The hot summers can also be pleasant. How so? | प्रखर उन्हाळाही सुसह्य होऊ शकतो. तो कसा?
प्रखर उन्हाळाही सुसह्य होऊ शकतो. तो कसा?

-सायली राजाध्यक्ष

उन्हाळा चांगलाच तापायला लागलाय. मी मुंबईत राहाते.  इथे तर उन्हाळा फारच विचित्न असतो. म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर गावांच्या मानानं तापमान कमी असतं; पण आद्र्रता फार वाढलेली असते. त्यामुळे घामाच्या नुसत्या धारा लागतात. काही करावंसं वाटत नाही.

उन्हाळ्याची चाहूल लागली की आपण काही गोष्टी आठवणीनं करत असतो. आपल्याकडे वाळवणांची पद्धत आहे त्यामुळे गावांमध्ये अजूनही वाळवणं केली जातात. मुंबईत वाळत घालायला जागाच नसल्यानं फारशी वाळवणं होत नाहीत. 

थंड हवेची तजवीज करताना
उन्हाळा सुरू व्हायच्या आधी काही गोष्टी केल्या तर उन्हाळा सुसह्य व्हायला मदत होते. आपल्याकडे कोकण वगळता बाकी ठिकाणी जो दाहक उन्हाळा असतो त्यासाठी बरेचजण कूलर्सचा वापर करतात. कोकणात आद्र्रतेमुळे कूलर वापरता येत नाही. 

पण बाकी ठिकाणी मोठेमोठे कूलर्स वापरले जातात. हे कूलर्स बाकीवेळ बंदच असतात. तेव्हा कूलर्स वापरण्याआधी ते आतून स्वच्छ घासावेत. त्याचे जे वाळ्याचे किंवा गवताचे पडदे असतात त्यांची डागडुजी करावी. आत तसाच कचरा ठेवून पाणी भरलं तर त्याचा त्नासच होण्याची शक्यता असते. 

कूलर्स वापरताना निदान पंधरा दिवसातून एकदा पूर्ण पाणी काढून टाकून जरा वेळ कोरडं राहू द्या. यामुळे डासांची पैदास कमी व्हायला मदत होते. कूलरमध्ये  पाणी भरताना लक्ष देऊन भरा. नाहीतर अनेकांच्या घरी पाइप लावून ठेवतात मग ते पाणी कितीतरी वेळ वाहात राहातं. ज्यांच्या घरी ए.सी. आहेत त्यांनी उन्हाळ्यात ते वापरायला सुरुवात करण्याआधी त्यांचं सर्व्हिसिंग करून घ्यावं.  न वापरल्यामुळे त्याचे फिल्टर्स ब्लॉक झालेले असू शकतात किंवा गॅस संपलेला किंवा लीक झालेला असू शकतो. त्यामुळे ए.सी. वापरण्यापूर्वी त्याची नीट तपासणी करून घ्यावी. 

शिवाय वापरायला सुरुवात केल्यावरही दर आठवड्याला फिल्टर स्वच्छ करावं. कारण आपण ए.सी. जेव्हा वापरतो तेव्हा फिल्टर्स जास्त ब्लॉक होतात. फिल्टर साफ करणं अगदी सोपं आहे. 

आमच्या घरी मी स्वत: हे काम करते. हे कुणालाही सहज जमू शकतं. त्यात जमलेल्या धुळीमुळे संसर्ग होण्याची, दम्याचा, अँलर्जीचा त्रास होण्याची शक्यता असते. पंखे वर्षभरच पुसावेत. आठवड्याला एकदा तरी पंखे पुसावेत कारण त्यावर धूळ आणि जाळी बसतात. त्यानंही अँलर्जीचा त्रास होण्याची शक्यता असते. 
 

थंड घरासाठी जाड पडदे

अनेकांच्या घरात पडदे असतात. त्यांचे निदान दोन सेट्स तरी असतात. मी पावसाळ्यात पातळ पडदे वापरते, कारण मुंबईत पाऊस खूप पडतो आणि पावसाळ्यात अनेकदा दिवस दिवस सूर्य दिसत नाही. त्यामुळे प्रकाश यावा म्हणून पातळ पडदे लावते. त्याउलट उन्हाळ्यात प्रखर प्रकाश नकोसा होतो. म्हणून उन्हाळ्यात जाड पडदे वापरते. 

उन्हाळ्यात जाड पडदे लावले आणि उन्हाचा कडाका सुरू होण्याआधी ते बंद करून ठेवले तर घराचं तापमान कमी राखायला मदत होते. ए.सी. किंवा कूलर जास्त परिणामकारकपणे काम करतात. तेव्हा हे आवर्जून करून बघा. वाळ्याचे, बांबूचे पडदे शक्यतो वापरू नयेत. कारण असं की आपल्याकडे प्रचंड धूळ असते. हे पडदे धुता येत नाहीत. ते वेळोवेळी व्हॅक्यूम क्लीनरनं साफ करायची गरज असते ते आपल्याकडे केलं जात नाही. त्यामुळे ते वापरूच नयेत.   
थंड पाणी अन् रसदार फळं
उन्हाळ्यात गार पाणी प्यावंसं वाटतं. आणि ते प्यावं. गार पाणी प्यायल्यानं त्नास होत नाही; पण सर्दी असेल किंवा घसा दुखत असेल, घशाला संसर्ग झाला असेल तर मात्र  गार पाणी पिऊ नका. पण इतरवेळी प्यायलं तर काही होत नाही. पाणी पिताना मात्न ते फिल्टरमधलं किंवा उकळलेलं प्यावं. बाहेर कुठेही पाणी पिऊ नका. उन्हात बाहेर पडताना बरोबर आपली पाण्याची बाटली जरूर ठेवा. 

या मोसमात आंबे, कलिंगड, खरबूज, जांभळं, स्ट्रॉबेरी, चेरी, अननस अशी फळं मिळतात. ती भरपूर खायला हवीत. अर्थात ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांना विचारून खावीत; पण इतरांनी ती भरपूर खावीत. कलिंगड, खरबूज ही फळं आपल्याला पाणी पुरवतात. त्यांच्यात पाण्याचा अंश जास्त असतो. त्यामुळे तहान तहान होत नाही. या दिवसात फारसं मसालेदार खावंसं वाटत नाही. म्हणून मग आमरस खावासा वाटतो. काही त्रास नसेल तर मग तो अवश्य खायला हवा.  कारण त्यामुळे वर्षभराचं अ जीवनसत्त्वं  मिळतं. शिवाय जेवणात कच्च्या भाज्यांचा समावेश करावा. काकडी, टोमॅटोसारख्या भाज्याही भरपूर पाणी देतात. 

मऊ सुती कपडे आणि सनस्किन लोशन

माझ्या कपाटात उन्हाळ्यातले, पावसाळ्यातले आणि हिवाळ्यातले वेगवेगळे कपडे असतात. असे सगळ्यांकडेच नक्की असतील. मुंबईतल्या दमट हवेत उन्हाळ्यात पातळ सुती किंवा पातळ लिननचे कपडे घातले जातात. घरात राहणार असेल तर स्लीवलेस कपडे आवडतात मला; पण बाहेर पडणार असेल तर पातळ कपड्याचे लांब बाह्यांचे कपडे घालते. कारण मग उन्हाच्या तडाख्याचा त्नास होत नाही. नाहीतर त्वचा जळाल्यासारखी होते. अजून एक महत्त्वाचं. उन्हात बाहेर पडताना किंवा घरातही चांगल्या दर्जाचं सनस्किन लोशन जरूर वापरावं. निदान हात आणि चेहर्‍याला ते लावावं. उन्हात बाहेर पडताना स्कार्फनं डोकं आणि कान झाकून घ्यावेत. हे सगळं केलंत तर उन्हाळ्याचा त्नास होण्याची काय बिशाद आहे! अर्थात मी हे गमतीनं म्हणतेय. कारण आपण नशीबवान आहोत की आपल्याला तीनहीऋतू इतके भरभरून उपभोगायला मिळतात. 

परदेशात ज्यांना महिनोनमहिने सूर्य दिसत नाही त्यांची अवस्था काय होते ते आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश हे एक प्रकारचं वरदानच आहे आपल्याला !

(लेखिका साहित्य, स्वयंपाक आणि  जीवनशैलीच्या आस्वादक आहेत) 

sayaliwrites@gmail.com


Web Title: The hot summers can also be pleasant. How so?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.