Lokmat Sakhi >Health >Pregnancy > आई होणार आहात, दात आणि हिरड्यांचे आरोग्य सांभाळा, नाहीतर बाळाला होतो त्रास..

आई होणार आहात, दात आणि हिरड्यांचे आरोग्य सांभाळा, नाहीतर बाळाला होतो त्रास..

गरोदरपणात हार्मोन्समधे बद्ल होतात. या काळात मौखिक आरोग्य या बदलांप्रती अतिशय संवेदनशील आणि असुरक्षित असतं. तसेच आईनं आपल्या मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे दुष्परिणाम गर्भातील बाळावर होण्याचा धोका असतो. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 07:24 PM2022-01-11T19:24:49+5:302022-01-11T19:37:32+5:30

गरोदरपणात हार्मोन्समधे बद्ल होतात. या काळात मौखिक आरोग्य या बदलांप्रती अतिशय संवेदनशील आणि असुरक्षित असतं. तसेच आईनं आपल्या मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे दुष्परिणाम गर्भातील बाळावर होण्याचा धोका असतो. 

You are going to be a mother, take care of your oral health first.. otherwise the baby will suffer. Narikaa | आई होणार आहात, दात आणि हिरड्यांचे आरोग्य सांभाळा, नाहीतर बाळाला होतो त्रास..

आई होणार आहात, दात आणि हिरड्यांचे आरोग्य सांभाळा, नाहीतर बाळाला होतो त्रास..

Highlightsगरोदर राहाण्यापूर्वीच स्त्रीने आपल्या मौखिक आरोग्याची तपासणी, काही समस्या असल्यास त्यावर उपचार करुन घेण्याची गरज असते.आईनं दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्याकडे केल्यास त्याचा परिणाम वेळेआधीच प्रसूती वेदना सुरु होण्यावर होतो.

गरोदरपणात स्त्रीनं आपल्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. यात मौखिक आरोग्य याचाही समावेश होतो. आईच्या मौखिक आरोग्याचा परिणाम पोटातल्या गर्भावरही होवू शकतो. अनेकांना स्त्रीचं मौखिक आरोग्य आणि गर्भ यांचा थेट संबंध कसा हे कळत नाही. म्हणूनच गरोदरपणात मौखिक आरोग्याची काळजी घेणं क महत्त्वाचं, ती कशी घ्यवी हे समजून घेण्यासोबतच मौखिक आरोग्य आणि गर्भ यातला संबंध समजूनही घेणंही आवश्यक आहे.
गरोदर राहाण्यापूर्वी जशी आरोग्य तपासणी महत्त्वाची असते तितकीच मह्त्त्वाची मौखिक आरोग्य तपासणीही महत्त्वाची आहे. गरोदरपणात  नियमित दातांच्या हिरड्यांच्या आरोग्याकडे लक्ष तर द्यावं लागतंच पण गरोदर राहाण्यापूर्वी दंतचिकित्सकांकडे जावून मौखिक आरोग्य तपासणी करणंही महत्त्वाचं असतं.

Image: Google

 गरोदर राहाण्यापूर्वी दंतचिकित्सकांकडे जावून तपासणी केल्यास दंतविकार तज्ज्ञ गरोदरपणात मौखिक आरोग्याच्या दृष्टीने काय बदल होतात, त्याकडे कसं लक्ष द्यायला हवं हे समाजावून सांगतात. गरोदरपणात आईच्या आरोग्याचा आणि पोटातील गर्भाच्या आरोग्याचा थेट संबंध असतो, म्हणूनच केवळ गरोदर राहाण्यापूर्वीच नाहीतर गरोदरपणातही दंतचिकित्सकांकडे जावून दातांची तपासणी करणं, त्यांचा सल्ला घेणं महत्त्वाचं असतं. 

गरोदर होतांना मौखिक आरोग्याचा विचार कसा कराल?

गरोदरपणात हार्मोन्समधे बद्ल होतात. या काळात मौखिक आरोग्य या बदलांप्रती अतिशय संवेदनशील  असतं.  दातांमधे जीवाणू आणि किटाणुंची वाढ होणं, हिरड्या हुळहुळीत होणं किंवा या दोन्ही समस्या गरोदरपणात निर्माण होऊ शकतात.  त्यामुळे पुढे दात किडणे किंवा हिरड्यांचे गंभीर आजार होणे याचा धोका वाढतो. 

Image: Google

गरोदरपणात उद्भवू शकणाऱ्या दातांच्या समस्या

1. गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत हिरड्यांची आग होणं ही समस्या प्रामुख्याने आढळून येते. हिरड्या सुजणं, हुळहुळीत होणं,  दात घासताना, गुळण्या करताना हिरड्यांतून रक्त येणं या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. गरोदरपणात शरीरात हार्मोन्समधे होणाऱ्या बदलांचा परिणाम म्हणून आईच्या हिरड्यांचं आरोग्य धोक्यात येतं. हा परिणामच गिंगिव्हिटिस नावाच्या हिरड्यांच्या गंभीर समस्येला कारणीभूत ठरतो. या समस्येत हिरड्या सळसळतात, हिरड्यातून रक्त येणं, हिरड्यांची जळजळ होणं हे त्रास होतात. 
या गिंगिव्हिटिसकडे दुर्लक्ष केलं, त्यावर योग्य वेळी उपचार घेतले नाहीत तर गिंगिव्हिटिसचं रुपांतर पेरिओडाॅनटिटिस सारख्या हिरड्यांच्या गंभीर आजारात होतं. या समस्येत दातांच्या भोवतीच्या पेशींवर होतो, हिरड्या आंकुचन पावतात आणि दात सैल होतात. 

2. गरोदरपणात दातांच्या मधे किंवा दातांवर, दातांच्या मागील बाजूस थर तयार होणं  (प्लाक) ही बाब सामान्यत: आढळून येते. पण याकडे दुर्लक्ष न करता  नियमितपणे ब्रश करणं, गुळण्या करणं यामुळे ही समस्या नियंत्रित राहू शकते. गरोदर असताना स्त्रीचं शरीर या प्लाक समस्येशी  लढू शकत नाही.  त्यामुळे या प्लाककडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा परिणाम म्हणून दात किडतात.

3. गरोदरपणात हिरड्यांवर पेशींची जास्त वाढ होवून हिरड्यावर फुगीर भाग तयार होतो. यालाच प्रेगन्सी ट्यूमर असं म्हणतात. ही समस्या सामान्यत: गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत निर्माण होते. हिरड्यांवरील ही पेशींची वाढ कर्करोगाची नसते.  पण म्हणून त्याकडे दुर्लक्ष केल्यास  दातांवर थर निर्माण होण्याची समस्या वाढते आणि त्यामुळे हिरड्यातून रक्त येतं. प्रसूतीनंतर हिरड्यांवरील हा पेशींच्या वाढीचा फुगा निघून जातो.. 

आईच्या मौखिक आरोग्याचा गर्भावर कसा परिणाम होतो?

1. आईच्या मौखिक आरोग्याचचासंबंध गर्भातील बाळाच्या आरोग्याशी असतो. हा संबंध आईच्या तोंडातील जिवाणुंद्वारे येतो. जेव्हा गरोदर स्त्रीच्या तोंडात जास्त जिवाणुंची वाढ झाली, तर हिरड्यांद्वारे हे जिवाणू तिच्या रक्तप्रवाहात मिसळतात आणि गर्भाशयापर्यंत प्रवास करतात. याचा परिणाम प्रोस्टाग्लॅनडिन्स नावाच्या रसायनाची निर्मिती जास्त होते. त्यामुळे वेळेआधीच प्रसूती वेदना सुरु होण्याचा धोका असतो. 

2. बाळाच्या जन्मानंतर तर आईमधील जिवाणु बाळाच्या शरीरात प्रवेश करतात.  यालाच व्हर्टिकल ट्रान्समिशन असं म्हणतात. त्यामुळे आईच्या तोंडात जर आम्लप्रेमी जिवाणू जास्त असतील तर आपल्या नवजात बाळाच्या शरीरात आईकडून जास्त जिवाणू  प्रवेश करतात. 

3. संशोधन सांगतं की, मौखिक आरोग्याचा संबंध वेळेआधीच प्रसूती होण्याशी, कमी वजनाचं बाळ जन्माला येणं आणि गिंगिव्हिटीज होण्याशी असतो.

Image: Google

गरोदरपणात मौखिक आरोग्य कसं जपायचं?

गरोदरपणा मौखिक आरोग्य जपण्यासाठी रोज करण्याच्या काही गोष्टींचा समावेश आहे. 

1.  गरोदर राहाण्यापूर्वी  महिलेने दंतचिकित्सकांकडे जाऊन आधी दातांची आणि हिरड्यांची तपासणी करायला हवी. लगेच काही स्वच्छ करणं किंवा शस्त्रक्रिया करण्याची गरज असेल, भूल देऊन काही दंतउपचार करायचे असतील तर ते वेळीच लक्षात येतात आणि असे उपचार गरोदर राहाण्यापूर्वी करुन घेता येतात. 

2.  गरोदर स्त्रीने दिवासातून किमान दोन वेळा ब्रश करावा. त्यासाठी फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट वापरावी. जर हिरड्या सूजल्या असतील, हुळहुळीत झाल्या असतील तर दात घासण्यासाठी मऊ ब्रश वापरावा. दातांना ब्रश हळुवार करावा. 

3. गरोदरपणात नियमित दंतचिकित्सकांकडे जाऊन दातांची आणि हिरड्यांची तपासणी करावी. दात स्वच्छ करुन घ्यावेत. 

4.  दंतचिकित्सकांकडे गेल्यानंतर गरोदर स्त्रीने आधी आपण किती महिन्यांचे गरोदर आहोत हे अवश्य सांगांव. याचा फायदा डाॅक्टरांना औषध  सूचवण्यावर होतो. डाॅक्टर गरोदरपणाची नेमकी स्थिती लक्षात घेऊन गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या वाढीवर घातक परिणाम होणार नाहीत असे औषधं सूचवतात.

5.  दंतचिकित्सकांना तोंड धुण्यासाठी जिवाणुविरोधी उपायाबाबत विचारावं. याचा फायदा तोंडात वाढणाऱ्या प्लाकला रोखण्यास होतो. 

6. गरोदरपणात उलट्या होण्याचा अर्थात माॅर्निंग सिकनेसचा त्रास होत असेल तर पाण्यामध्ये एक छोटा चमचा बेकिंग सोडा घालून गुळण्या कराव्यात, तोंड धुवावं. यामुळे पोटातील आम्लांचा दातांवर होणारा परिणाम रोखला जातो. दातांना किड लागण्याचा धोका टाळता येतो. 

7.  आहारात कॅल्शियमयुक्त , ब 12 आणि क जीवनसत्त्वयुक्त घटकांचा अवश्य समावेश करावा. यामुळे हिरड्यांचं आरोग्य चांगलं राखलं जातं. 

8. आहारात गोड पदार्थ, साखर घातलेले पदार्थ आणि साखरयुक्त पेयांचं सेवन एकदम नियंत्रित करावं. आहारात पोषक घटकांचा समावेश असणं गर्भात वाढणाऱ्या बाळाला  आवश्यक पोषण मुल्यं मिळण्यासाठी महत्त्वाचे असतात.  गरोदरपणात  3 ते 6 व्या महिन्यापसून बाळाचे दात येण्याची प्रक्रिया सुरु होते. त्यामुळे कॅॅल्शियम, प्रथिनं, फाॅस्फरस आणि अ,क, ड जीवनसत्त्वं हे घटक आहारात असल्यास बाळाचे दात चांगले येण्यास मदत होते. 

9. गरोदर महिलांनी दातांचं आरोग्य जपण्यासाठी धूम्रपान  करणं टाळावं.

Image: Google

10. दात किंवा हिरड्यांच्या बाबतीत जर काही शस्त्रक्रिया करायची असल्यास गरोदरपणात हे टाळावं. किंवा करायची असल्यास गरोदरपणात दुसऱ्या तिमाहित करावी. 

11. ज्या महिलांना खूपच उलट्या होण्याचा त्रास होतो त्यांनी उलटी झाल्याबरोबर ब्रश करण्याचं टाळावं. कारण उलटी झाल्यानंतर आम्लाचा  परिणाम दाताचा संरक्षक आवरणावर (इनॅमल) होतो.  त्यामुळे लगेच ब्रश केल्यास त्याचा दातावर आणखी वाईट परिणाम होतो. त्यामुळे उलटी झाल्यानंतर केवळ गुळण्या कराव्यात आणि नंतर थोड्या वेळानं मऊ ब्रश वापरुन दात घासावेत.

गरोदरपणात दातंची काळजी घेणं मौखिक आरोग्य जपणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यासाठी दात आणि हिरड्या स्वच्छ ठेवणारे नियमित उपाय तर करावेतच, सोबत दात, हिरड्या याबाबत काही बदल झाला आहे का याकडेही लक्ष द्यावं. आपलं मौखिक आरोग्य जपून गरोदर स्त्री स्वत:चं आरोग्य सुरक्षित ठेवते तसेच यामुळे बाळ निरोगी आणि सुदृढ जन्माला येतं.  

तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी विशेष आभार: डाॅ. रश्मी शर्मा ( एमबीबीएस, डीजीओ) 

 

Web Title: You are going to be a mother, take care of your oral health first.. otherwise the baby will suffer. Narikaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.