भारताची मिसाईल वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळच्या टेसी थॉमस यांना डॉ. पॉलोस मार ग्रेगोरियोस अॅवॉर्ड २०२५ ने सन्मानित करण्यात आलं. भारताच्या मिसाईल आणि संरक्षण क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल टेसी थॉमस यांना या महत्त्वाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. केरळच्या रहिवासी असलेल्या थॉमस भारतासाठी मिसाईल प्रोजक्टचं नेतृत्व करणाऱ्या देशातील पहिल्या महिला आहेत.
टेसी थॉमसला लहानपणापासूनच विज्ञान आणि गणितात खूप रस होता. ६२ वर्षीय थॉमस म्हणतात की, रात्री चंद्र पाहून त्यांना अनेकदा आनंद व्हायचा. जेव्हा मी संध्याकाळी घरी परतायचे, तेव्हा मी चंद्राकडे पाहायचे. विमानातून येणाऱ्या कॉन्ट्रेल्स (विमानाच्या मागे तयार होणाऱ्या पांढऱ्या रेषा) पाहिल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. या साध्या प्रश्नांमुळे त्यांना एका असाधारण कारकिर्दीकडे नेलं, त्यांनी भारताच्या मिसाईल आणि संरक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणलं.
टेसी थॉमस या देशातील मिसाईल प्रोजेक्टचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला आणि संरक्षण तंत्रज्ञानातील चीफ इंजिनिअर आहे. २०१४ मध्ये त्या एरोनॉटिकल सोसायटीच्या स्पेस पायनियर हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झालेल्या पहिल्या भारतीय महिला होत्या आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे आभार मानले, ज्यांनी अनेक भारतीय शास्त्रज्ञांना घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
थॉमस यांनी आपल्या कामाने या क्षेत्रात क्रांती घडवली. एका कार्यक्रमादरम्यान सोफिया सोसायटीचे अध्यक्ष डॉ. युहानोन मार डेमेट्रिओस यांनी "थॉमस यांनी महिला, पुरुष आणि सर्व वयोगटातील लोकांना दाखवून दिलं आहे की, दृढनिश्चय कोणतीही उंची गाठू शकतो." हा पुरस्कार सोफिया सोसायटी ऑफ द मलंकरा (इंडियन) ऑर्थोडॉक्स चर्चद्वारे दोन वर्षांनी दिला जातो.
