Lokmat Sakhi >Health >Pregnancy > गरोदरपणात थायरॉइडचा त्रास, तो गंभीर किती असतो, त्यावर उपचार काय?

गरोदरपणात थायरॉइडचा त्रास, तो गंभीर किती असतो, त्यावर उपचार काय?

गरोदरपणात थायरॉइड म्हटलं की टेंशन येतं; पण त्या आजाराचं नेमकं स्वरूप काय हे पाहायला हवं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 01:47 PM2021-06-15T13:47:18+5:302021-06-15T13:51:34+5:30

गरोदरपणात थायरॉइड म्हटलं की टेंशन येतं; पण त्या आजाराचं नेमकं स्वरूप काय हे पाहायला हवं...

What is the treatment for thyroid problems during pregnancy? how to take care | गरोदरपणात थायरॉइडचा त्रास, तो गंभीर किती असतो, त्यावर उपचार काय?

गरोदरपणात थायरॉइडचा त्रास, तो गंभीर किती असतो, त्यावर उपचार काय?

Highlightsसौम्य आजाराला काहीही उपचार लागत नाहीत.

डॉ. शंतनु अभ्यंकर

“डॉक्टर, मला थायरॉइड आहे !”  - “त्यात काय, मला पण आहे!!” - माझ्या दवाखान्यात घडणारा हा नेहमीचा संवाद.  थायरॉइड नावाची ग्रंथी सर्वांनाच असते. ती असल्याशिवाय जीवन अशक्य. तेव्हा ‘मला थायरॉइड आहे’, या विधानाला काही अर्थ नाही. मला डोके आहे, हृदय आहे, तसंच हे. खरं तर पेशंटला म्हणायचं असतं, मला थायरॉइडचा विकार आहे. थायरॉइड ही ग्रंथी आणि थायरॉक्झिन हे त्यापासून स्रवणारे संप्रेरक (हार्मोन). टी ३ आणि टी ४ हे त्याचे दोन प्रकार. या ग्रंथीतून हे रक्तात मिसळते. शरीरात सर्वदूर जाते आणि सर्वदूर आपला प्रभाव दाखवते. मुख्यत्वे शरीरातल्या ऊर्जा वापराशी या संप्रेरकाचा थेट संबंध येतो. त्यामुळे यात काही बिघाड झाला की सर्वदूर परिणाम दिसतात. बिघाड काहीही असू शकतो. म्हणजे थायरॉइडचा स्राव अति होणे किंवा कमी होणे. दोन्ही शक्य आहे. दोन्ही तापदायक आहे. अति झालं की त्याला म्हणतात हायपर- थायरॉइडीझम आणि अल्प झालं की हायपो-थायरॉइडीझम. थायरॉइड स्राव निर्माण होण्यासाठी लागतं आयोडिन.
बाळासाठी आणि आईसाठी असं मिळून दिवसाला २५० मिलीग्रॅम लागतं. दूध, मांसाहारी पदार्थ यात ते भरपूर असतं. शिवाय आता आपल्याकडे मीठ मिळतं, तेही ‘आयोडिनयुक्त’ असतं. हे आयोडिनयुक्त मिठाचं धोरण, आहारातील आयोडिन कमतरेविरुद्ध एक महत्त्वाचं पाऊल आहे.

थायरॉइडच्या आजाराचे निदान नेहमीच शारीरिक तपासणी आणि रक्त तपासणी करून केले जाते.
स्त्रियांच्या आरोग्यातही या थायरॉइडच्या अनारोग्याला महत्त्व आहे. इथे थायरॉइड आणि गरोदरपण ह्या बद्दलचीच माहिती बघू या. थायरॉईडचा विकार असेल तर गरोदरपणात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. तेव्हा वेळोवेळी थायरॉईडची तपासणी (TFT) करण्याला पर्याय नाही. गर्भावस्थेत या थायरॉईडच्या छत्रछायेत गर्भाची वाढ होत असते. पहिले तीन महिने तर बाळाच्या थायरॉईड ग्रंथी कार्यरत नसतात. त्यामुळे बाळ, वारेतून मिळणाऱ्या आईच्या थायरॉईड
स्रावावरच संपूर्णतः अवलंबून असते. १२ आठवड्यादरम्यान बाळाची ग्रंथी कार्यरत होते पण पूर्ण क्षमतेने काम करायला पाचवा महिना उजाडतो. तेव्हा आईच्या ग्रंथीचे काम सुरुवातीपासूनच योग्य सुरू असणे अतिशय महत्त्वाचे आहे.

हायपर-थायरॉईडीझम

थायरॉईडचं प्रमाण वाढलं, की आईमध्ये धडधड, हाताला कंप सुटणे आणि वजन पुरेसे न वाढणे अशी लक्षणे दिसतात. हा प्रकार बहुतेकदा शरीरात थायरॉईडला उचकवणारी प्रतिपिंड (Antibodies) निर्माण झाल्यामुळे होतो. हा तर आपल्या प्रतिकारशक्तीचा प्रताप. ह्याला म्हणतात ग्रेव्हस् चा आजार. ‘ग्रेव्हस्’ म्हणजे कबर किंवा गंभीर ह्या अर्थी नाही हं. रॉबर्ट ग्रेव्हस् या आयरीश डॉक्टरने हा प्रथम वर्णिला म्हणून त्याला हे नाव दिलं आहे.
गरोदरपणात स्त्रीची प्रतिकारशक्ती किंचित क्षीण झालेली असते. त्यामुळे हा प्रताप थोडा थंडावतो देखील. पण नंतर पुन्हा हा आजार उचल खातो. ह्याच्या या असल्या बेभरवशाच्या वागण्यामुळे वारंवार तपासणीला पर्याय नाही. थायरॉईड स्त्राव वाढण्यामागे खास गरोदरपणाशी संबंधितही एक कारण आहे. गरोदरपणात वारेतून एचसीजी हे द्रव्य स्रवत असतं. ह्याचा अगदी पूरच येतो म्हणा ना. गर्भसंवर्धनाचे सुरुवातीचे काम ह्या द्रव्याचे. मग हा पूर ओसरतो. पण तोपर्यंत या एचसीजीमुळे थायरॉईड ग्रंथीचा स्त्राव वाढतो. मग खूप उलट्या वगैरेचा त्रास होतो. तेव्हा उलट्या जास्त होत असतील, वजन घटत असेल तर थायरॉईड स्त्राव वाढल्याची शंका घ्यावी. तीन महिन्यानंतर एचसीजीचा पूर ओसरतो आणि उलट्याही थांबतात. अगदी क्वचित थायरॉईड स्थित एखादी गाठ जास्त स्त्राव निर्माण करण्याचा उद्योग करत असते. पण हे अगदी क्वचित.

औषधोपचार न घेतल्यास थायरॉईडच्या दुखण्याचे गर्भावर आणि गर्भिणीवर दुष्परिणाम होतातच. गर्भपात, कमी दिवसाची प्रसूती, अशक्त मूल, बाळंतवात (पीआयएच) असे काही काही होते. टोकाच्या केसेसमध्ये काही अधिक गंभीर प्रकारही (थायरॉईड स्टॉर्म) घडतात. ग्रेव्हस् च्या आजारात बाळावर थेट परिणामही संभवतो.

ज्या प्रतिपिंडामुळे ग्रंथीचे स्राव वाढतात ती प्रतिपिंडे वारेतून बाळापर्यंत पोहोचू शकतात. मग बाळाची ग्रंथीही जास्त स्राव निर्माण करते. क्वचित तिचा आकारही वाढतो. त्याहून क्वचित, काही बाळात हा तापदायक ठरेल इतका वाढतो. बाळाची वारंवार सोनोग्राफी करुन, त्याची ग्रंथी तर वाढलेली नाही ना, हे तपासले जाते. या आजारावर उपचार म्हणून कधी कधी आईची ही अति कामसू ग्रंथी ऑपरेशन अथवा किरणोत्सर्गी औषधाने निकामी केली जाते. मग आईला बरे वाटते. पण तिच्या शरीरातील प्रतिपिंडे कायमच असतात.
ती बाळात जाऊन तिथे वरील लोच्या करू शकतातच. तेव्हा अशा रोगमुक्त स्त्रियांत देखील, बाळाची वारंवार सोनोग्राफी करुन, त्याची ग्रंथी तर वाढलेली नाही ना, हे पहिले जाते. बाळात जर ही ग्रंथी अति स्त्राव निर्माण करू लागली तर बाळाच्या नाडीचा वेग वाढतो, कधी याचा हृदयावर ताण येतो, टाळू लवकर भरते, बाळ अशक्त आणि किरकिरे बनते; असे अनेक परिणाम दिसतात. जर ग्रंथीचा ग्रंथोबा झाला तर बाळाला श्वास घ्यायला अडथळा येऊ लागतो.


उपचार

सौम्य आजाराला काहीही उपचार लागत नाहीत. उलट्या जास्त झाल्या तर प्रसंगोपात सलाईन लावावे लागते. गोळ्या घ्याव्या लागतात. 

 


(लेखक स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहेत.)

Web Title: What is the treatment for thyroid problems during pregnancy? how to take care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.