Lokmat Sakhi >Inspirational > क्रिकेटचा ध्यास घेतलेल्या मराठवाड्याच्या लेकी, हिमतीच्या या इनिंगची गोष्टच न्यारी! भेटा त्यांना..

क्रिकेटचा ध्यास घेतलेल्या मराठवाड्याच्या लेकी, हिमतीच्या या इनिंगची गोष्टच न्यारी! भेटा त्यांना..

मराठवाड्यातल्या या तरुण मुली, महिला क्रिकेटमध्ये करिअर करायचे स्वप्न पाहत जिद्दीने एक नवी वाट चालत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2021 09:00 AM2021-11-06T09:00:00+5:302021-11-06T09:00:02+5:30

मराठवाड्यातल्या या तरुण मुली, महिला क्रिकेटमध्ये करिअर करायचे स्वप्न पाहत जिद्दीने एक नवी वाट चालत आहेत.

Meet girls from Maharashtra-Marathwada and Aurangabad, women cricket players are writing story of new cricketing joy. | क्रिकेटचा ध्यास घेतलेल्या मराठवाड्याच्या लेकी, हिमतीच्या या इनिंगची गोष्टच न्यारी! भेटा त्यांना..

क्रिकेटचा ध्यास घेतलेल्या मराठवाड्याच्या लेकी, हिमतीच्या या इनिंगची गोष्टच न्यारी! भेटा त्यांना..

Highlightsया तरुण मुली इंडिया कॅपचे स्वप्न पाहत अन्य मुलींसाठीही स्वप्नांची एक मोठी वाटच तयार करत आहेत.

-जयंत कुलकर्णी

सरावासाठी पुरेशी जागा नाही, जिकडेतिकडे गवत. मोठमोठे वारूळ, बीळ, अशा परिस्थितीत ती क्रिकेटचा सराव करत होती. ध्यास क्रिकेटचा, सोबत तिचे प्रशिक्षक राहुल पाटील आणि त्यातून तिचे क्रिकेट करिअर आकार घेऊ लागले. श्वेता सावंत तिचे नाव. जयपूर येथे २५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी तिची निवड झाली आहे. या स्पर्धेतूनच अंडर १९ वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघ निवडला जाणार आहे. आपल्या इंडिया कॅपच्या स्वप्नाच्या दिशेने श्वेताने एक पाऊल आणखी पुढे टाकले आहे.
संयम, आत्मविश्वास, शिस्त आणि कोणत्याही परिस्थितीवर यशस्वी मात करण्याचे कसब या बळावर औरंगाबादच्या या खेळाडूने आपले क्रिकेट स्वप्न प्रत्यक्षात आणायचे ठरवले. उंची जेमतेम ५ फूट ३ इंच. मात्र खेळाडूला साजेल अशी शरीरयष्टी, विजेच्या गतीने सीमापार जाणारा तिचा कव्हर ड्राइव्ह पाहत राहावा असा सुंदर असतो आणि शिवाय तिच्या हातात फिरकीची कला आहे. संघासाठी ती बॉलिंगही उत्तम करते.
पुरुषच काय, महिला क्रिकेटमध्येही सोपे नाहीच इंडिया कॅपचे स्वप्न; पण श्वेताच्या नजरेतही तेच स्वप्न आहे.

श्वेताची आई राणी सावंत शिक्षिका आहे, तर वडील हनुमंत सावंत देवगिरी महाविद्यालयात क्लार्क आहेत. श्वेताची आई मूळची सोलापूर जिल्ह्यातील कोळगाव येथील. त्याही कबड्डी आणि ॲथलेटिक्सच्या उत्तम खेळाडू. जिल्हास्तरावर त्या खेळल्या. लेकीने खेळावे अशी आईची इच्छा. त्यातून श्वेता ॲथलेटिक्ससाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांच्याकडे सरावाला जायला लागली. यादरम्यान, जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत श्वेताने ग्लोबल अकॅडमी या शाळेचे प्रतिनिधित्व केले. शाळेचे क्रीडा शिक्षक प्रवीण क्षीरसागर आणि प्रदीप जगदाळे यांनी श्वेताला प्रोफेशनल क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. २०१६ साली श्वेता राहुल पाटील यांच्या अकॅडमीत प्रशिक्षणासाठी जाऊ लागली. राहुल पाटील हे स्वत: उत्तम फलंदाज व खेळाडू. श्वेताची तीन महिन्यांतच महाराष्ट्राच्या शिबिरासाठी निवड झाली. गतवर्षी तिची राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली होती. मात्र, कोरोनामुळे नाशिक येथे होणारी ही स्पर्धा रद्द झाली होती. तिने सुरत येथे नुकत्याच झालेल्या बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत प्रथमच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना चंदीगडविरुद्ध सुरेख गोलंदाजी करताना २९ धावांत ४ गडी बाद केले. चॅलेंजर ट्रॉफीसाठी आपली निवड निश्चित केली. सध्या तिचे लक्ष्य हे जयपूर येथील चॅलेंजर ट्रॉफीत उल्लेखनीय अष्टपैलू कामिगरी करून अंडर १९ विश्वचषकासाठी भारतीय संघातील स्थान निश्चित करणे हे आहे.
ही श्वेताची गोष्ट वाचून कौतुक वाटते की मराठवाड्यातली एक लेक सर्व गैरसोयींवर मात करूनही आपली वाटचाल ध्येयाच्या दिशेने करते आहे.
पण ती एकटीच नव्हे.
मराठवाड्यातून अनेक तरुणी क्रिकेटचे स्वप्न पाहत मैदान गाजवत आहेत आणि देशपातळीवरच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटपटू म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
श्वेता जाधव, मुक्ता मगरे, प्रियांका गारखेडे, श्वेता माने, मीना गुरवे या मराठवाड्याच्या खेळाडू अनेक वर्षांपासून आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना मैदान गाजवत आहेत.

१९८५ साली भारताने ऑस्ट्रेलियातील चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स ही स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी विशेष ठरली. यावेळी त्यांनी मालिकावीर पुरस्कार पटकावला व त्यांना ऑडी कारही देण्यात आली होती. त्यामुळे क्रिकेट खेळासाठी हा काळ पोषक होता. त्याच वेळी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त शिरीष बोराळकर यांनी औरंगाबाद जिल्हा महिला क्रिकेट संघटना स्थापन केली. त्यानंतर प्रत्येक वर्षी महाराष्ट्राच्या महिला संघात ५ ते ६ खेळाडू असायचे. १९८६ ते १९९६ दरम्यान शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त दीपाली रोकडे, ऋचा शिंदे, कल्पना माने, प्रज्ञा देशपांडे, कविता पटेल, मोनिका डोणगावकर, मंजूषा पाटणकर यांनी सातत्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत उल्लेखनीय योगदान दिले. विशेष म्हणजे दीपाली रोकडे हिने शेष भारतीय संघाचे, तर कल्पना माने, मोनिका डोणगावकर व कविता पटेल यांनी इंडियन युनिव्हर्सिटी संघाचे प्रतिनिधित्व केले. कल्पना मानेने तर इंडियन युनिव्हर्सिटी संघाचे उपकर्णधारपदही भूषवले.
या प्रतिभावान खेळाडूंची परंपरा पुढे श्वेता जाधव हिने यशस्वीपणे कायम ठेवली. स्फोटक फलंदाजी हे तिचे वैशिष्ट्य. श्वेताने पाकिस्तानविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीत २१ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना अर्धशतक फटकावत आपला विशेष ठसा उमटवला. त्यानंतर तिने वूमेन्स सिनिअर चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत इंडिया ब्लू, तसेच श्रीलंकेविरुद्ध भारतीय अ संघाचे प्रतिनिधित्व केले.
या तरुण मुली इंडिया कॅपचे स्वप्न पाहत अन्य मुलींसाठीही स्वप्नांची एक मोठी वाटच तयार करत आहेत.
 

Web Title: Meet girls from Maharashtra-Marathwada and Aurangabad, women cricket players are writing story of new cricketing joy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.