Lokmat Sakhi >Inspirational > ऑफिसात बाकीच्यांचे पगार वाढतात, प्रमोशन होतं; आपणच का मागे पडतो? असा प्रश्न पडला असेल तर...

ऑफिसात बाकीच्यांचे पगार वाढतात, प्रमोशन होतं; आपणच का मागे पडतो? असा प्रश्न पडला असेल तर...

आपले व्यावसायिक प्राधान्यक्रम ठरवता यायला हवेत. त्यानुसार आपल्या करिअरची आणि कामाची दिशा ठरवायला हवी, काय महत्त्वाचं याचं उत्तर आपणच द्यायचं स्वत:ला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 05:09 PM2022-05-21T17:09:47+5:302022-05-21T17:22:57+5:30

आपले व्यावसायिक प्राधान्यक्रम ठरवता यायला हवेत. त्यानुसार आपल्या करिअरची आणि कामाची दिशा ठरवायला हवी, काय महत्त्वाचं याचं उत्तर आपणच द्यायचं स्वत:ला..

no promotion, no pay rise, how to decide your priorities in professional life | ऑफिसात बाकीच्यांचे पगार वाढतात, प्रमोशन होतं; आपणच का मागे पडतो? असा प्रश्न पडला असेल तर...

ऑफिसात बाकीच्यांचे पगार वाढतात, प्रमोशन होतं; आपणच का मागे पडतो? असा प्रश्न पडला असेल तर...

Highlightsवेतनवाढीइतकंच दुसरं काय महत्त्वाचं आहे. हेदेखील आपलं आपल्याला माहितीच असलं पाहिजे.

अनन्या भारद्वाज

मे-जून उजाडला की सर्वत्र अपरायझलचे गरम वारे वहायला लागतात. कार्यालयात तीच चर्चा. वर्षभर मरमर काम केलेलं असतं, यंदा तरी अच्छे दिन येतील. मात्र अनेकदा प्रत्यक्ष ऑर्डर आल्यावर हाती निराशाच पडते. मनासारखं प्रमोशन, पगारवाढ होत नाही. पण दु:ख त्यांचंही एवढं होत नाही, अनेकदा कमी काम करणारे, आपल्यापेक्षा कमी स्किल्स असणारे, केवळ शो शा करणारे आपल्या पुढे निघून जातात त्याचं दु:ख जास्त झालेलं असतं. आणि मग आनंद -समाधान तर सोडाच कामात मन लागत नाही. आपलं काम आवडेनासं होणं याहून वाईट काही नाही. म्हणून मग आपणच शोधायला हवं की आपल्या प्रोफेशनल आयुष्यात आपण कुठं कमी पडतो? नक्की कुठं चुकतं? कुठं सॉफ्ट स्किल्स कमी पडतात? बॉस आणि सहकाऱ्यांना, ऑफिसमधल्या राजकारणाला दोष देऊन हा प्रश्न सुटणार नाही. तो सोडवायचा तर आपला प्राधान्यक्रम काय, आपली मूल्य कुठली, ती मूल्य जोपासायची, त्यांचा हात सोडायचा नसेल तर मग आपल्याला काय मिळेल काय मिळणार नाही हे आपलं आपल्याला कळायला हवं. एकदा ते समजलं की, आपल्या प्रोफेशनल आयुष्यातली प्रगती आणि समाधान हे गणित सुटायला लागतं. रोज उठून हुसहुस, चिडचिड, इतरांशी तुलना असं होत नाही. त्याहून महत्त्वाचं जर आपण डिझर्व्ह करतो अशी आपली खात्री असेल तर बॉसशी शांतपणे, मुद्देसूद बोलता आलं पाहिजे. त्याच्यासमोर आपली वर्षभराची कामगिरी मांडता आली पाहिजे. इमोशनल न होता, आरोप न करता आपलं म्हणणं मांडून त्यांचं म्हणणं ऐकूनही घेता यायला पाहिजे. आपल्यावर अन्यायच होतो असं रडून काहीच उपयोग नसतो.
एक कायम लक्षात ठेवायला हवं की आपली मूल्य, आपली तत्त्वं, आयुष्याच्या  प्रत्येक टप्प्यावर आपले मार्गदर्शन करत असतात. ते सारं आपल्याही नकळत आपणच ठरवलेलं असतं. त्यामुळे इतरांशी तुलना करत स्वत:ला जज करणं आधी थांबवा. सरळ ठरवा की आपल्या क्षमता काय, कौशल्य कोणती, आपण किती रिस्क घेऊ शकतो, आणि आपल्या मुल्यांना आपण जे करु ते पटतंय का? त्याचं उत्तर हो आलं, तो ताळा जमला की गोष्टी सोप्या होतील.

(Image : Google)

आता हे ठरवायचं कसं?

तर सरळ एक यादी करा. आपले प्राधान्यक्रम ठरवा. आपल्याला व्यावसायिक आयुष्यात काय महत्त्वाचं वाटतं त्याची यादी करा..
१. इमानदारीनेच पैसे कमावणे.
२. आपल्या कामावरच लक्ष देणं, त्यात कायम प्रगती करणं, नवीन गोष्टी शिकणं.
३. इतरांना मदत करणं.
४. वैयक्तिक आणि सांघिक जबाबदारीही पूर्ण क्षमतेनं निभावणं. 
५. इतरांसमोर आपले सामर्थ्य/कौशल्य सिद्ध करण्याची तयारी असणं.
६. लीडरशिप घेणं.
७. आपण बुद्धीमान, विचारी आहोत हे मानणं. असणं.
८. नवीन व सर्जनशील पद्धतीने काम करणं.
९. कामाचा झपाटा असणं, टंगळमंगळ न करणं.
१०. चोख व अत्यंत अचूक काम करणं.
११. जॉब सिक्युरिटी असलेल्या ठिकाणी काम करणं की सतत नोकऱ्या बदलणं, आपल्याला काय महत्त्वाचं वाटतं.
१२. कामाचं स्वातंत्र्य आणि कल्पकतेला वाव असणं.
१३. सतत येस सर न म्हणता आपली मतं मांडण्याची ताकद असणं.
१४. वेळच्यावेळी वेतनवाढ होण्यासह कामात नाविन्य असणं.
१५. आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणं.

(Image : Google)

आता ठरवा की यापैकी कोणते ५ मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत.

त्यावरुन तुम्हाला कळेल की आपल्यासाठी प्रोफेशनल आयुष्यात काय महत्त्वाचं आहे. त्यात आपण तडजोड करणार नाही. 
हे सारं एकदा पक्कं झालं तर तुम्हाला सतत काम करताना डिप्रेशन येणार नाही. आणि आपल्यालाच का प्रमोशन मिळत नाही, पगारवाढ नाही याचं उत्तरही मिळेल. कळेल आपण कुठं कमी पडतो जिथं कमी पडतो, त्यावर काम करायची तयारीही असली पाहिजे. आणि कमी पडत नसलो तरी आपल्यासाठी वेतनवाढीइतकंच दुसरं काय महत्त्वाचं आहे. हेदेखील आपलं आपल्याला माहितीच असलं पाहिजे.
हा स्वत:चा व्यावसायिक शोध आहे. 


(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

Web Title: no promotion, no pay rise, how to decide your priorities in professional life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.