राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यातील भेरुसरी या छोट्याशा गावाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही लोक या गावाला पाच अधिकारी बहिणींचं गाव असंही म्हणतात. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या पाच मुलींनी राजस्थानच्या सर्वात प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक, राजस्थान प्रशासकीय सेवा (आरएएस) उत्तीर्ण करून देशभरात आपल्या कुटुंबाचं नाव मोठं केलं आहे.
भेरुसरी गावातील लहान शेतकरी असलेले सहदेव सहारन म्हणतात की, ते आणि त्यांती पत्नी हे अशिक्षित आहेत. पण त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं. ते स्वत: शिकले नसले तरी त्यांच्या पाचही मुली आता आरएएस अधिकारी आहेत. मुलींच्या यशाचं रहस्य त्यांचे वडील आहेत, ज्यांनी त्यांना नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा दिली.
जमिनीचा छोटा तुकडा असल्याने त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. चांगले पीक मिळणं कठीण होतं. त्यामुळेच आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने मुलींच्या शाळेची फी देखील भरू शकत नव्हते. तरीही त्यांनी चिकाटीने काम केलं. मुलींनीही आपल्या शेतकरी वडिलांच्या अडचणी समजून घेतल्या आणि घरी राहून कठोर अभ्यास केला.
पदवी प्राप्त केल्यानंतर सहदेव यांच्या मोठ्या मुली रोमा आणि मंजू यांनी सरकारी नोकरीची तयारी सुरू केली. दोघींनीही राजस्थान प्रशासकीय सेवेवर (आरएएस) लक्ष केंद्रित केलं. २०१० मध्ये रोमा कुटुंबातील पहिली आरएएस अधिकारी बनली. त्यानंतर २०१७ मध्ये, मंजूनेही परीक्षा उत्तीर्ण केली आणि अधिकारी बनली. दोन मोठ्या बहिणींपासून प्रेरणा घेऊन तीन लहान बहिणींनीही सरकारी नोकरीची तयारी सुरू केली.
दोन्ही मोठ्या बहिणी अधिकारी झाल्यामुळे कुटुंबाची परिस्थिती थोडी सुधारली होती. घरात आधीच शिक्षणासाठी अनुकूल वातावरण आणि पुरेसं अभ्यास साहित्य होते. त्यामुळे तिन्ही बहिणींना यशस्वी होण्यास वेळ लागला नाही. अंशू आणि सुमन यांनीही २०१८ मध्ये आरएएस परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर रितू २०२१ मध्ये आरएएस अधिकारी झाली.
