Heavenly Creatures:- A bloody tale about a friendship between two girlfriends. | दोन मैत्रिणींच्या मैत्रीची रक्तरंजित गोष्ट सांगणारा चित्रपट
दोन मैत्रिणींच्या मैत्रीची रक्तरंजित गोष्ट सांगणारा चित्रपट

-माधवी वागेश्वरी


लहान असताना आपल्या कपाळाच्या दोन्ही टोकावर किंवा कानांवर हात ठेवून, मोठी ताई किंवा दादा तसं अख्खं तोलून विचारायचे, ‘बघ मोर दिसतो का, मोर?’
अशावेळी खरं तर पहिल्यांदा मानेच्या मागे आधी दुखू लागतं; पण कळत नाही, तसं झटकन उंच झाल्यावर हळूहळू समोर नसलेल्या त्याची निळसर मान दिसू लागते. त्याच्या चेह-याचा कण नि कण स्पष्ट होऊ लागतो आणि जाणवतं त्याला नाही तर आपल्यालाच असंख्य डोळ्यांचा पिसारा फुटलाय. 
हा लहानपणी मिळालेला पिसारा आपण मोठे होतो तसा स्वत:ला मिटून घेतो. पण काहींचा नाही मिटत. जिथं जाईल तिथं त्यांची मोरपिसं सांडत राहतात. 
अशा मोर दिसता दिसता मोरच होऊन जाणा-या , सतत थुईथुई नाचणा-या  पॉलिन आणि ज्युलिएट या दोन सख्या मैत्रिणींची गोष्ट असलेला सिनेमा म्हणजे ‘हेवनली क्रीचर्स’. 
किशोरवयच असं असतं की ज्यात हार्मोन्सचा शरीरात अद्भुत खेळ चाललेला असतो. ‘आपणच आपलं जीवन घडवणार’ टाइप्सची वाक्यं तर शुद्ध बंडल वाटू लागतात, या हार्मोन्सपुढे! तर  हार्मोन्सचा शरीरात चाललेला गोंधळ आणि त्यात भर कडक शिस्तीच्या नन्सच्या शाळेची, अशावेळी न दिसणा-या मोरात मन जास्त रमणं अपरिहार्य बनून जातं. 
पॉलिन आणि ज्युलिएट सतत एकमेकांत रमणा-या , गावभर नुसत्या भटकणा-या , हसता हसता खळकन फुटणा-या  दोघी, दोघीतच सगळं चाललं आहे तोपर्यंत ठीक; पण मग त्यांच्या पाठीला फुटलेले पंख त्यांच्या आईवडिलांना दिसू लागतात तेव्हा काय होतं? आपलं स्वप्नील जग जेव्हा आपण प्रत्यक्षात जगू लागतो तेव्हा काय होतं?? सगळं झूठ आणि आपली कल्पनाच खरी तेव्हा काय होतं? 
तेव्हा त्या दिसलेल्या निळ्या मानेवरून लाल रंग ओघळू लागतो, इतके घाव होतात की सगळी मानच रक्ताळून जाते. ते रक्त ना मोराचं होतं, ना पॉलिनचं, ना ज्युलिएटचं. ते रक्त आईचं होतं, पॉलिनच्या आईचं. 
पॉलिन आणि ज्युलिएट या दोघींनी मिळून मैत्रीसाठी आडकाठी करणा-या  पॉलिनच्या आईचा खून केला होता. ही खरी घटना आहे. 1954 साली न्यूझीलंडमध्ये घडलेल्या पार्कर हुल्मे र्मडर केसवर ‘हेवनली क्रीचर्स’ ही फिल्म आधारित आहे. 1952 साली त्या दोघी शाळेत भेटल्या. त्यांची घट्ट मैत्री  होत गेली इतकी की त्यांनी मिळून खून केला. 
आपल्यापैकी बहुतेक जणांना किंग कॉँग (2005 सालचा) लॉर्ड ऑफ द रिंग आणि हॉबीट ट्रायोलोजीचे डिरेक्टर म्हणून माहिती असलेले न्यूझीलंड फिल्ममेकर पीटर जॅक्सन यांची ही फिल्म आहे. 1954 साली घडलेल्या प्रत्यक्ष खुनाच्या घटनेनंतर चाळीस वर्षांनी पुन्हा त्याच जागांवर जाऊन त्यांनी ही फिल्म शूट केली आहे. 1994 सालच्या व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ही उद्घाटनाची फिल्म होती आणि या फिल्मला  ‘सिल्व्हर लायन’ हे महत्त्वाचं बक्षीसदेखील मिळालं होतं. जगभरातील महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये फिल्मला उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले’ या विभागात ऑस्करसाठी नामांकनदेखील मिळालं होतं.  
 ‘टायटॅनिक’पासून कधी एकदा हिला ऑस्कर मिळतो आहे अशी प्रेक्षकांच्या जीवाला घोर लावून  ‘द रीडर’ या फिल्मसाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा ऑस्कर मिळविणारी गुणी आणि बुद्धिमान अभिनेत्री केट विन्सेल्टची ही पहिली फिल्म आहे. आपण या बाईच्या प्रेमात का आहोत याचं उत्तर हा सिनेमा बघून कळतं. पहिलाच सिनेमा तिनं असा अवघड निवडला आहे. ज्युलिएटची व्यक्तिरेखा इतकी गुंतागुंतीची आहे, सतत मोठमोठय़ानं गात, बडबडत, इथून तिथून सगळ्यांना पटापट फाट्यावर मारत अतिआत्मविश्वासाचा लांबलचक परीसारखा झगा घालून ती फिरते. पण,  लहानपणापासून तिला तिच्या आईवडिलांपेक्षासुद्धा अधिक जवळ घेतलंय ते तिच्या आजारपणानं. ती सतत आजारी पडते, खोकते,  रक्त बाहेर पडतं. श्रीमंत आईवडील तिला हॉस्पिटलमध्ये भरती करून चक्क एका परिषदेसाठी देशाबाहेर रवाना होतात. शाळा बंद झाल्यामुळे तिला रोज पॉलिनला भेटता येत नाही, त्यांना हा विरह असह्य होतो. एकाच गावात राहून मग पॉलिन तिला रोज पत्र लिहिते, तिच्याविषयी, एकमेकींविषयी रोज डायरीत लिहिते. हीच ती डायरी ज्यामुळे दोघींना अटक झाली. दोघींनी शिक्षा भोगली. इथून पुढे कधीही एकमेकांना भेटायचं नाही असं कायद्यानं त्यांना ठणकावून सांगितलं. 
केट विन्सेल्ट इतकंच दमदार काम केलं आहे ते  Melanie Jayne Lynskey या न्यूझीलंडच्या  अभिनेत्नीनं. पापभिरू आणि  सर्वसामान्य कुटुंबातली पॉलिन तिनं साकारली. गोब-या गालाची पॉलिन खूपच भिडस्त स्वभावाची. वर्गाचा फोटो क्लिक करताना ती चक्क मान खाली घालते आपला चेहराच दिसू नये म्हणून. 
अशा या पॉलिन आणि ज्युलिएट एकमेकांना भेटू नाही दिलं तर ढसाढसा रडतात. त्या दोघी मिळून एक कादंबरी लिहित आहेत. दोघींनी वसवलेलं ते राज्य. त्यातल्या व्यक्तिरेखा त्यांनी मातीच्या बनवलेल्या. दोघी एकमेकांना त्यांनी लिहिलेल्या गोष्टीतल्या राजकन्यांच्या नावानं हाक मारू लागतात. वास्तविकता आणि काल्पनिकता यांची त्यांच्यासाठी झालेली सरमिसळ इतकी सफाईदारपणे दिग्दर्शकानं दाखवली आहे की, स्पेशल इफेक्ट, व्हीएफएक्सचे सिनेमे आवडणार्‍या लोकांनी हा सिनेमा आवर्जून पाहावा. अलून बॉलिंगर यांचं अप्रतिम कॅमेरा वर्क यात आहे. आपल्या मुली समलैंगिक तर नाही ना याची अक्षरश: दहशत घेऊन त्यांचे आईवडील त्यांना एकमेकांपासून दूर नेतात. 15/16 वय असलेल्या दोन मुलींची मानसिकता, त्यांचं भावविश्व ते त्यांनी खून करणं हा प्रवास पीटर जॅक्सन यांनी तपशीलवारपणे मांडला आहे. आपण वयाच्या सगळ्याच टप्प्यावर प्रेम हुडकत असतो. ते दिसलं तर बाकी कोणाची नजर त्याकडे जाऊ नये म्हणून त्यावर झडपच घालतो. नखं रूतेपर्यंत त्याला गच्च गच्च धरतो.  प्रेमाच्या या भुकेला कोणी अपवाद नाही. ना स्त्री, ना पुरुष अगदी कोणीही. ही ‘भूक’ आणि हा ‘गुन्हा’ आपल्याला स्त्री-पुरुष म्हणून समान करून टाकतो. सिनेमा बघताना जेव्हा सतत कळतं की ही घटना प्रत्यक्ष घडली आहे तेव्हा मनाचे खेळ ही काय चीज आहे ते लक्षात येतं. 
https://www.youtube.com/watch?v=VsTm43Q1smU या लिंकवर ही फिल्म यू-टाूब वर उपलब्ध आहे
बरं जाता जाता त्या दोघी आजही आहेत. ज्युलिएटचं नाव आता, अँन पेरी आहे. डिटेक्टिव्ह फिक्शन लिहिणारी बेस्ट सेलर रायटर ती झाली आहे. आणि पॉलिन न्यूझीलंडमध्ये राहाते, शांत. 

(लेखिका चित्रपट आणि दृश्य माध्यमाच्या अभ्यासक आहेत.)

madhavi.wageshwari@gmail.com

Web Title: Heavenly Creatures:- A bloody tale about a friendship between two girlfriends.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.