How to use water safely? | पाणी जरा जपून!
पाणी जरा जपून!

-सायली राजाध्यक्ष

हल्लीच हैदराबादला जाऊन आले. प्रवास मला आवडतोच. पण हा प्रवास कामासाठी होता. उन्हाळ्यात भारतात कुठेही प्रवास करणं भयंकर जिकिरीचं असतं. सगळीकडे प्रचंड ऊन, पाण्याची वानवा, वैराण झालेला परिसर असं सगळं बघणं त्नासदायक असतं. पण त्याला पर्याय नाही. कारण इतर वेळी आपण इतकं ऊन असलेल्या देशात राहातो हे आपलं नशीबच म्हणायचं. कारण अनेक देशांमध्ये 6-6 महिने सूर्यप्रकाश बघायलाही मिळत नाही. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही दोन्ही राज्यं मुळातच अतिविषम हवामानाची. इथे ऊनही खूप असतं आणि  पाऊसही खूप पडतो. या भागात चक्रीवादळंही येत असतात. आमचा ड्रायव्हर सांगत होता की, गेली 3-4 वर्षं तिथे पाऊसच झालेला नाही. सगळी शेतं करपून गेली आहेत, प्यायला पाणी नाहीये. हे ऐकल्यावर मला महाराष्ट्राची आठवण झाली. आपल्याकडे काय वेगळी परिस्थिती आहे?

विशेषत: मराठवाडा आणि  विदर्भात गेली काही वर्षं पुरेसा पाऊसच पडलेला नाहीये. पाऊस कमी झाला की जमिनीतल्या पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे झाडं मरतात, बाष्पीभवन कमी होतं आणि त्यामुळे परत पाऊस कमी होतो. हे असं दृष्टचक्र  सुरूच राहातं.

खरं तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात उत्तम पाऊस होतो. काही भागांमध्ये नद्या दुथडी भरून वाहतात, पूर येतात. या पाण्याचं नियोजन केलं गेलं तर दुष्काळ असलेल्या भागांना पाणी पुरवता येणार नाही का? मी काही या विषयातली तज्ज्ञ नाही; पण एक सामान्य नागरिक म्हणून माझा हा प्रश्न आहे. पुराचं जे पाणी वाया जातं ते जर इकडे वळवलं तर काही फायदा होईल की नाही?

जशी पाणीपुरवठा ही सरकारची जबाबदारी आहे तसंच पाण्याचं नीट नियोजन आणि नीट वापर ही आपली म्हणजे नागरिकांची जबाबदारी आहे. कारण जगभरातले पाण्याचे साठे कमी होत चालले आहेत. जोहान्सबर्गमध्ये काही दिवसांपूर्वी पाण्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. तिथले पाण्याचे साठे आटले आहेत आणि पिण्याच्या पाण्याचीही वानवा आहे. आपल्या देशातही आपण पाण्याची नासधूस अशीच सुरू ठेवली तर लवकरच ही परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

मी मुंबईत राहाते. आम्ही राहातो त्या वांद्रे भागात आम्हाला 24 तास पाणी आहे. माझ्याकडे काम करणारी एक मुलगी झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीत राहाते, तर दुसरी सांताक्रूझला बैठय़ा चाळीत राहाते. या दोघींकडेही पाण्याचा तुटवडा आहे. प्यायचं पाणी ठरावीक वेळ येतं ते भरून ठेवावं लागतं. वापरायचं पाणीही साठवावं लागतं. असं असलं तरी त्यांना पाण्याची किंमत शून्य आहे. जेव्हा त्या माझ्या घरी असतात तेव्हा त्यांना पाणी जपून वापरा म्हणून ओरडावं लागतं.

थोड्याफार फरकानं सगळीकडे हेच चित्र आहे. मी असेही ओळखीचे लोक बघितले आहेत की आम्ही पाणीपट्टी भरतो तर आम्ही वाटेल तसं पाणी वापरणार. माझी परिचित अशीही कुटुंबं आहेत की घरात तीन-चार गाड्या आहेत, त्या रोज भरपूर पाणी वापरून धुतल्या जातात. वॉशिंग मशीनचा वापर करताना पांढरे कपडे वेगळे, कॉटन वेगळे, सिन्थेटिक वेगळे असे निदान 3-4 लोड करणारे लोक माझ्या पाहाण्यात आहेत. आणि ही कुटुंब 4-5 लोकांची आहेत. हे एवढय़ाचसाठी सांगतेय की इतक्या लहान कुटुंबामध्ये मशीनचे इतके लोड करायची गरज काय?

घरांच्या फरशा धुण्याची पद्धत पूर्वी आपल्याकडे होती. काही लोक अजूनही ती पद्धत पाळतात. खरं तर बाथरूम्स सोडल्या तर इतर खोल्या फक्त चांगल्या स्वच्छ कपड्यानं आणि पाण्यात निर्जंतुकं घालून पुसल्या तर चालतं. बाथरूम मात्न रोज नाहीतरी निदान दोन दिवसांनी धुवायला हवी. गॅस-ओटा धुताना कमीत कमी पाण्याचा वापर करता येतो हे मी स्वानुभवानं सांगतेय. पाणी देताना मोठे पेले भरून देण्याऐवजी तांब्याभांडं दिलं किंवा पाण्याची बाटली आणि पेला समोर ठेवला तर हवं तितकंच पाणी घेतलं जाईल. पेल्यात उरलेलं पाणी टाकून न देता ते झाडांना घालता येईल किंवा एखाद्या भांड्यात घालून पक्षांसाठी ठेवता येईल. मुख्य म्हणजे नळ सोडताना बारीक धार सोडली तर हवं तितकंच पाणी घेतलं जाईल. शिवाय बादली नळाखाली लावून इकडेतिकडे न फिरता समोर उभं राहून पाणी बंद केलं तर पाण्याची बचत होईल.
सतत सरकारला नावं ठेवण्याऐवजी नागरिक म्हणून आपली जबाबदारीही आपण पार पाडायला हवी ना?

(लेखिका साहित्य, स्वयंपाक आणि जीवनशैलीच्या आस्वादक आहेत) 

sayaliwrites@gmail.com


Web Title: How to use water safely?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.