताना ताक वापरलं जातं, तर इडलीचं पीठ तयार करताना ते एकत्र  वाटून आणि भिजवून ठेवलं की आपोआपच आंबतं! 
 

आंबवलेल्या पदार्थांचे फायदे-तोटे

आंबणे या शब्दातच आंबटपणा लपलेला आहे. त्यामुळे हे पदार्थ मूळचे आंबटसर चवीचे असतात! या पदार्थांच्या फायद्यांविषयी, उपयोगाविषयी खूप बोललं जातं. आपलं जठर, लहान आणि मोठे आतडे, यांचे अनेक आजार या पदार्थांमुळे टळू शकतात असं संशोधनदेखील झालेलं आहे. पचनसंस्थेचे स्वास्थ्य आंबवलेले पदार्थ खाल्ल्यानं चांगलं राहातं असा निष्कर्ष यावरून काढता येईल. 

काही संशोधनामध्ये एक आठवडा रोज रुग्णांना दही देण्यात आलं आणि त्याचा कोलेस्टेरॉलवर काय परिणाम होतो हे अभ्यासलं गेलं, तेव्हा ते थोडं कमी झालेलं आढळलं; परंतु आयुर्वेद याच्या अगदी विपरीत मत मांडतं. नियमित दही खाण्याची सवय असेल आणि तुमची प्रकृती ते नीट पचवू शकत नसेल तर रक्तवाहिन्या कोलेस्टेरॉल साठून ब्लॉक होण्याची शक्यता भरपूर असते. 

कारण चिकटपणा किंवा अभिष्यांद निर्माण करण्याचा दह्याचा जो गुणधर्म आहे तो चरबी साठवण्यासाठी कारणीभूत ठरतो. हृदयविकार असणा-या रुग्णांचा आहाराचा अभ्यास किंवा इतिहास बघितल्यास दह्याचा अनेक वर्षं भरपूर वापर हे कारण नक्की सापडतं. आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे इडली, डोसा, ढोकळा खूप हलके होतात; परंतु त्याचवेळी त्यातला आंबटपणा, आम्लता  त्रासदायक ठरते. विशेषत: ज्यांना आधीपासूनच अँसिडिटीचा त्रास आहे त्यांना छातीत जळजळ होणं, घशात आंबट पाणी येणं, मळमळ, उलटी अशी लक्षणंदेखील जाणवू शकतात. ब्रेड किंवा बेकरीची इतर उत्पादनं खाल्ल्यावर  त्रास होणारी अनेक मंडळी आपणही आपल्या आसपास बघतोच! शिवाय या पदार्थांंमुळे गॅसेस, पोट फुगणं, खूप ढेकर येणं, अस्वस्थ वाटणं या तक्रारी जाणवू शकतात. 

अगदी क्वचित हे पदार्थ खाल्ले तरी त्रास होणा-या  अनेक व्यक्ती असतात; पण तरीही केवळ परंपरा म्हणून, पद्धत म्हणून हे पदार्थ नियमित खाणारे पुष्कळ रुग्ण आम्हाला नेहमीच आढळतात. 
 

काय योग्य, काय अयोग्य?
ढोकळा गुजरातमध्ये अधिक खाल्ला जातो, तर दक्षिण भारतात इडली, डोसा वगैरे पदार्थ मोठय़ा प्रमाणात खाल्ले जातात.  प्रत्येक भागातील, देशातील आहार हा त्या त्या ठिकाणी तयार होणारी पिकं, पाऊसपाणी, हवामान यावर अवलंबून असतो. 

तुम्ही तामिळनाडूमध्ये अगदी रोज हे पदार्थ लहानपणापासून खात आले असाल आणि तिथेच राहात असाल तर तुम्हाला त्याचा काही त्रास होणार नाही. पण कामधंद्याच्या निमित्तानं समजा महाराष्ट्रात किंवा उत्तरेच्या कोणत्याही ठिकाणी राहात असाल आणि केवळ मूळचे दक्षिणेकडचे म्हणून आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदलत नसाल तर ते निश्चितच त्रासदायक ठरणार यात शंका नाही! कारण तिथलं हवामान वेगळं आहे, पाणी वेगळं आहे आणि  मुख्य म्हणजे तुमची पचनशक्ती ज्याला हे आधुनिक भाषेत ‘इन्टेस्टीनल फ्लोरा’ म्हणतात तो पूर्वी सारखा न राहता आसपासच्या वातावरणानुसार बदलत जातो.  पूर्वी नियमितपणे खात असलेले पदार्थ खाण्याची आणि ते पचवण्याची क्षमता नंतर राहात नाही. म्हणूनच म्हणतात ना ‘देश तसा वेश’ हे केवळ कपड्यांपुरते किंवा परिधानापुरते मर्यादित नाही, तर ते खाण्यापिण्याच्या सवयींनादेखील लागू आहे.

इंग्लंडमध्ये लोकं रोज ब्रेड, बटर खातात म्हणून आपण त्याचा रोजच्या आहारात समावेश केला तर तो अशाच पद्धतीनं तापदायक ठरतो.  दही, बेकरीची उत्पादनं किंवा इडली, डोसे यासारखे दाक्षिणात्य पदार्थ असोत, हे क्वचित खाण्याचे पदार्थ आहेत हे कायम लक्षात असू द्यावं. चव, सवय, पटकन उपलब्धता यापैकी कोणतीही कारणं सांगून जर ते नेहमीच खाल्ले गेले तर ते आज ना उद्या त्रास देणार हे नक्की ! 

(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)

rajashree.abhay@gmail.com


Web Title: Is it healthy to eat Idli Dosa frequently?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.