If you want to use the screen by avoiding disadvantages? | तोटे टाळून स्क्रीन वापरायचा असेल तर?
तोटे टाळून स्क्रीन वापरायचा असेल तर?


-डॉ. सुनील आणि डॉ. अश्विनी गोडबोले

स्क्रीनचे मुलांवर होणारे दुष्परिणाम आपण सगळे हळूहळू समजायला लागलो आहोतच. पण तरीही हे युगच ‘डिजिटल क्रांती’चं आहे. आणि मोबाइल-इंटरनेट घराघरात राहाणारच (खरं तर घुसणारच !) हे वास्तव आहे. मग हेच तंत्रज्ञान आपण मोठय़ांनी समजूतदारपणे वापरायचं ठरवलं तर धोक्याची वाटणारी ही स्क्रीन फायद्याचीही आहे हे समजू शकेल.

आधुनिक ,अस्थिर आणि अतिरेकी गतिशील जगात ‘पालकपण’ सोपं करायचं असेल तर डिजिटल तंत्रज्ञान मदत करेलच फक्त सिगारेटच्या पाकिटावर असतो तसा धोक्याचा इशारा स्क्रीनच्या बाबतही  लक्षात ठेवावा!

स्क्रीनची फायद्याची बाजू 

*  चिमुकल्या बाळांना घरी आजीच्या ताब्यात किंवा पाळणाघरात ठेवून जाणा-या  आधुनिक मातांना बाळावर लक्ष ठेवण्यासाठी मोबाइलशी जोडलेल्या कॅमे-यासारखं साधन नाही. काही आधुनिक पाळणाघरं अशा प्रकारे सर्व वेळ सीसीटीव्हीच्या माध्यमातून आईशी जोडलेली असतात. आपसूकच बालसंगोपनाची पातळी उंचावते आणि आईचीही काळजी कमी होते.
*  आमच्या वैद्यकीय क्षेत्रात बाळ आजारी पडलं की दवाखान्यात घेऊन येणारे आजी-आजोबा आणि त्यांच्याबरोबर मोबाइलद्वारे संपर्कात राहाणारी नोकरदार; पण तितकीच चिंतातुर आई हे चित्रं आता नवीन राहिलेलं नाही. फक्त त्याचा अतिरेक करून फोनवर/व्हॉट्सअँपवर  डॉक्टरांचा सल्ला मागणा-या मातांना आम्हाला कधीतरी ‘मूल प्रत्यक्ष तपासणं महत्त्वाचं असतं’ हे  सांगावंच लागतं.
 

* मूल शाळेत जाऊ लागलं की मग शिक्षक आणि पालक यांच्यातील दुवा म्हणूनही स्मार्ट फोनकडे बघता येतं.  आता बालकेंद्रित शिक्षण पद्धतीमध्ये पालक आणि शिक्षकांमध्ये संपर्क जास्त गरजेचा बनू लागलाय.  म्हणून मग थेट फोन करण्यापासून व्हॉट्सअँप मेसेज पाठवणं, गृहपाठाचा मेसेज किंवा इ-मेल पाठवणं इथपासून ऑनलाइन परीक्षा घेण्यापर्यंत सगळी कौशल्यं शाळा आणि शिक्षक वापरू लागलेत. 

*  इंटरनेटच्या क्रांतीनं माहिती मिळवण्याच्या तंत्रात आमूलाग्र बदल घडलेत. एकेकाळी संदर्भग्रंथाची भली मोठी ग्रंथालयं सांभाळणारी सुशिक्षित घरं आता फक्त इंटरनेट आणि संगणकावर गूगलरूपी दीक्षा घेतात !   शाळासुद्धा आता या गूगलगुरुचा आधार घेऊन मुलांकडून (खरं तर पालकांकडून) प्रकल्प करून घेतात ! फक्त गडबड होते ती ‘कॉपी-पेस्ट’ पद्धतीमुळे ! यात इंटरनेटवरची माहिती थेट कागदावर जाते, मुलांचं डोकं  मात्र रिकामंच राहातं. काहीवेळा उपयुक्त माहितीबरोबर विकृत माहितीही गूगलगुरु तितक्याच विरक्त पद्धतीनं शिकवतो ! त्यासाठी आपण मोठय़ांची ‘नजर’ आवश्यकच !

 * विशेष मुलांना शिक्षणात मदत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान एक कल्पवृक्षच म्हटलं पाहिजे ! दृष्टिहीन मुलांना पुस्तकं वाचून दाखवणारा संगणक हा दिव्यदृष्टीच म्हटला पाहिजे. काही समस्यांमुळे लिहायला अडथळा येणार्‍या मुलांसाठी संगणकाची बटणं किंवा बोललेलं लिहिण्यात परिवर्तन करणारं तंत्रज्ञान हे वरदानच आहे. स्टिफन हॉकिन्ससारखा संशोधक याच तंत्रज्ञानाच्या मदतीनं जगावर आपला ठसा उमटवून गेला. आता अध्ययन अक्षमता, स्वमग्नता यांसारख्या समस्यांशी लढणा-या मुलांसाठीही मोबाइल-संगणकाचा उपयोग होऊ शकतो ! इथं एक धोक्याची सूचना म्हणजे हे तंत्रज्ञान नेहमीच्या कष्टसाध्य उपचारांना साध्य  करायला मदत करू शकते, त्याला पर्याय ठरू शकत नाही !

*  सध्या सगळं विश्वच लहान बनू लागलंय ! त्यामुळे कुटुंबंही वैश्विक बनायला लागली आहेत. अशावेळेस बाबा अमेरिकेत आणि मुलं भारतात आईबरोबर राहाताय ही गोष्ट नवीन राहिलेली नाही. अशावेळेस कुटुंब एकत्रित ठेवण्याचा सगळ्यात प्रभावी दुवा परत एकदा इंटरनेट आणि मोबाइलच म्हटला पाहिजे. परदेशातच नाही तर पलीकडच्या गल्लीत राहाणा-या आजी-आजोबांनाही जोडणारा दुवा स्मार्टफोन असू शकतो. 

* आपण डिजिटल तंत्रज्ञान फायद्यांसाठी कमी; पण व्यसनासाठी जास्ती वापरतो हे दुर्दैव ! डिजिटल तंत्रज्ञान हे अणुशक्ती सारखं आहे. अणुबॉम्ब वापरला तर फक्त विनाश आणि अणुऊर्जा वापरली तर भविष्य उजळेल !

(लेखक हे बालविकासतज्ज्ञ आणि लेखिका  बालआहारतज्ज्ञ आहेत)

suneel.godbole@gmail.com


Web Title: If you want to use the screen by avoiding disadvantages?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.