Insult in 26 seconds - a storm arose from an advertisement in China | २६ सेकंदांतला अपमान- चीनमधील एका जाहिरातीनं उठलं वादळ 

२६ सेकंदांतला अपमान- चीनमधील एका जाहिरातीनं उठलं वादळ 

- प्रतिनिधी

घटना चीनमधील; पण ती जगभरात व्हायरल झाली. एक जाहिरात आणि त्यावरची टीकाही. चीनमधील प्युअर कॉटन या कंपनीच्या उत्पादनाची एक जाहिरात नुकतीच समाज माध्यमावर प्रसारित झाली होती. या २६ सेकंदांच्या जाहिरातीत असं दिसतं की, एक मास्क घातलेला माणूस एका तरुण मुलीचा पाठलाग करत असतो. घाबरलेली मुलगी मग आपल्या पर्समधून मेकअप पुसण्याचा रुमाल काढते आणि चेहरा पुसते. तिचा मेकअपविना चेहरा बघताच तो मास्क घातलेला पुरुष अदृश्यच होतो.

जाहिरात एवढीच; मात्र ती पाहताच समाजमाध्यमावर अनेक लोक भडकले. फक्त चिनीच नाही तर जगभरातलेच. काहींनी तर थेट त्या उत्पादनावरच बहिष्कार घालण्याची मागणी केली. प्युअर कॉटन या कंपनीने या टीकेची दखल घेत दिलगिरी व्यक्त केली. समाजमाध्यमावरून ही जाहिरात काढून टाकण्यात येईल, असंही सांगितलं. पीडित स्त्रीलाच दोष देण्याच्या मानसिकतेवर अनेकांनी टीका केली.

याचदरम्यान चीनमधील दोन विद्यापीठांनी असे फतवे काढले की, लैंगिक अत्याचार टाळायचे असतील तर मुलींनी मोठ्या गळ्याचे ड्रेस घालू नयेत. नको इतकी उघडी पाठ बघितल्याने मुलांचं लक्ष विचलित होतं, असं या फतव्यात म्हटलं होतं. दुसऱ्या एका विद्यापीठानं खूप सुंदर दिसणं किंवा स्वत:च्या दिसण्यावरच लक्ष केंद्रित केल्यानं मुली आपल्याकडे लैंगिकदृष्ट्या मुलांचं अनावश्यक लक्ष वेधतात हे होऊ नये म्हणून आपण काय स्वरूपाचे कपडे घालतो याचा विचार करायला हवा, असंही हे विद्यापीठ म्हणतं. या साऱ्यावरही चिक्कार टीका झाली. मात्र, आशिया खंडातले महाशक्ती म्हणवणारे देशही महिलांकडे कोणत्या नजरेनं पाहतात, हेच यावरून स्पष्ट होतं.

Web Title: Insult in 26 seconds - a storm arose from an advertisement in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.