If this continues, will women write freely on social media? | हे असंच चालू राहिलं तर सोशल मीडियावर महिला मोकळेपणानं लिहितील?

हे असंच चालू राहिलं तर सोशल मीडियावर महिला मोकळेपणानं लिहितील?

शिल्पा दातार- जोशी

प्रसंग एक
फेसबुकवर नेहमी राजकारणातील दिसणा-या त्रुटींवर लिहिते. मला राजकारण आणि समाजकारण या विषयात रस आहे.  पण राजकारणातल्या घडामोडींविषयी बोलायला गेलं तर फेसबुकवरील टिप्पण्यांच्या रूपानं काहीजण माझ्यावर तुटून पडतात. राज्यातील बेरोजगारी, कोविडची परिस्थिती आणि अत्याचार होणा-या लहान मुलं-महिलांकडे लक्ष द्यावं, असं सुचवलं, की त्या पक्षाच्या पाठीराख्यांची श्वान म्हणण्यार्पयत मजल जाते. (श्वान हा सभ्य शब्द इथं लिहिलाय.) काही जण ‘बघून घेऊ’ या स्वरूपाचं लिहितात.
एकीकडे निर्भया, हाथरसच्या बलात्कार व निर्घृण हत्येनं बळी पडणा-या मुलींविषयी कळवळा दाखवताना राजकारणावर लिहिणा-या महिलेला मात्र  शिव्यांची लाखोली वाहायला फेसबुकवर जमा होतात. राजकारणाबाबत प्रत्येकाचं स्वत:चं मत असतं. विचार व्यक्त केले, म्हणून शिव्या?
प्रसंग 2
मराठवाडय़ातील दारूबंदीसाठी लढा देणा:-या, जात  पंचायतीविरुद्ध लढणा-या, महिला हक्कांचा आग्रह धरणा-या एका सामाजिक कार्यकर्तीचा अनुभव. फेसबुकवरून आपल्या दारूबंदीच्या कामाला होणा-या विरोधाची खरीखुरी कहाणी त्या मांडतात. त्यांना त्यांचं सामाजिक काम सुरू असताना एकीकडे गुत्तेवाल्यांशी, नोकरशाहीशी भांडण चालू असतं तर दुसरीकडे सोशल मीडियावरही मनस्ताप सहन करावा लागतो. दारूबंदीसाठी, स्रीहक्कांसाठी लढणारी महिला आपला लढा सोशल मीडियावर मांडते तेव्हा तिला सहकार्य अपेक्षित असतं; पण चारित्र्यहननानं तिचा उद्धार होतो. अशा वेळी स्रीनं आपला आवाज मोकळेपणानं उठवावा तरी कुठं? 


महिलांविरु द्धच्या ट्रोल्सची पद्धत म्हणजे चारित्र्यावर शिंतोडे उडवणं. शाद्बिक अत्याचार करणा-या सामूहिक झुंडी फेसबुकवर कार्यरत आहेत. या झुंडी  बहुतांश पक्षांच्या पाठीराख्या आहेत. ज्या महिला फॅशन, पदार्थ, सेल्फी, सहलींचे फोटो फेसबुकवर टाकतात, त्या कमी ट्रोल होतात का? तर तसंही नाही. लोचटासारख्या टिप्पण्या असतातच. 
***
घरातल्या बायांना धाकात ठेवणं, बायकोकडून अवास्तव अपेक्षा करणं, बायकांवर लादलेल्या प्रथा-परंपरा, टीव्हीवरील मॉडेलप्रमाणो सुंदर दिसण्याची अपेक्षा, बालसंगोपन, घरचं सगळं सांभाळून नोकरी करणं, मतदानाच्या वेळी नवरा करेल त्याच पक्षाला मत देणं, एवढंच तिचं काम ! अशा वातावरणात मोठा झालेला एक मोठा पुरुषवर्ग आहे. हा वर्गसमाजमाध्यमातही महिलांना छळायला, वाट्टेल ते बोलायला बिचकत नाही. शिव्यांचे शब्द मी इथं लिहू शकत नाही, पण त्याचा अर्थ ‘तिची हिंमतच कशी होते?’ असा होतो. मनातल्या विचारांना अश्लील शब्दांद्वारे मोकळं केल्यानंतर तिच्या आडनावावरून जात शोधली जाते, तिच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावलं जातं, तरीही ऐकलं नाही तर बायांचं राजकीय किंवा सामाजिक लिखाण थांबवायचा एकच मार्ग, सरळ चारित्र्यावर हल्ला! 
हे सगळं कुठंतरी थांबायला हवं. अश्लील, आईवरून दिल्या जाणा:या शिव्या, चारित्र्यहनन करणा-या शिव्या, अप्रत्यक्ष मारण्याच्या धमक्या असे प्रकार   घडल्यास प्रत्येक बाई सायबर सेलवर सतत कशी तक्रार करणार?
आज ज्या महिला राजकीय, सामाजिक वा तत्सम पोस्ट टाकत आहेत, त्यांचं फेसबुकवर खुलेपणानं लिहिणंच कमी होत जाईल का? हे भय आहेच.

(लेखिका मुक्त पत्रकार आहे.)

mrs.shilpapankaj@gmail.com 

Web Title: If this continues, will women write freely on social media?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.