Lokmat Sakhi >Health >Pregnancy > गरोदरपणातलं गोड दुखणं! गरोदरपणातला डायबिटीस आई आणि बाळासाठी किती त्रासाचा, उपाय काय?

गरोदरपणातलं गोड दुखणं! गरोदरपणातला डायबिटीस आई आणि बाळासाठी किती त्रासाचा, उपाय काय?

‘गरोदरपणात उद्भवलेला मधुमेह’ सुमारे ५ ते १० टक्के गर्भवतींत आढळतो हा, म्हणूनच प्रत्येक स्त्री ने, प्रत्येक गरोदरपणात मधुमेहाची चाचणी करून घेणे इष्ट. गरोदरपणाचं गोड ओझं स्त्रिया हौसेनं वागवतात पण, या दरम्यान जर गोड दुखणं जडलं तर, मात्र पंचाईत होते. हे गोड दुखणं म्हणजे गरोदरपणात उद्भवणारा डायबिटीस.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 01:35 PM2021-07-27T13:35:57+5:302021-07-27T13:40:44+5:30

‘गरोदरपणात उद्भवलेला मधुमेह’ सुमारे ५ ते १० टक्के गर्भवतींत आढळतो हा, म्हणूनच प्रत्येक स्त्री ने, प्रत्येक गरोदरपणात मधुमेहाची चाचणी करून घेणे इष्ट. गरोदरपणाचं गोड ओझं स्त्रिया हौसेनं वागवतात पण, या दरम्यान जर गोड दुखणं जडलं तर, मात्र पंचाईत होते. हे गोड दुखणं म्हणजे गरोदरपणात उद्भवणारा डायबिटीस.

pregnancy diabetes ! Gestational diabetes, how to take care , what is the treatment | गरोदरपणातलं गोड दुखणं! गरोदरपणातला डायबिटीस आई आणि बाळासाठी किती त्रासाचा, उपाय काय?

गरोदरपणातलं गोड दुखणं! गरोदरपणातला डायबिटीस आई आणि बाळासाठी किती त्रासाचा, उपाय काय?

Highlightsजर डायबिटीस असेल तर निव्वळ आहार नीट पाळल्याने ८० टक्के स्त्रियांची शुगर आटोक्यात राहते.

डॉ. शंतनु अभ्यंकर

इन्शुलीन हा तर जगप्रसिद्ध संप्रेरक (हॉरमोन). अगदी जीवनावश्यक. तसं शरीरात जीवन–अनावश्यक असे भाग / रसायने जवळपास नसतातच. तर ह्या इन्शुलीनमुळे रक्तातली साखर प्रत्यक्ष पेशींत दाखल होते. मग ती तिथे वापरली जाते. तेव्हा हा नसला किंवा असून गतप्रभ ठरला, तर रक्तशर्करा वाढते पण पेशी उपाशी रहातात, याला म्हणतात डायबिटीस.
दिवस राहिले, की गर्भात आणि वारेत इन्शुलीन हतप्रभ करणारे काही घटक तयार होतात. भरपाई म्हणून आई अधिकचे इन्शुलीन बनवत असते. जवळ जवळ तिप्पट इन्शुलीन बनवले जाते. पण, अशी भरपाई जेव्हा अपुरी पडते तेव्हा आईच्या आणि पर्यायाने गर्भाच्या शरीरातील शर्करा (ह्या लेखात शर्करा/शुगर/ग्लुकोज हे शब्द समानार्थी म्हणून वापरले आहेत) वाढत रहाते. रक्तातली शुगर जास्त वाढली तर ती लघवीतून बाहेर पडते. डायबिटीस मेलायटस ह्या शब्दाचा अर्थच मुळी, मधू-मूत्र !!!
तर असा हा ‘गरोदरपणात उद्भवलेला मधुमेह’ (Gestational Diabetes). सुमारे ५ ते १० टक्के गर्भवतींत आढळतो हा. म्हणूनच प्रत्येक स्त्री ने, प्रत्येक गरोदरपणात मधुमेहाची चाचणी करून घेणे इष्ट.

(छायाचित्र : गुगल)

एखाद्या मधुमेही स्त्रीला गर्भधारणा होणे आणि मूलतः निरोगी स्त्रीला गर्भधारणा झाल्यामुळे मधुमेह होणे; या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. इथे आपण, दुसऱ्या प्रकारच्या आजाराची, म्हणजे ‘गरोदरपणात उद्भवलेला मधुमेहाची’ (Gestational Diabetes) माहिती घेत आहोत.
हा तात्कालिक असतो. प्रसूतीनंतर परिस्थिती पुन्हा पूर्व पदाला येते. तात्कालिक असला, तरी याचे ताप टाळायचे असतील तर, लवकर निदान आणि प्रामाणिक उपचार महत्त्वाचे आहेत. शिवाय प्रसूती नंतर तो परत गेलाय ना हेही पाहावे लागते.
या गोड दुखण्याचा परिणाम म्हणून काय काय दुष्परिणाम होतात ते खाली देतोय. यादीतल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना लागू पडत नाहीत. नीट उपचार घेतले असतील तर, बहुतेकदा काहीही होत नाही. हे लक्षात घेऊनच पुढे वाचावे.
डायबिटीस जडला तर आईचे बीपी वाढण्याची (PIH बाळंतवात) आणि त्यामुळे कमी दिवसाची प्रसूती करण्याची निकड भासू शकते.
डायबिटीस असेल तर मूल गुटगुटीत होते ! म्हणजे त्याचा त्रास व्हावा इतके गुटगुटीत होते. बलदंडच म्हणा ना. चार किलोच्या आसपास वजन सहज भरते (Macrosomia). आता एवढा मोठा देह योनीमार्गे प्रकट व्हायचा तर अवघडच ठरणार. बाळाला आणि आईलाही इजा होण्याचा कितीतरी धोका. मग, अर्थात सीझरचा मार्ग पत्करावा लागतो.
पोटात अति पोषित झालेले हे बालक जन्मतः अन्नासाठी वखवखलेले असते. जरा उपास घडला की याची रक्तशर्करा ढपते (Hypoglycemia). मग शिरेवाटे ग्लुकोज द्यावे लागते. कधी कधी कॅल्शियम आणि मॅग्निशियमची पातळीही घसरते. हे ही द्यावे लागते.
या मधुवंतींच्या तान्ह्यांना बरेचदा ‘कावीळ’ होते. इथे कावीळ म्हणजे जंतूंद्वारे पसरते ती सुपरिचित कावीळ नव्हे. बाळाच्या अंगात असलेले आणि जन्मताच अनावश्यक ठरलेले जास्तीचे रक्त आता विघटित होऊ लागतं. ह्याच्या परिणामी अंगावर पिवळेपणा दिसू लागतो. बाळाला अतिनील किरणांच्या दिव्याखाली ठेवलं की ही कावीळ बरीही होते.
अशा बाळांना जन्मतः श्वसनाला त्रास होतो. यांना फुप्फुसे असतात पण ती पिकलेली नसतात. सबब काही काळ ऑक्सिजन वगैरे लागू शकतो.
जर डायबिटीस असेल तर निव्वळ आहार नीट पाळल्याने ८० टक्के स्त्रियांची शुगर आटोक्यात राहते. मात्र ही आटोक्यात आहे ना, हे वारंवार तपासावे लागते. दिवसातून तीन-तीन, चार-चार वेळाही तपासावे लागते. त्यासाठी घरच्या घरीच तपासणी केलेली बरी. ग्लुकोमीटर मिळतात. ते विकत घ्यावेत. टाळू नये.

(छायाचित्र : गुगल)

काय होत नाही?

आईतील मधुमेहामुळे बाळाला लहान वयात मधुमेह होत नाही. पण तान्हेपणीचे हे सुदृढ बालक पुढे मोठेपणीही गुटगुटीत रहाते. तेव्हा मात्र यालाही मधुमेह वगैरे स्थौल्यस्नेही आजार जडतात. म्हणून अशा मुलांत लहानपणापासूनच योग्य आहार, मैदानी खेळ वगैरेला ‘आईने सक्रिय उत्तेजन’ देऊन योग्य वजन राखले पाहिजे. ‘आईने सक्रिय उत्तेजन’, हे शब्द मुद्दामच अवतरण चिन्हांत टाकले आहेत. कारण गरोदरपणात डायबिटीस जडलेल्या ह्या आईलाही वाढत्या वयात पुन्हा डायबिटीस होऊ शकतो. तेव्हा योग्य आहार, मैदानी खेळ वगैरेची गरज आईलाही असतेच.
हा आजार साधारण पाचव्या-सहाव्या महिन्यानंतर जडतो. बाळाची शरीररचना तीन महिन्यातच पूर्ण झालेली असते. तेव्हा बाळात रचना-दोष, व्यंग आढळत नाहीत.
गोड दुखण्याचे दुष्परिणाम टाळायचे असतील तर, गरोदरपणात सुुरुवातीला एकदा आणि नंतरही किमान दोनदा डायबिटीससाठीची तपासणी केली पाहिजे. तपासणीच्या अनेक पद्धती आहेत. ठराविक ग्रॅम ग्लुकोज खाणे आणि ठराविक कालावधीने रक्त शर्करा मोजणे असे या तपासण्यांचे स्वरूप आहे. ज्या त्या दवाखान्याची काही पद्धत ठरलेली असते, त्यानुसार चेक करायला हरकत नाही. वारंवार दवाखान्यात येणे, वारंवार रक्त तपासणे हे आपल्याकडे अनेकींना अवघड असतं. हे जाणून भारतीय शास्त्रज्ञांनी ७५ ग्रॅम ग्लुकोज खाऊन दोन तासाने एकदाच रक्त तपासण्याची पद्धत विकसित केली आहे (DIPSI). तीच आता सर्वत्र मान्यता पावत आहे.

(लेखक स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहेत.)
faktbaykanbaddal@gmail.com

Web Title: pregnancy diabetes ! Gestational diabetes, how to take care , what is the treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.