Lokmat Sakhi >Inspirational > तामिळनाडू सरकार देणार नोकरीतून ब्रेक घेतलेल्या स्त्रियांना ‘सेकंड करिअर संधी'! मात्र...

तामिळनाडू सरकार देणार नोकरीतून ब्रेक घेतलेल्या स्त्रियांना ‘सेकंड करिअर संधी'! मात्र...

नोकरीतून ब्रेक घेतला की पुन्हा काम सुरु करताना अनेकींना अडचणी येतात, दुसऱ्या संधीसाठी झगडावं लागतं असं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 04:04 PM2022-01-14T16:04:23+5:302022-01-15T13:59:39+5:30

नोकरीतून ब्रेक घेतला की पुन्हा काम सुरु करताना अनेकींना अडचणी येतात, दुसऱ्या संधीसाठी झगडावं लागतं असं का?

‘Second Career!’ women who have taken a break from jobs, Tamil Nadu government new policy | तामिळनाडू सरकार देणार नोकरीतून ब्रेक घेतलेल्या स्त्रियांना ‘सेकंड करिअर संधी'! मात्र...

तामिळनाडू सरकार देणार नोकरीतून ब्रेक घेतलेल्या स्त्रियांना ‘सेकंड करिअर संधी'! मात्र...

Highlightsप्रशिक्षित आणि उत्तम काम करणारी महिला केवळ तिने ब्रेक घेतला आहे म्हणून प्रवाहाबाहेर फेकली जाऊ नये

प्राजक्ता काणेगावकर

चारुचं प्रमोशनही ड्यू आहे. सहा वर्षे ती उत्तम नोकरी करतेय. तिला दोन गोड मुलं आहेत. धाकट्याची तब्बेत जरा नाजूक असते. त्याची आजारपणं, नोकरी आणि घरातले सगळे सांभाळून चारुची पार दमछाक होते. तशी तिची तक्रार नाहीये कारण नोकरी करायची म्हणजे या अडचणी येणार, हे तिलाही माहीत आहे. घरातले, ऑफिसमधलेही समंजस आहेत. पण चारुची ओढाताण होतेच. शेवटी सारासार विचार करून चारूने नोकरीतून ‘ब्रेक’ घ्यायचा निर्णय घेतला. मुलासाठी तीन-चार वर्ष ब्रेक घेऊन परत नोकरीला सुरुवात करावी, असं ठरवलं. चारुच्या नवऱ्याचंही काही म्हणणं नाहीये. अचानक चारुचा पगार थांबण्याने तशी घरात अडचणच होणार, मात्र सगळे फायदे-तोटे बघता, मुलाची तब्बेत ही प्रायोरिटी असल्याने चारुच्या दृष्टीने तिचा निर्णय बरोबर आहे.
मात्र, प्रश्न चारूनं आता नोकरीतून ब्रेक घेण्याचा नाहीये. जेव्हा तीन-चार वर्षांनी ती नोकरीसाठी परत अर्ज करायला सुरुवात करेल तेव्हा?
आता नोकरी सुरु असल्याने चारू अपडेटेड आहे, तिच्या क्षेत्रात चालणाऱ्या घडामोडी तिला माहीत आहेत. नवीन तंत्रज्ञान, नवीन स्किल्स अवगत करण्याची तिला चांगली संधी आहे. त्या जोरावर ती नोकरीत पुढे जाऊ शकते. मुलासाठी घरात असली तरी मुलंही सदैव तिला चिकटून, बिलगून नसतात. त्यांच्या त्यांच्या शाळा, क्लासेस असं त्यांचं स्वतंत्र विश्व आहे. मुलं लहान असताना त्यांना असणारी आईची गरज आणि ती बऱ्यापैकी मोठी झाल्यावर असणारी आईची गरज यात फरक पडतो.

(Image : Google)

चारूसारखी अनेक उदाहरणं आपल्या आसपास सापडतील. सगळ्यांच्याच घरात अडचणीच असतील, असंही नाही. ब्रेक घ्यावासा वाटला म्हणून कधी मुलांची गरज म्हणून, कधी घरात एखादी आजारी व्यक्ती आहे म्हणून किंवा कधी स्वतःचीच तब्बेत साथ देत नाहीये म्हणून नोकरीतून ब्रेक घेणाऱ्या अनेकजणी आपल्या आसपास दिसतात. यात कळीचा मुद्दा त्यांनी नोकरीतून ब्रेक घेतला आहे, हा आहे. याचा अर्थ दोन-तीन वर्षांनी त्यांना परत नोकरी करायची आहे. या दोन ते पाच वर्षांच्या कालावधीत जग मात्र पुढे निघून जाणार आहे, हा विचारही करायला हवा. नोकरीच्या ठिकाणी लागू शकणारे स्किलसेट बदललेले असू शकतात. हाताखालचे लोक पुढे गेलेले असू शकतात. या सगळ्या घटकांचा विचारही ब्रेक घेताना करायला हवा.

(Image : Google)

ब्रेक घेण्याआधी काही गोष्टी तपासून बघता येऊ शकतात...
१. नोकरी सोडण्याआधी काही दिवस सुट्टी घेऊन घरात बसता येईल का ते पाहावं. त्यातून घरच्यांबरोबरच आपल्यालाही घरात बसणं कितपत मानवतंय, याचा अंदाज येऊ शकतो. आपल्याबरोबरच घरातल्यांचेही एक सेट रुटीन असते. तुमच्या घरी बसण्याने त्यात कसे आणि किती बदल होताहेत हे डोळसपणे तपासता यायला हवं. जर आपली तितकीशी गरज लागणार नाहीये, हे पुरेसे स्पष्ट होत असेल तर तसे मोकळेपणी मान्य करता यायला हवं.
२. घरच्यांशी सुस्पष्ट बोलणे गरजेचे आहे. तुम्हाला होत असणारा त्रास, शारीरिक, मानसिक त्यांच्या कानावर घातला गेला पाहिजे. काही सुसंगत बदल करून जर सगळ्यांच्या सहकार्याने त्रास कमी होऊ शकत असेल तर यासारखी उत्तम गोष्ट नाही. कदाचित नोकरीतून ब्रेक घेणे याची तितकीशी गरज नसू शकेल.
३. नोकरी सोडण्याने विस्कटणारी आर्थिक घडी हा खूपच नाजूक मुद्दा आहे. माझ्या एका मैत्रिणीने दोन वर्ष प्लानिंग करून मोठ्या पोस्टवरची नोकरी सोडली. आता ती तिच्या आवडीच्या क्षेत्रात पूर्ण वेळ काम करते. पण या निर्णयामागे तिचं काटेकोर नियोजन होतं. दोन वर्ष नोकरी सुरु असताना ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्याची संपूर्ण माहिती मिळवणे, त्यात काम करण्यासाठी आवश्यक ते शिक्षण घेणे आणि महत्त्वाचे म्हणजे आर्थिक सुनियोजन करणे याचा सतत पाठपुरावा करून संपूर्ण विचाराअंती तिने नोकरी सोडली. करिअरची दिशा बदलली तरी करिअरमधून ब्रेक त्यामुळेच तिला घ्यावा लागला नाही. संपूर्ण ब्रेक घेऊन करिअर बदलण्यापेक्षा असा काही पर्याय अजमावता येऊ शकत असेल तर याचा विचार नक्की करता येऊ शकतो.
४. सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे स्किल्स अपग्रेडेशनचा. आपल्या क्षेत्रात होत असणाऱ्या बदलांबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तुम्हाला ब्रेक घेऊन परत यायचे असेल तर नक्कीच. कितीही उदार धोरणी कंपनी असली तरी अपग्रेडेड स्किलसेट्स हा तुमचा अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे यातला कळीचा मुद्दा असू शकतो. यात टेक्निकल स्किल्सबरोबरच संवाद कौशल्य, इंग्रजी यासारख्या गोष्टींचाही विचार व्हायला हवा. ते अपडेट ठेवता येईल का हे पाहायला हवं!
५. या सगळ्या पार्श्वभूमीवर अशा ब्रेक घेणाऱ्या बायकांसाठी तामिळनाडू सरकारने जेव्हा स्किल्स अपग्रेडेशनची पॉलिसी जाहीर केली तेव्हा बरं वाटलं. या बायकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना ट्रेनिंग देऊन, त्यांच्यासाठी संधी उपलब्ध करून देणे हे फार मोठे पाऊल आहे. यात मेनोपॉझ आणि सांसारिक कारणांसाठी ब्रेक घेणे या दोन्ही घटकांचा विचार केलेला आहे, हे विशेष आहे. प्रशिक्षित आणि उत्तम काम करणारी महिला केवळ तिने ब्रेक घेतला आहे म्हणून प्रवाहाबाहेर फेकली जाऊ नये, यासाठी केले जाणारे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत.

(Image : Google)

सेकंड करिअर एण्ट्री
तामिळनाडू सरकारने नुकताच एका योजनेचा मसुदा तयार केला आहे. ही योजना तामिळनाडूत राहणाऱ्या महिलांसाठी आहे. जिचं नावच आहे सेकंड करिअर एण्ट्री. तामिळनाडू सरकारनं ठरवलं आहे की, राज्यातल्या अशा १०,००० महिलांना शोधून काढायचे ज्यांनी मुलांची, कुटुंबाची काळजी घेण्यासाठी नोकरी सोडली. काही जणींनी मेनॉपॉजच्या काळात होणाऱ्या त्रासाने, संसारिक जबाबदाऱ्यांमुळे नोकरी सोडली. अशा हाती ‘कौशल्य’ असलेल्या मात्र वर्क फोर्सपासून लांब राहिलेल्या महिलांसाठी ही योजना आहे. या महिलांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्राप्रमाणे, कामाच्या अनुभवाप्रमाणे सरकार स्किल अपग्रेडेशन कोर्स उपलब्ध करून देणार आहेत. त्यांची कौशल्य वृद्धी करून त्यांना पुन्हा नोकऱ्यांत संधी देणे, कुशल मनुष्यबळ उपलब्ध करणे आणि महिलांना नवी संधी निर्माण करून देणं, हे सरकारचं उद्दिष्ट आहे.
या योजनेची चर्चा अर्थातच जोरात आहे. आता मसुदा तयार झाला आहे, प्रत्यक्ष मंजुरी आणि व्यवस्थित अमंलबजावणी हे लांब आहे. मात्र, सरकार स्तरावर या प्रश्नाची दखल घेतली गेली हेदेखील एक आशादायी पाऊल आहे. उत्तम नोकरी, करिअरची संधी असूनही अनेक महिला नोकरी सोडतात. कारण मुलांची देखभाल, कुटुंबाची काळजी. त्यातून त्या कुशल मनुष्यबळातून बाहेर जातात. अनेकींना पुन्हा काम सुरू करण्याची इच्छा असूनही दुसरी संधी सहजासहजी मिळत नाही. वय वाढलेलं असणं आणि स्किल्स पुरेशी अपडेट नसणं ही समस्या येते. त्यावर उपाय म्हणून तामिळनाडू सरकारने हा तोडगा काढला आहे.
कोरोना काळात तर जगभर अनेक महिलांनी नोकऱ्या सोडल्या किंवा त्यांच्या नोकऱ्या गेल्या. महिलांना पुन्हा चार भिंतीत ठेवणं अन्यायकारक आहे, असं तामिळनाडू सरकारचं मत असून, त्यांनी त्यादृष्टीनं ही योजना अंमलात आणायचं ठरवलं आहे.
सेकंद करिअर एण्ट्री महिलांना लाभदायक ठरावी अशी आशा आहे.

pkanegaonkar@gmail.com
(लेखिका इंग्लिश स्पिकिंग ट्रेनर आहेत.)

Web Title: ‘Second Career!’ women who have taken a break from jobs, Tamil Nadu government new policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.