Lokmat Sakhi >Inspirational > ५० किलोचं तांदुळाचं पोतं तिनं सहज उचललं, तेव्हाच वाटलं पोर वेटलिफ्टिंगसाठी तयार झाली! - सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुण्याच्या लेकीचा अभिमान

५० किलोचं तांदुळाचं पोतं तिनं सहज उचललं, तेव्हाच वाटलं पोर वेटलिफ्टिंगसाठी तयार झाली! - सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुण्याच्या लेकीचा अभिमान

मावळातल्या हर्षदाची ‘गरुडझेप’; वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक, मेहनत आणि जिद्द अशी की कर्तबारीला लाभली सोन्याची झळाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2022 04:38 PM2022-05-03T16:38:30+5:302022-05-03T17:13:38+5:30

मावळातल्या हर्षदाची ‘गरुडझेप’; वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक, मेहनत आणि जिद्द अशी की कर्तबारीला लाभली सोन्याची झळाळी!

She easily lifted a 50 kg bag of rice, only then did she feel that she was ready for weightlifting! - Proud of Pune's Lek who won a gold medal | ५० किलोचं तांदुळाचं पोतं तिनं सहज उचललं, तेव्हाच वाटलं पोर वेटलिफ्टिंगसाठी तयार झाली! - सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुण्याच्या लेकीचा अभिमान

५० किलोचं तांदुळाचं पोतं तिनं सहज उचललं, तेव्हाच वाटलं पोर वेटलिफ्टिंगसाठी तयार झाली! - सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुण्याच्या लेकीचा अभिमान

Highlightsआता  लक्ष्य २०२८ चे ऑलिम्पिक असल्याचं हर्षदाच नाही तर तिचे प्रशिक्षकही सांगतात.रमा शेट्टी आणि वैशाली खामकर या दुबे सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला वेटलिफ्टर

मनात जिद्द असेल तर तुम्ही ठरवलेली गोष्ट नेमकेपणाने साध्य करत यशाला गवसणी घालताच. मग कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करण्याची ताकद अंगात नकळत येते आणि यश तुम्हाला हुलकावणी देऊ शकत नाही. पुण्याच्या वडगाव मावळ या अतिशय लहान गावात राहणाऱ्या हर्षदा गरुडने (Harshada Garud) आपल्या कामगिरीने हे सिद्ध करुन दाखवले आहे. प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीतही तिनं आपल्या खेळावरचा फोकस हलू दिला नाही. वेटलिफ्टिंगसारखा (Weightlifting) खेळ तिनं अक्षरश: जिद्दीने आपल्या खांद्यावर पेलला. वेटलिफ्टींगच्या ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पिअनशीपमध्ये (Junior World Championship) भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारी हर्षदा पहिली तरुणी ठरली आहे. ग्रीस येथे नुकत्यात पार पडलेल्या जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत ४५ वजनाच्या गटात यश मिळवले आहे. ७० किलो आणि ८३ किलो असे एकूण १५३ किलो वजन उचलून तिने हे यश संपादन केले आहे.

(Image : Google)
(Image : Google)

‘मला खात्रीच होती की जागतिक स्पर्धेत मी पदक जिंकणारच, मात्र सुवर्ण पदक मिळेल असे वाटले नव्हते’असं या स्पर्धेनंतर हर्षदानं मोठ्या आत्मविश्वासानं सांगितलं. त्याचं कारण तिची मेहनत. वयाच्या १४ व्या वर्षी हर्षदाने वेटलिफ्टींग करण्यास सुरुवात केली आणि आज अवघ्या १८ व्या वर्षी तिच्या नावावर वेटलिफ्टींगचे अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. हर्षदाचे वडिल ग्रामपंचायतीत कामाला असल्याने कुटुंबाची सर्वसाधारण परिस्थिती. पण कुटुंबात व्यायामाचे आणि खेळाचे महत्त्व असल्याने हर्षदाच्या वडिलांनी तिला लहानपणापासूनच मैदानावर खेळण्यात प्रोत्साहन दिले. 

ग्रामीण भागातली ही मुलगी आज एवढी मोठी झेप घेत तर त्यासाठीची मेहनत आणि कठोर प्रशिक्षण कसं होतं हे तिच्या प्रशिक्षकांनाच विचारलं. हर्षदाचे प्रशिक्षक बिहारीलाल दुबे. ते म्हणाले, इयत्ता आठवीमध्ये असतानाच हर्षदाच्या वडिलांनी तिला माझ्याकडे आणले. त्यावेळी हर्षदा वेटलिफ्टींगमध्ये चांगले करिअर करु शकते असे वाटल्याने मी तिला आणि तिच्या वडिलांना वेटलिफ्टींग शिक असे सुचवले. तेव्हापासून हर्षदाने अतिशय कष्टाने सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करत खेळात जीव ओतला. हे यश तिला मिळणार याची खात्रीच होती. हर्षदाचे आजोबा, वडिल आणि ती अशा तीन पिढ्या आपल्याकडे व्यायामासाठी येतात. खेळातली चोख मेहनत या मुलीने केली.’

मात्र सोपी नव्हतीच वाट. दुबे सांगतात, आताच्या स्पर्धेच्या आधीही हर्षदाला फूड पॉयझनिंग झाले होते. त्यामुळे तिचे ८ दिवस दवाखान्यात आणि १० दिवस घरी आराम करण्यात गेले. त्यामुळे सरावात जवळपास ३ आठवड्याचा खंड पडला. तरी  पुढील २ महिन्यात आम्ही शक्य तितका सराव करायचा प्रयत्न केला.  सुवर्ण पदक हे त्याचेच फळ आहे.’दुबे यांची सूनही वेटलिफ्टर होती. तिचा वेटलिफ्टींगमधला प्रवास आपण जवळून पाहिला होता. त्यामुळे आपल्याला मुलगी झाली तर तिचे नाव हर्षदा ठेवायचे आणि तिलाही वेटलिफ्टर बनवायचे असे आपण तेव्हाच ठरवल्याचे हर्षदाचे वडिल शरद गरुड म्हणाले.

(Image : Google)
(Image : Google)

दुबे सरांमुळे गेल्या काही वर्षांपासून मनमाड, सांगली, कोल्हापूर या शहरांबरोबरच वेटलिफ्टींगसाठी वडगाव मावळ या लहानशा गावाचेही नाव घेतले जाते. वयाच्या ७३ व्या वर्षीही खेळाडू घडवण्यासाठी दुबे सर घेत असलेली मेहनत खरंच कौतुकास्पद म्हणावी लागेल. मागील ५० वर्षांपासून ते या भागात अनेक तरुण क्रीडापटू घडवत आहेत. रमा शेट्टी आणि वैशाली खामकर या दुबे सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला वेटलिफ्टर असून १९८५ मध्ये त्यांनी पदके मिळवून महाराष्ट्राचे नाव मोठे केले होते. हर्षदाने एकदा सहज ५० किलोचे तांदळाचे पोते उचलले होते तेव्हा ती वेटलिफ्टींगसाठीच तयार झाली हे माझ्या लक्षात आले आणि मी तिला त्याचदृष्टीने प्रोत्साहन द्यायचे ठरवले असे शरद गरुड म्हणाले. आता  लक्ष्य २०२८ चे ऑलिम्पिक असल्याचं हर्षदाच नाही तर तिचे प्रशिक्षकही सांगतात. मेहनत करण्याची तर तिची तयारी आहेच.

Web Title: She easily lifted a 50 kg bag of rice, only then did she feel that she was ready for weightlifting! - Proud of Pune's Lek who won a gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.