If you want to be ready for the rain .. | पावसासाठी सज्ज व्हायचं असेल तर..
पावसासाठी सज्ज व्हायचं असेल तर..

- सायली राजाध्यक्ष

गेली 25 वर्षं मी मुंबईत राहातेय. त्यामुळे मी मुंबईतले निदान24  पावसाळे बघितलेत असं म्हणायला हरकत नाही. मुंबईतला किंवा खरंतर कोकणातला पाऊस ही एक पर्वणी असते, अर्थात घरी बसणा-यासाठी किंवा ज्यांना टॅक्सी-रिक्षासारख्या सोयी परवडतात त्यांच्यासाठी. पण असं असलं तरी मुंबईतल्या पावसात एक रोमान्स आहे. 

मंजिल चित्रपटात एक गाणं आहे  रिमझिम गिरे सावन. हे गाणं किशोरकुमारच्याही आवाजात आहे आणि लता मंगेशकरांच्याही. गाणं एकच असलं तरी आर. डी. बर्मन यांनी दोन्ही गाण्यांना चाली अगदी वेगवेगळ्या दिल्या आहेत. किशोरकुमार यांच्या आवाजातलं गाणं खूप ठहराव असलेलं, शांत असं आहे तर लता मंगेशकरांच्या आवाजातलं गाणं जरा उडत्या चालीचं आहे. बासू चॅटर्जींनी या गाण्याचं चित्नीकरण फार सुंदर केलंय. मुंबईतला मुसळधार पाऊस तोही खराखरा. पाऊस नुसता कोसळतोय आणि मरीन ड्राइव्हवरच्या लाटा अंगावर घेत मौशुमी चॅटर्जी आणि अमिताभ बच्चन फिरताहेत. ओव्हल मैदानावर  पावसाच्या पाण्याच्या डबक्यातून पाणी उडवत चालताहेत. फोर्ट भागात रस्ता ओलांडताहेत. त्यावेळी फक्त काळ्या छत्र्या होत्या तेही बघायला मस्त वाटतं. 

मुंबईतला पाऊस हा असा आहे कवेत घेणारा. मला मान्य आहे की पावसाचा रोमान्स हा ज्यांना घरात बसणं परवडतं, ज्यांची घरं पक्की असतात अशांसाठीच आहे. लहान बैठ्या घरांमध्ये, झोपड्यांमध्ये राहाणा-या  लोकांना पावसाचा त्रासही खूप होतो. पण असं असलं तरी पाऊस नको असं म्हणणारे फार कमी लोक असतात. कितीही  त्रास झाला तरी पाऊस सगळ्यांना हवाच असतो. 

जिथे पाऊस खूप पडतो अशा ठिकाणी घरं पाऊसप्रूफ करायला लागतात. म्हणजे काय तर पावसाळ्याआधी घराला पावसासाठी सज्ज करावं लागतं. मुंबईतल्या अनेक इमारती जुन्या आहेत. विमानानं प्रवास करताना पावसाळ्यातली मुंबई जर बघितलीत तर संपूर्ण निळी दिसते. बहुतेक इमारतींवर गळती होऊ नये म्हणून प्लास्टिक टाकलेलं असतं. कारण जुन्या इमारतींमुळे सगळ्यात वरच्या मजल्यावर पाणी गळतंच गळतं.
तर जिथे पाऊस खूप पडतो अशा ठिकाणी जिथून जिथून पाणी आत येऊ शकतं. तिथे तिथे ते आत येऊ नये म्हणून काम करून घ्यावं लागतं. बैठी घरं असतील तर पावसाची मजा अजूनच वेगळी असते.  बाहेर बसून पाऊस छान अनुभवता येतो. 

पावसाळयाची तयारी म्हणजे पण हे आणि इतकंच नाही.  इतरही अनेक गोष्टी आहेत जे पावसाच्या तयारीच्या यादीत मोडतात. 

पावसाळ्यासाठी सज्ज होताना..

* पावसाला सुरूवात होण्याआधी आणि कडक ऊन असतानाच किचनमधले सर्व रूमाल-फडकी चांगले उकळून काढून त्यांना कडकडीत ऊन द्यावं म्हणजे ते निर्जंतुक होतात. 

* पावसाळ्यात घरात खूप माशा येतात. विशेषत: खिडक्या उघड्या ठेवल्या तर माशा येतातच. अशावेळी फरशी पुसताना त्यात निर्जुंतकं जास्त घालावं आणि  सगळ्यात शेवटी टेबल किंवा ओटा पुसताना पाणी न घालता निर्जुंतकं वापरावं म्हणजे माशांचा फार  त्रास होत नाही. 

* स्वयंपाकघरातली सगळी कपाटं रिकामी करून ती स्वच्छ पुसून मग नीट लावावीत. पुसण्यासाठी साबणाच्या पाण्याचा वापर करावा. यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव रोखता येतो. कपाटं पुसल्यावर पंखा लावून ती पूर्ण कोरडी होऊ द्यावीत आणि मगच परत लावावीत. 

* पावसाळ्यात स्वयंपाकघर कोरडं राहील याकडे कटाक्षानं लक्ष द्यावं. मी अनेकांच्या घरी बघितलंय, स्वयंपाकघरात ओट्यावर पचपच पाणी असतं. यामुळे सगळीकडे ओल राहाते. काम झालं की ओटा, टेबल स्वच्छ कोरडं करावा.

* पावसाळ्याची थोडी बेगमीही करावी लागते. त्यासाठी घरात 2लिटरच्या पाण्याच्या 5 बाटल्या आणून ठेवाव्या. हे कशासाठी तर नळाला कधी गढूळ पाणी आलं किंवा मुंबईसारख्या ठिकाणी अतिवृष्टी झाली तर पाणी बंद होण्याची शक्यता असते किंवा जमिनीखालच्या टाक्यांमध्ये घाण पाणी जाण्याची शक्यता असते म्हणून ही एक सोय. 

* पाऊस सुरू होण्याआधी घरात जरा जास्त कडधान्यं आणून ठेवावीत. पाऊस असताना पालेभाज्या फारशा मिळत नाहीतच शिवाय मिळाल्या तर अनेकदा त्या खराब असतात किंवा सडलेल्या.  त्यामुळे कडधान्यं घरात असतील तर पटकन रस्सा असलेल्या उसळी करता येतात. त्या मधल्या वेळचं खाणं किंवा जेवताना भाजीची जागा घेऊ शकतात. 

* पावसाळ्याच्या दिवसांमध्ये फ्रीजमध्ये टोमॅटो, भोपळा, सेलरी, दुधी भोपळा, फ्लॉवर, गाजरं अशा भाज्या जरूर ठेवाव्यात. या भाज्यांचा वापर गरमागरम सूप करण्यासाठी करता येतो. या दिवसात सूप प्यावंसंही वाटतं. बरोबर एखादा भाताचा प्रकार किंवा खिचडी केली की पूर्ण जेवण होऊ शकतं. 

* मुख्य गोष्ट जी सगळ्याच ऋतुंमध्ये महत्त्वाची आहे ती म्हणजे ताजा स्वयंपाक करावा. सकाळचं रात्री किंवा रात्रीचं सकाळी खायला हरकत नाही पण आपल्या देशात जीवाणू किंवा बॅक्टेरियांचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे शक्यतो ताजं अन्न खावं. परदेशात हवा थंड असते शिवाय जीवाणूंचं प्रमाण नगण्य असतं त्यामुळे तिथे शिळं अन्न खाता येतं पण भारतात तसं नाही. त्यामुळे शक्यतो ताजं अन्न खावं 
या काही लहान लहान गोष्टी पाळल्यात तर पावसाळा सुसह्य जाईल यात काही वादच नाही. 

(लेखिका साहित्य, स्वयंपाक आणि जीवनशैलीच्या आस्वादक आहेत) 

sayaliwrites@gmail.com


Web Title: If you want to be ready for the rain ..
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.