How long did women run in her career race with so many obstacles? | अडथळ्यांच्या शर्यतीत महिलांनी किती काळ धावायचं?
अडथळ्यांच्या शर्यतीत महिलांनी किती काळ धावायचं?

-अनन्या भारद्वाज 

सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केलेलं ट्विट पाहिलं? तसं ते गेल्या काही दिवसांत सगळ्यांच्याच मोबाइलपर्यंत पोहोचलं, बायकांच्या अनेक ग्रुपवर त्याविषयी हीरीरिनं चर्चा झाली, काही ग्रुपमध्ये पुरुषही म्हणाले की, खरंय, हे चित्र बदलायला हवं, फार गृहित धरतो आम्ही बायकांना, भयंकर ओढाताण होते त्यांची हे दिसतं!
त्या चर्चांनी क्षणभर ‘फीलगुड’ वाटलं की नाही?

 -तर वाटलं! वाटलंच!

कुणाला वाटलं?

तर माझ्यासारख्या अनेकींना वाटलं!

मी कोण?

-तर टीपीकल दहा ते पाच ची नोकरी नाकारुन ‘करिअर’ करु म्हणत व्यावसायिक स्पर्धेत उतरलेलीच एक, करिअर एके करिअर बाकी काहीच ध्येय डोळ्यासमोर नाही असं वाटणारीच एक. पुढं जगण्याच्या वाटेत  कुणीतरी आवडलं, लग्न झालं, मूल झालं आणि करिअर सुरुच राहिलं, मात्र वाट पूर्वीसारखी राहिली नाही. आता घर-किराणा-लॉँण्ड्री-भाजीपाला-स्वयंपाक-मूल-त्याची शाळा-देखभाल-त्यांचं वाढणं-पाळणाघर-शाळेल्या सुट्टया-आजारपण- वयस्कर होत जाणारे आईवडील-सासूसासरे-त्यांची आजारपणं-त्यांचं डिमांडिंग होणं- हे सारं करिअरच्या वाटेवर दबा धरुन बसल्यासारखे ऐन मोक्याच्या क्षणी आम्हाला वेळ दे, आमच्याकडे बघ म्हणत परीक्षा पाहू लागले. पुन्हा लग्न-संसार-करिअर हे सारं मी माझ्या इच्छेनं, मनासारखं, जे जे हवं, ते तेच निवडलं! ना माझ्यावर कुणाची सक्ती, ना कुणाचं बंधन, ना कसली जबरदस्ती ना कसल्या चौकटी. उलट जमलंच, तर जोडीदारानी, घरच्यांनी, माहेरसासरच्यांनी मदतच केली माझी घर-करिअर वाट सोपी व्हावी म्हणून.

मग तरीही  आनंद महिंद्रा यांनी केलेलं ट्विट, त्यातलं चित्र पाहून मला एका क्षणात वाटलं की ही तर मीच! 

मीच उभी आहे पांढर्‍या रेषेच्यामागे रेडीस्टेडीगो म्हटलं की पळणारी, धपाधप अडथळ्याची शर्यत पार करणारी, पडणारी-रडणारी-चिडणारी-हरणारी आणि जिंकणारीही! मात्र त्या जिंकण्यात आनंद कमी आणि दमछाक जास्त, रेस पळण्याच्या आनंदापेक्षाही पोहचलो यातलं ‘हुश्य!’ जास्त, असं का होत असेल आताशा?

त्या आताशामधली हताश निराशाच तर महिंद्रा यांनी ट्विट केलेलं चित्र मांडत होतं. 
काय होतं त्या चित्रात.?

करिअरची रेस दिसतेय. करिअरिस्ट नोकरदादर स्त्री-पुरुष सारेच दबा धरुन बसलेत    पांढ-या रेषेच्या मागे, रेस सुरु होण्याची वाट पाहत, एकदम तयारीनिशी. मात्र बायकांच्या वाटेत घरकाम,धुणीभांडी, स्वयंपाक, इस्त्री असं सारं ठेवलेलं आहे. रेस सुरु झाली की त्यांनी हे सारं आटोपून,  कामाचे अडथळे ओलांडून  ट्रॅक न सोडता धावायचं आहे. पुरुषांचा ट्रॅक मात्र सरळ- विनाघरकाम अडथळा आहे असं ते चित्र म्हणतं.

त्या चित्रासह आपल्या भावना व्यक्त करताना आनंद महिंद्रा म्हणतात,  ‘वर्षभराच्या नातवाला मी गेला आठवडाभर सांभाळलं आणि माझ्या डोळ्यासमोर झर्रकन या चित्रातलं वास्तवचं उभं राहिलं. नोकरी करणा-या प्रत्येक स्त्रीला मला सलाम ठोकावासा वाटला. यश मिळवायचं तर त्यांना पुरुष सहका-यापेक्षा कित्येकपट अधिक प्रयास करावे लागतात, त्या प्रयसांचं, सायासांचं मी कौतुक करतो!’

हे वाचून पहिल्या झटक्यात वाटलंच की, ही आपलीच गोष्ट! माझ्यासारख्या अनेकींना हे वाटलं असेल! 

मात्र तरीही माझ्यासारख्या सुदैवी कमीच म्हणायच्या, उच्चशिक्षित असून, उत्तम करिअर सुरु असूनही ज्यांना अपत्यप्राप्तीनंतर ‘थांबावं’ लागलं त्यांची संख्या तर मोठीच आहे. अलिकडेच प्रसिद्ध झालेला इंडियन स्किल सर्वेक्षण हा अहवालही तेच सांगतो की, उच्चशिक्षित असून बेरोजगार असणा-या महिलांचं प्रमाण मोठं आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 10 वर्षांत उच्चशिक्षित, उच्चपदस्थ महिलांचं नोकरी सोडण्याचं प्रमाण वाढलं आहे. अपत्यप्राप्ती, मूल सांभाळायला कुणी नाही, घर-करिअर दोन्ही सांभाळताना होणारी दमछाक अशी कारणं या महिला नोकरी सोडताना सांगतात.
खरंतर ही कारणं नाहीत नवं बदलतं वास्तव आहे.

 लग्न की करिअर, कुटुंब की करिअर हा अगदी ‘हे की ते’ एकच निवड छापाचा झगडा बायकांच्या वाट्याला येणं कमी झालेलं आहे, मात्र हा बदल घडताना आवश्यक सपोर्ट सिस्टिम्स आपल्या समाजात 

( खरंतर जगात कुठल्याच समाजात, कारण विकसित म्हणवणा-या  जपानमध्येही  सध्या या विषयावर मोठा खल सुरु आहे. मूल जन्माला घाला म्हणता पण त्याच्या संगोपनात साथ कुणाची?) 

तयार झाल्या नाहीत. त्याची गरज ना सरकारला वाटते ना खासगी क्षेत्रातल्या कंपनी व्यवस्थापनाला!

म्हणून तर पाळणाघरं ही गोष्ट खासगीच काय सार्वजनिकच -सरकारी क्षेत्रातही काम करणार्‍या महिलांसाठी उपलब्ध नाहीत. तसा विषयही कुणी काढत नाही, कामाचे फ्लेक्झी अवर्स ही तर चैन वाटावी अशा पद्धतीनं व्यवस्थापनं त्याकडे पाहतात. नाही म्हणायला आता सरकारने 6 महिन्यांची  सवेतन मातृत्व रजा मंजूर केली आहे, पण त्याचा उलट परिणाम असा की, शक्यतो प्रजननक्षम वयातल्या महिलांना नोकरीवर घ्यायला होणारी टाळाटाळ . स्त्री-पुरुष समानतेसाठी सजग असण्याचा दावा           करणा-या अनेक कंपन्या नोकरीच्या जाहिराती देताना ‘फक्त पुरुष उमेदवारांनीच अर्ज करावेत’ असं जाहीर छापतात.

तात्पर्य काय, तुम्हाला मूल झालं आहे तर त्याचं काय करायचं हे तुमचं तुम्ही पाहा, ते कसं सांभाळायचं हे तुमचं तुम्ही ठरवा, इथं प्रोफेशनली काम करा, रिझल्ट द्या नाहीतर उगाच पुरुषांच्या जागा अडवून ठेवू नका असाच एकुण व्यवस्थापनांचा सूर असतो. म्हणजे बाईला मूल असणं हा आजच्या कार्पोरेट जगण्यात तिचा मोठा अपराधच ठरू लागला आहे. दुस-या बाजूला घरी काय चित्र? तमाम नातलग काय म्हणातात, तुझी हौस आहे ना, करिअर करायचंय ना, आम्ही अडवतोय का तुला? मग घर-मूल सांभाळून जमेल ते कर! करिअर कुणाला हवंय तुला, मूल कुणाला हवंय तुला, दोन्ही हवंय हे ठरवलं कुणी? -तू , मग तुझं तू बघ कसं जमवायचं, नाहीतर बस घरी! -असाच एकुण आवेश!
म्हटलं तर निवडीचं स्वातंत्र्य बाईचं, पण त्यापायी किंमत तिनंच मोजायची. त्यावर इलाज म्हणून मग रोज नाकासमोर घरातलं आवरुन, स्वयंपाक करुन, मुलांचं आवरुन, पाळणाघरांत डबे पोहचवून, शाळेतल्या पेरेण्ट मिटिंगाना सुजाण पालकत्वात कमी पडताय हे ऐकून, सोशल मीडीयात चांगली मूलं घडवा वगैरे उपदेश वाचून, आपल्या मुलांना आपण कमी वेळ देतोय याचा अपराधगंड ( जो व्यवस्थाच देते) बाजूला ठेवून ऑफिस गाठायचं.

तिथं रोज एक्स्ट्रा माइल पुढं जाण्याचा प्रय} करायचा, पुरुष सहका-यापेक्षा जास्त काम करायचं. का तर कुणी असं म्हणू नये की, बायका कामात कमी पडतात. सवलती मागतात. 

आणि हे सगळं रोज करायचं. रोज- रो-ज!
या सा-याची उत्तरं कोण शोधणार?
कशी शोधणार?
कधी बदलणार हे सारं.
बदलेलही.पुढच्या काही पिढय़ांत!
तोवर मात्र आनंद महिंद्रांसारख्या द्रष्ट्या माणसांनी पाठीवर दिलेली शाबासकीची थाप आपली ताकद बनवायची.
आणि पळत रहायची रेस.
जिंकणं-हरणं नंतर.
ही रेस सोडायची नाही, हेच एवढंच माझ्यासारख्या अनेकींना कळून चुकलंय.

-----------------------------------------------------------------------------------
 

आनंद महेंद्रा यांनी ट्विट केलेल्या या फोटोत  खरं तर जाणीव आहे. मी माझ्या नातवाला सांभाळलं, बेबी सिटिंग केलं असा आव त्यात नाही तर त्यानंतर वाटलेल्या भावनांना वाट करून देताना नोकरदार बायकांचा संघर्ष ते मान्य करतात. आनंद महिंद्रा यांच्यासारख्या यशस्वी व्यक्तींनी सहज म्हणून नातवाला सांभाळावं, त्याच्या संगोपनात सहभागी व्हावं हे बदलत्या वृत्तींचं, कुटुंबकामात पुरुषांच्याच सहभागाचंही एक उदाहरण म्हणावं लागेल. बदलते काही पुरुष निदान असा सहभाग नोंदवू लागलेत, हा बदलही महत्त्वाचा आहे.

---------------------------------------------------------------------------------

अनन्याचा हा लेख वाचून कुणी सहज म्हणेल, बायकांच्याच वाटेला तेवढी अडथळ्याची शर्यत येते का?- पुरुषांच्या वाटेत नसतात का अडथळे?
रूढार्थानं घरकामाचे अडथळे दिसत नसतील; पण त्यांना नाही का असा ऊर फुटेस्टोवर धावावं लागत?

- तर लागतंच ! मुळात चर्चा कोण दोषी किंवा कोण चूक ही नसून काय चुकतंय आणि काय सुधारता येऊ शकतं अशी आहे ! घरोघर अनेक पुरुषांना आपल्या नोकरदार बायकोच्या वाट्याला येणा-या  रोजच्या धावपळीची जाणीवच नाही, असं अजिबातच म्हणता येणार नाही. 

काहीजण स्वत:हून घरकामात मदत करतात, बालसंगोपनातही हौशीनं सहभागी होऊन जबाबदारीनं वागणारे बाबा आता दिसू लागलेत. नोकरी-घर-मूल यात बायकांच्या वाट्याला येणारी भयंकर कसरत आता पुरुषांनाही ‘कळते!’

पण मग ‘कळतं’ मात्र ‘वळत’ नाही अशी काही स्थिती आहे का? बायकांच्या वाट्याला येणारी ही अडथळ्यांची शर्यत खरीच आहे, उलट वर्तमानकाळात ती अधिकच वाढली आहे असं वाटतं का?

काय आहेत या शर्यतीतल्या नव्या अडचणी?

उत्तम पाळणाघरांसह घरातली र्शमविभागणी यांचा अभाव हे सारं नोकरदार महिलांची वाट अजूनही अवघड करतं आहे का? किंवा आपणच सुपरवुमन आहोत, आपल्याला सगळं जमतं असं म्हणत बायकाच अजूनही स्वयंपाकघराची दारं जोडीदारांसाठी उघडत नाहीत, त्यांना घरकामात सहभागी करून घेत नाहीत, असं काही आहे का? - तुमचा अनुभव काय सांगतो?
या अखंड शर्यतीत पळण्याचा, रडकुंडीला येण्याचा, माघार घेण्याचा?- तुम्ही सोडली आहे का अशी शर्यत? किंवा सोडून परत आला आहात का या शर्यतीत? कसा मार्ग काढलात या प्रश्नातून
जरूर लिहा.आणि या चर्चेत फक्त महिलांनीच सहभागी व्हावं असं काही नाही, पुरुषांनीही आपण स्वत:हून बदललेल्या भूमिकांची, उचललेल्या कामांची आणि जबाबदारींची कहाणी जरुर लिहावी.
पत्ता - संपर्क  : संयोजक, सखी, पुरवणी विभाग, ‘लोकमत भवन’, बी - 3, एमआयडीसी, अंबड. नाशिक - 422 010.  

sakhi@lokmat.com लिहायचं नसेल आणि आपलं म्हणणं मोबाइलवर शूट करून पाठवायचं असेल तर तसा व्हिडीओही तुम्ही किंवा तुमच्या मैत्रिणी, मित्रमैत्रिणी एकत्र येऊन आम्हाला पाठवू शकता..पत्र/इमेलवर-अडथळ्याची शर्यत असा उल्लेख नक्की करा. 

( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

lokmatananya@gmail.com  

Web Title: How long did women run in her career race with so many obstacles?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.