Lokmat Sakhi >Health >Menopause > मेनोपॉजच्या काळात सांधेदुखी, हातापायात गोळे येणं असे त्रास सुरु होतात, त्यावर त्वरित उपाय करा...

मेनोपॉजच्या काळात सांधेदुखी, हातापायात गोळे येणं असे त्रास सुरु होतात, त्यावर त्वरित उपाय करा...

रजोनिवृत्तीकाळाचं शरीराचं व्यवस्थापन म्हणून येणारी सांधेदुखी ही एकटीदुकटी येत नसते. ती सोबत चिंता नि काळजी या आपल्या सोबत्यांना आणते. अशा स्थितीत अनेकदा स्नायूंमध्ये सतत एक वेदना जाणवत राहाते किंवा अचानक शरीरात ताठरपण जाणवतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 03:07 PM2021-04-29T15:07:19+5:302021-04-29T15:21:08+5:30

रजोनिवृत्तीकाळाचं शरीराचं व्यवस्थापन म्हणून येणारी सांधेदुखी ही एकटीदुकटी येत नसते. ती सोबत चिंता नि काळजी या आपल्या सोबत्यांना आणते. अशा स्थितीत अनेकदा स्नायूंमध्ये सतत एक वेदना जाणवत राहाते किंवा अचानक शरीरात ताठरपण जाणवतो.

During menopause the muscles become stiff and sore ..... what is the reason behind this pain and stiffness? | मेनोपॉजच्या काळात सांधेदुखी, हातापायात गोळे येणं असे त्रास सुरु होतात, त्यावर त्वरित उपाय करा...

मेनोपॉजच्या काळात सांधेदुखी, हातापायात गोळे येणं असे त्रास सुरु होतात, त्यावर त्वरित उपाय करा...

Highlights पाळी जाण्याचा काळ जसजसा जवळ येऊ लागतो तसतसं शरीराचं काम बरंच बदलतं. हे सगळे बदल अर्थातच हार्मोन्सच्या खेळामुळे होतात.हार्मोनल गडबडीमुळं वजन वाढतं आणि वाढत्या वजनाचा भार सहन न होऊनही स्नायू आणखी दुखतात.रजोनिवृत्तीच्या काळात त्रास देणारी सांधेदुखी डोक्याचा ताप व्हायला नको असेल तर आपल्याला जगण्याच्या पद्धतीत चांगले बदल करून तिची वजाबाकी नक्कीच करता येते!

स्नायूंमध्ये ताठरता किंवा अवघडलेपण जाणवणं हे रजोनिवृत्तीदरम्यान आढळणारं एक नेहमीचं लक्षण आहे. स्नायूंमध्ये असा ताण  जाणवायला लागला की स्त्रियांना कळतं, रजोनिवृत्ती जवळ आलीय! वाढत्या वयाचा भाग म्हणून जी सांधेदुखी होते तीही काही आहारविषयक आणि जीवनशैलीत बदल करून आणि काही विशिष्ट उपचारांचा अवलंब करून कमी होते.
साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास वयाच्या दरम्यान रजोनिवृत्ती होते. स्त्रीच्या गर्भधारणा क्षमतेचा लोप होण्याचा हा टप्पा. या काळात स्त्रीशरीरात इतके हार्मोनल बदल घडतात की त्याचा परिणाम म्हणून बर्‍याच लक्षणांचा जन्म होतो. त्यापैकी एक म्हणजे सांधेदुखी.
रजोनिवृत्तीकाळाचं शरीराचं व्यवस्थापन म्हणून येणारी सांधेदुखी ही एकटीदुकटी येत नसते. ती सोबत चिंता नि काळजी या आपल्या सोबत्यांना आणते. अशा स्थितीत अनेकदा स्नायूंमध्ये सतत एक वेदना जाणवत राहाते किंवा अचानक शरीरात ताठरपण जाणवतो.  वेदना बराच काळ टिकते. कधीकधी हातापायात क्रॅम्प येतात व एकदम दुखून येतं. सततच्या दुखण्यातून स्नायू अगदी नाजूक होऊन बसतात, वेदना सहनशक्तीपुढे जाऊ लागते.

लचकतं- दुखतं का?
पाळी जाण्याचा काळ जसजसा जवळ येऊ लागतो तसतसं शरीराचं काम बरंच बदलतं. हे सगळे बदल अर्थातच हार्मोन्सच्या खेळामुळे होतात. या हार्मोन्सपैकी महत्त्वाचे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. त्यांचं प्रमाण एकाएकी नेहमीपेक्षा खूप कमी होतं. शरीर त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतं, म्हणजेच पाळी जायच्या प्रक्रियेची सुरूवात होते. शरीरात शांतपणा आणि सुरळित कामकाज राखण्याचं काम होतं प्रोजेस्टेरॉनमुळं. त्याचीच पातळी खालावली की स्नायूंमध्ये ताठरता येते, ते वेळी अवेळी मुरगळतात. कॉर्टिझलची पातळी नियंत्रणात ठेवण्याचं काम इस्ट्रोजेनचं. त्याची पातळी मंदावली की कॉर्टिझलची पातळी दाणकन वाढते. त्यामुळं स्नायूंमध्ये टणकपण येतो,  जीव नसल्यासारखं वाटतं. त्यामुळंच रक्तातली साखर वाढते नि रक्तदाबही. ताण, काळजी, वेदनेबद्दल अत्यंत संवेदनशील होणं हा ही त्याचाच भाग. हार्मोनल गडबडीमुळं वजन वाढतं आणि वाढत्या वजनाचा भार सहन न होऊनही स्नायू आणखी दुखतात.

पाठ, खांदे नि मानेचे स्नायू दुखणं हा सर्वसाधारणपणे अवघडणारा भाग. सांधेदुखी किंवा अवघडलेपणामागे हालचालीतील निष्क्रियता, चुकीच्या पद्धतीनं स्वीकारलेली शरीरअवस्था, ताण, चिंतातूरपणा, जुना मुकामार अशीही काही कारणं असू शकतात.

स्नायूंच्या दुखण्यावर उपाय काय?

दुखण्यामुळं आलेली अस्वस्थता नि वेदना कमी करण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करणं आवश्यक आहे. 

- स्ट्रेचिंगचे व्यायाम जाणीवपूर्वक करावेत. त्यातून शरीर लवचिक राहातं. शिवाय स्नायूंमधून होणारा रक्तप्रवाह सुरळित होण्यासाठी व्यायामाची मदत झाल्यामुळे त्यांच्यातला ताण कमी होतो.

- आपल्या शरीराची ठेवण म्हणजेच पोश्‍चर सुयोग्य राखता आल्यामुळं दुखणंखुपणं कमी होतं.

- एन-सेड ड्रग्ज म्हणजेच वेदनाशामक गोळ्यांनी वेदनेला काही प्रमाणात उतारा मिळतो.

- ड जीवनसत्त्वाचा पुरवठा शरीराला होण्यानं स्नायू ठणठणीत राहातात. त्यासाठीचा सोपा उपाय म्हणजे सूर्यप्रकाश. मात्र कधीकधी लक्षणं बघून व तपासण्या करून डॉक्टर त्यासाठीचे सप्लिमेंट देतात.

- शरीराला संपूर्ण आठ तासांची शांत झोप मिळण्यातून फार फरक पडतो. पुरेशा विश्रांतीमुळे शरीर अतिशय ताजंतवानं होऊन निरोगी राहातं. शरीर निरोगी तर मनही निरोगी.

- मसाज करण्यातून शरीरातील स्नायू कार्यरत होतात व विषारी घटकांचं प्रमाण वाढत नाही.

- हिट पॅड वापरण्यातून स्नायूंमधील ताण निवळतो.

- हर्बल थेरपी म्हणून आयसोफ्लाव्होन्सचाही उपयोग होतो.

- आहारात जाणीवपूर्वक काही घटकांचा समावेश करावा लागतो.  शेंगदाणे, सीड्स, ड्रायफ्रूट्स यातून मँग्नेशियमचा उत्तम पुरवठा होतो. आयर्न सप्लिमेंट्सच्या वापरानं स्नायूंना ऑक्सिजन पुरवठा चांगला होतो. ब्रोकोली, दूध अशा अन्नपदार्थांमधून कॅल्शियम मिळतं. पालक, केळी म्हणजे पोटॅशियम रिच फूड. नीट समजून अशा घटकांचा रोजच्या अन्नात वापर करण्यातून सांधेदुखीची तक्रार बरीच नियंत्रणात राहू शकते.
याचा अर्थ असा की रजोनिवृत्तीच्या काळात त्रास देणारी सांधेदुखी डोक्याचा ताप व्हायला नको असेल तर आपल्याला जगण्याच्या पद्धतीत चांगले बदल करून तिची वजाबाकी नक्कीच करता येते!
 

Web Title: During menopause the muscles become stiff and sore ..... what is the reason behind this pain and stiffness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.